29 May 2020

News Flash

वेशाचे महाभारत

‘स्त्रीभान’ हे नयना सहस्रबुद्धे लिखित पुस्तक उद्या प्रकाशित होत आहे. त्या पुस्तकातील एक लेख..

(संग्रहित छायाचित्र)

‘देश तसा वेश’ ही ‘काळानुरूप बदला’ हे सांगणारी म्हण आपण लहानपणी घोकलेली आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. बाईच्या वेशाबद्दल, वागण्याबद्दल समाजाच्या नेहमीच काही अपेक्षा होत्या. आजच्या स्त्रीच्या जगण्याचा देश, काल व स्थितीच्या संदर्भात वेध घेताना जाणवतं की, बाईबद्दल भारतात व जगात वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या संस्कृतींत काही मिथके तयार झाली. मिथक याचा अर्थच सत्याचा अपलाप. ही मिथकं पिढय़ान् पिढय़ा जोपासली गेली आणि जात आहेत. काळ बदलला तरी मिथकांनी घडवलेल्या धारणा कायम राहिल्या. ती मिथके का तयार झाली, आता ती कशी बदलायला हवीत, किंवा नवी मिथके तयार होण्यापासून बाईला आणि समाजाला कसे वाचवायला हवे, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. मिथके फक्त बाईच्या बाबतीतच असतात असे नाही; स्त्री किंवा पुरुषांना त्यांच्या कथित पारंपरिक भूमिकांमध्ये पाहणे, त्यात त्यांना जखडून ठेवणे, यातून ही मिथके तयार होतात आणि दोघांसाठीही जगण्याचे काच निर्माण करतात. उदा. बाई म्हणजे नाजूक फूल, बाई म्हणजे अबला, पुरुषाने रडायचे नसते.. घाबरायचे नसते, पुरुष आक्रमक असणारच, बायकांचा नकार म्हणजे होकार असतो, बाई म्हणजे अध्यात्म मार्गातली धोंड.. यादी खूप मोठी आहे.

एक नवे मिथक तयार झाले आहे की मुलींनी जीन्स पँट घातल्यामुळे बलात्कार होतात.. निदान वाढतात! म्हणून काही शाळा-कॉलेजमध्येही ड्रेस कोड- वस्त्र परिधान नियम बनवले गेले आहेत व त्यांचे समर्थनही केले जाते. घरगुती सण-समारंभ, धार्मिक कार्यक्रमातही वेशाबद्दल अनेक संकेत असतात. अनेक धर्मस्थळांमध्ये जाताना काय घालावे, काय घालू नये याचे नियम आहेत. कुठे डोक्यावर गोल टोपी घालावी लागते, कुठे रुमाल, कुठे फक्त साडी, तर कुठे धोती! काही वर्षांपूर्वी मद्रास हायकोर्टाच्या मदुराई येथील एक-सदस्यीय बेंचने भाविकांनी देवळात जाताना काय घालावे, काय घालू नये याबद्दल काही नियम केले. न्यायमूर्ती वैद्यनाथन यांचा आदेश तातडीने अमलातही आला. तोही एतद्देशीय व विदेशी सर्व नागरिकांना लागू केला होता. त्याविरोधात सर्व थरांतून सूर उमटू लागताच तामिळनाडू सरकारने त्या ड्रेस कोड- वस्त्रपरिधान नियमाविरोधात अपील केले. आणि दहा-बारा दिवसांत आदेश मागे घेतला गेला. त्यामागे भाविकांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा सांगितला गेला, तरीही अर्थकारणाचाही मोठा प्रभाव त्यावर होता, हे नक्की. त्रिवेंद्रमच्या प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिरातले पोलीस त्यांच्या पोलिसी गणवेशात नव्हे, तर ‘मंदिर गणवेशा’त पाहिले होते. म्हणजे धोती आणि वर स्काउट-गाइडसारखा ‘केरळ पोलीस’ लिहिलेला स्कार्फ!  तात्पर्य- वेशाचे महाभारत हे असे गरज, कला, संस्कृती, अर्थकारण व राजकारण यांच्या रंगरेषांनी रंगते.

जवळजवळ सर्व मानवी संस्कृती वस्त्र परिधान करतात.. तेही हजारो वर्षांपासून. जारवासारख्या काही आदिवासी, वनवासी जमाती याला अपवाद असू शकतील. पण कपडे ही मनुष्यप्राण्याची आगळीवेगळी व एकमेवाद्वितीय ओळख आहे. कपडय़ावरून व्यक्तीची संस्कृती, देश, धर्म, जातपात ओळखता येऊ शकते. कपडेवापराची सुरुवात स्त्री-पुरुषांमधील फरक दाखवणारे अवयव झाकण्यापासून झाली. मुख्य हेतू शरीराचे बा हवामान, धूळ, कीटक अशापासून संरक्षण करावे हा होता. कपडे परिधान करणाऱ्याला कपडय़ामुळे बा घटकांपासून संरक्षण तर मिळतेच; त्याबरोबरीने मानसिक, भावनिक सुरक्षितता मिळावी आणि कपडय़ांनी सांस्कृतिक ओळखही द्यावी, ही किमान अपेक्षा असते. भारतीय इतिहास, साहित्य, संस्कृतीत वस्त्रांना जोडलेल्या अनेक कथा आहेत. ‘कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई’ किंवा नदीवर अंघोळ करणाऱ्या गोपींची वस्त्रे पळवणारा अवखळ कान्हा किंवा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा साडी-चोळी देऊन सन्मान करणारे शिवाजीमहाराज, जहागिरीची वस्त्रं किंवा दानाचा अग्रमान असलेलं वस्त्रदान हे आपल्यासाठी नेहमीच महत्त्वाचे होते. नंतर मात्र त्याला धर्म, संस्कृती, राजकारण, अर्थकारण चिकटत गेले. कपडे, सत्ता व राजकारण यांचे उत्तम उदाहरण म्हणजे महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग. स्त्रीला एका बाजूला देवी मानायचे आणि दुसऱ्या बाजूला मालकीची वस्तू मानायचे, याचे हे उदाहरण. दोन पुरुषांच्या शत्रुत्वात बळी मात्र बाई. आपण कालौघात कपडय़ांना चिकटलेल्या या गोष्टी वागवायच्या की झटकायच्या, हे नव्याने समजून घ्यायला हवे, शिकायला हवे.

वस्त्रपरिधानाइतकाच न-वस्त्रता किंवा नग्नता आणि कलाविष्कार हाही एक चर्चेचा, वादाचा मुद्दा. समाजनियमांची चौकट तसेच श्लील-अश्लील, नीती-अनीतीच्या संकल्पना देश, काळ, परिस्थितीनुसार बदलतात; पण सांस्कृतिक धारणा मात्र पिढय़ान् पिढय़ा संक्रमित होतात. त्यांना लागलेला धक्का समाजाला पचत नाही- हे नग्नतेचा चित्राविष्कार असो किंवा चित्रपट आविष्कार- अनेक वेळा दिसून आले आहे. अनेकदा प्रत्यक्ष नग्नतेपेक्षाही नग्नतेची शक्यता जास्त उद्दीपित करणारी असते. एखाद्या बलात्काराच्या सिनेदृश्यातली नग्नता भेदकपणे अंगावर आदळते. मात्र सिनेमातली अर्धवृत, अनावृत दृश्ये केवळ लैंगिक भावना उद्दीपित करणारी, मन चाळवणारी असतात. त्यांचा हेतू कलात्मकतेचा नसतो, तर तिकीट बारीवर गर्दी खेचण्याचा असतो. म्हणून सिनेतारकांची कॉपी करताना, फॅशनचे अनुकरण करताना, आपला पोशाख निवडताना या वास्तवाचेही भान ठेवायला हवे.

पाश्चात्त्य आणि पौर्वात्य देशांमधील कपडय़ांच्या पद्धती मात्र खूप वेगळ्या आहेत. पाश्चिमात्य स्त्रीमुक्तीची प्रणेती जम्रेन ग्रिअर हिने नोंदवलेले निरीक्षण दोन्ही संस्कृतींमधील मूलभूत फरक दर्शविणारे आहे. ती लिहिते, ‘‘आफ्रिकी किंवा दक्षिण आशियाई देशांतल्या महिला घालतात ते अंगरखे, सलवार-कमीज, साडी, शाल, गोषा किंवा बुरखा हे सलसर म्हणून आरामदायी असतात. त्यात बाळाला सुरक्षित सामावून घेणे किंवा स्तनपान देणेही सहज शक्य होते. बहुतेक पाश्चिमात्य नसलेल्या देशांमधील वस्त्रे आणि दागिने मातृत्वाचा आदर करणारे असतात.. जे मातृत्व आमच्याकडे नाकारले गेले आहे..’’

स्त्री व पुरुषांचे कपडे पिढय़ान् पिढय़ा वेगळ्या पद्धतीचे असत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात महिलांचा कामगार म्हणून वावर सुरू झाला आणि कारखान्यात शर्ट व पँट वापरला सुरुवात झाली. १९४३ सालचे जे. मिलरचे ‘रोझी द रिवेटर’ हे शर्टाच्या बाह्य सारून दंडाचे स्नायू दाखवणारे चित्र अमेरिकन स्त्रीचे प्रतीक बनले. १९६० नंतर अमेरिका, युरोपमध्ये व नंतर जगभर स्त्रीहक्काची, समानतेची चळवळ जोर धरू लागली व स्त्री-पुरुषांचे पेहराव, घरातील व घराबाहेरील भूमिका, जबाबदाऱ्या बदलू लागल्या. आर्थिक-सामाजिक-कुटुंबातील स्थान याची चर्चा आणि चळवळ सुरू झाली. १९६८ मध्ये सौंदर्य स्पर्धाना विरोध करताना बायका वापरत असलेली उत्पादने जाळली गेली. काहींच्या मते, त्यात स्त्रियांची अंतर्वस्त्रे नव्हती, पण ‘ब्रा बìनग’ हे मिथक तेव्हा जन्माला आले. स्त्री-पुरुष समानता म्हणजे पुरुषाची बरोबरी, तुलना आणि अनुकरण असे काहीसे चित्र तयार झाले. त्यातून पुरुषी ते चांगले, बायकी ते वाईट किंवा जे बायकांचे त्या प्रत्येकाला विरोध असा प्रकार सुरू झाला.

विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत कपडय़ांचे सोय व गरज हे मुख्य निकष होते. फॅशन या घटकाचा त्यात समावेश झाला आणि कपडे हे स्व-ओळख, स्व-निर्धार, स्व-प्रतिनिधित्व, स्व-अभिमान, स्वातंत्र्य, अस्मिता यांचे परिमाण बनले. कापड व्यापारी आणि नव्याने जन्माला आलेला, फोफावलेला सिनेमा उद्योग यांनी नवनवे प्रकार, पद्धती, स्टाईल्स निर्माण केल्या आणि जाहिरात व मार्केटिंगच्या तंत्राने स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती अशा भावना त्यात कालवून त्या विकल्या गेल्या, आजही विकल्या जात आहेत. तरीही स्त्रियांच्या कपडय़ांना चिकटलेल्या अपेक्षा व वेगवेगळ्या धारणांचे अस्तर काही निघाले नाही. अगदी अंतर्वस्त्रांची खरेदी हा घाईघाईत व लाजेने उरकण्याचा प्रकार होता, कारण बऱ्याच दुकानांत विक्रेते पुरुष असायचे. टीव्हीवर सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिराती येऊ लागल्यावर संकोचामुळे चॅनेल बदलले जायचे. तिथपासून आता ऑनलाइन लाँजरी दालनापर्यंत आपण पुढे आलो आहोत.

२०११ ची ही घटना आहे. स्त्रियांनी त्यांच्यावर लैंगिक हल्ले, अन्याय, अत्याचार होऊ नयेत म्हणून ‘बाहेरख्याली’ २’४३ कपडे वापरू नयेत असे विधान कॅनडा- टोरांटोच्या एका पोलीस अधिकाऱ्याने केले. त्या वक्तव्यावर, स्त्रियांवरील अत्याचाराला पुरुषी विकृतीला जबाबदार न धरता स्त्रियांच्या पोशाखाला जबाबदार धरणाऱ्या या वृत्तीबद्दल जगभर पडसाद उमटले. त्यातून ‘बेशर्मी मोर्चा’ किंवा  ‘२’४३६ं’‘’ या निषेध मोर्चाचा जन्म झाला. ज्यात काही ठिकाणी निषेध म्हणून स्त्रिया तंग, उत्तान कपडे घालून रस्त्यावर उतरल्या. या मोर्चाचे दुर्दैव हे, की चर्चा ‘पुरुषांची विकृत नजर’ या मुद्दय़ावर न होता चर्चा स्त्रियांच्या तंग कपडय़ांची झाली. आज स्त्रिया व मुलींचे कपडे आणि होणारे वाद यामागे असलेल्या या इतिहासाची आणि बदलत्या अपेक्षांची दखल आपण घ्यायला हवी व अशा विषयांवरची आपली मते तपासून घ्यायला हवीत. असे करताना दोन-तीन मुद्दय़ांचे भान मात्र नक्की ठेवायला हवे.

फक्त कपडे हेच स्त्रियांवरच्या अत्याचाराचे कारण आहे का? हे खरे असेल तर मग बुरखा, साडी यांसारखी अंगभर वस्त्रे परिधान करणाऱ्या स्त्रियांवर होणाऱ्या बलात्कारांचे काय?  एक-दोन वर्षांच्या अबोध, अजाण मुली किंवा प्रौढेवरही बलात्कार का होतात? आपण गुन्हा करणाऱ्याला दोषी धरणार की नाही? की फक्त बाईनेच तिच्या संरक्षणासाठी स्वत:भोवतीच विशिष्ट कपडय़ांच्या, वेळेच्या मर्यादा आणि कुंपणे घालून घ्यायची? ज्या जीन्स किंवा शॉर्ट्सला आपण तथाकथित मुक्ततेचे लेबल लावतो, तो पेहराव तिने स्वत: निवडलेला की फॅशन किंवा अनुकरणाचा भाग आहेत? की स्त्रीसौंदर्याच्या पुरुषांनी ठरवलेल्या मापदंडाचा तो आविष्कार आहे? ड्रेस कोणताही असो; तो आपण कसा ‘कॅरी’ करतो? तो घालण्याचा उद्देश सोय, संरक्षण की आणि काही? आपली देहबोली कशी असते? असे प्रश्न मनात येतात. कोणताही पोशाख घातल्यावर आपल्या आत्मसन्मानात भर पडते ना, हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 12:08 am

Web Title: stree bhan marthi book review nayana sahasrabuddhe abn 97
Next Stories
1 कलायात्रा : इस्तंबूलचं एक पुरोगामी विधान
2 नाटकवाला : ‘कविता भाग गई’
3 संज्ञा आणि संकल्पना : असाध्य ते साध्य
Just Now!
X