ब्रिटिशकाळानंतर सुमारे शंभर वर्षांनी डॉ. गणेश देवी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लोकभाषांच्या सर्वेक्षणाचे अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक काम अलीकडेच पूर्ण झाले. पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे यांनी महाराष्ट्रातील लोकभाषांच्या सर्वेक्षणाच्या कामी त्यांना मोलाचे सहकार्य केले. या सर्वेक्षणावर आधारीत ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’ हा पहिला मराठी खंडही त्यांनीच प्रकाशित केला आहे. सर्वेक्षणाचे काम करताना आलेल्या अनुभवांचा अरुण जाखडे यांनी घेतलेला धांडोळा..
डॉ. गणेश देवी यांच्या तेजगड आदिवासी अकादमीत आणि ‘भाषा केंद्र, बडोदा’च्या काही कार्यक्रमांना मी अनेक वेळा गेलो होतो. ८ मार्च २०१० ला Bhasha Confluence At Ground Zero या परिषदेस उपस्थित राहण्यासाठी बडोद्याला गेलो होतो. या परिषदेत भाषाविषयक अनेक प्रश्नांची चर्चा झाली. ‘भाषा मरते म्हणजे काय? आणि भाषा का मरतात?’ यांपासून भाषांच्या अस्तित्वासाठी काय केले पाहिजे, यावर भारतातील आणि भारताबाहेरील अनेक भाषातज्ज्ञांनी आपले विचार व्यक्त केले होते. गुजरातचे गांधी म्हणून ओळखले जाणारे नारायणभाई देसाई आणि साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यां महाश्वेतादेवी यांच्या अध्यक्षतेखाली जे अनेक निर्णय घेतले गेले, त्यापैकी एक होता- ‘भारतीय भाषांचे सर्वेक्षण’! सरकारच्या मदतीशिवाय लोकसहभागातून हा प्रकल्प व्हावा, हेही ठरले होते. मी तीन दिवसांची ही परिषद आटोपून परत आलो त्यावेळी माझ्याबरोबर प्रा. म. द. हातकणंगलेकर होते.
अशा परिषदा होतात आणि पुढे त्यात झालेल्या चर्चा लोक विसरून जातात. माझेही तसेच झाले होते. अधूनमधून दूरध्वनीवरून किंवा प्रत्यक्ष भेटीत डॉ. देवींनी ‘भाषा सर्वेक्षणाचे काम करायचे आहे. गुजरात व काही भागांत माझे प्रयत्न सुरू झाले आहेत,’ हे मला सांगितले होते. पुढे वर्ष- सहा महिने असेच गेले आणि एके दिवशी डॉ. देवींचा फोन आला की, तुम्ही सापुताऱ्याला या. तिथे गुजरात आणि महाराष्ट्राच्या भाषा सर्वेक्षणाविषयी चर्चा करायची आहे. सापुतारा हे गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे आणि दोन्ही राज्यांतील लोकांना तिथे येणे सुलभ होते. बडोद्याला भाषाविषयक काही कार्यक्रमांना जाऊन माझ्या मनात भाषाविषयक प्रश्नांची काही जाण निर्माण झाली होती, परंतु मी काही भाषावैज्ञानिक नाही. तरीही जी अल्पस्वल्प जाण मला झाली होती, त्यातून केवळ कुतूहल म्हणूनच मी सापुताऱ्याच्या चर्चासत्राला गेलो होतो. डॉ. देवींची भेट एवढाच माझा माफक उद्देश होता. तेथे डेक्कन कॉलेजमधील काही आजी-माजी भाषावैज्ञानिक, गुजरातमधील काही भाषावैज्ञानिक आणि डॉ. देवींचे सहकारी आले होते. डेक्कन कॉलेजमध्ये आता सीआयआयएल असलेले म्हैसूरच्या भाषा केंद्राचे प्राध्यापक, डेक्कन कॉलेजमधील माजी प्राध्यापक डॉ. खुबचंदानी, संतोष शेणई अशी आम्ही थोडीफार महाराष्ट्रातील मंडळी त्या चर्चेला हजर होतो. तिथे काही फार सकारात्मक चर्चा झाली नाही. डॉ. देवी यांची झालेली भेट व त्यांच्याशी झालेल्या गप्पा एवढीच माझ्यासाठी समाधानाची गोष्ट होती. मी पुण्याला आलो आणि पुन्हा या सगळ्या गोष्टी विसरून गेलो.
नॅशनल बुक ट्रस्टच्या सहाय्याने पुणे विद्यापीठात मी ‘ट्रेनिंग कोर्स इन् पब्लिशिंग’ आयोजित केला होता. या अभ्यासक्रमाचा समारोप करण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यासाठी मी डॉ. गणेश देवींना निमंत्रित केले. ते धावपळीत होते, पण माझ्या आग्रहास्तव ते आले. त्यांना बोलावण्यात त्यांची भेट आणि त्यांच्याशी काही चर्चा, गप्पा हा माझा स्वार्थच होता. त्यावेळी गप्पांच्या ओघात महाराष्ट्रातील भाषा सर्वेक्षणाचा विषय त्यांनी काढला आणि महाराष्ट्रातील काही बोलींच्या प्राध्यापकांची एक मीटिंग आयोजित करावी असे ठरले. डॉ. देवी यांचा आदिवासी व भटक्या-विमुक्त समाजातील अनेक कार्यकर्त्यांशी पूर्वीपासूनच संबंध होता. त्यांनी भटक्या-विमुक्त समाजातील कार्यकर्त्यांना भटक्या समाजातील विविध बोलींचे सामाजिक कार्यकर्ते घेऊन येण्यास सांगितले होते. त्यावेळी डॉ. मनोहर जाधव हे मराठी विभागप्रमुख होते. त्यांनी विद्यापीठात हॉल व येणाऱ्या लोकांसाठी विद्यापीठात निवासव्यवस्था करण्यास सहकार्य केले. दोन दिवसांच्या त्या परिसंवादात तेही सहभागी होते.
येथेच महाराष्ट्राच्या भाषा सर्वेक्षणाचा प्रारंभ झाला. काही बोलींची व त्या लिहू शकणाऱ्यांची नोंद झाली. भाषा सर्वेक्षण कसे असावे, याबद्दल डॉ. देवी यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या प्रकल्पाचा समन्वयक म्हणून मी काम पाहावे असे ठरले. कामाला हळूहळू सुरुवात झाली. प्रथम भाषेचा शोध घेणे, नंतर त्या भाषेतील व्यक्ती शोधणे, त्या भाषेत लिहिणारे शोधणे, त्यांना सर्वेक्षणासाठी त्या भाषेतील कोणती माहिती हवी आहे, ते समजावून सांगणे आणि ती माहिती त्यांनी त्वरित मिळवून पाठवावी यासाठी सतत पाठपुरावा करणे, हे माझे काम सुरू झाले. पद्मगंधा प्रकाशनाचे कार्यालय हेच महाराष्ट्रातील भाषा सर्वेक्षणाचे कंेद्र आणि कार्यालय झाले.
मधल्या काळात मला एक छंदच लागला. तो म्हणजे- जो भेटेल त्याला ‘तू आणखी कोणती भाषा बोलतोस, तुझ्या घरात कोणती भाषा बोलतात, तू राहतो त्या गावात कोणकोणत्या भाषा बोलतात..’ अशी माहिती विचारायचा. या चौकशीच्या छंदातून एक-एक भाषा वाढत चालल्या. एखादी व्यक्ती म्हणे, ‘आमच्या भागात अमुक अमुक एक भाषा आहे. ती भाषा बोलणाऱ्या समाजातील काही लोक माझ्या ओळखीचे आहेत. मी तुम्हाला हवी तशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो.’ पण तो नंतर करेलच अशी शाश्वती नसते. काही वेळा लोक बोलतात आणि नंतर विसरून जातात. नंतर लक्षात आले की, नुसती माहिती विचारून उपयोग नाही. सर्वेक्षणाचे महत्त्वही सांगायला हवे.
या सर्वेक्षणाविषयी मी काही वृत्तपत्रांतून, वाङ्मयीन नियतकालिकांतून आणि ‘लोकराज्य’सारख्या शासकीय मासिकातूनही लेख लिहिले. लेख वाचून काहींनी फोन केले. त्यातून काही नवी माहिती देणारे व लिहिणारे लोक मिळत गेले.
क्षेत्रीय कार्य हे एक आव्हानच असते. एरव्ही उत्तम व मनमोकळ्या गप्पा मारणारा माणूस त्याच्या समाजाची किंवा भाषेची माहिती द्यायची वेळ आली की स्वत:ला आकसून घेतो. त्याच्या मनात संशय निर्माण होतो आणि आपल्या समाजातील इतर लोक अशी माहिती दिली तर काय     म्हणतील, या भीतीने तो काहीच बोलत नाही. विशेषत: भटक्या-विमुक्तांच्या भाषांसंबंधीचे काम त्यामुळे लांबत गेले. त्यांच्या भाषा बोलणारे लोक हे आधीच्या पिढीतले- साठीच्या पुढचे आहेत. अनेकांना ‘माहिती कोठून मिळवली? संदर्भ देता येतील का?’ विचारले तर ते नाराज व्हायचे. शेवटी समजून सांगावे लागे की, ‘हा तुमच्यावरचा अविश्वास नाही, तर ती लेखनाची शिस्त असते.’ संदर्भासंबंधात शिस्त पाळण्यास प्राध्यापकही तयार नसतात, तर या बिचाऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ? लेखाच्या परिपूर्णतेसाठी संबंधित व्यक्तीला फोन केले तर ‘जाऊ द्या आता; आहे तेवढय़ात घ्या भागवून!’ किंवा ‘आमच्या पाव्हण्याला विचारून कळवतो,’ असे सांगून वेळ मारून नेत.
या सर्वेक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक लोकांशी संबंध आला आणि मानवी मन हे किती अनाकलनीय आणि गूढ आहे हे आपण वाचतो, लिहितो; परंतु या वाक्याची प्रचीती यानिमित्ताने आली. पणे असे अनुभव आपल्याकडेच येतात असे नाही. क्षेत्रीय कार्य करताना अशा अनेक अडचणी येतात. आता त्याला अडचणी म्हणता येणार नाही. तो आपल्या शोधयात्रेचा एक भाग असतो. आपल्याला घाई असते आणि त्यामुळे आपण अस्वस्थ होत असतो, एवढेच.
माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्वेक्षणामुळे माझा भ्रम दूर झाला, तो म्हणजे- आपल्याला महाराष्ट्र समजला आहे, याचा! महाराष्ट्रात मी निमित्ता-निमित्ताने व काही वेळा मुद्दाम फिरलो. महाराष्ट्रातील साहित्यिकांचे साहित्य वाचले, महाराष्ट्राचा इतिहास-भूगोल वाचला. पण खरा महाराष्ट्र या सर्वेक्षणामुळेच समजला.
स्वातंत्र्यानंतर आता पासष्ट वर्षे होऊन गेली तरी आजही कितीतरी समाज वंचित अवस्थेत आहेत. दक्षिण महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त समाजातील काही कार्यकर्ते पुण्याला ऑफिसला आले तर संकोचाने ऑफिसच्या बाहेरच बसायचे. रात्रीचा रेल्वेचा कमी तिकिटाचा प्रवास करून यायचे. त्यांना ऑफिसमध्ये फार आग्रहाने बोलावून घ्यावे लागे. ऑफिसमध्ये अंघोळीची सोय झाली याचा त्यांना आनंद वाटायचा. त्यांना मी सांगू लागलो, ‘तुम्ही येऊ नका, मीच येतो तुमच्याकडे.’ एक-दोनदा मीच मग सांगली-कोल्हापूरकडे जाऊन आलो.
आदिवासींच्या नेहाली भाषेसाठी थोडे अधिक प्रयत्न करावे लागले. विदर्भातील भाषा माहीत होती, पण तिथे जाणार कोण? अकोल्याचे प्राध्यापक डॉ. श्रीकृष्ण काकडे यांना मी विनंती केली. त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या दोन गावांतील या भाषेचे सर्वेक्षण केले आणि आदिवासींच्या भाषा लिहिण्यासाठी त्या समाजातील व इतर काही प्राध्यापक मिळाले.
आता लोक म्हणत आहेत की, हे काम फार मोठे व महत्त्वाचे झाले आहे. काम करताना माझ्या मनात असे काही नव्हते. डॉ. देवी सांगतील ते ऐकायचे, या श्रद्धेपोटी मी काम करत राहिलो. त्यांनी फोन केला आणि बोलावले की जायचे, एवढेच मला समजते. तेजगड, बडोदा, किशनगड, दिल्ली अशा अनेक ठिकाणी भाषांविषयक चर्चेसाठी मी गेलो. देशभरातील अनेक भाषाप्रेमी व अभ्यासक तिथे भेटायचे. नवे मित्र मिळाले. नवे अभ्यासक्षेत्र मिळाले. माझे अनुभवविश्व अधिक व्यापक झाले. आता हे काम खरोखरच मोठे असेल आणि त्यात माझा किंचित सहभाग असेल, तर त्याचे श्रेय डॉ. देवींचे आहे.
हा जगन्नाथाचा रथ आहे. त्याला अनेकांचे हात लागले आहेत. या एकूणच प्रकल्पाविषयी खंडाला लिहिलेल्या माझ्या संपादकीयात मी आणखी विस्ताराने चर्चा केली आहे. आता मिळालेली माहिती पुढील काळात अद्ययावत करणे, त्यात वाढ करणे, हे महत्त्वाचे काम करावे लागेल. इथे पूर्णविराम नाही.

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Bhatrihari Mahtab recently joined the BJP after leaving the Biju Janata Dal
भाजप – बिजद यांच्या मैत्रीपूर्ण संघर्षांत कुणाची सरशी?
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार