09 July 2020

News Flash

सारस्वत

समाधान बापूराव लोकरे नावाचे गृहस्थ एका तालुक्याच्या ठिकाणी राहतात. जवळच्या खेडय़ावर त्यांची चार एकर कोरडवाहू शती आहे. तेवढय़ावर भागत नाही म्हणून ते वडिलांच्या मृत्यूनंतर

| May 5, 2013 01:01 am

समाधान बापूराव लोकरे नावाचे गृहस्थ एका तालुक्याच्या ठिकाणी राहतात. जवळच्या खेडय़ावर त्यांची चार एकर कोरडवाहू शती आहे.  तेवढय़ावर भागत नाही म्हणून ते वडिलांच्या मृत्यूनंतर तालुक्याच्या गावी आले. एका टोकाला लहानसे विटामातीचे घर बांधले. समोरच्या खोलीत किराणा दुकान टाकले. बायको, एक मुलगा, एक मुलगी असा लहानसा संसार रेटू लागले. त्यांचे वय सध्या पंचेचाळीसच्या आसपास आहे. पण एवढय़ावर त्यांचा परिचय संपत नाही (असे त्यांचेसुद्धा म्हणणे आहे.) त्यांना लिहिण्याचा नाद आहे आणि त्यांच्या सहा कथा दैनिक ‘राष्ट्र प्रेम’, साप्ताहिक ‘दुं दुं भि’ आणि ‘बालरंग’ च्या दिवळी अंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी एक तीनशे पानांची वही भरून जाईल इतकी मोठी कादंबरीही लिहिली आहे. काही कविता त्यांनी लिहिल्या आणि ओळखीच्या सुशिक्षित लोकांना दाखविल्या, तेव्हा एकाजणाने त्यांची ‘किराणा घराण्याचे कवी’ अशी टवाळी केली. तेव्हापासून ते उदास झाले, पण आपल्यावर देवी सरस्वतीचा वरदहस्त आहे; त्याशिवाय का आपल्याला लेखन करता येते- असा ते विचार करतात. युद्ध, देशप्रेम, पूर, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा प्रत्येक ज्वलंत विषयावर त्यांनी लेखन केले आहे. आणि सरस्वतीच्या कृपेने एक दिवस हे सगळे पुस्तकरूपाने प्रसिद्ध होईल आणि आपल्याला लेखक म्हणून मान्यता मिळेल, याची त्यांना खात्री होती. ते गावातल्या एकमेव सार्वजनिक वाचनालयातून पुस्तके आणून वाचत. त्यांना माहीत होते की, दु:ख आणि वेदना यातूनच साहित्याची निर्मिती होत असते. आपल्या या ओढगस्तीच्या संसारापासून आपले लेखनच आपल्याला मुक्त करील, अशी त्यांना मनोमन खात्री वाटत होती. आपल्या बायकोला, मुलांना, सोयऱ्या-धायऱ्यांना एक दिवस, आपण वेगळे कोणीतरी आहोत हे समजेल, असे त्यांना ठामपणे वाटत होते. आपल्या खानदानीत आणि जवळ-दूरच्या नात्यात कोणी लेखक पैदा झाला नाही आणि आपण लेखक आहोत, ही जाणीव लोकरे यांना सुखावत असे..
एक दिवस असाच विचार करीत दुकानात बसले असताना, सकाळी अकराच्या सुमारास त्यांना एक गोरे, उंच, नीटनेटके कपडे घातलेले, दाढी-मिशा नसलेला गुळगुळीत चेहरा असलेले गृहस्थ दुकानासमोर उभे असलेले दिसले. रस्त्यावरूनच ते म्हणाले, ‘समाधान बापूराव लोकरे नावाचे लेखक इथेच राहतात का?
लोकरे भांबावून गेले. भारावून गेले. गहिवरून गेले. आयुष्यात पहिल्यांदा एक इतका चांगला माणूस इतक्या आदराने त्यांना लेखक म्हणत होता. ते धावतच बाहेर आले. ‘या या’ म्हणत गुळगुळीत गृहस्थांना दुकानात घेऊन गेले. आतल्या खोलीत जाऊन लोटीपेला घेऊन आले, पण गृहस्थ पाणी प्यायले नाहीत. शांतपणे म्हणाले, ‘तुम्ही बसा शांतपणे. मी चहा घेत नाही. सांगू नका. आपण कामाचे बोलू.’ इतकं नीट शांतपणे व ठामपणे बोलणारा माणूस लोकरे यांनी पहिल्यांदाच पाहिला होता. ते आता काय बोलणार या हुरहुरीने लोकरेंच्या गळ्यात आवंढाच आला. गुळगुळीत गृहस्थ एकेक वाक्य स्वल्पविराम, अर्धविराम आणि पूर्णविराम यांचा नीट उपयोग करीत  बोलू लागले, ‘लोकरेसाहेब, मी शशिकांत विनायक मणेकर. इथे आमच्या नातेवाईकाच्या लग्नात आलो होतो. तिथे कुणाच्या तरी बोलण्यातून कळले की तुम्ही इथे असता. तुमचे नाव मी पूर्वी ऐकले आहे आणि लेखन केव्हातरी वाचल्याचे स्मरते, पण महत्त्वाचे कळले ते असे की, तुम्ही एक कादंबरी लिहिली आहे. मी एक प्रकाशक आहे. ‘अक्षरबंध’ हे नाव तुम्ही ऐकले असेल. ती माझी प्रकाशन संस्था. या संस्थेमार्फत चाळीसेक पुस्तके मी प्रकाशित केली आहेत. त्यापैकी अनेक पुस्तकांना राज्य पुरस्कार व इतर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. काही पुस्तकातील भाग तर अभ्यासक्रमातसुद्धा निवडले गेले आहेत. एक ध्येय म्हणून, आवड म्हणून आणि देवी सरस्वतीची सेवा आपल्याकडून घडावी म्हणून मी हा प्रकाशन-व्यवसाय सुरू केला आहे. आणि मुख्यत: आपल्यासारखे अंधारात असलेले जे सरस्वतीपुत्र आहेत त्यांना प्रकाशात आणावे, असे मला मनापासून वाटते. खरं तर हा व्यवसाय आतबट्टय़ाचा आहे, पण आपल्यासारख्या प्रतिभावंतांच्या सहकार्याने आणि देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने माझी ध्येपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. यात आपले योगदान असावे म्हणून तुम्ही आपली अप्रकाशित कादंबरी ‘अक्षरबंध’ला द्यावी, अशी विनंती करण्यासाठी मी आलो आहे. आपली अनुमती असेल तर आजच तुमचे हस्तलिखित घेऊन जावे असे मला वाटते?
मणेकरांसमोर लोकरे स्टुलावर बसले होते. आपल्या डोळ्यात पाणी येईल किंवा आपण लोळागोळा होऊन मणेकरांच्या पायावर पडू की काय, अशी भीती लोकरेंना वाटू लागली. त्यांनी कसेबसे स्वत:ला सावरले. पाणी किंवा सुपारीही न घेता जाणारे मणेकर त्यांना देवदूतासमान वाटू लागले. हस्तलिखिताची वही घेऊन मणेकर निघून गेले तरी काहीतरी अद्भुत घडल्याप्रमाणे लोकरे आनंदाच्या डोंगरावर बसून होते. टवाळक्या करणाऱ्या गावातल्या लोकांना ही गोष्ट इतक्यात सांगायचीच नाही. एकदम प्रकाशन समारंभाचीच निमंत्रणपत्रिका घेऊन जाऊ.. मात्र बायकोला ही गोष्ट सांगितलीच पाहिजे, असे त्यांना वाटले. ‘माझे पुस्तक छापणारेत प्रकाशक..’ असे सांगितल्यावर ती म्हणाली. ‘भारीची च्यापत्ती नाई अन् भरडासुपारी संपल्ती म्हनून दोन गिराइकं वापस गेल्ती सकाळी, तेवढं सामान आनुन ठुवा..’
.. मग समाधान बापूराव लोकरे यांचा लेखक होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. मणेकर त्यांना जाफ्राबादला बोलावू लागले. एकदा त्यांनी स्पष्टच सांगितले की, त्यांच्या म्हणजे मणेकरांच्या बायकोच्या आजारपणामुळे ते अडचणीत आले आहेत. पुस्तक काढायसाठी पन्नास हजार खर्च येतो, तर लोकरेंनी किमान दहा हजाराची तरी सोय करावी. पुस्तक अर्धे छापून झाले आहे आणि छापखान्याचे बिल द्यायचे आहे. लोकरेंनी भीतभीत काही छापलेली पाने पाहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मणेकर म्हणाले, अहो इथे जिल्ह्य़ाच्या ठिकाणी अव्वाच्या सव्वा भाव असतात म्हणून आम्ही बाहेरगावाहून छापून घेतो. लोकरे घरी परत आले आणि बायकोपोराची नजर टाळून घरात वावरू लागले. मुलीला तिच्या मामाने दिवाळीत चांदीच्या तोरडय़ा केल्या होत्या. त्या लोखंडी ट्रंकेत होत्या. लोकरेंना लाज वाटली एकदाच; पण लेखक होण्याचे स्वप्न हातातोंडाशी आले असताना कच खाणे बरोबर नाही असे त्यांच्या मनाने  घेतले. तोरडय़ा काय पुस्तक निघाल्यानंतर काहीतरी उलाढाल करू आणि पुन्हा ट्रंकेत गुपचूप ठेवून देऊ आणि मणेकरांना दहा हजार पोचले. तोरडय़ा गहाण ठेवून भागत नव्हते, म्हणून विकल्या; तरीही रक्कम पूर्ण होईना म्हणून उधारउसनवार केली आणि मणेकरांची भरती पूर्ण केली.
नंतर मणेकरांनी कळवले की पुस्तकाचे मुखपृष्ठ करायचे आहे तर चित्रकाराला हजार पाचशे तरी द्यावे लागतीलच, तेवढे तातडीने पाठवा. लोकरेंनी पाठवले. लोकरेंच्या बायकोला असे वाटायला लागले की, आपल्या नवऱ्याची नजर आजकाल घरभर इथे तिथे काही तरी शोधत असते आणि या किंवा त्या वस्तूवर बराच वेळ खिळून राहते.
मध्ये एकदा मणेकरांकडे गेले तेव्हा वीस रुपयाच्या की शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लोकरेंच्या सह्या त्यांनी घेतल्या. ‘हा ‘करारनामा’ आहे. याच्या झेरॉक्स प्रती काढतो व नंतर तुम्हाला पाठवतो’, असे म्हणाले. नंतर मणेकरांचा निरोप आला की तुम्ही नवोदित लेखक आहात, तुम्हाला कोणी सध्या ओळखत नाही म्हणून पुस्तकाला प्रस्तावना हवी. तेव्हा लवकर कोणाकडून तरी लिहून घ्या न् पाठवा. पुस्तक खोळंबलेय. की मी लिहवून घेऊ इथेच?’
एकदम घाबरून लोकरेंनी कळवले, ‘नको, मी पाठवतो.’ मग लोकरे स्थानिक महाविद्यालयातील मराठीच्या निवृत्त होऊ घातलेल्या विभागप्रमुखांकडे गेले. ते प्राध्यापक गेल्या तीस वर्षांपासून ‘ज्ञानराज माउलींचे पसायदान’ या एकाच विषयावर छोटय़ा-छोटय़ा गावात व्याख्यान देत असायचे. ‘विनामूल्य लेखन केले तर लेखकाची किंमत राहात नाही’ असे सुरुवातीलाच सांगून प्रस्तावनेसाठी तीनशे रुपयांची मागणी प्राध्यापक महोदयांनी केली. अखेर हो-नाही करताकरता दोनशे रुपयांवर सौदा तुटला.
पुस्तकाचा प्रकाशन समारंभ करायचा का, असे मणेकरांनी विचारताच लोकरेंना दरदरून घाम फुटला. लोकरेंनी एक-दोन प्रकाशन समारंभ जवळून पाहिले होते. विशेषत: प्रकाशनानंतरचा समारंभ पाहून तर ते पळूनच आले होते.
अखेर एक दिवस पुस्तकांचा गठ्ठा आला. त्यात दहा प्रती होत्या. मुखपृष्ठावर फक्त वेडीवाकडी अक्षरे होती. ‘दु:खाचा कडेलोट’ हे कादंबरीचे शीर्षक इतके जाड टायपात होते की आकारात कोंबून बसवल्यासारखे वाटत होते. आपले पूर्ण नाव- ज्यात वडिलांचेही असावे असे वाटत होते- तसे न छापता केवळ ‘समाधान लोकरे’ असे लेखक म्हणून छापले होते. लोकरेंनी अर्पणपत्रिका वाचली. आई-वडिलांच्या स्मृतीला पुस्तक अर्पण केले होते. बायको, मुलगा आणि मुलगी यांचे आभार मानले होते. मुलीचे नाव वाचताना लोकरेंना तोरडय़ा आठवल्या आणि भडभडून आले..
काही दिवसांनंतर मणेकरांचा निरोप आला तेव्हा जड पायाने लोकरे गेले. मणेकर म्हणाले, ‘मी सध्या घाईत आहे. वेळ नाही. पण तुम्हाला यासाठी बोलावले की, इथली एक संस्था दरवर्षी वीस लेखक-कवींना पुरस्कार देते. समारंभ मोठा असतो. त्याला एक मोठा लेखक व एक मंत्री येतात, पण आजकाल आयोजनाला खर्च खूप येतो. त्यांची वीसजणांची यादी तयार होती, पण त्यातला एक कापून तुमचे नाव त्यात टाकतो. एक हजार ताबडतोब उद्याच्या उद्या पाठवून द्या..’
लोकरे विषण्णपणे हसले. आता विकण्यासारखे काही नव्हते. किराणा दुकान बंद पडल्यात जमा होते, पण बक्षीस आता नाही मिळाले तर पुढची शाश्वती काय? लोकरेंनी हिंमत केली. एक हजार रुपये व्याजाने काढले. मणेकरांना नेऊन दिले. बक्षीस समारंभात रांगेत उभे राहिले. पन्नास रुपये फोटोग्राफरला देऊन एक कॉपी घेतली. पाकिट उघडले तेव्हा त्यात घोषित केलेली बक्षिसाची रक्कम नव्हती. संस्थेचे प्रमाणपत्र होते!
लोकरे आणि मणेकर दोघेही सरस्वतीचे पुत्र! पण या दोघांच्या कार्याची देवी सरस्वतीला काही माहिती आहे किंवा नाही, हे कळावयास मार्ग नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2013 1:01 am

Web Title: story of a writer
टॅग Story
Next Stories
1 विकारविलसित
2 आपुलाचि संवाद तुकोबाशी
3 कवीपेक्षा कविता मोठी!
Just Now!
X