कौस्तुभ केळकर- नगरवाला

आज माणसांचं पत्रलेखन थांबल्यातच जमा आहे. अशा काळात भोवतालच्या घटना-घडामोडींवर खुसखुशीत टिपण्णी करणारी सॅबी परेरा आणि कौस्तुभ केळकर यांची तिरकस पत्रापत्री..

how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
Contempt of Babasaheb Ambedkar by Congress Amit Shah allegation
काँग्रेसकडून बाबासाहेबांचा अवमान; अमित शहा यांचा आरोप
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…
Make Tasty Crispy Leftover Roti Chivda Not The Recipe And Try This Ones At Your Home
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा झटपट अन् कुरकुरीत ‘पोळीचा चिवडा’ ; नोट करा सोपी रेसिपी

जिगरी मतर सदाभाव यांसी,

दादासाहेब गावकरचा दंडवत!

भाऊसायेब, काय चाललंया? बाकी तुमास्नी पीकपानी इचारून काय उपेग? तुमचा म्हयन्याचा मीटर पडलेला असतुया. येक तारखेला पशाचं पीक टरारून येतंया. त्ये ऱ्हाऊ द्या. तुमी आमास्नी कसं बी लक्षात ठिवा. दादासाहेब म्हना, नाहीतर दादू म्हना. गेलाबाजार दाद्या म्हना पाहिजं तर! ‘अरे दाद्या, कशाला मिस्कॉल करतुयस?’ ह्य़ेबी चालतंय. हिथं शेतमालाला भाव मिळंना, तिथं आमच्या भावनान्लाबी भाव नाई. तवा त्या दुखावण्याचा सवालच नाही. क्या मेरा अन् क्या तेरा, सगळ्यांची हालत सारकीच!

भाऊसायेब, ममईस यायची मस विच्छा हाय. त्यात तुमी बसायची ऑफर दिलीत.. लई झ्याक वाटलं. पर जिवाची ममई करायची तर खिसा गरम हवा की वो. त्यो सध्याच्याला थंड पडलाय.. तुमच्या ममईवानी. आमच्या हितंबी सॉल्लीड थंडी पडलीया. रामपारी रानात घोंगडं पांघरून पानी सोडाया जातू दररोज. विडी पेटविल्याबिगर धूर निघतुया नाकातोंडातून. तराऽऽर पीक वाऱ्यासंगं डोलताना बघून लई बरं वाटतंया. पर बाजार समितीत काय भाव मिळंल, ह्य़ो इचार आला की भर थंडीत घाम फुटतोया. यंदाच्या साली तुमी आमचा फोटू बगनार पेपरमंदी. दादासायेबानं दिल्लीला मनीऑर्डर धाडली म्हून.

ह्य़े आसं होतं बगा. आमी आमचंच रडगाणं गात बसतुया. झुक्याभाऊचं ह्य़े थोबाडपुस्तक आमच्या गावाला भी लई पॉप्युलर हाये. याड लागलंय पब्लिकला शोशल राहन्याचं. सांच्याला दीड भाकर कमी आसली तरी चालंल, पर दीड जीबीखाली चालत न्हाई हिथं. आपल्या मत्रीला येक वसर्ं झालं. नवीनच होतू तवा आमी हिथं. तुमी लय सांभाळून घेटलं.

खरं हाय, शोशिक चेहरा हाय आमचा. आक्षी गंगेवानी निर्मळ. अगदी आमच्या आण्णांसारका.

जत्रेत दरसाली ढोलकीच्या तालावर सवाल-जवाब रंगतुया गावात. त्येचाच इफेक्ट आसंल. पयलं पयलं लय सवाल-जवाब केलं तुमास्नी. राग मानू नगा. बाकी तुमचं खरं नाव अन् इथल्लं नाव- आमास कायबी फरक नाय पडत बगा. एकदा ‘आपलं मानूस’ म्हन्लं की जालं!

तुमची दिवाळी कशी कै ग्येली? त्ये दिवाळी अंकावरनं आठीवलं.. आमीबी एम. ए. मराठी हाय म्हन्लं. ती डिग्री अन् तुमचं ते दिवाळी अंक.. उपेग एकच. चुलीत जाळ करून चहाचं आधण ठेवाय वापरील तुम्ची वैनीसायेब. तुमास्नी एक रिक्वेश्ट हाये. रद्दीत घालण्यापरीस ते मॅगेझीन आम्हाला शेंड करा. मऱ्हाटी अप्शरांची कव्हरपेजं बघाया लई आवडतं आमास्नी. अन् त्यात भविश्य येकदम डिटेल्ड आसतंय.

त्ये कॅलेन्डराचं आमच्या कानावर आलंया. गेल्या वर्सी ब्लॅकमदे घेतलं आमी. आमच्याकडं ‘खंडय़ा’ कॅलेन्डर म्हन्त्यात त्येला. घरी आल्यावर बगितलं.. तारीक दोन वर्सापूर्वीची हाय त्याच्यावर. मग म्हन्लं, तारीख पे तारीख कराया आपून काय शनी देवुल हाये काय? आपून आपलं इंग्लिश पिक्चरसारखं बगायचं. डायलॉग गेलं मस्नात. डोळं भरून आलं पायजेल. आमच्याकडं ह्य़ा खंडय़ा कॅलेन्डराची लई डिमांड हाये.

आराराऽ, ह्य़ा खंडय़ा कॅलेन्डरला टाळं लागनार? लई वंगाळ झालं. तो इजय देवमानूस. स्वर्गातल्या अप्शरा डायरेक्ट आमच्या घरला आन्तो की! तेन्ला हिकडं परत आनाया, काय लागंल ती मदत कराया आमी तयार हाये. फकस्त त्ये गतसालीचं खंडय़ा कॅलेन्डर आम्हाला शेंड करा.

तुमी ते स्टार्टप म्हन्ला त्यावरून आठीवलं. आमचं जानी दोस्त हायेत- सर्जेराव नावाचं. लय म्हंजी लय रंगेल गडी हाये. नाचगान्याचं शौकीन. प्रायवेट बठका हुतात त्याच्याकडं. ‘बाई वाडय़ावर या’सारकी शेम टू शेम! गडी चित्रंबी लई ब्येस काढतुया. आर्टश्टि मानूस. वाडय़ावर हाजरी लावलेल्या परत्येक बाईचं रंगीत चित्र हाय तेच्याकडं. पन्नासयेक पोट्रेटं नक्की गावतील. येक येक चित्र आसं भारीये, की लगुलग मनात ढोलकी वाजतीया. घुंगराचा नाद ऐकू येतुया! चार-पाच वर्साची कॅलेन्डराची सोय हुईल. काय म्हन्तासा? छापू का? ही इश्काची इंगळी येक डाव डसली की धप्पाधप कॅलेन्डरं संपत्याल. आजच सर्जेरावासंगट बोलतू. ममईचं डिश्ट्रिबूशन तेवढं तुमी बगा. या वर्सी बुलेट घ्येतो बगा आमी!

पण येका गोस्टीचं लय वाईट वाटून ऱ्हायलंय बगा. उदारउसनवार करून हे स्मार्ट फून आनलंय. अन् त्या झिंगाट साडेआठशे साइटा बंद करून ऱ्हायलेय हे सरकार. ह्य़ेच ते ‘अच्छे दिन’ म्हनायचं का काय आमी? आमचं येक शिक्रेट हाये. एक चावट वॉटश्शाप ग्रुप हाय. ‘शेन्शारबोर्ड’ नावाचा. परवाच्याला गडबड झाली. आमच्या सुभान्याचं दहावीतलं पोरगं चुकून त्याचं फून बगत हुतं. ह्य़ो गडी भाईर गेलेला. आल्याबरूबर सुभान्यानं उलटतपासणी सुरू क्येली. खोदून खोदून विचाराया लागलं. पोरगं लई च्याप्टर. डायरेक म्हन्लं बापाला, ‘‘का जीवाला तरास करून घ्येताय बापू? तुमचं शेन्शारबोर्ड नाय बघितलं म्या. लई जुना माल हाय तुमच्याकडं. आठवीतलं पोरगंबी ढुकून बगणार नाय तेच्याकडं.’’ सुभान्याचं दात घशात गेलं पार. काय द्याचं बोला? अश्यानं हिथल्या तरून पोरांनी काय बगायचं? संसदपटून्ला त्यांच्या मनाचा इचार करायलाच हवा.

पानी तुमच्याकडंबी प्येटलंय जनू. आमी कशाला तुमच्या वाइटावर ऱ्हावू? फकस्त गाडय़ाघोडय़ा धुताना, तुमच्या गावाकडच्या आयाभनी पान्यासाठी धा-धा मल भटकत्यात,  ध्यानात ऱ्हाऊ द्या. गावच्या इस्वराला एकच मागणं हाये. सगळ्यास्नी त्हान भागंल इतकं पानी मिळू दे मंजी झालं.

इजेचा खेळखंडोबा वाईच कमी हाये यंदाच्या पारी. पर बिलाचा मीटर बेक्कार पळतुया. तुमच्याकडंबी आसंच होवून ऱ्हायलंय की काय? यापरीस अंधारच बरा. आमच्या घरच्या भकास भिंती झाकतुया तरी.

कंचा शिनेमा म्हन्लं तुमी? ‘मुंबई- पुणे- मुंबई’? पहिल्या एपिशोडात पिरेम, दुसरीत लगीन आन् आता बाळंतपण! आता काय, नातवंडं- पतवंडांपत्तुर चालू द्या! ती मुक्ताबाई आमचा बी ईक पाइंट हाये. तिचा येक शिनेमा आमाला लई आवडतो बगा.. ‘एक डाव धोबीपछाड’! सुलक्षणाचं काम लई झ्याक केलतं तिनं. आमच्या गावाकडचीच पोर जनू. तिच्यासाठी त्या मिनी म्हागुरूस्नी सहन करू. बाकी आमाला मुंब काय आन् पुनं काय, समदं सारकंच!

आमचं पेशल इन्विटेशन हाय तुमास्नी. रानामंदी हुरडा तयार होवून ऱ्हायलाय. समदे या. रानात जावू. हुरडा खावू. बसू बी रातच्याला. आमचं अ‍ॅग्रोटुरिझम म्हना पायजेल तर. न्हाई म्हनू नका. तुमच्या परत्यक्श भेटीची आस लागलीया बगा. तुमी म्हन्ला म्हून पोष्टानं पत्र पाठवतुया. च्यामारी.. तुमच्यापायी पोश्त द्यावी लागली त्या पोष्टमनला.

चालतंय.

तुमच्यासाठी काय पन!

तुमचा जिवाभावाचा दोस्त..

दादासाहेब गावकर

kaukenagarwala@gmail.com