सकाळी फिरायला गेलेला एक माणूस उत्साहाने दोन्ही हात उंचावून समोरून येणाऱ्या मित्राला म्हणतो, Good morning!
मित्र थोडय़ाशा घुश्श्यातच म्हणतो-  kWhat is so good about the morning?
पहिला आश्चर्याने म्हणतो, kWhy! man, you are alive!
‘जगणे’ हीच मुळी मोठी साजरी करण्याची गोष्ट आहे, हे किती सहज विसरतो आपण. ‘जगणे’ आपण गृहीतच धरतो- आजार येत नाही, तोपर्यंत!
उत्साहाने सळसळणारा एक तरुण एके दिवशी माझ्या दवाखान्यात आला. म्हणाला, ‘ओळखलंत मॅडम?’ माझ्या डोळ्यांसमोर धुकं. तोच म्हणाला, ‘कसं ओळखणार म्हणा! केवढा झालोय मी आता! मी अमोल. अमोल पाटील. मिशनमध्ये अ‍ॅडमिट होतो बघा महिनाभर.. धनुर्वात झाला होता मला. आठवतंय?’ मी म्हटले, ‘हो, हो. आठवतंय.’ आणि मला आठवलेच. एक विशिष्ट चेहरा नव्हे, पण असहाय वेदना सोसत असलेल्या निरागस मुलांनी भरलेला धनुर्वाताचा वॉर्ड! होय. मिशन हॉस्पिटलमध्ये बालरुग्ण विभागात तेव्हा धनुर्वाताचा एक वॉर्ड होता. सतत भरलेला. अगदी नवजात अर्भकांपासून वेगवेगळ्या वयाची लहान-मोठी मुले सगळ्या शरीराचे धनुष्य करून आचके देत असायची. ते पाहणेसुद्धा क्लेशकारक असे. लहानशा आवाजाने, स्पर्शाने, प्रकाशाने, कोणत्याही लहानशा संवेदनेने शरीराचे धनुष्य अधिकच ताणले जाई. आचक्यांचा जोर वाढे. हा आजार बरेच दिवस चाले. अनेक गुंतागुंती निर्माण होत. रात्रंदिवस आम्हाला सजग राहावे लागे. कारण अचानक उद्भवणाऱ्या गुंतागुंतीनुसार ताबडतोब उपचार करणे गरजेचे असे. एवढे करूनही काही मुले दगावत. काही बरी होत. मुख्य म्हणजे बरी झालेली मुले पूर्ण बरी होत. त्यांच्यात काहीही दोष राहत नसे. त्यामुळे धनुर्वाताच्या मुलाला बरे करायचे, अशी आम्हा डॉक्टरांची ईष्र्या असे. रात्रंदिवस त्यासाठी आम्ही धडपडत असू. बरे झालेले मूल घरी पाठवताना डोळ्यांत अश्रू जमा होत. मनात कृतकृत्यतेचे समाधान असे. आज पस्तीस वर्षांनी पुन्हा एकदा अमोलच्या निमित्ताने तो आनंद, ती धडपड जिवंत झाली. अमोल म्हणाला, ‘कधी कधी एकदम आपण सहज मरून गेलो असतो, हे जाणवतं आणि आपण जिवंत आहोत म्हणून मस्तच वाटतं.’ त्याच्या नुसत्या बोलण्यानेही मला मस्तच वाटलं.
अमोल त्याच्या मुलाला घेऊन आला होता. त्याला रस्त्यावरचा कुत्रा चावला होता. लोकांनी त्या कुत्र्याला मारलं. पण तो पिसाळलेला असावा अशी त्यांना शंका होती. अमोल म्हणाला, ‘पिसाळलेल्या कुत्र्यानं होणारा आजार फार भयंकर असतो का मॅडम? धनुर्वाताइतका?’ आज अमोलनं माझ्या मनातली सगळीच भुतं जागी करायची ठरवली होती की काय?
धनुर्वातासाठी आमच्याकडे एक वॉर्ड होता. पण रेबीजसाठी फक्त एक लहानशी खोली. सिव्हिल हॉस्पिटलमधील एका कोपऱ्यातील दहा बाय दहाची खोली. त्याला लोखंडाच्या गजांची भिंत. त्या भिंतीतच लोखंडाच्या गजांचं एक लहानसं दार आणि त्या दाराला बाहेरून लावलेलं कुलूप! एखाद्या पोलीस चौकीत शोभेल अशी ही खोली- फक्त रेबीज झालेल्या मुलांसाठी होती. पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे होणारा हा भयानक आजार. या आजाराला कोणतेही औषध नाही. हा आजार कधी बरा होत नाही. मृत्यू शंभर टक्के ठरलेला. आणि तोही अगदी थोडय़ाच दिवसांत. याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे पेशंटला बेशुद्ध होण्याचा उ:शापही नाही. या मुलांचा चेहरा भेसूर दिसे. त्यांना तहान लागे. पण पाण्याच्या नुसत्या दर्शनानेही गिळण्याचे स्नायू आकुंचन पावत आणि ती मुले चेहरा वेडावाकडा करून विचित्र आवाज काढत. त्यांची सतत लाळ गळत असे. कारण तीही त्यांना गिळता येत नसे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्यांना असे गजाआड ठेवावे लागे. त्यांचे पालक हरवलेल्या नजरेने पाहत बाहेर बसलेले असत. त्या खोलीत पेशंट असेल तर आम्ही डॉक्टर, सगळे कर्मचारी अस्वस्थ असू. ती खोली रिकामी झाली की मगच थोडे हायसे वाटे. आणि अमोल मला विचारतोय, हा आजार भयंकर असतो का, म्हणून.
मी त्याला सांगितले, ‘हा आजार झाला तर पेशंटला कोणीही वाचवू शकत नाही. परंतु हा आजार आपण ‘टाळू’ शकतो. रेबीज आजार टाळण्यासाठी आज आपल्याकडे फार प्रभावशाली लस आहे.’
‘काय भयंकर आजार असतात हो एकेक!’ अमोल म्हणाला.
मी म्हटलं, ‘गेल्या पंधरा वर्षांत मी धनुर्वाताचा पेशंट पाहिलेला नाही. आणि रेबीजचाही. रेबीज, धनुर्वात, घटसर्प, गोवर, पोलिओ असे अनेक भयानक आजार आपण लसीकरणामुळे टाळू शकतो, हे माणसाचे केवढे कर्तृत्व आहे. या लसी म्हणजे आपल्या शरीराचे संरक्षण करणारी अदृश्य कवचकुंडलेच आहेत.’
आज ही आठवण लिहिताना माझ्या मनात येते- ज्या महात्म्यांनी आपले दु:ख दूर केले, त्यांच्यापुढे आपण नतमस्तक होतो. त्यांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. परंतु ज्यांनी आपल्या आयुष्यात दु:ख येऊच दिले नाही, त्यांची आपल्याला आठवण तरी आहे काय? लसीची संकल्पना शोधणाऱ्या आणि वेगवेगळ्या लसी बनविणाऱ्या शास्त्रज्ञांच्या कष्टांची, धडपडीची, कर्तबगारीची आपल्याला जाणीव तरी आहे काय? लसीकरण नसते तर आपल्यापैकी अर्धी तरी माणसे आज अस्तित्वात नसती. उरलेल्यांपैकी कित्येकजणांच्या चेहऱ्यावर देवी व्रण ठोकून गेल्या असत्या. आणि कित्येकांच्या हाता-पायावरून पोलिओचे वारे गेले असते. कदाचित आज हे लिहायला मीही नसते; आणि वाचायला तुम्हीही!
जगणे ही साजरी करण्याजोगी गोष्ट आहेच; पण ती साजरी करताना ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत त्यांची कृतज्ञ आठवणही ठेवायला हवी.