06 August 2020

News Flash

फळभाज्या, शेंगभाज्या भाग ५

रताळे, रक्ताळू या नावाने मिळणारे कंद उपवासापुरतेच वापरले जातात. रताळे बटाटय़ासारखेच उत्तम पूरक अन्न आहे. बटाटय़ापेक्षा काही चांगले गुण रताळ्यात आहेत. रताळे मधुर, वृष्य, गुरू

| December 16, 2012 12:29 pm

रताळे
रताळे, रक्ताळू या नावाने मिळणारे कंद उपवासापुरतेच वापरले जातात. रताळे बटाटय़ासारखेच उत्तम पूरक अन्न आहे. बटाटय़ापेक्षा काही चांगले गुण रताळ्यात आहेत. रताळे मधुर, वृष्य, गुरू व स्निग्ध आहे. रताळ्यापासून उत्तम दारू बनवतात. रताळ्याचे पीठ व साखर सर्वसामान्यांकरिता सोपे टॉनिक आहे.
कृश व्यक्तींच्या दाह या विकारात रताळे उकडून खावे. लगेच आराम पडतो. लघवी कष्टाने होणे, अडखळत होणे, त्यामुळे शरीरात सूज येणे या तक्रारीत रताळ्याच्या चांगल्या तुपावर परतलेल्या फोडी किंवा उकडलेले या स्वरूपात वापर करावा. पोटात वायू धरण्याची खोड असणाऱ्यांनी, मधुमेही रुग्णांनी रताळे खाऊ नये. अकाली ताकद गमावलेल्यांनी शुक्र धातू वाढवण्याकरिता रताळी खावी. ज्यांचा अग्नी चांगला आहे त्यांच्याकरिता शेंगदाण्याचे कूट, उकडून बटाटा व रताळी, साबुदाणा व शिंगाडय़ाचे पीठ व सुरण किसून एकत्रित थालीपीठ चांगले; तसेच ते उत्तम ताकदीचे पोटभरू अन्न आहे.
वांगे
वांगे हे फळ औषधी गुणांचे आहे, यावर सर्वसामान्य जनांचा विश्वासच बसणार नाही. हल्ली स्टेरॉईड औषधांचे प्रस्थ खूप माजले आहे. शरीरात एकदा जोम आणण्याकरिता, रोगाला लगेच आवर घालण्याकरिता स्टेरॉईड असलेली औषधे घेतली जातात. अ‍ॅथलिट, मैदानी खेळ खेळणारे खेळाडू याच घटक द्रव्यांचा गैरवाजवी उपयोग करत असलेल्या कथा आपण ऐकतो. वांगे या फळाच्या फॅमिलीत नैसर्गिक स्टेरॉईड आहेत.
थोडय़ाशा श्रमाने थकवा येऊ नये, शरीर सक्षम व्हावे म्हणून कोवळी, बिन बियांची वांगी खावीत. घाम कमी येतो, घामावाटे शरीरातील चांगली द्रव्ये, फाजील प्रमाणात बाहेर जाण्याची क्रिया थांबते. जादा बी असलेले वांगे खाऊन आतल्या बियांमुळे वृक्क किंवा मूत्रमार्गात मूत्राश्मरी बनण्याची शक्यता असते. वांगे रुची आणणाऱ्या भाज्यांत अग्रेसर आहे. कफप्रधान व फुप्फुसाच्या विकारांत कोवळ्या वांग्याचा रस किंवा शिजवून फार मसाला न मिसळलेली भाजी खावी. गळू झाले असल्यास वांगे शिजवून त्याच्या पोटिसाचा शेक द्यावा. गळवे बसतात. पू होत नाही. ज्वरामध्ये वांगे शिजवले की, पूर्ण निर्दोष होते. त्यातील काही असलेले नसलेले विषार दूर होतात. कृश व्यक्तींनी शिजवलेलीच वांगी खावीत. तरुणांनी व बलवानांनी – भरपूर श्रमाची कामे ज्यांना करावयाची आहेत – त्यांनी कोवळे , कच्चे वांगे खावे व त्यासोबत आले, लसूण, जिरे, ओवा, लिंबू, मीठ, हिंग, ताक असे तोंडी लावण्याचे पदार्थ प्रकृतीनुरूप व आवडीप्रमाणे खावे.वांग्याच्या पानांचा रस मूत्रल आहे. ज्यांना लघवी कमी होते, मसालेदार पदार्थ किंवा चमचमीत पदार्थ खाऊन लघवीचा त्रास होतो, त्यांनी वांग्याच्या पानांचा रस प्यावा. वृद्ध माणसांच्या कफ विकारात वांग्याच्या पानांचा चहासारखा काढा उपयुक्त आहे. कफ साठला असेल तर वांग्याच्या पानांचा रस प्यावा. कफ पडून जातो. पोटदुखी, मुरडा, मलावरोध असणाऱ्या व वृद्ध व्यक्तींनी वांगी खाणे टाळावे.
सुरण
सुरण संस्कृतमध्ये अशरेघ्न म्हणून ओळखला जातो. सुरणाची ताकातील भाजी मूळव्याध कमी करते, हे सर्वाना माहीत आहे. पण रक्त पडणाऱ्या मूळव्याधीत त्याचा उपयोग होत नाही, हे रक्ती मूळव्याधीच्या रुग्णांनी लक्षात ठेवावे. सुरण उष्ण, शोथहर व पथ्यकर भाजी आहे. सुरणाचे खाजरे व गोड असे दोन प्रकार आहेत. खाजरा सुरण जास्त औषधी गुणाचा आहे. दणकट माणसांनी अधिक ताकदीकरिता तुपावर परतून सुरणाच्या चकत्या खाव्या. भूक मंद असताना, पचन ठीक होण्याकरता, मूळव्याधीचा ठपका व सूज कमी होण्याकरिता ताकातील भाजी उत्तम गुण देते. सुरणपाक तयार करण्याकरिता सुरण बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये लगदी करून घ्यावा. साजूक तुपावर परतावा. दुप्पट साखर घेऊन त्याचा तीनतारी पाक करावा. वडय़ा पाडाव्या, कृश व्यक्तींकरिता उत्तम टॉनिक आहे.
शेवगा
शेवग्याच्या शेंगेप्रमाणे त्याची कोवळी पाने पालेभाजीकरिता वापरतात. लाल शेवगा हा अधिक औषधी गुणांचा आहे. त्यामध्ये अनेक रासायनिक घटक असतात. समस्त वातविकारांकरिता शेवग्याची पालेभाजी पथ्यकर व उपयुक्त आहे. अग्निमांद्य, कुपचन, आनाह, आध्यान, पोटदुखी, पोटफुगी या वातविकारात पाल्याचा रस वापरावा. वेदना लगेच थांबतात. उचकी लागली असता पानांचा रस प्यावा, लगेच गुण येतो. जेवणानंतर धाप लागल्यास शेवग्याच्या पानांची भाजी खावी किंवा आले स्वरस व शेवग्याच्या पानांचा रस असे मिश्रण जेवणानंतर घ्यावे, धाप थांबते. शेवग्याच्या पानांचा रस डोक्याला चोळावा. कोंडा, नायटा, खवडे बरे होतात. तापातून उठलेल्यांकरिता भूक पूर्ववत व्हावी लागते. त्याकरिता शेवग्याची पालेभाजी प्रशस्त आहे. गळवे बसण्याकरिता पानांचा वाटून लेप करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2012 12:29 pm

Web Title: swasthya ani ayurved fruit vegetable sheng bhajya
टॅग Medical
Next Stories
1 काँग्रेसची ‘विचारप्रणाली’ केवळ सत्ताकारणाची!
2 लाजीरवाणी गोष्ट
3 अ‍ॅलेक्झँडरच्या इच्छा!’
Just Now!
X