मीजसजसा जाणता आणि मोठा होत गेलो, तसतशी मला तिच्यातली सुप्त वेडीबागडी आणि भाबडी छोटी मुलगी प्रकर्षांनं दिसत-भासत राहिली. तिच्या निरागस मनोभावांची आणि त्यातल्या सुख-दु:खाची कहाणी सांगायची म्हटलं तर एक वेधक लघुकादंबरी आकार घेईल. ते जेव्हा व्हायचं तेव्हा होईल, पण आज तिच्या माझ्यावरच्या एका अनमोल ऋणाची छोटीशी गोष्ट सांगावी, असा मानस आहे. आपल्या सर्वात अधिक जवळच्या व्यक्तींसंदर्भात आपण फार बेफिकीर आणि अन्यायकारक वागत असतो. हे आपण हेतूपुरस्सर करतो किंवा त्यामागे त्या व्यक्तीविषयी आपण कृतघ्न असतो, असं मुळीच नाही. कदाचित त्या व्यक्तींचं आपल्या सर्वाधिक जवळ असणं हेच यामागचं मूळ कारण असू शकतं, हे योग्य नाही, हेही कळत असतं; पण तरीही कळतं, पण वळत नाही या चिरंतन वास्तव्याचीच प्रचीती पुन:पुन्हा येत राहते. तर अशा या अन्यायाला बळी पडणाऱ्या आपल्या जिवलग व्यक्तींमध्ये सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे आपली आई.

मी मातृमुखी (आणि म्हणून सदासुखी) आहे, असं मी ऐकून होतो. पण गेल्या काही वर्षांतली माझी छायाचित्रं पाहताना या म्हणण्यात नक्की तथ्य आहे, असं मलाही वाटू लागलं आहे. विशेषत: पापण्यांवर ओथंबू पाहणारी मऊ कातडी असलेले आणि त्यामुळे चिनीमकाव वाटणारे डोळे आणि टोकाशी फुगीर असलेल्या नाकाच्या अग्रावरची प्रशस्त टेबललँड या खुणा ही खास आईची रूपवैशिष्टय़ं माझं मातृमुखीपण सिद्ध करायला पुरेशी आहेत. मात्र, हे साम्य बाहय़ांगापुरतंच म्हणावं लागेल. आईचं विलक्षण सहृदय अंत:करण पुरतेपणी आलंय ते दादाकडे. गंमत म्हणजे वडिलांची रेखीव रूपमुद्रा त्यानं घेतली आहे आणि त्यांच्यामधली आतली परखड विश्लेषणात्मक वृत्ती माझ्यात पुरेपूर उतरलेली दिसते. आई-वडिलांच्या रूपगुणांचा खराखुरा सुवर्णमध्य मानावा असा समन्वय उतरला आहे, तो आमच्या हेमाताईमध्ये. ही एकूण वाटणी मला नेहमीच फार रसमय वाटते. आमच्या आईबद्दल आजवर वेळोवेळी निमित्तानिमित्तानं आमच्या कुटुंबापुरतं खूप बोलणं होत आलं आहे. पण तरीही तिच्याबद्दल समग्रपणे असा विचार करण्याची निदान माझी तरी ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल. नाही म्हणायला सहा-सात वर्षांपूर्वी एका मुलाखतीनिमित्तानं मी आईविषयी त्यामानानं बराच सविस्तर असा प्रथमच बोललो होतो. त्यानंतर अगदी नुकतंच प्रमोदिनी वडके-कवळेंनी माझ्या आईसंबंधी काही विचारताना, यापूर्वी कुणीही न विचारलेला प्रश्न विचारला होता. तुमच्या कलावंत म्हणून झालेल्या घडणीत तुमच्या आईचा काय सहभाग आहे? क्षणभर या प्रश्नानं मी बऱ्यापैकी गोंधळलो होतो. कारण तोपर्यंत मी हा विचारच कधी केला नव्हता. त्यामुळे असं काही नेमकं सांगता येण्याजोगं नाही बुवा, असं उत्तर द्यायच्या मी बेतात होतो. तेवढय़ात माझ्या मस्तकात लख्ख प्रकाश पडला आणि मी म्हणालो, माझं सांगीतिक व्यक्तित्व आणि मुख्य म्हणजे माझं गाणं जोपासलं जाण्याचं श्रेय सर्वार्थानं केवळ आईलाच द्यायला हवं. काय मौज आहे पहा. आई जिवंत असताना तर नाहीच, पण ती गेल्यावरदेखील तब्बल पंधरा वर्षांनी हा साक्षात्कार माझ्या मुखावाटे प्रकट झाला होता. मी आरंभी मांडलेल्या वस्तुस्थितीच्या कबुलीची ही एक प्रचीतीच ठरू शकेल. आमच्या कीर्तनकार वडिलांचं सर्वागसुंदर कलावंतपण आणि त्यांचे आम्हा तिघाही भावंडांवर झालेले संस्कार ही इतकी प्रभावी आणि सर्वमान्य गोष्ट होती, की त्यापलीकडे त्या वारशाचा काही अंश आईमधूनही आपल्याकडे आला असेल ही शक्यताही मनानं त्यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती आणि म्हणून स्वीकारलीही नव्हती आणि तरीही त्या क्षणी एका क्षणात ते उत्तर स्वत:लाही नकळत माझ्या ओठावाटे बाहेर पडलं. कारण ते निखालस सत्य होतं, नव्हे आहेच.

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

मी लहानपणी भलताच बुजरा होतो. बाहेरच्या जगाला सामोरं जाणं तर सोडाच, पण घरातील गुणवंतांनाही मी, त्यांचा कुणाचा कसलाही दोष नसताना उगीचच बुजायचो. त्यामुळे न घाबरता व्यक्त होण्याची माझी एकमेव हक्काची जागा होती, ती म्हणजे आई. माझा मीच पेटी वाजवायला शिकलो आणि यथावकाश वादक म्हणून मी प्रथम प्रकट होऊ लागलो, तो फक्त आईपुढे. आईचाही आवाज गोड होता आणि हलक्या मधुर स्वरात ती खूप गाणी म्हणायची. त्यातलंच एक गाणं ‘पंढरीनाथा झडकरी आता’ हे भावगीत एके दिवशी ती गात असताना मी अनपेक्षितपणे तिची साथ केली. तेव्हा स्वत: तर ती आनंदलीच, पण बाहेरच्या खोलीतून वडील कोण पेटी वाजवतंय, ते पाहायला माजघरात आले आणि त्यांची चाहूल लागताच अस्मादिकांनी पोबारा केला. अर्थात पुन्हा पुढे बरीच र्वष त्यांना हे श्रवणभाग्य लाभलं नाही. पण आईची अशी छुपी साथ करीतच माझा हात पेटीवर छानपैकी स्थिरावला. हळूहळू नंतर मग मी पेटीच्या स्वरात माझाही स्वर मिसळू लागलो. मुक्त गळ्यानं मनसोक्त गाऊ लागलो. दादा, हेमाताई छान छान गाण्यांची घरामध्ये आयात करायचे. ते गात असताना माझी केवळ मूक श्रवणभक्ती चालायची. पण नंतर मात्र कधीतरी संधी साधून आईसमोर माझी गान-अभिव्यक्ती. त्यानंतर मग माझं स्वत:चं रेडिओश्रवण सुरू झालं आणि माझ्याजवळचा हिंदी-मराठी गाण्यांचा खजिना वाढत चालला. लता, गीता दत्त, आशा भोसले, मुबारक बेगम, तलत महमूद, रफीसाहेब, मुकेश, मन्ना डे, किशोरकुमारपासून ते थेट पाकिस्तानस्थित नूरजहाँ, इक्बाल बानू, एस. बी. जॉन, सलीम रझाक आणि मुनीर हुसेनपर्यंतच्या गानप्रतिभांचं श्रवण-अध्ययन सहज घडू लागलं. पाठोपाठ त्या श्रवणयज्ञावर विचार रियाजही सुरू झाला. पुरुषांनी फक्त पुरुषांचीच गाणी गावी आणि स्त्रियांनी स्त्रियांची हा बुरसट भेदभावविचार मनात कधी उपजलाच नाही. मला आवडलेली सगळी गाणी मी बिनधास्त माझ्या पट्टीत आणि माझ्या शैलीतही गात राहायचो. हा सगळा धबधबा प्रामुख्यानं कोसळायचा तो आईसमोरच. तीही पठ्ठी मस्तकावर गंगौघाचा आवेग लीलया झेलणाऱ्या शिवाच्या थाटात तो सगळा भडिमार तल्लीन होऊन ऐकायची. त्यामुळे मुख्य म्हणजे मी अखंड गाता राहिलो. एरवी कसलेही अधिकृत शिक्षणसंस्कार न लाभलेला आणि कुठलीच शिस्तबद्ध निगराणी नसलेला माझा गळा कधीच आतल्या आत सुकून गेला असता.

त्याच काळात ‘गीतरामायण’ प्रभावित झालं. त्या गीतांचे प्रतिध्वनी निनादत ठेवणं ही तत्कालीन कुठल्याही गात्या गळ्याची अपरिहार्य निकड होती. मी तरी त्याला अपवाद कसा असेन? तिथंही आमच्या मातोश्री हा आमचा एकमेव तल्लीन श्रोता. हा सिलसिला अगदी पुण्यात येईपर्यंत अखंड चालला. पुण्यात आल्यावर माझ्यातील कवी प्रकट होऊ लागला आणि त्या जोडीला माझ्यातील संगीतकारही. ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा’ ही माझी पहिलीवहिली अधिकृत चाल आईसमोरच साकार झाली आणि ‘स्वतंत्रते भगवती’ हा गीतसमूह तिच्या साक्षीनंच उलगडत गेला.

कुठलीही कलासाधना ही एरवी कितीही एकांतगर्भ आणि स्वगतरूप असली तरी तिला अभिव्यक्तीचा निखार लाभतो तो झंकारत्या, तन्मय श्रोतृवृंदामुळेच. तो मला सत्तरच्या दशकापासून पुढे आजतागायत चढत्या-वाढत्या श्रेणीत मिळत राहिला आहे. पण त्याआधी मात्र त्याची जागा केवळ एकटय़ा आईनं स्वत:च्या संगीतवेडावर तोलली होती. आधीच्या अज्ञातवासाच्या प्रदीर्घ काळोखात, माझ्या गळ्यात भिजलेल्या स्वराची एकाकी आत्ममग्न ज्योत अखंड तेवती ठेवण्याचं बहुमोल काम आईनं निरागस सहजभावानं केलं आणि म्हणूनच पुढचा सगळा श्रेयलाभ हा दोन पायांवर उभा राहू शकला, असं मी आज उच्चरवानं ठामपणे म्हणू इच्छितो.

स्वत:च्या आयुष्याचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग पाडून पाहू लागलो की, तो सगळा प्रवास आज स्वत:लाच अविश्वसनीय वाटू लागतो. इतका की, जणू एकाच जन्मात दोन जन्म अनुभवायला मिळावेत. स्वत:ची स्वत:शी ही अवस्था, तर मग भाबडय़ा निरागस मुलीची मनोवस्था घेऊन अखेपर्यंत जगलेल्या आमच्या आईची काय गोष्ट? अगदी अखेरच्या काळात एके दिवशी तिनं त्याच बालभावानं अचानक मला विचारलं, आज हे जे तू काय काय करतोयस, ते तू कुठं आणि कधी शिकलास रे?

मला हसू आलं. वाटलं, तिला म्हणावं, ‘येडे पोरी, अगं तुझ्या अगदी समोर, तुझ्या साक्षीनंच तर सगळं शिकत होतो ना मी.’

पण नेहमीप्रमाणे तेही सांगायचं राहूनच गेलं.