इतक्या महत्त्वाच्या आणि प्रचंड अवघड परीक्षेचा निकाल काय लागेल? तळहातांना घाम, हाताची हलकीशी थरथर, आरशात स्वत:शी संवाद, देवासमोर हात जोडून उभे राहिल्यावर मनापासून प्रार्थना- ‘तसं मी चुकत असेन अधूनमधून; पण मी वाईट नाही, दुष्ट नाही.. माझे अपराध विसरून यावेळी माझ्या पाठीशी उभा lok02राहा..’ आणि मग रिझल्टच्या दिवशी चांगल्या गुणांनी पास झाल्यावर नुसत्याच कल्पना- की समजा, नापास झालो असतो तर..? संकटाची कल्पना नं. एक!
मोटरसायकल ऑइलवरून घसरली परवा. पाऊस, पाणी, गर्दी आणि मागून ट्रक.. त्या एका क्षणात सगळे आठवले. पण नशीब, की कसाबसा सावरलो आणि ट्रकवाल्याने पण दूर असताना ब्रेक लावला.. नाहीतर..? संकटाची कल्पना नं. दोन!!
डॉक्टर म्हणाले, ‘मानेवर गाठ आहे. बहुधा साधीच असणार. पण रिपोर्टनंतरच पक्कं कळेल.’ मग धाकधुक.. हुरहुर.. मनात भलभलते विचार.. दुसऱ्या दिवशी.. ‘नॉर्मल आहे रिपोर्ट..’ हुऽऽश्श! समजा, काही वेगळं असतं तर..? माझ्यानंतर कसं जगले असते हे सगळे? संकटाची कल्पना नं. तीन!!!
घाटात समोरून अगदी अंगावर येणारी बस आयत्यावेळी जवळून घासून जाते, पण धडकत नाही.. जत्रेमध्ये अचानक लहान मुलं दिसत नाहीत म्हणून धडधड वाढतानाच ती येऊन बिलगतात.. जन्मत: श्वास रोखून धरलेले, न रडणारे बाळ दोन धपाटय़ांत रडायला लागते.. ऐन लग्नसमारंभात अचानक बेशुद्ध पडलेल्या आजी दोन चमचे साखर दिल्यावर पुन्हा टुणटुणीत होतात..
सगळी संकटं दिसतात; पण अंगावर येत नाहीत. राक्षसाच्या गोष्टी ऐकतो आपण. भुताचे किस्सेसुद्धा. पण मनाला हे कुठंतरी ठाऊक असतं, की आपल्याला ही भुतं लांबून घाबरवतील; पण मानगुटीवर नाही बसणार. आपल्या नशिबावर, चांगुलपणावर आपला नको तितका विश्वास बसायला लागतो हळूहळू. आपल्याला का कोणी फसवेल? ‘कर भला, तो हो भला!’ अशी काही वाक्यं आपल्याला पटायला लागतात. अचानक आपण पूर्वजांची पुण्याई, गुरूचे बळ, पॉझिटिव्ह एनर्जी अशा विषयांवर गप्पा पण मारायला लागतो. आपल्याभोवती कायमच एक सुरक्षाकवच असल्याच्या भ्रमात राहायला लागतो आपण. मग ट्रॅफिक जॅममध्ये चार तास अडकणं, पंधरा दिवस मलेरियाने घरी झोपून राहणं, विमान चुकणं यालाच आपण ‘संकट’ म्हणायला लागतो. अनेक खरीखुरी संकटं आपल्याला लांबून दर्शन देऊन गेल्यावरसुद्धा आपण स्वत:ला कुठंतरी इतके सुरक्षित समजू लागतो, की मग अडचणींनाच ‘संकटं’ समजायला लागतो आपण.
आपल्या बाबतीत फार वाईट काही होणारच नाही अशी खात्री वाटत असताना जर काही झालंच तर ते सहन करण्याइतके कणखर आहोत आपण, की आपण अशावेळी अगदीच मोडून पडू, याविषयीसुद्धा संभ्रम असतो. आणि मग वर्गशिक्षिका अवघड प्रश्नाचे उत्तर विचारताना जसं आपल्याला न विचारता आपल्या मागच्या, पुढच्या, शेजारच्या मुलांना विचारतील असं धरूनच चाललेलो असताना अचानक आपल्यालाच उभं राहावं लागतं, तसाच एक दिवस आपला नंबर लागतो. वर्षांनुवर्षे शनी, राहू आदी मुख्याध्यापक- उपमुख्याध्यापक अशा कडक मंडळींपासून आपल्याला दूर ठेवणाऱ्या आपल्या वर्गशिक्षकाची बदली होते आणि मग कळतं, की याला म्हणतात ‘संकट’!
चार दिवस गावाला गेल्यावर सगळे नळ चालू राहतात आणि घरभर पाणी साठतं, त्यालाच ‘संकट’ समजून घाबरणाऱ्या आपल्या घरी पुराचं पाणी शिरतं आणि कळतं, की हे खरं ‘संकट’! पुष्पगुच्छ दिला की त्यात फुलंच असणार; आणि फुलांमध्ये शुभेच्छाच- असं मनात असताना त्यात बॉम्ब निघतो आणि मग जाणवतं की, इतके दिवस, वर्षे आपण निसटलो; पण आता ही भेट अटळ आहे.
आता यापेक्षा जोरात धडधडलं तर फुटून जाईल हृदय असं वाटतं. पण गंमत म्हणजे हृदयाचं धडधडणं अगदी व्यवस्थित चालू असतं. आपल्या डोळ्यांतून अश्रू येणं ही प्रक्रिया बंद झालीये असं वाटत असतानाच हे ‘संकट’ आपल्याला पुन्हा एकदा अगदी छोटय़ा बाळासारखं रडवून दाखवतं.
तीस-चाळीस वर्षांत जे जाणवलं नाही, समजलं नाही, शिकलो नाही, त्याची जणू कार्यशाळा घ्यायला आलेला मास्तरच- तसं संकट येऊन बसतं तुमच्याबरोबर! नको तो उद्याचा दिवस- असं वाटायला तर लावतंच ते; पण आपण कितीही म्हटलं तरी ‘काळ धावं म्होरं म्होरं.. जणू वाघ लागे पाठी, तेच्या जोडीनं धावणं हेच माणसाच्या हाती’ हे पण सांगतं. तहानभूक सगळं हरपून तुम्ही संकटाखाली गुदमरलेले असतानाही अन्न, पाणी आदी गोष्टींच्या वेळा तुम्ही चुकवूच शकत नाही. आणि मग हे मास्तर तुम्हाला सांगतात की, म्हणूनच तुम्हाला ‘मनुष्यप्राणी’ म्हणायचं!!
स्वत:शी पुन्हा एकदा ओळख करून देणारे हे संकटमास्तर. मित्र, नाती, आधार, विश्वास, प्रसिद्धी सगळ्याच्या व्याख्या खोडून पुन्हा नव्याने लिहून देणारे हे मास्तर आपल्या आयुष्यातल्या माणसांची गटवारी, वर्गवारी व्यवस्थित लावून देतात. म्हणजे वर्षांनुवर्षे तुम्ही ज्यांना हक्काचे मानता त्यापैकी तुमच्यावर खरा विश्वास असणारे कोण? ज्यांना खात्री पटवताना तुमची सर्वात जास्त शक्ती खर्च होते असे नावाचे- विश्वासाचे कोण? काहीही नातं नसताना तुमच्यावर श्रद्धा, विश्वास, प्रेम करणारे कोण? आयत्यावेळी बँकेतून ठेवी काढून घ्याव्यात तसं खांदा काढून घेणारे कोण? खरं हसणारे कोण? तुमच्यासाठी तुमच्यासमोर रडणारे आणि नंतर डोळा मारून आपसात हसणारे कोण? प्रत्येक वेळेला हात जोडल्यावर देवाकडे तुमच्यासाठी सुख मागणारे कोण? मित्र असून मित्र नसणारे आणि मित्र नसून काळजी करणारे.. लांबून मजा घेणारे.. तुमच्याकडे सध्या संकटमास्तर आहेत याबद्दल आनंद साजरा करणारे.. काहीही घेणंदेणं नसणारे.. नुसतेच चकित.. लबाड.. तटस्थ.. सगळं वर्गीकरण किती सुटसुटीत करून देतात. नाहीतर आपण! सगळ्यांनाच उगीच आपलं मानून बसलेले असतो.
सतत इंद्रधनुष्याच्या कुठल्या ना कुठल्या रंगांमागे धावणाऱ्या आपल्याला हे मास्तर एका इतक्या काळोख्या खोलीत घेऊन जातात, की रंगांमागे धावायची हावच एकदम सुटून जाते. आणि मिट्ट अंधारातसुद्धा जरा वेळाने सगळं स्पष्ट दिसतं, हे एकदा कळलं, की समर्थाचं ‘आल्या-गेल्याची क्षिती नाही, ऐसे जाले पाहिजे’ हेसुद्धा जाणवायला लागतं.
ज्या ज्या गोष्टींवाचून आपलं सगळं जीवन व्यर्थ आहे, भकास आहे, निर्थक आहे असं आपण समजत असतो, त्या सगळ्याशिवायही आपण जगू शकतो, हेही कळतं.
कुठल्याशा इंग्रजी पुस्तकात वाचलं की, फार कमी लोकांना स्वत:चा अंत्यविधी आणि तेव्हाचे माणसांचे चेहरे, संवाद आणि मन:स्थिती कशी असेल हे बघायला मिळतं.. ‘संकट’ कोसळल्यावर ती संधी येते!! तेव्हा जाणवतं, की कोण उपचाराचं भाषण करेल आणि कोणाला खरंच जाणवेल कायमची पोकळी! कोण असतं खरंच आपलं!!
संकटमास्तर खूप काही घेऊन जातातच; पण तितकंच देऊनही जातात.
त्यांची भेट झाली आणि जाणवलं की, मी समजत होतो तितका भक्कम, तितका संयमी, खोल मी नक्कीच नाही. पण हेसुद्धा नक्की, की मी आणि कदाचित मास्तरही समजत होते तितका कमकुवतसुद्धा नाही मी!!
थँक यू!! संकटमास्तर!!!
सलील कुलकर्णी – saleel_kulkarni@yahoo.co.in

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा