28 February 2021

News Flash

प्रेम, कुटुंब आणि करंटेपणा

ती केमिस्ट्रीची प्राध्यापक होती आणि मुलांशी मराठी, गुजराती दोन्ही भाषांत बोलायची.

समीना दलवाई

 ‘लव्ह जिहाद’ हे नाव जरी नवीन असले तरी प्रेमाला बंडखोरी, सामाजिक धोका समजणे ही आपल्यासारख्या चाकोरीबद्ध समाजात परंपराच आहे. जातीनिहाय उतरंडीवर आधारित, धार्मिक अंधश्रद्धांनी जखडलेला समाज आपल्या तरुण-तरुणींना प्रेम करायची, जीवनसाथी निवडायची मुभा कशी देणार? त्यातही तरुण मुली स्वयंनिर्णयाचा हक्क मागू लागल्या की कुटुंबव्यवस्था भलतीच डगमगते. अशा वातावरणातदेखील प्रेम, विवाह इत्यादी करू बघणाऱ्यांच्या या कहाण्या..

एका मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते. मुंबईची मराठी मुलगी. आई-वडील कोकणातून आलेले. मी त्यांना विचारले, ‘‘मुलीने ख्रिश्चन नवरा करायचा ठरवला, तुम्ही सहज संमती दिली? जराही विरोध केला नाही?’’ तिचे वडील म्हणाले, ‘‘इतकी शिकलेली, सीए असलेली मुलगी स्वत:चे निर्णय घेणारच ना! आपण विरोध करायचा म्हणजे आपल्याच मुलांना दुरावायचे. असला करंटेपणा कशाला करायचा आई-बापाने?’’ आणि मैत्रिणीची आई हसून म्हणाली, ‘‘किती मस्त धमाल लग्न-समारंभ आहे की नाही? नाच..गाणी..खेळ.. आपल्यालाही वेगळ्याच जगाची ओळख होतेय.. बघ.’’

बदलता भारत असा समजदार होतोय. कोकणातून मुंबईत चाकरमानी म्हणून आलेल्यांची पुढची पिढी आज दिल्ली, बंगलोरच नव्हे, तर इंग्लंड, अमेरिकेत जाऊन वसली आहे आणि इतर समुदायांशी मैत्री, प्रेम, विवाह करून नवी नाती निर्माण करते आहे. त्यांचे आई-वडील त्यांना साथ देतील तर नवे जग तेही अनुभवतील.

माझ्या आईच्या कुटुंबात अख्खा भारत सामावला आहे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बंगाली, पंजाबी, गुजराती सर्वच आहेत तिथे. भाऊबीजेला सगळे जमले की अनेक भाषा, पदार्थ, पोशाख यांची सरमिसळ दिसते. एकूणच भांडारकर कुटुंब उदारमतवादी. जेव्हा आमच्या आईची धाकटी मावशी १९६० मध्ये गल्लीतल्याच एका भाटिया जैन तरुणाच्या प्रेमात पडली तेव्हा दोन्ही कुटुंबे आनंदाने लग्नाला तयार झाली. लग्नानंतर ती एकत्र कुटुंबात सामावून गेली, पण स्वत:ची ओळख, नोकरी कायम ठेवली. ती केमिस्ट्रीची प्राध्यापक होती आणि मुलांशी मराठी, गुजराती दोन्ही भाषांत बोलायची.

त्या काळी भाटिया कुटुंबात कोणी वारले की अंगावरचे दागिने बदलायची पद्धती होती.  विशिष्ट दागिने पाहिले की शोककाळातील कुटुंब समाजाला समजत असे. पण रजू मावशीला कॉलेजमध्ये मराठी सहकारी विचारीत, ‘‘अय्या, नवीन बांगडय़ा? घरात काही कार्य वगैरे?’’ या लग्नाच्या नसून मर्तिकाच्या बांगडय़ा आहेत हे म्हणायला ती धजावत नसे. संस्कृतीमधील फरक कोणा कोणाला समजावत राहणार? २०११ मध्ये रजू मावशीच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा झाला; तिचा पंजाबी जावई, बंगाली सून आणि नातवंडे यांच्या उपस्थितीत!

आमच्या आईच्या आत्याने १९६२ मध्ये तिच्या पारशी मित्राशी लग्न केले. तिच्या सासरच्या बायका भेटायला आल्या की गळाभेट घेत. माझ्या पणजीला भारी टेन्शन येई. ते येऊन गेले की ती सुस्कारा सोडून कोकणीत म्हणे, ‘‘आयल्यो.. मिठय़ो झयल्यो.’’ (आल्या बाई.. मिठय़ाही झाल्या.) परकी संस्कृती आपलीशी करणे सोपे थोडेच आहे?

माझ्या लहानपणी सगळ्या आज्या जमल्या की चेष्टा-मस्करीला ऊत येई. ‘‘अगं, आता कोण आहे रांगेत पुढचे? आपल्याकडे कोण नाहीए? तमिळ किंवा तेलुगू हवेत की नाही?’’ मी स्वत: विशीत इंग्लंडला निघाले तेव्हा म्हणाल्या, ‘‘तू ब्रिटिश आण. आम्हाला आवडेल गोरा जावई!’’ मी म्हटले, ‘‘काळा नाही चालणार का?’’ त्यावर म्हणाल्या, ‘‘आम्हाला काय, व्हॅनिला आणि चॉकलेट दोन्ही आवडतं!’’ अशा पार्श्वभूमीवर १९७४ मध्ये माझ्या आईच्या हिंदू-मुस्लीम लग्नात अडसर आला नाही.

दलवाई कुटुंबात जेव्हा आंतरधर्मीय प्रेमप्रकरणे सुरू झाली तेव्हा खूपच मजेदार अनुभव आले. एका चुलत बहिणीने हिंदू मराठा नवरा निवडला. आमच्या आत्या तिला सासरी सोडायला गेल्या. त्या घरात बघतात तर चारी भिंतींवर देवादिकांचे फोटो. देवांच्या हातात तलवारी आणि खड्गे. देवींनी जिभा बाहेर काढलेल्या.. त्याही रक्ताळलेल्या. कोणाच्या हातात कापलेले मुंडके आणि रक्ताचे ओहोळ. हे सारे बघून आमच्या आत्या रडायलाच लागल्या. या असल्या खूनखराबा वातावरणात आमची पोरगी कशी राहणार म्हणून!

एका आतेभावाने लग्न ठरवले ती मुलगी होती ब्राह्मण. वडिलांना कळल्यावर ते म्हणाले, ‘‘हा मुसलमानच का निवडलास? तो तुझा दुसरा मित्र ब्राह्मण आहे. त्याच्याशी का करत नाही लग्न?’’ आमच्या भावाच्या वतीने सगळे कुटुंब त्यांना भेटायला, मनधरणी करायला गेले; पण त्यांनी कुणाचेच काही मानले नाही. त्यांनी मुलीशी संबंध तोडून टाकले. पाच वर्षांनी तिने वडिलांना फोन केला आणि सांगितले, ‘‘तुम्हाला एक नातू झाला आहे.’’ तेव्हा तिची आई बाळाला बघायला आली. पण वडिलांची अढी काही सुटली नाही. मुलगी दुरावली ती कायमचीच.. आणि नातवाबरोबर खेळत मोठे होण्याचा आनंदही गमावला.

दुसऱ्या आतेभावाला भावली ती मुलगी ख्रिश्चन होती. त्याने पोस्टकार्डाने कळविले, ‘‘मी तुमच्या मुलीचा हात मागायला घरी येत आहे.’’ तिचे वडील खूप भडकले. म्हणाले, ‘‘मी तलवारीने खांडोळी करून टाकेन.

त्याची एवढी हिंमत?’’ भाऊ त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा आमची भाभी घाबरून स्वयंपाकघरात बसली होती. वडील बाहेर येरझाऱ्या घालत

शिव्या देत होते. दादा हिंमतवान. त्याचा स्वभावही मजेशीर. त्यांच्याशी दीड तास गोड गोड बोलत राहिला. मग ते वैतागले आणि म्हणाले, ‘‘एकटाच येतो कोणी लग्न ठरवायला? घरातले कुठे आहेत?’’ त्याच्या आईचाही विरोध होता. मग मामा-मामी, मावशी यांना घेऊन पुढच्या रविवारी तो

पुन्हा हजर! शेवटी तिचे वडील थकले आणि म्हणाले, ‘‘करा काय ते!’’ लग्न शासकीय आणि चर्चमध्ये. गावाला तिला सोडायला आलेले आई-वडील परत निघाले तेव्हा तिला खूप रडू कोसळले. तर दादा त्यांना

म्हणाला, ‘‘इतक्या लवकर का जाताय? राहा दोन दिवस.’’ तर ते म्हणाले, ‘‘छे छे, मुलीच्या घरचे पाणी पिणार नाही आम्ही.’’ तर दादा म्हणाला, ‘‘अहो बाबा, पाणी आपण शेजारून मागवू. तुम्ही राहा.’’ पुढच्या काही वर्षांत सासरे-जावयाची चांगलीच गट्टी जमली. सुख-दु:खाची साथ बनली. आता सासूबाई वारल्यानंतर सासरे जावयाच्याच घरी राहतात. रोज एकत्र चालायला जातात.

थोडय़ाफार फरकाने माणसे सगळी सारखीच असतात. लपूनछपून सिगारेटी ओढतात, मोठे झाले तरी आयांना घाबरतात, मित्रांमध्ये बतावणी करतात, आणि बाथरूममध्ये किशोरकुमार बनून ताना मारतात. धर्म बदलला म्हणून हे थोडेच बदलणार आहे? ज्यांना हे समजले ते शहाणे झाले. बाकी आहेतच करंटे!

wsameenad@gmail.com

(लेखिका जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी, सोनीपत येथे प्राध्यापिका आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 1:07 am

Web Title: successful love marriage love marriage story of couples zws 70
Next Stories
1 रफ स्केचेस् : त्रिभुवन
2 अरतें ना परतें.. : किडक्या दाण्यांचं काय करायचं?
3 अंतर्नाद : अभिसरण.. धर्म आणि संगीताचे!
Just Now!
X