प्रवीण दशरथ बांदेकर

मटार सोलताना एखाद्या शेंगेत आतल्या दाण्याला लगडून असलेली कीड दिसून येते. हुबेहूब शेंग आणि दाण्याच्याच रंगाची. अर्धवट दाणा पोखरून आत लपून बसलेली अशी कीड दिसली तरी आपल्याला फार आश्चर्य नाही वाटत. असायचीच अशी एखाद् दुसऱ्या दाण्यात अशी एखाद् दुसरी कीड.. त्यात काय एवढं? आपण हे आजवरच्या आपल्या मटार शेंगा सोलायच्या अनुभवानं गृहीत धरलेलं असतं. त्यामुळे सरावल्यासारखे अंगभूत सवयीनं आपण कीड असलेली तेवढी शेंग टरफलांसोबत बाजूला टाकतो. दुसऱ्या बऱ्या शेंगांतले दाणे काढण्याच्या उद्योगात गुंतून जातो. एखाद् दुसऱ्या शेंगेपुरतं हे असं असेल तर ठीक आहे; पण सगळ्याच शेंगा किडक्या मिळायला लागल्या तर काय करायचं? आपण वैतागून जातो. चरफडतो. त्राग्यानं शिव्याशाप देतो. आपल्याला नक्की कशामुळे इतका राग आलेला असतो? कशाचं दु:ख झालेलं असतं? फसवणूक झाल्यामुळे की पैसे फुकट गेल्याने? की आणखीन दुसऱ्या कशामुळे?

हे असंच होऊ लागलं आहे अलीकडे सतत. विश्वासानं काही घरात आणावं तर निराशाच पदरी येते आहे. बाहेरून काही कळत नाही. वरचं आवरण अत्यंत आकर्षक असतं. उत्सुकतेनं उघडून पाहावं तर आतल्या वस्तूमध्ये काहीतरी दोष असतो. खूप दिवसांपासून ठरवलेलं आवडत्या लेखकाचं पुस्तक मुद्दामहून वेळ काढून वाचायला घ्यावं तरी असंच होतं. पहिल्याच एक-दोन पानांत आपण कंटाळून जातो. पुस्तक नकळतच बाजूला सारतो.

सगळीकडे सगळ्याच बाबतीत हे असं काय व्हायला लागलंय? आपला आजवरचा अनुभव आपल्याला दगा द्यायला लागलाय का? की सगळीकडे डुप्लिकेट वस्तूंचाच सुळसुळाट झालाय? की आपलंच काही चुकतंय म्हणायचं?

आणि वस्तूच कशाला, भरवशाची- आपल्या विश्वासाची माणसंही अचानक दगा देऊ लागलीत असंही आता जाणवू लागलं आहे. माझ्यासमोरच्या या विद्यार्थ्यांचंच पाहा ना! करोनामुळे आठ-दहा महिन्यांपासून शाळा-कॉलेजेस बंद होती. सगळेच कंटाळून गेले होतो घरात नि मोबाइलच्या स्क्रीनसमोर बसून बसून. कधी एकदा शाळेच्या घंटा वाजतायत, कधी एकमेकांना भेटतोय असं सगळ्यांना होऊन गेलं होतं. आणि हे तसं साहजिकच होतं म्हणा. महामारीचा भर थोडा ओसरल्यावर शाळा सुरू झाल्या. पण आम्हाला वाटलं होतं तसं विद्यार्थी काही फार उत्सुक वगैरे वाटत नव्हते. उलट, अगदीच सुस्तावलेले, अनोळखी असल्यासारखे आणि त्याहून धक्कादायक म्हणजे अगदीच पाटय़ा कोऱ्या करून आलेले होते. म्हणजे साध्या साध्या गोष्टीसुद्धा ही मुलं विसरून गेली आहेत, हे कळल्यावर धक्का बसणं साहजिकच होतं. शिवाय हे दोन-चार उनाडटप्पू मुलांच्या बाबतीतच नव्हे, तर सरसकट सगळ्याच मुलांच्या बाबतीत अनुभवाला येत होतं. वर्तमानपत्रातील एका लेखावर मी मुलांशी चर्चा करत होतो. त्यात एक वाक्य होतं- ‘..महामारीसारख्या अशा अनुभवांमुळे आपली जाणिवांची क्षितिजं विस्तारायला मदत होते.’

‘‘ ‘जाणिवांची क्षितिजं’ म्हणजे काय रे? बरं, ते जाऊ दे.. ‘क्षितीज’ म्हणजे तरी नक्की ठाऊक असेलच तुम्हाला..’’

ढिम्म कोरे चेहरे. त्यातही तोंडावरच्या मुसक्यांमुळे तर काहीच कळू नये अशी परिस्थिती. मी मग थोडं मुलांना विश्वासात घेत बोलकं करण्याचा प्रयत्न करू लागलो. आकाश, पृथ्वी, डोंगर, नद्या, पाऊस, झाडं.. मुलांना कशातच रस नव्हता. किंवा हे काय, कशाविषयी बोलतायत आपले शिक्षक- त्यांना काही आकलन होत नसावं असंच एकंदरीत वाटत रालं होतं. जणू सगळ्याच मुलांच्या मेंदूतून आधल्या सगळ्या स्मृती कुणीतरी पुसून टाकल्या होत्या. मधल्या आठ-दहा महिन्यांच्या काळात घराबाहेर न पडलेली मुलं बाहेरचं विश्व विसरून गेली होती.

मला पोर्तुगीज कादंबरीकार जुझे सारामागोची ‘ब्लाइंडनेस’ ही कादंबरी आठवली. तिथेही अशाच एका चमत्कारिक परिस्थितीचं वर्णन आलं आहे. कसल्याशा एका विचित्र साथीमुळे कादंबरीतल्या त्या शहरातली माणसं एकामागून एक आंधळी होऊ लागतात. दृष्टीबरोबर आत्मविश्वासही गमावून बसतात. अनपेक्षितपणे संपूर्ण शहर आंधळेपणाच्या काळोखात बुडून जातं. त्यातून निर्माण झालेल्या भयावह स्थितीविषयी हा कादंबरी बोलत राहते. विनाशाच्या टोकावर येऊन उभ्या असलेल्या, जनावरांच्या पातळीवर येण्याइतपत अध:पतित झालेल्या एका काल्पनिक जगातल्या या माणसांविषयी वाचतानाही मन एकूणच मानवजातीच्या भवितव्याविषयीच्या एका भयव्याकूळ शंकेनं घेरलं जातं. यातलं एक पात्र म्हणतं, ‘आपली प्रतिकाराची शक्ती आता संपत आली आहे. अन्नपाणी झपाटय़ानं नाहीसं होत आहे. हवेत सर्वत्र काहीतरी कुजल्याचा दुर्गंध पसरतो आहे. अन्नाचं विष होत आहे. आपल्यासाठी जणू काळ भराभर संपू लागला आहे..’ अराजकसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या माणसाचे हताश उद्गार याहून वेगळे काय असू शकतात?

अनेक अर्थानं मला हे आजच्या वर्तमान व्यवस्थेवरचं भाष्य वाटतं. अलीकडच्या आपल्या सामाजिक नि सांस्कृतिक व्यवहारातील काही गोष्टी पाहताना वाटतं, आंधळेपणाचा हा रोग केवळ या कादंबरीतील काल्पनिक जगापुरताच सीमित राहिलाय असं म्हणता यायचं नाही. बघता बघता या रोगानं आपल्याही माणसांची दृष्टी, विचारशक्ती, आकलनक्षमता, जाणिवा, संवेदना सगळंच गिळून टाकलं आहे. लहान मुलं, स्त्रिया, शहाणेसुरते, जाणते सगळ्यांनाच एक प्रकारचं विस्मरण ग्रासून टाकतं आहे. माणसांना साध्या साध्या डोळ्यांसमोरच्या गोष्टीही दिसेनाशा झाल्या आहेत. आपणच काल-परवा बोललेलं, काल- परवा केलेलं आठवेनासं झालं आहे. साधं, सरळ नि थेट बोललेलंसुद्धा कळेनासं झालं आहे. त्याचा अर्थ लागेनासा झाला आहे. रूपकात्मक, प्रतीकात्मक, उपहासात्मक, वक्रोक्तीपूर्ण वा व्यंजोक्तीयुक्त बोललेलं, लिहिलेलं आणि ‘बिटविन द लाइन्स’ अर्थ शोधावे लागतील असं मांडलेलं समजून घेणं ही तर फारच दूरची गोष्ट म्हणावी लागेल. विचार, तर्क आणि आकलन करण्याची शक्ती गमावून बसलेल्या या आंधळ्या जीवांना कवितेची प्रतिमा-प्रतीकांनी युक्त भाषा कळत नाही. चित्रांची लिपी उलगडवता येत नाही. सिनेमा-नाटकांतल्या दोन फ्रेम्समधल्या वा संवादांमधल्या मोकळ्या जागांचे, विरामांचे अर्थ लावता येत नाहीत. त्यांना कशाचीही चिकित्सा नको असते. कदाचित चिकित्सेनंतर हाती लागू शकणाऱ्या सत्याला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात नसतो. त्यामुळेच नव्या, चाकोरी मोडू पाहणाऱ्या मांडणीला त्यांचा विरोध असतो. परंपरा जशीच्या तशी कवटाळण्याच्या वेडगळ अट्टहासातून त्यांच्या जातीय, धार्मिक, भाषिक, प्रांतिक वगैरे अस्मिता तीव्र बनलेल्या असतात. आत्मविश्वासाच्या अभावामुळे त्यांना एक प्रकारची आंतरिक असुरक्षितता भेडसावत असते. त्यातूनच त्यांना आपल्याच आयाबहिणींवर अमानुष बंधने लादावीशी वाटतात. स्वत:पलीकडे जग आहे, त्या जगाला त्याचा म्हणून काही विचार असू शकतो, तो विचार मांडण्याचा हक्क असू शकतो, तो वेगळा वाटणारा विचार समजून घेण्यासाठी आपणही आपली कुवत परिश्रमपूर्वक, अभ्यास वा व्यासंगपूर्वक वाढवणं गरजेचं आहे, साहित्यसाक्षर, चित्रसाक्षर होणं गरजेचं आहे, हेच ही आंधळी मंडळी सोयीस्करपणे विसरत चालली आहेत. आपल्यासाठी नवनव्या गोष्टी घेऊन आलेल्या या विश्वातील प्रकाशाचा डोळसपणे वेध घेण्याऐवजी नाकातोंडाबरोबर डोळ्यांवरही पट्टी बांधून काळोखात डुबक्या मारणं यांना जवळचं वाटू लागलं आहे.

आता प्रश्न असा येतो की, हे सगळं काल-परवापर्यंत नव्हतं का? आधी हे असं नव्हतं असं म्हणता यायचं नाही. पण विवेक, विचार, संवेदनशीलता, सहिष्णुता ही मूल्येही थोडीफार का होईना, शाबूत होती. बुद्धीचा वापर जग समजून घेण्यासाठी, समाजाला अधिक उन्नत, सुसंस्कृत करण्यासाठी करायचा आहे, हा विचार जागृत होता. त्यामुळे मटारची एखाद् दुसरी शेंग किडकी असू शकते; तेवढं बघितलं, ती कीड बाजूला केली, की उरलेले हिरवेगार, स्वच्छ दाणे आपल्याला सुखावणारे, आनंद देणारेच आहेत, हा विश्वास असायचा. पण शेंगांचा सगळाच ढीग किडका निघावा, सोलून बघेपर्यंत बाहेरून काही कळू नये असं पहिल्यांदाच घडू लागलं होतं. फारच निराशा आणणारं वर्तमान आहे हे माझ्यासारख्या अनेकांसाठी. नाकातोंडात पाणी जाऊन घुसमटून जीव जायची पाळी आली तरी आम्ही लादून घेतलेलं हे आंधळेपण आम्हाला सोडवत नाहीये. अशा वेळी म्हणूनच सारामागोची आठवण पुन्हा पुन्हा येते. ‘ब्लाइंडनेस’मधलं ते पात्र म्हणतं तसं, आम्हालाच जर आंधळं होऊन विनाशाचं दळण दळायची हौस असेल तर त्याला जगातला कुठलाच डोळस काय करू शकणार आहे?

मटारचे बाजूला काढलेले बरे दाणे पाहताना अचानक वाटलं, बाहेरून बरे दिसणारे हे दाणेही त्यांच्या पोटात न दिसणारी अदृश्य कीड बाळगून नाहीयेत, हे तरी आपण कशाच्या भरवशावर म्हणतो आहोत? या न दिसणाऱ्या किडीचं आपण काय करणार आहोत?

wsamwadpravin@gmail.com