News Flash

अरतें ना परतें.. : बहिऱ्यामुक्यांची दिंडी

माझे हे सहकारी त्या मुलाच्या कुटुंबाला थोडंफार ओळखत होते.

प्रवीण दशरथ बांदेकर

कॉलेजची भित्तिपत्रिका प्रदर्शित करायची होती. त्यासाठी साहित्य द्या, म्हणून विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं. कविता, लेख, कथा, चुटकुले असं काहीबाही लेखन मुलं आणून देत होती. काल असाच आपल्या कविता घेऊन एक बुजरासा दिसणारा मुलगा आला होता. कवितेखाली त्यानं त्याचं नाव लिहिलेलं होतं. त्यावर नजर जाताच मी चमकलो. काहीतरी विचित्र जाणवलं. असं कसं एखाद्याचं नाव असू शकतं? की त्यानं मुद्दामहूनच तसं काही लिहिलंय.. टोपणनावासारखं? जाणून घ्यावं म्हणून काहीशा कुतूहलानं मी विचारलं, ‘‘नाव काय रे बाळ तुझं? हे लिहिलंय तेच, की..’’

‘‘हो, सर! हे माझंच नाव आहे. संत तुकाराम बाबाजी सावंत.’’

‘‘संत तुकाराम? की नुसतंच तुकाराम आहे मुळात.. नि तू कवितेसाठी म्हणून संत तुकाराम केलंयस?’’

‘‘नाही सर, संत तुकाराम असंच आहे माझं नाव.’’

मला आश्चर्य वाटलं. याच्याआधी मी असं नावामागे संतबिंत असलेलं कधी ऐकलं नव्हतं. संतांची किंवा देवाबिवांची नावं मुलांना ठेवायची खूप जुनी प्रथा आहे आपली. इकडे कोकणात तर हे खूपच कॉमन आहे. विशेषत: पूर्वजांच्या आठवणीसाठी म्हणून आजोबा-पणजोबांचं नाव नातवाला दिलं जातं. त्यामुळे आजच्या आधुनिक नावांच्या जमान्यातही आमच्याकडे महादेव, रवळनाथ, पांडुरंग, विठ्ठल, नामदेव, एकनाथ अशी नावं घराघरांत दिसून येतात. हे समजू शकलो, तरी ही नावं कुणी ‘श्रीदेव महादेव’ किंवा ‘संत नामदेव’ अशी काही ठेवत नाहीत.

मग हे असं नाव त्याच्या आई-वडिलांनी का ठेवलं असावं? विचार करूनही उत्तर सापडत नव्हतं. डोक्यातून विषयही जात नव्हता.

कॅन्टिनमध्ये चहा पिताना सहकारी शिक्षकांना म्हटलं, ‘‘याच्या घराण्यात काय वारकरी परंपरा वगैरे आहे की काय? तसं जरी असलं तरी अशा कुटुंबांतही मुलांना संतांची नावं ठेवली तरी ती ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम अशीच ठेवली जातात. मला यांचं हे जरा अतीच भक्तिभाव दाखवणं वाटतंय किंवा मग भाबडेपणा तरी!’’

माझे हे सहकारी त्या मुलाच्या कुटुंबाला थोडंफार ओळखत होते. ते म्हणाले, ‘‘अहो सर, याचे वडील त्या अमक्यातमक्या धर्मरक्षक संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पंथाचं म्हणणं आहे की, मुलांना मुळात ही अशी देवादिकांची नावं ठेवायचीच नाहीत. अपमान होतो आपल्या देवाधर्माचा. धार्मिक भावनाही दुखावतात.’’

‘‘पण देवाचं वा संताचं नाव तर आपण त्यांच्याविषयी आदर असल्यामुळेच ठेवत असतो ना? त्यामुळे कशा काय कुणाच्या भावना दुखावल्या जाणार आहेत? आणि आपली तर ती कितीतरी वर्षांची परंपरा आहे.. मग आताच असं काय झालं?’’

‘‘सर, त्यांचं म्हणणं आहे- नाव ठेवताना आदर असला तरी पुढे त्या नावाचं आपण काय करतो? त्याला एकेरी संबोधतो, रागावतो, शिव्या देतो, नावाची मोडतोड करतो. त्यांना असं वाटतं की, देवाच्या किंवा संतांच्या नावांमध्ये एक अद्भुत शक्ती असते. एक प्रकारची अदृश्य ऊर्जा असते. नावाची अशी हवी तशी वाट लावून आपण त्या महान पुरुषांचा तर अपमान करतोच, पण ती अद्भुत शक्तीही नष्ट करून टाकतो.’’

‘‘कमाल आहे! हे असं काही असू शकतं हे आजवर कुणालाच कसं कळलं नव्हतं? चुकीची नावं उच्चारून किती ऊर्जा वाया घालवली आपण. तरीच आपण महाशक्ती होता होता राहिलो!’’

‘‘आता याच्या बापाला तर आपल्या बापाच्या आठवणीसाठी तुकाराम हेच नाव याला ठेवायचं होतं. पण ‘तुकाराम’ असं म्हटलं तर तुकाराम महाराजांचा अपमान होतो. यावर तोडगा काय, तर हे असं ‘संत तुकाराम’ हे नाव ठेवणं. त्यामुळे एकेरी नाव घेणं आपसूकच टळतं नि संतांविषयीचा आदर कायम राहतो.’’

हे ऐकल्यावर मात्र संत तुकारामाच्या त्या धर्मरक्षक बापाविषयी माझ्या मनात अपार आदराची भावना दाटून आली. एका दगडात किती पक्षी मारले होते त्यांनी. कुणालाही दुखावलं नव्हतं, कुणाचाही अनादर होऊ दिला नव्हता, आपल्या पूर्वजांचीही स्मृती जतन केली होती. शिवाय एक नवा पायंडाही पाडला होता. आता तुमच्या मनात असो-नसो, संतांची आणि ऐतिहासिक महापुरुषांची नावं तुम्हाला आदरानंच घ्यावी लागणार होती. नावातच संत किंवा महाराज वगैरे असल्यावर तुमची काय बिशाद आहे त्याला एकेरी नावानं वा शिव्या वगैरे घालून पुकारण्याची? या सद्गुरू बाबाजी सावंतांना भेटून त्यांचे चरणस्पर्श करण्याची ऊर्मी माझ्या मनात दाटून आली.

मी सहकारी मित्राला म्हटलं, ‘‘हे असे जागरूक धर्मरक्षक आपल्या आजूबाजूला आहेत म्हणूनच आपला महान धर्म आणि मंगल संस्कृती टिकून राहिली आहे, नाही तर आपली कधीच अमेरिका झाली असती. कुणाची पॅण्ट कुणाच्या कमरेवर नसते तिथं. जो-तो स्वत:ला शहाणा समजतो. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणे! पण शांती आहे का? माणसं समाधानी आहेत का? आपल्याकडे बाकी काही नसलं तरी आपण शांतपणे झोपू शकतो. कसलाही विचार करावा लागत नाही आपल्याला. आपल्या पुढच्या कैक जन्मांचा विचार आपल्या पूर्वजांनी आधीच करून ठेवलाय. आपल्याला फक्त त्यांना अनुसरत पुढे जायचंय. कसलेही प्रश्न विचारायचे नाहीयेत की कसल्या शंका मनात आणायच्या नाहीयेत. मनात कसल्या विचारांचा गोंधळ नसला की जगणं सोपं होतं. गाढ झोप लागते. आयुष्य वाढतं.’’

त्याच रात्री मला एक भयंकर स्वप्न पडलं. माझ्या घरावर धर्मरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा निघाला आहे. चिडलेले कार्यकर्ते जोरजोरात घोषणा देत आहेत.. ‘‘देवांची, संतांची, ऐतिहासिक स्त्री-पुरुषांची नावं ठेवू नका! आमच्या भावना दुखावू नका!! आमच्या महन्मंगल संस्कृतीचा.. विजय असो!’’

‘‘अहो, पण माझ्या मुलाचं नाव शिवाजी आहे, मी ते वीस वर्षांपूर्वीच ठेवलंय. तेव्हा हे असलं काही नव्हतं ना!’’ मी चाचरत चाचरत कसंबसं विचारलं. खरं तर घाबरल्यामुळे माझ्या तोंडून शब्दही फुटला नव्हता. पण कसं कोण जाणे, मला काय म्हणायचंय ते त्यांना बरोबर कळलं. कदाचित ते त्यांना आधीच माहीत होतं म्हणूनच तर ते माझ्यापर्यंत आले असावेत.

‘‘एकेरी नाव बदलून टाका ताबडतोब. आदरार्थी करून टाका.’’ त्यांनी फर्मान सोडलं.

म्हणजे काय करायचं? शिवाजी महाराज? की छत्रपती शिवाजी महाराज? की गोब्राह्मणप्रतिपालक? मला काहीच कळेनासं झालं होतं. अंगाला दरदरून घाम फुटला होता. तरी बरं, माझं नाव त्यातल्या त्यात जरा आधुनिक आहे. नाही तर तेही बदलावं लागलं असतं. पण वडलांच्या नावाचं काय करायचं? महाराज दशरथ करावं, की नुसतंच दशरथ राजा चालेल? आणि आईचं काय? कौसल्या राणी? हे राम! काय भयंकर घोळ घालून ठेवला आहे आमच्या पिताश्रींनी! कशी निपटवायची आता ही नावांची भानगड? कशी सुटका करून घ्यायची आपली? कुणाला विचारू शकतो आपण? कुठल्या संकटमोचक तारणहाराला? उन्हातान्हात रांगा लावून मतदान करून निवडून दिलेल्या आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधींना? की डोळ्यावरची पट्टी कधीही किलकिली न करता कायमच काळोखलेल्या नजरेनं न्यायदान करणाऱ्या न्यायदेवतेला? की कुठल्याही बाबा-महाराजांपुढे कधीही नतमस्तक न झालेल्या आपल्या कुण्या विवेकनिष्ठ शास्त्रज्ञांना? सत्ताधीशांपुढे कधीही गोंडा न घोळवलेल्या आपल्या विद्वान पत्रकारांना? की प्रसिद्धी-पुरस्काराच्या मागे न लागलेल्या संवेदनशील लेखकमित्रांना?

यावर कुणापाशीच उत्तर नसावं. तरी बरं, हे स्वप्नच आहे म्हणून. प्रत्यक्षात असं काही झालं तर किती कठीण आहे. झोपेत ही अशी स्वप्नं पडतात. भयंकर. म्हणूनच रात्र झाली की भय वाटतं. आता झोपायचं आहे, या विचारानंही धास्तावायला होतं. यावर उपाय म्हणून मी मग रात्री उशिरापर्यंत जागत बसतो. काहीही लिहीत, वाचत, टिवल्याबावल्या करत राहतो. असं काही करत राहिलं की झोपेचा कालावधी कमी होईल, भयकारी स्वप्नं कमी वेळासाठी पडतील, किंवा लवकर विसरता येतील असं वाटतं.

तशातच अचानक एका रात्री भाचीचा फोन आला- ‘‘मामा, चेडवाचां नाव जीजा ठेवू की भवानी? तू सुचवलेली ही दोन्ही नावं इकडच्या मंडळींना आवडली आहेत. काय फायनल करू, तूच सांग.’’

‘‘नको! नको!! यातलं एकही नको. असलं काही नकोच आता. आपण दुसरी शोधू.’’

‘‘अरे, असं काय झालं अचानक? तूच आग्रह धरलेलास ना जुन्या नावांचा..?’’

‘‘होय, पण ते आधी ठीक होतं. आता काळ बदललाय. मी आता बहिऱ्यामुक्यांच्या दिंडीत सामील झालोय! भावना दुखावू शकतात असं आता आपण काहीच करायचं नाहीये!’’

‘‘बहिऱ्यामुक्यांची दिंडी? म्हणजे रे काय?’’ तिनं गोंधळून विचारलं.

‘‘काही नाही गं, दिलीप चित्रेंची एक कविता आहे. जाऊ दे, तू नको विचार करूस. झोप शांत. मी उद्या नव्या काळाला साजेशी काही नावं सुचवतो तुला.’’

samwadpravin@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 12:32 am

Web Title: story of student sant tukaram babaji sawant name zws 70
Next Stories
1 मोकळे आकाश..: टोल की टाळाटाळ :
2 अंतर्नाद : डमरू  हर कर बाजे..
3 अपरिचित काकोडकर
Just Now!
X