25 February 2021

News Flash

रफ स्केचेस् : बंद फाइलमधील चित्रं!

..आणि ‘तो भारतात येणार’ अशा भीतिदायक बातम्या आल्या, त्यावेळची माझी ही गोष्ट!

सुभाष अवचट

रेखाचित्र : अन्वर हुसेन

सारं कसं सुरळीत चालू होतं. अमेरिकेत ट्रम्पची कावकाव, इकडे कंगनाची चिवचिव, एअरपोर्टवर नटनटय़ांचे लुक्सचे फोटो, मॉल्स, क्लब, बीकेसीतील निरनिराळ्या फूड ब्रँड्सची रेस्तराँज्, मालवणी छोटय़ा खाणावळी, आमच्या नट-नटय़ांची सीरियल्सची शिफ्टमधली शूटिंग्ज, एस. टी. स्टँड्स, एअरपोर्ट, लोकल्स, प्रत्येक राज्यातील राजकारणातली उलथापालथ, वर्तमानपत्रांतल्या त्यावरच्या चविष्ट बातम्या, सीमेवरील सैनिकांच्या हालचाली, देवळे, चर्चेस, मशिदी, आश्रम, मुलांना शाळेत सोडणाऱ्या बसेस, टीव्ही सीरियल्स, त्यावरचे डिबेटस्, आगीचे बंब, अ‍ॅम्ब्युलन्सचे धावते सायरनचे आवाज, आरक्षणाचे मोर्चे, कवितासंग्रहांचे प्रकाशन समारंभ, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्काय स्क्रेपर्स, फिरणाऱ्या क्रेन्स, थिएटर्स, नाटकं, सफाई कामगार, माथाडी कामगार, शेतमजूर, फळविक्रेते, भंगारवाले, ट्रॅफिक पोलीस, सिग्नलजवळचे भिकारी, तृतीयपंथी आणि बागेत बसलेली वृद्ध जोडपी, हॉस्पिटल, महामार्गावरचे अपघात, इंडियन आयडॉल, चौकातली कबुतरं, समुद्रकिनाऱ्यावरची भटकी कुत्री, मार्केटमधली अतोनात गर्दी, धुरकट सूर्योदय आणि अस्त!

सारं कसं सुरळीत चालू असताना एक अदृश्य शत्रू एके दिवशी जगभर पसरला. बघता बघता त्याने पाय पसरले. मृत्यूच्या विळख्यात त्यानं लाखो माणसे घेतली. त्याच्या नावाचं बारसं झालं; ते म्हणजे ‘करोना.’

..आणि ‘तो भारतात येणार’ अशा भीतिदायक बातम्या आल्या, त्यावेळची माझी ही गोष्ट!

‘करोना भारतात टिकणार नाही’ अशा चर्चा सुरू झाल्या. पण तो आलाच! आणि मग एके दिवशी सर्वत्र भीती पसरली. थाळ्या वाजवून झाल्या, दिवे पेटवून झाले; पण तो देशातल्या घराघरांमध्ये पसरलाच. मृत्यूंची संख्या वाढली. हॉस्पिटलं भरली. स्मशानात प्रेतं जाळण्यावर ठिकठिकाणी लोकांनी बंदी घातली. एकच गोंधळ, त्यावरून पसरलेली भीती आणि

त्यावर लस नसल्याने तो वाढू नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी लॉकडाऊन आलं. सारी गावं ठप्प झाली!

मास्क आणि सॅनिटायझरचा एक इझम् सुरू झाला. वाहत्या शहराला आता घरात बसावं लागलं. आणि करोनापेक्षा सायकॉलॉजिकल इफेक्ट मोठा झाला. साहजिकपणे डिप्रेशन आलं. फोनाफोनी, सोशल मीडियाचा आधार घेऊन जो- तो मनं मोकळी करू लागला.

घरातली कामं करण्याची वेळ आली. कामं वाटण्यात आली. पुरुष भांडी घासू लागले. झाडू मारणं, स्वयंपाक करणं, कपडे धुणं असं कामांचं वेळापत्रकच तयार झालं. पण घरात कोंडून बसायचं- या विचारांनीच सारे सैरभैर झाले. ‘अरे, मला दूध मिळाले!’, ‘अरे आज अंडी मिळाली’, ‘चार ब्रेड घेऊन आलो’.. अशा एरवी साध्या वाटणाऱ्या गोष्टींचं अप्रूप झालं.

वास्तविक सरकारने अशा घरगुती किराणामालाचा तुटवडा भासू दिला नाही. एकीकडे लाखो कामगार आपापल्या गावाकडे मुलेबाळे, चंबुगवाळे घेऊन चालत निघाले. ते मात्र भयाण दृश्य होतं. बेघर, उपासमार, अंधारं भविष्य याच विचारांनी हे मायग्रेशन झालं होतं. यात यातनाच होत्या. धंदे, रोजगार, रोगाची भीती त्यात साठलेली होती.

मात्र, शहरातली भीती ही मानसिक होती. तिचे तुकडे अजूनही समाजात आहेत. ‘घरात कोंडून राहणे’ या कल्पनेमुळेच ही भीती निर्माण झाली होती. त्यावर होणाऱ्या मृत्यूंची छायाही होतीच.

याच सुमारास मी घरी एकटा होतो. माझी मुलंबाळं सारे परदेशात अडकले होते. आता खरं सांगायचं तर मला या घरात एकटं राहण्याची अथवा स्वत:पाशी राहायची सवय फार जुनी आहे. माझं घर म्हणजे स्टुडिओच आहे. त्यामुळे खाण्यापिण्याची आबाळ होणे साहजिकच होते. त्यात मी खाण्याचा फार शौकीन नाही. मूठभर खायला मिळालं की माझा दिवस निघतो. तरीही यातून मार्ग निघाले. माझ्या जवळपासच्या मित्र-मैत्रिणी घरी काहीतरी पाठवत राहिले. परंतु एक विचित्र शांतता चोहीकडे जाणवायची. हवेत होणारा बदल जाणवू लागला होता. माझ्या घराभोवती झाडांवर कधीही न दिसणारे पक्षी, फुलपाखरं दिसायला लागली होती. रस्त्यांवर झाडांच्या सावल्या ठळक दिसू लागल्या. निर्मनुष्य रस्त्यावर मी एखादा फेरफटका मारीत असे. काहीतरी हरवलंय असं वाटायला लावणारी ही शांतता होती. काहीतरी घडणार आहे अशी उगाचच भावना भोवती होती. घरात फिरत असताना हा वेळ कारणी कसा लावावा असा विचार मनात होता. वास्तविक मी काही तुरुंगात नव्हतो, अथवा मी काही गुन्हा केला नव्हता. आणि अचानक या येरझाऱ्यांमध्ये मला हेन्री मूर आठवला.

१९४१  साली दुसऱ्या महायुद्धात लंडन बेचिराख व्हायला सुरुवात झाली होती. प्रचंड बॉम्बहल्ले होत असताना हजारो माणसे अंडरग्राऊंड रेल्वेच्या बोगद्यांत आश्रयाला आली होती. त्याला ‘अंडरग्राऊंड शेल्टर’ म्हणत असत. प्रचंड गारठय़ात त्या टनेलमध्ये त्यांनी अनेक रात्री काढल्या. लंडनच्या इतिहासातला हा काळा पीरियड म्हणावा लागेल. वॉर काऊन्सिलने हेन्री मूर यांना अंडरग्राऊंड शेल्टरची स्केचेस करायची विनंती केली. आता मूर यांचा स्टुडिओ नव्हता, जवळ साहित्यही नव्हतं. त्यांच्या भाचीकडून त्यांना कमी दर्जाचे काही ऑईल पेस्टल्स आणि वॉटर कलर्स मिळाले. मग त्यांनी चित्र काढायचं नवीन टेक्निक शोधून काढलं. ऑईल पेस्टल वापरले की त्यावर जलरंग टिकत नाही, हे लक्षात घेऊन हेन्री यांनी माणसं आणि त्यांच्या वेदना ऑईल पेस्टल्समध्ये रंगवल्या आणि त्याच्या अवतीभवती जलरंगांचा वापर केला आणि अजोड कलाकृती जन्माला आल्या. त्यांनी तिथली झोपलेली माणसे, स्त्रिया आणि मुले यांची स्केचेस केली. ती पाहिली की आजही अंगावर काटा येतो. युद्धाची क्रूरता, मानव जमातीची विदीर्ण अवस्था या स्केचेसमधून बघताना मन बधिर होतं. खरं पाहता मूर हे जगातले मोठे शिल्पकार आहेत. पण त्यांची ही स्केचेस म्युझियममध्ये पाहताना त्या भयाण वेळेचं डॉक्युमेंटेशन किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात येतं.

अशीच ही वेळ ‘करोना’ पिरीयडमध्ये माझी होती. हा लॉकडाऊन आज संपेल, उद्या संपेल अशा भ्रमात सारे होते. अशा वेळी मी किती दिवस येथे बंद राहणार याची खात्री नव्हती. आता माझ्या हातात फक्त एकच मार्ग शिल्लक होता. तो हा की, या एकटेपणात भ्रमिष्ट व्हायचे नसेल तर मी चित्रं काढायला पाहिजे. मूरसाहेबांचा दाखला तर मनात होताच. स्टुडिओत काही कॅनव्हासचे तुकडे शिल्लक होते. पण रंग वाळले होते. दुकानंही बंद होती. मी शोधाशोध सुरू केली आणि अचानक एक जुनं वॉटर कलरचं पॅड सापडलं आणि चक्क रंगाचा एक बॉक्स हाताशी आला. बहुतेक ती माझ्या नातवाला बर्थ-डे गिफ्ट मिळाली असावी. मला हायसं वाटलं. आता हा लॉकडाऊन राहिला काय अन् नाही राहिला काय, मला काही देणंघेणं उरलं नाही.

कित्येक वर्षे मी वॉटर कलरला हात लावला नव्हता. कारण माझे मीडियम हे अ‍ॅक्रॅलिक आहे. माझ्या पेंटिंग्जच्या साइझही भल्यामोठय़ा असतात. मला बारीकसारीक काम करण्याची सवय नाही. आता प्रश्न हा होता की, छोटय़ा आकारात वॉटर कलरची पेंटिंग्ज करण्यासाठी मानसिकता बदलणे. छोटय़ा ब्रशने छोटय़ा आकारात काम करण्यासाठी प्रथम मला

प्रॅक्टिस करावी लागणार होती. परत रंग, कागद वाया घालून चालणार नव्हते. तेही बरं होतं. हाताशी वेळच वेळ होता. नाही तरी करायला काम काय होतं?

मी जुन्या, पाठकोऱ्या कागदावर काळ्या शाईत काम सुरू केलं. पाणी आणि इंक यांच्या कॉम्बिनेशनमध्ये काही आठवडे गेले आणि आता मला वॉटर कलरचं थोडं टेक्निक जमलं. पाण्याचा फ्लो, रंगांच्या वापरावर कंट्रोल आणि विषयानुसार त्याचे कम्पोझिशन वगैरे.

वॉटर कलरची एक खुबी आहे. ती म्हणजे चित्रकारानं किती सहजतेनं रंग वापरलेत असं एखादं चित्र पाहताना वाटतं. मात्र ते खरं नसतं. त्याअगोदर दोन-तीन चित्रं प्रॅक्टिससाठी काढावी लागतात. तो कागद व्हर्जिन असतो. त्यावर एकदा रंग लावला की त्यावर पुन्हा काम करण्याची संधी तुम्ही गमावता. ते चित्र मातकट होत जातं. त्यामुळे श्वास, हातावरचा, मनावरचा कंट्रोल हे सारे एकजीव व्हावे लागते. सामुराईंच्या शिक्षणातल्या एका प्रॅक्टिससारखंच हे असतं.

वॉटर कलर हे अत्यंत लिरिकल (काव्यात्म) माध्यम आहे. ते करताना तुम्ही तेवढेच तरल होत जाता. हळुवार वाऱ्यानं फुलांच्या पाकळ्या जशा हलतात, तसं मुक्त होत जाणं हेच त्याचं वैशिष्टय़. तुमचं मनही याला साक्षी राहतं. चित्र आकार घेताना मनात अनेक आठवणी येत-जात असतात. त्याही तेवढय़ाच निरागस असतात. काम करायला सुरुवात झाली आणि चित्रं फसत गेली. पण त्याच चित्रांच्या पाठकोऱ्या बाजूला मी पुन्हा चित्रं केली. कारण कागद मिळणार नव्हते. चित्र तयार होताना एक विलक्षण अबोल संवाद चालू असतो. त्यात गर्दी नसते. ध्यानाला बसल्यासारखे विचार येत-जात असतात. तुम्ही त्यात प्रेक्षक असता. हे माझे अनुभव अनेक वर्षांचे आहेत. त्याबद्दल मी कधीतरी सविस्तर लिहीनच.. आता तर या लॉकडाऊनमध्ये बेल वाजत नव्हती. कोणाचीही आत-बाहेर ये-जा नव्हती. फोडणीचे खमंग वासही नव्हते. पावलांचे, हॉर्नचे, फेरीवाल्यांचे आवाजही नव्हते.

एका सकाळची ही गोष्ट आहे.

मी कागदावर लेमन यलोचा वॉश मारला. तो कागदावर पाण्याबरोबर पसरत गेला आणि अचानक मनात खोल कुठेतरी बा. भ. बोरकर आठवले. पुण्यातल्या चित्तरंजन वाटिकेत मी सकाळी सकाळी त्यांच्याबरोबर होतो. त्यांचे फोटो मला काढायचे होते. पोएट बाकीबाब उन्हात उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर हाच लेमन यलोचा कोवळा, पातळ प्रकाश पसरला होता. ते नाकातल्या नाकात, त्यांना आत सुचलेल्या कवितेच्या ओळी गुणगुणत होते. कागदावर जसा लेमन यलो हळुवार पसरत होता, त्यात बाकीबुवांच्या कवितेचे ते गुणगुणणे पसरत निघालेले होते. आठवणी कोठून कधी येतील त्यांचा नेम नसतो. मला अलंकारिक उपमा देऊन लिहिण्याची सवय नाही. पण असे मनातले वैयक्तिक अनुभव वॉटर कलर करताना मनात येऊन जातात. मनाच्या या खोलीचा उलगडा करण्याच्या भानगडीत मी कधी पडलो नाही.

एका संध्याकाळी स्टुडिओत परतीची उन्हं पसरली होती. माझं चित्र जवळपास पूर्ण व्हायच्या बेतात असावं. ओलंच होते ते. अचानक पाण्याच्या वाटीला माझा हात लागला आणि सारं पाणी चित्रावर पसरलं. काही हरकत नाही. नळाखाली पूर्ण चित्र धुऊन मला परत सुरुवात करता येणार होती. कागदावरचा पाण्याचा एक ओघळ रंग घेऊन खाली उतरत होता. यावर परतीची उन्हं अडकलेली होती. परत तेच झालं. मनातल्या कुजबुजीत माझा मित्र ग्रेसच्या कवितेतला पाऊस आला. मी बेसिनमध्ये चित्र धुताना वाटलं- येथे आता ग्रेस असता तर ते माझे चित्र झोळीत घालून नागपूरला निघाला असता.

..असा संवाद होत गेला. अनेक बरी-वाईट चित्रं झाली खरी. मी काही वॉटरकलरीष्ट नाही आणि मी काही रोमँटिक पेंटरही नाही. माझी स्टाईल वेगळी आहे. त्यात हमाल, कामगार, संन्यासी आहेत. धारावी आहे. थिएटर आहे. गुहेत अंधाराचा शोध आहे. विदूषकाच्या डोळ्यांतला पॅथॉस आहे. कदाचित लॉकडाऊनमध्ये घराकडे, गावाकडे चालत निघालेल्या कामगारांच्या झुंडी, घरात गुदमरलेल्या, भीतिदायक चेहऱ्यांचा माझा विषय आहे.

रंगाअभावी तो मी स्टुडिओत या काळात रंगवू शकलो नाही खरा. पुन्हा कधीतरी तो येईल.

या कागदाच्या छोटय़ा पॅड अणि रंगपेटीने मला या काळात मानसिक साथ दिली. मला आनंदी तर ठेवलेच; पण एकांतवासाला सामोरं जाण्याची उमेद दिली. आता वॉटर कलर्सची इतकी सवय झाली आहे की गंगेच्या किनारी उगवत्या सूर्याला जसे अध्र्य देतात, तसा मी दररोज सकाळी एक वॉटर कलर काढून दिवस सुरू करतो.

या काळात केलेल्या या चित्रांचं प्रदर्शन करण्याचं वगैरे माझ्या डोक्यात नाही. एका फाइलमध्ये मी ती सारी चित्रं बंद केली आहेत. लॉकडाऊनने जसे सर्वाचे मनाचे दरवाजे बंद केले होते, या आठवणीने बहुधा!

Subhash.awchat@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2021 1:07 am

Web Title: subhash awchat article about paintings zws 70
Next Stories
1 पुस्तक परीक्षण : महामानवाशी काव्यात्म संवाद
2 दखल : वास्तवदर्शी लेखन
3 मोकळे आकाश.. : आभास हा!
Just Now!
X