गेले वर्षभर आपण आहाराच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून घेतली आहे. साध्या, सकस, चौरस आहाराचे महत्त्व जाणून घेतले आहे. आहाराचा शरीराला फायदा आहे, पण अती आहार किंवा चुकीच्या आहाराने शरीराला नुकसान/इजा होऊ शकते हे सुद्धा समजावून घेतले आहे.
पण याचा अर्थ असा होतो का, की कधीही बाहेरचे खाऊ नये? बाहेरच्या जेवणात जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ, खाण्याचे रंग, मीठ व साखर असते. सध्या पाटर्य़ाचे दिवस आहेत. शिवाय लग्नाचे खूप मुहूर्त आहेत. न्यू इअर पाटर्य़ा सुरू झाल्या आहेत.
या ठिकाणी गेल्यावर काय करावे? काही जण असा विचार करतात, की एक दिवस खाल्ल्याने काय होते? पण आपण अशा अनेक पाटर्य़ामध्ये न विचार करता खाऊ लागलो, की मग वजनाचा काटा उजव्या बाजूला जाताना दिसू लागतो. त्यामुळे वजनावर नियंत्रण राखू इच्छिणाऱ्यांनी पाटर्य़ा आणि कार्यक्रमांना जाणे शक्यतो टाळावे!
डाएट किंवा पथ्य करणाऱ्यांनी कधीही बाहेर खाऊ नये, हा चुकीचा समज आहे. कारण आहार/ जेवण हा पार्टीचा एक भाग असतो. त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या नातेवाईक, मित्रांना भेटणे, मजा करणे इत्यादी. पण मग जेवणाचे काय करायचे?
‘आज संध्याकाळी बाहेर जायचे आहे म्हणून मी दुपारी कमी जेवेन,’ ही नीती  अनेक जण वापरतात. म्हणजे पार्टीत भरपूर खाता येते. ही संकल्पना बदलली पाहिजे. पार्टीमध्ये आपण चुकीचे खाणार आहोत, म्हणून दुपारी घरचे चांगले जेवण कमी घेऊ नये. या उलट दुपारी व्यवस्थित जेवावे. जर तुमचे पोट आधीपासून भरलेले असेल तर मग तुम्ही पार्टीमध्ये आपोआप कमी खाल. त्यामुळे दुपारचे लग्नाचे जेवण असले तरीही सकाळचा नाश्ता करायला विसरू नये! घरच्या जेवणाला महत्त्व दिले, की बाहेरचे खायला भूक उरत नाही.
आजकाल बहुतेक ठिकाणी बुफे पद्धत असते. त्याचा फायदा असा, की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, हवे तेवढेच खाऊ शकता. सर्व पदार्थ घेण्याचा आग्रह नसतो. त्याचबरोबर अनेक पदार्थ स्टार्टर म्हणून आधी दिले जातात. जर आपल्याला आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर पहिले बुफेमध्ये काय पदार्थ आहेत, हे बघून घ्यावे. जे आपल्याला आवडते तेवढेच घ्यावे. यामुळे आपोआप आपले खाणे कमी होते.
आजकाल अनेक बुफेमध्ये लिअर काउंटर असतो. त्यात आपल्यासमोर एखादा पदार्थ करतात. ते अनेक दृष्टींनी फायदेशीर आहे. पदार्थ आपल्यासमोर तयार होत असतो, त्यामुळे त्यात किती तेल, तूप घातले आहे हे आपल्याला कळते. त्याचबरोबर आपल्याला गरम पदार्थ खायला मिळतो. तिसरे म्हणजे लिअर काउंटरवर नेहमी इतकी गर्दी असते, की तो पदार्थ घेण्यासाठी ताटकळत उभे राहण्याचा संयम कमी होत जातो! त्यामुळे आपोआप कमी खाल्ले जाते.
ज्यात जास्त कॅलरीज आहेत, असे बाहेरचे पदार्थ ओळखणे फार कठीण नाही. उदा. पनीर मख्खनवाला, बटर चिकन, फिश फ्राय, बटर डोसा, दाल मख्खनी या पदार्थामध्ये जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात. असे पदार्थ टाळावे किंवा घेतले तर फार कमी प्रमाणात घ्यावे.
बाहेरचे सूप व सॅलड हे डाएट किंवा लो कॅलरीज असते असे नाही. रशियन सॅलडसारख्या सॅलडमध्ये खूप जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात. त्याचबरोबर क्रीमबेस्ड सूपमध्येसुद्धा खूप जास्त प्रमाणात क्रीम असते. तेव्हा हे पदार्थ खाण्यापेक्षा ज्यात कमी प्रमाणात स्निग्ध पदार्थ आहेत ते खाणे अधिक योग्य!
पार्टीला जाण्याअगोदर घरून निघताना, काही तरी अवश्य खाऊन निघावे. असे केल्याने पार्टीला गेल्यावर आपण खाण्याऐवजी इतरांना भेटण्याला, गप्पा मारण्याला प्राधान्य देतो. घरून निघताना सूप, फळं, दूध इत्यादी कुठलाही पदार्थ घेता येतो.
त्यामुळे नववर्षांच्या पाटर्य़ाना जाताना  न चुकता ही खबरदारी घ्या आणि मौज करा!(समाप्त)