अनिकेत आणि निरंजन.. दोघेही एकांडे आणि तंद्रीखोर. काळोख आवडणारी ही जोडगोळी. कितीतरी दिवस अनिकेत एकटाच काळोखाशी संवाद साधत होता. पण एके दिवशी त्याला त्याच्याच वयाचा निरंजन हा मित्र भेटतो आणि त्याची कोंडी फुटते. अनिकेत खूश होतो.
ख रं म्हणजे कथालेखन किंवा कादंबरीलेखन हा माझा पिंडच नाही. पण तरीही एक लघुकादंबरी खूप दिवस मनात घोळते आहे.. तिचं शीर्षक आहे- ‘अनिकेत.. निरंजन’. ती संकल्पित लघुकादंबरी म्हणजे या दोघांची गोष्ट आहे. हे दोघे माझे खूप जवळचे जिवलग सांगाती आहेत.. मी त्या दोघांचा आजवरचा सगळा प्रवास जवळून पाहिला आहे. आणि खरं तर त्यांनीही माझा. याचा अर्थ आम्ही अखंड एकत्र असतो किंवा होतो असं मुळीच नाही. पण कितीही दूर राहिलो आणि कितीही काळ भेटलो नाही तरी आम्ही दुरावत नाही.. इतकंच नाही, तर आमचा मधला प्रवासही आम्हाला न पाहता, न सांगताही एकमेकांना कळत राहतो, इतके आम्ही तिघे एकमेकांना ओळखतो, किंवा ओळखून आहोत. पण इतकं असूनही ही लघुकादंबरी माझ्याकडून लिहिली जात नाही आणि पुढेही ती लिहिली जाईल, असं वाटत नाही. ते लेखन आपल्या हातून पूर्ण व्हावं, असं मात्र फार तीव्रपणे वाटतं आहे. त्यामुळेच त्यातला थोडा अंश या लेखनाच्या ओघात लिहून पाहावा, असं मनात येत आहे. कारण त्या दोघांच्या गोष्टीचा एक तरल धागा कविता सखीशी कुठेतरी जुळेल, असं वाटतं. पाहू या..
आपलं बालपण ज्यांना खडा न् खडा आठवतं अशा महाभागांपुढे अनिकेतला केवळ चकाचौंध व्हायला होतं..  एका महाकवींना तर जन्मताच त्यांना ज्या टॉवेलात गुंडाळलं होतं त्याचा उबदार मुलायम स्पर्शही आठवायचा म्हणे! तो टॉवेल अंगाभोवती गुंडाळणाऱ्या त्या ‘सुस्वरूप’ परिचारिकेचं बोट आपण घट्ट पकडून तिला हलकेच डोळा कसा घातला होता, ही आठवण ते कशी काय विसरले तेच जाणोत! सांगायचा मुद्दा, अनिकेतला आपलं बालपण वगैरे असं काही सुतराम आठवत नाही. खरं म्हणजे आठवावंसं वाटतही नाही. म्हणजे ते फार क्लेशदायक वगैरे होतं, असं मुळीच नाही. उलटपक्षी शेंडेफळ म्हणून तो भलताच लाडाकौतुकातच वाढला होता.. पण तरीही त्या बाल्यातील स्मृती वगैरे जे काही म्हणतात ते केवळ त्याच्या आयुष्यातूनच नव्हे तर स्मृतीतूनही बरंचसं पुसलं गेलेलं आहे. नाही म्हणायला काही भलेबुरे तपशील मात्र तुटक तुटक जाणवतात. उदाहरणार्थ, बालपण व्यापून राहिलेला एक अशक्तपणा. मग अपरिहार्यपणे येणारं अंथरूण, कडू औषधं आणि काही न खातापिता डोळे मिटून पडून राहणं, दिवसचे दिवस.. तेव्हा एक विचित्र स्वप्न वारंवार त्याला पडायचं. दोन अवाढव्य, थुलथुलीत माणसं आगगाडीतल्या गर्दीत रेटून बसावीत तशी त्याच्या दोन बाजूंना बसलेली आणि त्या दोघांच्या सापटीत तो हळूहळू चेंगरत चाललेला.. एका क्षणी तो घुसमटतच जागा व्हायचा.. पण जागं झाल्यावरही त्याच्या सर्वागावर तो पालीसारखा थंडगार गिळगिळीत मांसल स्पर्श कितीतरी वेळ तसाच रेंगाळत राहिलेला.. केवळ त्या दिवास्वप्नातच त्याला दिसणारी त्याच्या कल्पनाविश्वातली ती मानवी रूपं पुढे बऱ्याच मोठेपणी काही प्रमाणात त्याला प्रत्यक्ष पाहायला मिळाली. सुमो मल्लांच्या विद्रूप रूपांत..
अनिकेतची आई अधूनमधून माहेरी म्हणून पुण्याला यायची. आपल्या अगत्यशील बंधुराजाच्या घरी महिना महिना तळ ठोकायची. खरं तर तिला सख्खं असं हक्काचं माहेर नव्हतंच. पण या चुलत भावंडांनी ती कसर पुरेपूर भरून काढली होती. त्यामुळे तिच्या बहिणी, त्यांची मुलंमुली असा मोठा गोतावळा जमलेला असायचा. ‘गाडय़ाबरोबर नळ्याची यात्रा’ या म्हणीनुसार अनिकेताची यात्रा इथंही खेचली जायची.. छोटय़ामोठय़ा माणसांच्या गर्दीतलं घुसपटलेपण म्हणजे काय, हे त्याला प्रथम इथं कळू लागलं. पुन्हा यामधे त्या भोवतालच्या चैतन्यानं रसरसलेल्या कुटुंबकबिल्याचा कणभरही दोष नसायचा. या महाराजांचा मुखदुर्बळपणा, खाण्यापिण्याच्या अशक्यकोटीतल्या खोडी आदी गुणविशेषांमुळं त्यांची ही स्वत: ओढून घेतलेली घुसपट असायची. पण ती तशी होती, त्याला कोण काय करणार? पण मग या सगळ्यातून सुटका करणारी एक जागा त्याला एके दिवशी सापडली. मामाच्या वरच्या मजल्यावरील खोलीकडे जाणारा, स्वयंपाकघर व आजींची देवघराची खोली यांच्यामधील भिंतीतून जाणारा एक चिंचोळा अंधारा जिना.. अंघोळ, सकाळची न्याहारी (पानात पेजेसारखा वाहणारा गुरगुटय़ा भात, िलबाचं लोणचं किंवा मेतकूट.. या सगळ्याच गोष्टी त्या रुग्ण दिवास्वप्नातील गिळगिळीत सुमो पहिलवानांची आठवण देणाऱ्या..) सोबत, त्या घरच्या भारदस्त पण मायाळू आजींचा सल्ला ‘अरे बाळा, या आटवलाचे चार ऊन ऊन घास खावेत, गोऽड लागतात.’ हा गोड खाद्यपदार्थाशी जन्मजात वैर घेऊन आलेला. या दिव्य बाळाला होणारा दैनंदिन आग्रह, झाल्यास तर दिवस व रात्रीची दोन जेवणं इत्यादी.. तर भोवतालच्या या अशा सक्तीच्या सार्वजनिक कार्यातून मुक्तता होताच, हा जीव त्या जिन्याच्या आसऱ्याला जायचा आणि परमसुखी व्हायचा..
केवळ एकटा अनिकेतच बसू शकेल इतकी चिंचोळी जागा, दोन्ही बाजूंना जवळजवळ खांद्यांना स्पर्श करतील अशा डोळ्यांना न दिसता जाणवणाऱ्या गार भिंती, ढुंगणाला चड्डीतूनही जाणवणारा पायरीच्या लाकडाचा कठीण शीतल स्पर्श आणि या सर्वानिशी त्याला आपल्या विलक्षण संजीवक मिठीत मिटून टाकणारा दिव्य अंधार.. हे सारं त्याला एका कुठल्यातरी अनोख्या विश्वात घेऊन जायचं.. ते विश्व नक्की काय होतं हे त्याला तेव्हाही सांगता येणारं नव्हतं आणि आजही ते तसं स्वसंवेद्य असंच म्हणावं लागेल. त्या जिन्यातून कुणाची ये-जा अशी फारशी नसेच.. वरच्या मजल्यावरची खोली मामाची अभ्यासिका.. तोच अधूनमधून दडदडत खाली उतरायचा. एक दोन वेळी तो अनिकेतच्या आईला म्हणालाही, ‘अगं, हा पोरगा अंधारात बसलेला असतो.. मला हे लक्षात ठेवायला पाहिजे..’ स्वत:च्या अभ्यासिकेत लेखनतंद्री जमवणाऱ्या मामाला भाच्याचा हा जगावेगळा एकांत खटकला नसावा बहुतेक.. त्यामुळं तो निर्वेध चालू राहिला, महिनोन्महिने.. वर्षांनुर्वष.. एकेदिवशी अचानक पाठीमागून त्या काळोखातच एक कोवळा बालस्वर उमटला.. ती हलकेच घातलेली साद होती.. ‘अनिकेत..’ अनिकेतनं माग वळून पाहिलं.. त्याच्याच वयाचा, आकारमानाचा एक हसरा पोरगा त्याला हाकारत होता.. त्या तसल्या काळोखातही दोघे एकमेकांना स्वच्छ दिसले.. कोवळ्या उन्हासारख्या आवाजात तो बोलला- ‘तू अनिकेतच ना, मी निरंजन..’’
हा अनाहूत पोरगा कोण आणि आणि मुळात इथे कधी, कसा आला, आपल्या नकळत? या गोंधळाचा उलगडा त्याच्याकडून झाला. ‘‘अरे, मी तुझा कसला तरी भाऊच आहे म्हणे.. तासभरापूर्वीच आम्ही इथं आलो.. आणि हा आत्ताच तर तुझ्या जवळूनच मी इथं येऊन बसलो. तुझी जाम तंद्री लागली होती.. अशी तंद्री मलाही ज्याम आवडते.. त्याचा तो ‘ज्याम’ हा शब्दप्रयोग अनिकेतलाही ज्याम आवडला. प्रत्यक्षात बाटलीतील जामशी त्याचं आयुष्यभरांत सख्य जमलं नसलं तरीही.. मग नंतर निरंजनकडूनच त्याला कळलं की, तोही आता वडिलांच्या बदलीमुळे अनिकेतच्या गावीच राहायला येतो आहे. तो अगदी म्हणजे, अगदी अनिकेतच्या वयाचा आहे. म्हणजे साल, महिना, दिवस, वेळ सगळं एकसारखं, खरं म्हणजे एकच.. आजकालच्या एखाद्या पॉप्युलर टी.व्ही. मालिकेतल्यासारखं. कहर म्हणजे, दोघांच्याही जन्माचं ठिकाणही एकच. ते सगळं जाऊ दे. पण हा निरंजनही आपल्याच गावी राहणार म्हणजे जाम धमालच की. आपलं गाव टीचभर छोटंसं. परिसर एक; म्हणजे शाळाही एकच. म्हणजे वर्ग एक, बाक एक हेही ओघानंच येणार. थोडक्यात, आपलं ते अशक्त एकलकोंडेपण संपलं म्हणायचं.
अनिकेतची एक कोंडी जणू फुटलीच. आता त्या स्वप्नातल्या गिळगिळीत सुमो पैलवानांना भ्यायलाच नको. कारण हा निरंजन त्यांना पळवूनच लावील.. शिवाय पुन्हा हा तसा आपल्यासारखा एकांडा आणि तंद्रीखोरही, म्हणजे दोघांनाही एकमेकांचा तसा उपद्रव नाही. असली तर मस्त संगतच, बरोबर असताना आणि नसतानाही.. म्हणजे अगदी ‘जिंदगीभरका साथ’च म्हणा की.. कारण दोघांनाही जोडणारा दुवा म्हणजे हा सलामीलाच भेटलेला तेजाळ काळोख. तर आता, अनिकेतच्या भोवतालचं ते अगम्य दुर्धर कवच हळूहळू म्हणजे अगदी हळूहळू.. का होईना, पण वितळणार.. नक्कीच.
स्वत:ला अखंड आत आत ओढत राहणारा एक सुरवंट बहुधा तिथपासून बदलू लागला. स्वच्छ प्रकाशातील रंगीत फुलपाखरू होण्याच्या दिशेनं.. ही किमया बहुधा त्या जिन्यातील जिवलग, अवलिया, निरंजन काळोखाच्या शब्दातीत नात्याची म्हणायला हवी. बहुधा कशाला? नक्कीच!