News Flash

विवेकानंद-दूत

कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांचे आगळेवेगळे भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वस्व झोकून देणारे सेवाव्रती एकनाथजी रानडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या निरलस सेवाकार्याचे पुण्यस्मरण..

| November 16, 2014 06:25 am

कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांचे आगळेवेगळे भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वस्व झोकून देणारे सेवाव्रती एकनाथजी रानडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या निरलस सेवाकार्याचे पुण्यस्मरण..
१७ जानेवारी १९६३. स्थळ- कोलकाता. स्वामी विवेकानंद जन्मशताब्दीच्या निमित्ताने विवेकानंदांच्या समस्त साहित्याचा अभ्यास करून ते संपादित रूपात प्रकाशित करण्यात आले. त्याचे संपादन केले होते एकनाथजी रानडे यांनी. पुस्तकाचे नाव होते- ‘राऊझिंग कॉल टू हिंदू नेशन.’
त्यावेळी कन्याकुमारी येथे काही युवक एकत्र आले होते. त्यांना असे वाटले की, संपूर्ण देशभरात स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. ज्या कन्याकुमारी येथील श्रीपद परईवर त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश समजला, जिथे एका युवा संन्याशाचे रूपांतर राष्ट्रनिर्मात्यामध्ये झाले, तिथे त्यांचे स्मारक करावे. तीही तारीख- १७ जानेवारी १९६३!
या दोन्ही घटनांमध्ये परस्परसंबंध नव्हता आणि कदाचित तो तसा आलाही नसता. कारण स्मारकाची कल्पना अतिशय साधी होती. त्या खडकावर केवळ एक पाटी लावावी, की ‘इथे भारत परिक्रमेनंतर स्वामी विवेकानंदांनी २५,२६, २७ डिसेंबर १८९२ ला ध्यान केले.’ पण काही लोकांनी ती पाटी काढून फेकून दिली. त्या घटनेला अनावश्यक धार्मिक रंग दिला गेला. सरकारी हस्तक्षेप झाला. राजकीय रंग दिला गेला. एकूण काय, तर तिथे स्मारक होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली गेली. पण या युवकांच्या मनात त्या खडकाचे स्वामीजींच्या आयुष्यातील स्थान व अर्वाचीन भारताच्या घडणीतले त्यांचे स्थान सुस्पष्ट असल्याने हे स्मारक तिथेच व्हावे अशी जबरदस्त इच्छा होती. या तरुणांमध्ये दत्ताजी डिडोळकर हे संघ-प्रचारकही होते. या स्मारकासंबंधी चर्चा करण्यासाठी सर्वजण रा. स्व. संघ मुख्यालयात सरसंघचालक गोळवलकर गुरुजींना भेटण्याकरता नागपूरला आले. चर्चेत असे ठरले की, विवेकानंदांचे स्मारक तिथेच व्हायला पाहिजे. पण हे स्मारक वास्तवात आणायचे असेल तर एकनाथजी रानडे यांच्यासारखा कार्यकर्ता या कामासाठी पूर्णवेळ उपलब्ध असला पाहिजे.
एकनाथजींना गोळवलकर गुरुजींनी त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या (एकनाथजी त्यावेळी संघाचे अ. भा. बौद्धिक प्रमुख होते.) जबाबदारीतून मुक्त केले; आणि सुरू झाली एका संघर्षांची, अथक परिश्रमांची अन् उत्तुंग प्रतिभेची यशोगाथा! एकनाथजींना एकाच वेळी अनेक पातळ्यांवर आणि अनेक समस्यांशी चार हात करावे लागले. पण समस्येचे संधीत रूपांतर करण्याची अद्भुत क्षमता त्यांच्यापाशी होती.
तामीळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री भक्तवत्सला यांनी असे वक्तव्य केले होते की, मी जोपर्यंत सत्तेत आहे तोवर इथे विवेकानंदांचे स्मारक होऊ देणार नाही. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री हुमायून कबीर यांनीही या स्मारकाला विरोध दर्शविला होता. स्थानिक जनतेमधील एक गटही स्मारकाच्या विरोधात होता.
शिवाय हे स्मारक भरसमुद्रात उभारायचे होते. चारी बाजूला समुद्र असल्यामुळे सिमेंट, विटा वगैरे न वापरता ते ग्रॅनाइटमध्येच करणे आवश्यक होते. त्यासाठी लागणारा ग्रॅनाइट ८०-८५ कि. मी अंतरावरील खाणींतून आणावा लागणार होता. त्यापैकी काही दगड तर ३५ ते ४० टन इतक्या वजनाचे असणार होते. कन्याकुमारीपर्यंत ते आणताना वाटेतील नद्यांवरील छोटे पूल सक्षम केल्याशिवाय ही वाहतूकही शक्य नव्हती.
या सगळ्याबरोबरच स्मारकासाठी लागणारा पैसा उभा करणे हेही मोठे आव्हान होते. यापैकी कुठल्याच प्रश्नाला एकनाथजी त्यापूर्वी सामोरे गेलेले नव्हते. पण या अशा असंख्य समस्यांवर एकनाथजींनी अतिशय सकारात्मक पद्धतीने उत्तरे शोधून काढली.
सर्वप्रथम अतिशय कौशल्याने त्यांनी स्मारकाची परवानगी मिळवली. सर्व बाजूंनी स्मारकास होणारा विरोध पाहिल्यावर अनेकांनी सुचवले होते की, आपण यासंबंधात आंदोलन उभे करू या. पण एकनाथजींचे म्हणणे होते की, स्वामी विवेकानंदांच्या स्मारकासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करणे योग्य नव्हे. कदाचित आंदोलनामुळे परवानगी मिळेलही; पण ज्याने संपूर्ण आयुष्य देशबांधवांच्या कल्याणाचा विचार आणि कृती करण्यात घालविले, त्या महामानवाच्या स्मारकासाठी आंदोलन करावे लागणे ही अतिशय खेदजनक गोष्ट होय. भारताची अस्मिता जागविणाऱ्या विवेकानंदांचे स्मारक त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे भव्य व खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्मारक व्हायला हवे. त्याकरता मग एकनाथजींनी सर्व लोकशाही आयुधांचा वापर केला. ‘नियोजित ठिकाणीच हे स्मारक व्हावे’ अशा अर्थाच्या अर्जावर लोकसभेतील ३२३ खासदारांच्या सह्या त्यांनी मिळवल्या आणि लोकनायक बापूजी अणे यांनी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना तो सादर केला. या अर्जावर भारताच्या सर्व प्रांतांतील सर्वच पक्षांच्या खासदारांनी सह्या केल्या होत्या. त्यातून स्वामी विवेकानंदांसंबंधी त्यांना वाटणारी आस्था आणि एकनाथजींच्या दांडग्या लोकसंपर्काची प्रचीती येते.
परवानगी तर मिळाली; परंतु एवढा मोठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी कसा उभारणार? एकनाथजींनी अतिशय कल्पकतेने निधी संकलनाची मोहीम आखली. स्वामी विवेकानंद सर्वधर्म परिषदेसाठी अमेरिकेला जाणार असे कळल्यावर काही संस्थानिकांनी त्यांचा प्रवासखर्च उचलण्याची तयारी दर्शविली होती. परंतु ‘मी हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून जात असेन तर सामान्य हिंदूंनीही त्यात सहभाग घेतला पाहिजे,’ असे विवेकानंदांचे म्हणणे होते. त्यामुळे स्वामीजींचे शिष्य अलासिंगा पेरुमल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मद्रास येथील घराघरांतून १० पैसे, २५ पैसे अशा रीतीने पैसे जमा केले. एकनाथजींनी त्याचाच आधार घेतला. हे ‘राष्ट्रीय’ स्मारक असल्याने १ रु., ३ रु. व ५ रु. ची कुपन्स छापून, देशभर प्रांतिक स्मारक समित्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून हा निधी त्यांनी उभा केला. अतिशय छोटय़ा रकमांतून तब्बल ८५ लाख रुपये त्यांनी उभे केले. निधीउभारणीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होता. महाराष्ट्रातील समितीचे अध्यक्षस्थान भूषवले होते स. का. पाटील यांनी. याचबरोबर सर्व राज्य सरकारांकडून प्रत्येकी एक लाखाची देणगीही त्यांनी मिळवली.
त्याकाळी ‘कोअर बँकिंग’ हा शब्दही अस्तित्वात आलेला नव्हता. पण एकनाथजींनी एका राष्ट्रीयीकृत बँकेशी बोलून अशी व्यवस्था करावयास लावली, की देशभरातून कुठल्याही शाखेत भरलेला निधी स्मारक समितीच्या मुख्यालयातील खात्यात जमा होत असे. स्मारकाचे लोकार्पण झाल्यानंतर थोडय़ाच दिवसांत त्यांनी देशातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये स्मारकाचा जमाखर्च जनतेच्या माहितीसाठी जाहीर केला.
एकनाथजींची स्मारकासंबंधीची कल्पना सुस्पष्ट होती. त्यांना विवेकानंदांचे मंदिर उभारायचे नव्हते. विवेकानंदांना देव न बनवता आपल्या तपस्येने व परिश्रमाने एखादा माणूस मानवापासून महामानवापर्यंतचा प्रवास कसा करू शकतो आणि अखंड प्रेरणास्रोत कसा बनू शकतो, याचा आदर्श त्यांना देशापुढे ठेवायचा होता. जेणेकरून स्मारकाला भेट देणाऱ्या प्रत्येकास देश आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळावी अशी त्यांची कल्पना आहे.
या स्मारकात विवेकानंदांची पूजा वगैरे केली जात नाही. या ठिकाणी स्वामीजींनी ध्यान केले म्हणून ध्यानस्थ प्रतिमा असावी असा आग्रह अनेकांनी धरला होता. पण स्वामीजींनी इथे ध्यान केले हे खरे असले तरी त्या ध्यानातून प्रेरणा घेऊन स्वामीजींनी अथक परिश्रमांद्वारे संघटनेच्या माध्यमातून ‘नरसेवा हीच नारायणसेवा’ हा मंत्र जगाला दिला होता. तसेच भारतातील उपेक्षित व वंचितांच्या सेवेसाठी आपल्या गुरुबंधूंना व शिष्यांना त्यांनी प्रेरित केले होते. म्हणूनच त्यांची ध्यानस्थ प्रतिमा न बनवता ध्यानातून बाहेर पडून ‘चैरवैती चरवैती’चा संदेश देणारी भव्य प्रतिमा सभामंडपात उभारण्यात आली आहे. प्रसिद्ध मूर्तिकार सोनावडेकर व चित्रकार एस. एम. पंडित यांच्या प्रतिभेतून ती साकारली आहे.
एकनाथजींना अनेक तज्ज्ञांनी सांगितले होते की, ज्या प्रकारच्या स्मारकाची कल्पना आपण करताहात, ते स्मारक उभे करायला किमान २५ वर्षे तरी लागतील. कारण ते भरसमुद्रात उभे करायचे आहे. आणि अशा कामाचा तुम्हाला काहीच पूर्वानुभव नाही. पण हाती घेतलेल्या कामात सर्वस्व झोकून देण्याची वृत्ती, अविश्रांत कष्टांची तयारी आणि कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन वेगळा विचार करण्याचे धाडस एकनाथजींपाशी असल्याने स्मारकाच्या कामाचे संपूर्ण नियोजन, त्यातल्या छोटय़ातल्या छोटय़ा अडीअडचणींचाही केलेला सखोल विचार यामुळे केवळ सात वर्षांत ही भव्य स्मारकवास्तू उभी राहिली. ती पाहून सगळेच अवाक् होतात. या अजोड वास्तुशिल्पात तशीच विलक्षण जादू आहे.
हे काम सुरू असतानाच एकनाथजींच्या मनात स्वामी विवेकानंदांचे जिवंत स्मारक उभे केले पाहिजे हे पक्के झाले. एकनाथजी म्हणत, ‘केवळ दगडावर दगड ठेवून विवेकानंदांचे स्मारक करावे ही माझी कल्पना नाही. हे स्मारक तर प्रथम चरण आहे. पण विवेकानंदांना अभिप्रेत असे मनुष्यनिर्माण करणारे जैविक संघटन हा या स्मारकाचा द्वितीय चरण असेल.’ त्यातूनच विवेकानंद केंद्राचा जन्म झाला. त्याद्वारे अध्यात्मप्रेरित सेवासंघटन त्यांनी निर्माण केले. विवेकानंद केंद्राच्या मुख्यालयासाठी त्यांनी १२० एकर जमीन खरेदी केली. ज्यांनी कधी जमिनीचा व्यवहार केलेला असेल त्यांना लक्षात येईल, की एक एकर जमीन खरेदी करून ती आपल्या नावावर करणे हेसुद्धा किती कष्टाचे काम आहे. इथे तर एकनाथजींनी १२० एकर जमीन वेगवेगळ्या १०० व्यक्तींकडून खरेदी केली. ही कामे कमी म्हणूनच की काय, स्वामीजींनी साऱ्या जगात हिंदू धर्माचा व  संस्कृतीचा झेंडा फडकवला. आपल्या देशाने विश्वाकरता कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे, याबद्दलचे संशोधन करून ‘कल्ल्िरंल्ल उल्ल३१्रु४३्रल्ल ळ६ं१२ि ळँ४ॠँ३ अल्ल िउ४’३४१ी’ हा ग्रंथराजही त्यांनी सिद्ध केला.
स्वामी विवेकानंदांनी अशा एका संघटनेची कल्पना मांडली होती, की जे जनसामान्यांचे संघटन असेल; ज्यात समाजातील शिक्षित स्त्री-पुरुष दोघेही मिळून व्रतस्थ जीवनाचा आदर्श समोर ठेवत भारतमातेच्या सेवेत आपले आयुष्य व्यतीत करतील. विवेकानंदांनी म्हटलेच आहे की, शिक्षणाचा व्यापक प्रसार आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यांच्या माध्यमातून हा देश पुन्हा एकदा उभा करता येईल. अनेक मान्यवरांशी केलेल्या चर्चेतून विवेकानंद केंद्राची कार्यपद्धती विकसित केली गेली. त्यानुसार शिक्षण, स्वाध्याय, योग, संस्कार यांच्या माध्यमातून विवेकानंद केंद्राचे काम अथक सुरू आहे. परंतु या संकल्पित संघटनेसाठी कार्यकर्ते कुठून मिळणार? म्हणून चक्क वर्तमानपत्रांतून जाहिरात देण्यात आली. आणि त्यास मिळालेल्या पदवीधर युवक-युवतींच्या प्रतिसादातून विवेकानंद केंद्राचे काम सुरू झाले. आज देशभरात ८२० हून अधिक ठिकाणी विवेकानंद केंद्राचे काम सुरू आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, अंदमान अशा ठिकाणी विवेकानंद केंद्र विद्यालयाच्या ६२ हून अधिक शाळा आहेत. पर्यावरण, स्वस्त घरकुल योजना, स्वस्त व हरित ऊर्जा या क्षेत्रांतही संशोधनात्मक काम सुरू आहे. याशिवाय राष्ट्राची अंतर्गत सुरक्षा, जगात अन्यत्र चालणाऱ्या गोष्टींचा मागोवा घेणे, वेगवेगळ्या समस्या व त्यावर संशोधन करणारे संशोधक निर्माण करणे, यासाठी दिल्लीत विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनचे काम सुरू आहे.
एकनाथजींचे एक स्वप्न होते. ते म्हणत की, भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यात विवेकानंद केंद्राची शाखा असावी. तिच्या माध्यमातून स्वामीजींच्या ‘राष्ट्र देवो भव:’ आणि ‘मानवसेवा हीच माधवसेवा’ या मंत्रांचा जागर करता येईल.
विवेकानंद स्मारकाला दरवर्षी साधारण २० लाख लोक भेट देतात. मात्र, या स्मारकावर कुठेही आपल्या नावाची साधी पाटीही लागणार नाही याची दक्षता एकनाथजींनी घेतली आहे. या अनामिकतेतच त्यांच्या आयुष्याचे सार आहे. एका महामानवाचे स्मारक
निर्माण करता करता स्वत:च महामानव झालेल्या एकनाथजींना जन्मशताब्दीनिमित्ताने आदरांजली!    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 6:25 am

Web Title: swami vivekananda
टॅग : Swami Vivekananda
Next Stories
1 सेवाधर्मी एकनाथजी..
2 त्या लिहितात, मुलं ‘ऐकतात’!
3 औषध दरनियंत्रणाची ऐशीतैशी
Just Now!
X