ऐतिहासिक कादंबरीत काल्पनिकतेची फार उंच भरारी मारता येत नाही. कारण त्यातलं काल्पनिकही ऐतिहासिक वास्तवाला धरूनच असावं लागतं. म्हणूनच स्वतंत्र सामाजिक कादंबरीपेक्षा ऐतिहासिक सत्यावर आधारलेली कादंबरी हे सर्वाधिक कठीण कर्म असतं. मराठीत ज्या ऐतिहासिक कादंबऱ्या यशस्वी झाल्या, त्यात आता महाबळेश्वर सैल यांच्या ‘तांडव’ या कादंबरीची गणना अग्रक्रमानं करावी लागेल.
सोळाव्या शतकात पोर्तुगीज भारतात पश्चिम किनाऱ्यावर येऊन थडकले आणि त्यांनी गोवा हे बेट आपल्या ताब्यात घेतलं. पण केवळ प्रदेशावर सत्ता प्रस्थापित करून ते थांबले नाहीत. जो धर्म राजाचा तोच प्रजेचा असला पाहिजे, या धर्मवेडानं पछाडलेल्या या सत्तेनं प्रजेचं धर्मातर करण्यासाठी, त्यांना ख्रिश्चन करण्यासाठी त्यांच्यावर पाशवी अत्याचार केले. छळ केला. त्या अत्याचारांचं रौद्र रूप म्हणजेच ‘तांडव’. अडोळशी गावात घडणारी ही कहाणी त्या वेळच्या संपूर्ण गोव्याचं एक सामाजिक, मानसिक आणि श्रद्धेय जग उभं करतं.
ज्यूंवरील धार्मिक अत्याचार, मुसलमान सत्ताधीशांचे हिंदूंवरचे अत्याचार यांचा आपण वेगवेगळ्या माध्यमांतून परिचय करून घेतला आहे. पण पोर्तुगीजांचे गोव्यावरील अत्याचार विशेष कुठल्या माध्यमातून प्रकट झालेले ऐकिवात नाहीत. गोवा ज्ञात आहे तो निसर्गसौंदर्यासाठी, कलेसाठी आणि देवदेवळांसाठी! हे सगळं सौंदर्यपूर्ण लालित्यानं ओथंबणारं, भावभक्तीचं गाणं गाणारं अभिनित करणारं रम्यतम आहे. ‘तांडव’मध्ये जे एका विशिष्ट शतकातल्या गोव्याचं दर्शन घडतं ते सर्वस्वी वेगळं, शहारे आणणारं, दाहक आहे.
यापूर्वीच्या आपल्या ओळखीच्या असलेल्या धार्मिक अत्याचारांच्या चित्रणात एक धीरोदात्त नायक असतो, त्याचे अनुचर असतात. बलाढय़ सत्तेशी त्या समूहाची नायकाच्या मार्गदर्शनाखाली तुंबळ झुंज चालू असते, म्हणूनच त्यांच्या पराभवात वा विजयातही एक प्रभावी नाटय़ असतं. रोमहर्षकता असते. कुणीतरी पेटवणारा आणि काही पेटणारे असतात. स्वत: यज्ञात उडी टाकून स्वाहा होणारे असतात.
‘तांडव’ कादंबरीत असा संपूर्ण कादंबरीला व्यापून टाकणारा कुणी वीर पुरुष नाही. समूह नाही. माणसांचे पुंजके आहेत आणि संघर्षांऐवजी हतबलता, हतवीर्यता, दयनीयता, लाचारी याच गुणावगुणांचा सर्वावर जबरदस्त प्रभाव आहे. त्यामुळे येथे तुंबळ असं काही नाही. सगळे निर्बल आहे. म्हणूनच ती काळीज कुरतडणारी झाली आहे. कारण ती झुंजारतेची दुसरी बाजू आहे.
पोट आणि त्यासाठी जगणं हा इथला सर्वापुढचा यक्षप्रश्न आहे. शेतजमीन करणं, भात पिकवणं हे एकमेव साधन आहे आणि ‘देव’ हाच एकमेव निवारा आहे. सर्व हवाला देवावरच टाकला गेल्यामुळं माणसांना शेती करून जगण्याशिवाय आणि देव-देवादिकांच्या उत्सवातच आपला आनंद आणि सुख शोधण्याशिवाय दुसरं गत्यंतरच उरत नाही. अखेर जगणं किंवा मरणं हे सारं देवाधीन आणि फक्त देवाच्याच हातात. देऊळ फोडणाऱ्यालाही देवच शिक्षा करील, ही भावना मुळापासून रुजल्यामुळे तो सर्व काही निभावेल. यातून काही विद्रोह करण्याची गरजच भासेनाशी झाली. त्या काळच्या गरीब समाजाचं हे प्रत्ययकारी चित्रण आहे.
साहित्याचा प्रकार कुठचाही असो – कथा, कादंबरी वा नाटक असो – पहिल्या काही घटकांतच त्या कलाकृतीचं लक्ष्य, तिचं भावविश्व वा उद्देश सूचकपणे, प्रतीकात्मकरीत्या प्रकट झाला तर एकूण परिणामात ती कलाकृती तीव्र प्रभाव टाकण्यात यशस्वी होते. या कादंबरीचे पहिले तीन प्रसंगच त्याची प्रचीती आणून देतात.
सातण नायकनच्या डोळ्यासमोर त्याच्या शेतातल्या जू लावलेल्या बैलाच्या जोडीपैकी एकावर वाघ झडप घालतो. गळ्यात काढणं असलेल्या बैलाच्या वाटेला वाघ जात नाही, ही समजूत खोटी ठरते. पुजारी वेंकू नायकानं पूजा बरोबर केली नसल्याचा हा परिणाम, असा गावकरी त्याच्यावर आरोप करतात तेव्हा तो ओरडतो, ‘सगळा भार देवावरच का टाकता? सगळे मिळून हातात कोयते, कुऱ्हाडी घेऊन वाघाला रानातून का हाकलून लावत नाही? देव सोपा मिळालाय तुम्हाला.’
दुसऱ्या प्रसंगात लखू नायकाचा मुलगा गणबा शेजारच्या गावातून डोंगर उतरून गावात येतो. विहिरीतून पाणी काढून गोऱ्यांना पाजतो, त्यांनी दिलेलं खातो. तो बाटतो. त्या अठरा वर्षांच्या तरुणाला आई-बाप घरातून हाकलून लावतात. या गावातही त्याला थारा मिळत नाही. गावकरी त्याला हातातल्या दांडय़ांनी ठार करतात. देवाच्या तळीत त्याचं प्रेत दुसऱ्या दिवशी तरंगताना दिसतं. ते प्रेत हाही एक प्रश्नच होतो. बाटगा म्हणून त्याला अग्नीही दिला जात नाही. सदा नाईक धारिष्टय़ करून दिवसभर खपून एकटय़ानं ते प्रेत पुरतो. तोही गावाचा, देवाचा गुन्हेगारच ठरतो.
कँपिताव फिग्रेटीनं घोडय़ावरून गोवापाटणात प्रवेश केला. गोऱ्यांबद्दल नको नको ते गावकऱ्यांनी ऐकलं होतं. फ्रिग्रेटीनं मगरूर घोषणा करतो ‘तुमची जमीन ती राजाची जमीन. राजाचा धर्म तो तुमचा धर्म.’ सगळे घाबरून दरवाजे बंद करून बसलेले. एक म्हातारी दार उघडून हातातलं तांदळाचं लाकडी मापटं कँपितावच्या तोंडावर मारते. भवानी-शण बाणेदारपणे उत्तर देतो, ‘तुमच्या राजाला आम्ही नमस्कार करणार नाही, आमचा आम्हाला देव आहे. त्यालाच आम्ही नमस्कार करू.’ रागाने लालबुंद झालेल्या कँपितावच्या कमरेतला चाबूक शणच्या पाठीवर ओढला जातो. सटासट त्याच्या उघडय़ा अंगावर फटकारे मारले जातात. भवानी भूमीवर आडवा पडतो.
कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा धर्म सोडणार नाही असं म्हणणाऱ्यांना कँपिताव बिलंदरपणे अखेरचा प्रश्न विचारतो, ‘एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात घण घेऊन तुमचा देव. आणि देऊळ फोडायला कुणी एक आला तर तुम्ही काय कराल?’
आता तिथं एकदम मुकेपणा पसरतो. बामण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागतात. मग सगळेच पुटपुटत म्हणतात, ‘देवच पाहून घेईन त्यांना. देवच शिक्षा देईल.’ गैरसमजुतीच्या बैलाचं नरडं फोडणारा उन्मत्त वाघ, बाटगा ठरवलेल्या तरुणाची गावात झालेली अवस्था, घोडय़ावरून येणारा मगरूर कँपिताव, त्याचे सोजीर, त्याची दहशत आणि त्याच्यापुढे फुसका विरोध करत शरण जाणारी गावकरी मंडळी या सगळ्या घटनांतून एकूण कादंबरीचा विषय आणि स्वरूप लक्षात येतं.
देवावर सारी भिस्त ठेवून जगणाऱ्या गरीब प्रदेशाचं हे चित्रण आहे. त्यात देव तर आहेतच, पूजा-अर्चा आहे, देवांचे उत्सव आहेत, देवाचा रथ आहे, देवळं आहेत आणि देवाची आंघोळीची तळीही आहेत. हा देवधर्म, त्याच्याबद्दलच्या समजुती, सोवळंओवळं हे सारं कातडीसारखंच त्यांना चिकटलेलं आहे. हिंदू धर्मातल्या लोकांना बाटवणं हे नको तेवढं सोपं आहे. केवळ घरात पाणी शिंपडून किंवा परधर्माच्या माणसानं प्रवेश केल्यानं त्या घराचा वा कुटुंबाचा धर्म बदलतो. घरातले लोक खरोखरीच तसं मानतात. त्या काळातली त्या लोकांची देवावरची श्रद्धा ही आज आपल्याला अंधश्रद्धा वाटत असेल, पण त्यांना अगदी मनापासूनच देवच आपल्याला तारणार अशी खात्रीच होती त्याचं काय? म्हणूनच त्यांच्यात जुलमी, अत्याचारी दडपशाही विरोधात फारच शबल प्रयत्न होतात.  त्यांचं भांडण गोऱ्याबरोबर नाहीच; ते आहे त्याच्या स्वत:च्याच मनातल्या देवाबरोबर! तू आम्हाला संगर करायला शक्ती दे अशी प्रार्थना नाहीच. देव असून तू तुझ्यासाठी तरी आम्हाला का वाचवत नाहीस, अशी तक्रार आहे. म्हणून कुटुंबं रस्त्यावर येतात. शेतजमिनीच्या बदल्यात धर्म, चाकरीच्या बदल्यात धर्म, पोरगं हवं असेल, शील वाचवायचं असेल, काहीही हवं असेल तर ख्रिश्चन धर्म स्वीकारा, नाही स्वीकारला तर घरं जाळण्यात येतील. तलवारीच्या जोरावर तुम्हाला तो स्वीकारणं भाग पाडू. गावकरी संगर करायच्या ऐवजी गाव सोडून दिगंतराला जातात. स्वत:साठी देवांनाच घेऊन पळणं पत्करतात.
या असहाय्यतेचाच गोरे फायदा उठवतात. घरं जाळून, संसार उद्ध्वस्त करून कुटुंबाच्या कुटुंबांना बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन करण्यात येतं. त्यांची ती नाइलाजी, असहाय्यता वाचताना वाचक गलबलून जातो. त्यातही विरोधाच्या, प्रतिशोधाच्या काटक्या पेटताना दिसतात. पण जेथे आगडोंबच उसळला आहे तेथे काडय़ांचे काय हो?
सैल यांचं कलात्मक कौशल्य असं की, एका बाजूला रुद्रभीषण क्रौर्याचं व शरणागतांचं वास्तव चित्र प्रकट करताना त्याच ख्रिश्चन धर्माच्या मूळ तत्त्वांचा प्रसार करणाऱ्या फादर सिमॉवचं व्यक्तिचित्र लेखक अत्यंत प्रभावीपणे चितारतो.
दया, क्षमा, शांती आणि करुणेचा प्रसार करणाऱ्या येशूचा धर्म दडपशाहीनं वाढवण्याच्या तो सक्त विरोधात आहे. तो साऱ्यांना प्रेमाने जिंकू पाहतो, गरजूंच्या मदतीला धावून जातो. पण या माणसातल्या खऱ्या येशूलाही इन्क्विझिशेनच्या न्यायसभेच्या अघोरी शिक्षेला बळी जावंच लागतं. जुलमी लोकांचा येशू वेगळा आहे. सामान्य माणसावर जबरदस्ती करून त्यालाच वधस्तंभावर चढवणारा त्यांचा येशू आहे.  त्यांचं बायबलही सैतानाचं आहे. येशूचं बायबल घेऊन सर्वाना शांतीचा, प्रेमाचा मार्ग दाखवणारा फादर या कथेतला हुतात्मा आहे.
या कादंबरीत अनेक पात्रं आहेत, प्रसंग आहेत. पण त्या सर्वाच्या व्यक्तिरेखा होत नाहीत, कारण ही व्यक्तिरेखांची कादंबरीच नाही. ही पात्रं एका विशिष्ट परिस्थितीतील असहाय्यता प्रकट करण्यासाठी प्रवेशतात आणि ती परिस्थिती प्रकट झाल्यावर निघून जातात. सर्व प्रसंगांचं लक्ष्य एकच असलं तरी प्रत्येक प्रसंगातली विविधता आणि त्यातून उघड होणारी मानसिकता वाचकाला गुंगवून ठेवते. ती एकरेषीय असली तरी एकसुरी होत नाही.
धर्मविरोधी कृत्य करणाऱ्यांना काळकोठडीत- इन्क्विझिशेनच्या इमारतीत ज्या शिक्षा दिल्या, त्या शिक्षांची आणि एकूणच त्या वातावरणाची वर्णनं अंगावर शहारे आणतात. अंदमानमधल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेपेक्षाही ती भयानक वाटतात.
या कादंबरीतलं कुठलंही पात्र एकटं चालत नाही. त्याच्या साथीला आजूबाजूचा निसर्गही आहे. माणसं चालणारी, धावणारी, लपतछपत पळणारी असोत वा दिगंतराला जाणारी असोत, त्यांना साथ करणाऱ्या निसर्गाची वेगवेगळी रूपं आपल्याला दिसत राहतात. वाहनातून जाताना बाहेरचा निसर्ग दिसतो; त्यापेक्षा अधिक तपशिलातून अशा अप्रतिम निसर्गसौंदर्याची पाश्र्वभूमी लाभल्यामुळे त्यापुढील क्रौर्य, अमानवीपणा, देवभोळेपणा, इ. सारे व्याज विशेष अधिकच गडद होतात. तीव्र परिणाम करतात. भेदक होतात.
केवळ इतिहासाचं अस्तित्व न राहता विशिष्ट काळातल्या आणि परिस्थितीतल्या समग्र मानवी जीवन व्यवहाराचाच आलेख अत्यंत पारदर्शकपणे चितारला जातो. कादंबरीतला माणूस तहानलेला असो वा भुकेला, पेज हेच त्याचं एकमेव अन्न आणि पेय आहे. एवढय़ा एका वस्तुस्थितीवरूनही एकूण आर्थिक परिस्थिती लक्षात यावी. म्हणूनच कधी काळी माहीत असलेल्या क्रुसाद किंवा अश्रफसारखी नाणी हातावर पडण्याची वेळ येते, तेव्हा तो मोह टाळणं कठीण जातं.
लोकगीतं, लोकभाषेतील नेमके शब्द आणि त्यांचा नेमका वापर लेखकानं केला आहे. या कादंबरीचा आवाका फार मोठा आहे. त्याला कितीतरी स्तर वा पैलू आहेत. त्यांचं लेखकानं अशा काही कौशल्यानं फ्यूजन केलं आहे की, कुणालाही एकमेकापासून वेगळं काढता येत नाही.
तरुण सौभाग्यवतीला सती जाण्यासाठी चितेवर ढकलतात, चामुंडेश्वराचं देऊळ गोरे लोक फोडतात, महाबली नायकाच्या विठायला कुटुंबासकट जमिनीसाठी ख्रिश्चन व्हावं लागतं. तिला भेटायला आलेल्या तिच्या भावाला ती घरात घेत नाही. तो बाटू नये म्हणून भुकेल्या भावाला बाहेरचं शहाळं आणि काकडी काढून देते. काळोखात गुपचूप पडोशीत त्याला वरून जेवण वाढते. ख्रिश्चन धर्म पत्करायचं पाप नको म्हणून आई तान्ह्य़ा मुलासकट तळीत जीव लोटते, असे कितीतरी प्रसंग डोळ्यापुढे जिवंत उभे राहतात. लेखकाची विलक्षण चित्रशैली काळाचा आणि माणसांचा एक विशालपट मूर्तिमंत उभा करते. अत्याचारी धुमाकूळ आणि आंतरिक कल्लोळ यांच्यामधून जाणारी अनेक हृदयद्रावक करुणेची अपेक्षा करणारी दृश्यं मनाचा ठाव घेतात. भडकपणा वा मेलोड्रामा याचा किंचितही अवलंब न करता सिद्ध केलेलं हे ‘तांडव’ वाचकाला हडबडवून टाकतं.
इतिहासाचा किंचितही अपलाप न करता उत्कृष्ट कलाकृती निर्माण होते, याचं ‘तांडव’ हे उत्तम उदाहरण आहे. महाबळेश्वर सैल हे कोकणीतील ख्यातनाम लेखक आहेत. त्यांची ही पहिलीच मराठी कादंबरी. पदार्पणातच त्यांनी बाजी मारली आहे. मराठीतील श्रेष्ठ कादंबरीत गणना व्हावी इतक्या योग्यतेची ही निर्मिती आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांचं लक्षवेधी मुखपृष्ठ नेमका विषय पुढे ठेवणारं आहे. आवर्जून अनुभवायलाच हवं असंच हे ‘तांडव’ आहे.
तांडव – महाबळेश्वर सैल,
राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठे – ३७१, मूल्य – ३०० रुपये.

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
lokrang article, book review, Noaakhali manuskicha avirat ladha, novel, mahatma gandhi, last days, Ramesh Oza And Shyam Pakhare,
माणुसकीच्या अविरत लढ्याची गोष्ट
gondwana supercontinent overview interesting facts about gondwana supercontinent
भूगोलाचा इतिहास : गोंडवाना के भुईया मा..