त्या दिवशी अमित ऑफिसमध्ये काम करत होता. असाइन्मेंट वेळेत पूर्ण करायची असल्याने तहानभूक विसरून काम करणे चालले होते. ‘डेडलाइन’  गाठणे अत्यंत महत्त्वाचे होते. नाहीतर वरिष्ठांकडून बोलणी ऐकावी लागली असती. तसे हे नेहमीचेच होते, पण आज तहानभूक हरपून काम करणे चालले होते, हे नक्की. काम जवळजवळ पूर्ण झाले होते आणि अचानक अमितला कसेतरीच होऊ लागले. चक्कर यायला लागली, दरदरून घाम फुटला, छातीत धडधड व्हायला लागली, डोके दुखायला लागले. काय होतंय काही कळतच नव्हते. छातीत दुखत होते. गुदमरल्यासारखे होत होते. असे वाटत होते की आता जीवच जाणार आपला. बहुतेक हार्ट अ‍ॅटॅकच येणार. त्याबरोबर अधिकच गुदमरल्यासारखे व्हायला लागले. लगेच ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. घरचे सगळे धावून आले. सगळ्या चाचण्या झाल्या. सगळ्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले. डॉक्टर म्हणाले, ‘काही नाही झालेले तुम्हाला, निश्िंचतपणे घरी जा, कामाला लागा, टेन्शन घेऊ नका.’ पण ‘टेन्शन घेऊ नका,’ म्हटल्याने थोडेच ते थांबणार होते. अमितला वाटले, म्हणजे आपण काय नाटक करत होतो? नक्कीच आपल्याला काहीतरी झाले होते. म्हणून दुसऱ्या डॉक्टरांकडून पुन्हा सर्व तपासण्या केल्या. त्यांचेही रिपोर्ट्स एकदम नॉर्मल, पण तरीही अमित काही ‘नॉर्मल’ झाला नव्हता. ऑफिसला निघायचे म्हटल्यावर त्याला धडधडायला लागे. मग घरचे कोणीतरी पोचवायला आले तरी अध्र्या प्रवासातच तो परत घरी निघून येई. हळूहळू घरातून समोरच्या दुकानात जायचीही भीती वाटायला लागली. गेलाच तर पत्नी बरोबर हवी. एकटय़ाने कोठेही जाणे नको. काही झाले तर ही भीती!
घरच्यांनी किती समजावले तरी अमित काही मानण्यास तयार नव्हता. आणखी एकदोन डॉक्टरांकडे दाखवून झाले तरी रिपोर्ट्स नॉर्मल. शेवटी एका डॉक्टरांनी सांगितले की, मानसोपचारतज्ज्ञांकडे जा. म्हणून अमित माझ्यासमोर बसला होता. त्याची सर्व रामकहाणी मला सांगत होता. अर्थात एकटा नव्हताच. पत्नी बरोबर होती. अमितने शेवटी मला विचारले की, ‘डॉक्टर नक्कीच मला काहीतरी झाले आहे. आणि त्यामुळे मला कुठेही एकटय़ाने जायची भीती वाटते. हे बरोबर आहे ना? पण एकीकडे मला असेही वाटते की, मला असे झालेच कसे? आजपर्यंत मला एक पशाचा आजार नव्हता. व्यायाम करतो मी. सगळी काळजी घेऊनही मला असे होऊच कसे शकते?’ मी त्याला म्हटले की, ‘हे बघ अमित, तुला जो येतो तो भीतीचा अ‍ॅटॅक / झटका, त्या झटक्याचीच सतत तुला भीती वाटते. तो झटका आपल्याला येता कामा नये असे तुला वाटते आणि म्हणूनच तू सतत कुठे जायचे टाळतो. थोडक्यात ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ अशी तुझी अवस्था झाली आहे. या समस्येला आपण भयगंडाची समस्या असे म्हणू या.’
त्यानंतर आधी अमितला औषधोपचार सुरू केले. कारण त्याची चिंता आणि त्यातून आलेले नराश्य यातून बाहेर येण्यासाठी सुरुवातीस औषधोपचारांशिवाय पर्यायच नव्हता. नंतर थोडे बरे वाटल्यावर मग त्याला स्नायू शिथिलीकरणाचा व्यायाम शिकवला. स्नायू शिथिलीकरणातून मनाला आराम देणे हे त्यामागचे सूत्र. जेव्हा आपल्याला कोणताही ताण येतो, त्या वेळेस आपले स्नायूदेखील आवळले जातात, त्यांच्या आवळलेल्या स्थितीमुळे ताण वाढत जातो. त्यामुळे शिथिलीकरणाच्या या उपायावर त्याचे प्रभुत्व आल्यावर त्याचा उपयोग काल्पनिक स्तरावर, त्याची भीतीच लक्षणे कमी करण्यासाठी होणार होता. हा वर्तन उपचारपद्धतीचा (Behaviour Therapy) भाग होय. या उपायांनी त्याचे भीतीबाबतचे वर्तन व भीतीची लक्षणे या दोन्हींवर नियंत्रण मिळणार होते, परंतु या भीतीच्या भावनेमागे व त्यापुढे होणाऱ्या पलायनवादी वर्तनामागे नक्कीच त्याची अविवेकी विचारपद्धती कारणीभूत होती. ती शोधून काढणे जास्त आवश्यक होते. कारण ती बदलली तरच त्याला भीतीचे पूर्ण नियंत्रण करणे शक्य होणार होते. आपण त्याचे विचार तपासून पाहिले तर असे दिसेल की, तो म्हणतो, ‘मला आतापर्यंत एक पशाचा आजार झाला नाही. मी सर्व काळजी घेतो. तरी मला असे झालेच कसे?’ म्हणजेच त्याची अविचारपद्धती काय होती तर ‘मी जर सर्व काळजी घेतो तर मला कधीच काहीच आजार होता कामा नये!’ त्यामुळे आपल्याला असे झाले तरी रिपोर्टस् नॉर्मल हे पटत नव्हते. नक्कीच काहीतरी मोठे झाले असणार या भीतीने त्याला ग्रासून टाकले होते. तर त्यामुळेच ज्या गोष्टींमुळे थोडा जरी त्रास होत होता तो टाळायला बघत होता.
आयुष्यात त्रास देणाऱ्या वा अवघड असणाऱ्या गोष्टी / जबाबादाऱ्या टाळायला पाहिजेत तरच बरे वाटेल! हा त्याच अविवेकी विचारपद्धतीचा पुढचा भाग होता; परंतु त्यामुळे त्याला कामापासून किती दिवस लांब राहता येणार होते? नोकरी गेली असती तर तो काय करणार होता, उलट त्याचे नराश्य वाढले असते.
त्यामुळेच त्याला विवेकी विचाराकडे नेणे गरजेचे होते. माझ्या शरीराची मी काळजी घेत असलो तरी त्याचा वापर सतत होत असतो. एखाद्या यंत्रासारखेच शरीराचे असते. कधी कधी कितीही काळजी घेतली तरी काही गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या असतात. मेंदूतील सिरोटोनिन कमी होणे आपल्या हातात नसते. त्यावर उपाय करणे आपल्या हातात असते. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे आपल्या हातात असते; परंतु तरीही हाताबाहेरील / आवाक्याबाहेरील काही गोष्टींमुळे त्यात कधीतरी बिघाड होऊ शकतो. बिघाड झाला की उपाय करायचा, पुन्हा काळजी घ्यायची हा झाला विवेक! तसंच काही समस्यांना तोंड दिले तर ताण कमी होतो. पळ काढला तर उलट तो वाढतो. दिव्यासमोर तोंड करून उभे राहिले तर सावली मागे पडते व छोटी होते तर पाठ करून लांब जाऊ लागलो तर ती पुढय़ात येते व मोठी होते. दिवा म्हणजे समस्या व सावली म्हणजे टेन्शन म्हटले तर समस्येला तोंड दिले तर ताण कायमचा कमी होतो. पळ काढला तर तात्पुरते बरे वाटते, पण थोडय़ा काळाने समस्येचा वाघ पुन्हा ‘दत्त’ म्हणून उभा राहू शकतो, त्यामुळे समस्येला तोंड देणे व उपाय करत राहणे हा त्या विवेकी विचारपद्धतीचा पुढचा भाग होय.
या विवेकाची कास धरली तर औषधोपचार, वर्तनउपचार व विवेकाची कास यांचा त्रिवेणी संगम त्याला आरोग्याकडे परत नेणार याची मला खात्री आहे!

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र