कौस्तुभ केळकर- नगरवाला

जिगरी मतर सदाभौ यांस,

दादासाहेब गावकरचा दंडवत.

काय सदाभौ? म्हन्लं, क्येलं की न्हाई वोटिंग? लावली की न्हाई शाई बोटाला? बोटाला शाई लागली की आमास्नी येकदम ‘सिंदूर भरी माँग’ आठवती गडय़ा. मंजी येखादी नवी नवरी तिच्या अखंड सौभाग्यासाटी डोईवरच्या भांगेत सिंदूर भरती, न्हाईतर कपाळावर कुक्कू लावती, तसंच हाये हे. बोटाला लागलेली शाई ह्य़ो मतदारराजानं लोकशाहीचा क्येलेला कुंकुमतिलक हाये. राजानं इमानेईतबारे आपलं कर्तव्य पार पाडलं तरच लोकशाही सदासुहागन राहती सदाभौ. देशाचा संसार सुखाचा होतू.

आमीबी काय इचारून ऱ्हायलोय बगा तुमास्नी. आवं, तुम्चा वोटिंगवाला फोटू बगितला की आमी. थोबाडपुस्तकावर अपलोडल्येला. जोडीनं काडल्येला.

ह्य़े भारी हाये. वोटिंग करायचं अन् बोटाची शाई वाळायच्या आदी शोशल मीडियावर त्येचा डंका पिटायचा. फोटूसाटी वोटिंग करून ऱ्हायलंय की काय पब्लीक? चालतंय की. फकस्त टक्का वाढाया हवा. वोटिंग झालं की येटिंग. पार तेवीस तारकेपत्तुर.

वोटिंग आटोपलं की आमच्याकडं कार्यकत्रे श्रमपरिहारास जात्यात. उन्हातान्हात रगत आटवून दमल्येलं आसत्यात ते. घोश्ना दिवून दिवून त्येंचा घसा सुकून जातू. मंग कुटंतरी छोटी ट्रीप. दारूकाम. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. पार ढगात जाऊन दोन-चार दीस तरंगत ऱ्हायाचं. क्रिकेटच्या म्यॅचमंदी जसं ड्रिंक्स इन्टरवल आसतंया, तसंच शेम टू शेम. शिणवटा घालवत्यात आन् फ्रेश होवून माघारी येत्यात. हाडाचं कार्यकत्रे पदरी बाळगायचं आसलं मंजी येवढं बजेट ठिवावंच लागतं उमेदवारास्नी.

सदाभौ, आमाला पहिल्या पहिल्यांदा लय काळजी वाटून ऱ्हायची या कार्यकर्त्यांची. मंजी विलेक्शनचा सीजन संपला की यास्नी काम काय? कामावरनं काडून टाकनार की काय त्यान्ला?

तसं नस्तं सदाभौ. सालगडय़ावानी वर्सभराचं कान्ट्रॅक्ट आसतंय. लई कामं आसत्यात त्येस्नी. रिकामपन लई वाईट. टाईम गावला की येकेका गाडीवर तिगं तिगं बसायचं. गल्लीबोळातून पोरींच्या मागं मागं नागमोडी फिरायचं. कानाचं पडदं फाटतील आसं कर्कश्य हार्न वाजवायचं. शिट्टय़ा मारायच्या. काळा गागल आन् दस दस तोळावालं फोटू मिरवत मोटाल्या फ्लेक्समंदी जाऊन बसायचं. कुटं बी राडा जाला की हाण तेच्या आयला. नेत्यांचं बर्थ-डे शेलीब्रेट करायचं. नेत्यांसाटी काय पण.. दमलंभागलं की मंग उताऱ्यासाटी पार्टीशार्टी. लई बिजी शेडय़ुल हाये त्येंचं. सतत कामात गुंतलेलं हात. फकस्त झोपाया घरला.

ह्य़े आशे आमचे युवा कार्यकत्रे.

कंच्या ना कंच्या विलेक्शना चालूच असत्यात. लोकसभा, इधानसभा, ग्रामपंचायत, पतसंस्था, सोसायटय़ा.. विलेक्शनचा मौसम हरघडी चालूच ऱ्हातो सदाभौ. मीटर पडलेला ऱ्हातू. नुस्तं धूमशान. मंग अंगावर दोन-चार केशीस घेयाच्या आन् कोर्टात हेलपाटं. कार्यकर्त्यांची डेफिनेशन बदलून ऱ्हायलीये गडय़ा.

तुमी म्हनताय त्येबी खरं हाये. समदेच कार्यकत्रे अशे नसत्यात. काई शिकल्यालं, अभ्यासू, संस्कारी, जनसंपर्क ठय़ेवनारे कार्यकत्रे भी हाईती. पर तेन्ला त्या ताकदीचं नेतं बी गावायला हवं. नेत्यामागं कार्यकत्रे न्हाई तर कार्यकर्त्यांमागं नेता.. ह्य़ो शिवणापानीचा ख्येळ थांबाया हवा सदाभौ. चांगला न्येता आनी त्याचं चांगलं कार्यकत्रे. दोगांनीबी बरोबरीनं, हिरीरीनं काम क्येलं तरच देशाचं भलं हुईल. राजकारनाकडं करिअर म्हनून बगाया हवं नव्या पिढीनं.

ह्य़ो विलेक्शनचा मौसम आमाला बिल्कूल सोसत न्हाई आताशा. श्येतीच्या कामान्ला गडीमान्सं गावत न्हाईत. विलेक्शनच्या टायमाला आमच्या मान्सांना लई डिमांड. सभा, मोच्रे चालूच ऱ्हात्यात. तिकडं ग्येलं की तीनशे रुपये हाजरी. चहा, नाश्ता, ज्येवन. डोईवरची टोपी, हातातलं झ्येंडं, नाहीतर घोश्ना तेवडय़ा बदलत्यात. मान्सं रोजच्याला तीच. दिसभर रानात घाम गाळाया कुनी बी सापडत न्हाई. आमी काय करावं?

सदाभौ, कंचा बी पक्ष आसू द्यात, कंचा बी न्येता येवू द्यात.. सभेसाटी मान्सं ईकत घ्यावी लागली तर लोकशाही जीत्ती ऱ्हाईल काय? ह्य़ो मर्डर हाय लोकशाहीचा.

आमी काय म्हन्तो सदाभौ? निवडनूक आयोगानं या जाहीर सभांवर बंदी आनाया हवी. परत्येक पक्षानं आपापली सभा फ्येसबुक लाइव्ह कराया हवी. नेतं कंट्रोल रूममदनं बोलू द्यात. पब्लीक आपापल्या नेत्याला फॉलो करील. तो पोलीस बंदूबस्त नगं की मान्सं गोळा कराया नगं. पटतंय की न्हाई? जेंच्याकडं नेट न्हाई तेंच्यासाटी दूरदर्शन हाये. परत्येक पक्षाला टाईम वाटून दिला की झालं!

तुमी बोलून ऱ्हायलंय त्ये येकदम खरं हाय. उडवाउडवीचाच शीजन हाये ह्य़ो. ईमानाचा ईषय समद्यान्नी इमानेईतबारे उडीवला. त्येलाच हवा दिल्ती. चालून्द्या. दिल्ली आता दूर न्हाई. तेवीस तारकेला निक्काल लागंल समद्याचा.

सदाभौ, आम्ची येक कंम्प्लेंट हाई. कंचा बी पक्ष घेवा, कंचा बी नेता घ्येवा. जवा कवा त्यो ईकासाची भासा बोलतू तवा तेन्ला मोटय़ा मोटय़ा शिटीचीच याद येती. शिटीवाल्यांसाटी फ्लायओव्हर, मेट्रो, येअर टॅक्सी. आमा गाववाल्यांकडं कुनाचं ध्यान न्हाई. तुमी सहा-सहा पदरी रस्तं क्येलं तरी बी त्यो वन-वेच आसतुया. गावाकडची मान्सं शिटीमंदी घेऊन जानारा वन-वे. येक डाव मानूस शिटीत ग्येला की गावाकडं परत येत न्हाई.

आमचं येवढंच म्हननं हाय. सरकार कुनाचं बी येवो; शेराकडून गावाकडं येनारा रस्ता बी चालू ऱ्हायाला हवा. छोटय़ा छोटय़ा गावाला उद्योगधंदं आलं की मोटय़ा शिटीतली भीड कमी हुईल. खुराडय़ावानी घरात मानसं कोंबत्यात. तेन्ला पानी, ईज देतान्ना सरकारच्या डोळ्यात पानी येतंया. तिकडं दक्षिन आफ्रिकेत झालं त्ये तुम्च्या ममईला भी हुईल फ्युचरमंदी. पान्याविना मोटय़ा मोटय़ा शिटी तडफडून ऱ्हायल्यात गडय़ा.

सदाभौ, तुम्च्या-आम्च्यातली दरी बुजवनारा येखादा फ्लायओव्हर बांधाया सांगा की राव.. येनाऱ्या तुम्च्या नव्या सरकारला.

तुमी म्हनून ऱ्हायलंय तसंच हाये. समदेच मुके आन् बहिरे झालेलं हाईत. समदेच कोडगे. समद्यांचीच कातडी गेंडय़ाची. समद्यांचं यकच टारगेट.. कसं बी करून विलेक्शन जिकायचं. पसा, जातपात, बिरादरी, आरक्षन समदी हत्यारं वापरायची. येक मानूस दुसऱ्या मान्सापासून तोडायचा. फकस्त आजचा मतलब बगायचा. उद्याची फिकीर न्हाई.

सदाभौ, तुमी जरा टेरेसवर जाऊन बगा. हाईटवरनं आभाळाकडं येक नजर टाका. तुमाला फ्युचर दिसंल. लई अवगड हाये. नुस्ता अंदार दाटून ऱ्हायलाय. पुडच्या पाच वर्सात झालेली लाखो झाडांची कत्तल दिसंल. टम्म फुगलेल्या मोटय़ा शिटी दिसतील. तहानलेल्या नद्या आन् पन्नाशी गाटलेलं टेंम्परेचर दिसंल. भ्रष्टाचाराची दलदल अन् रुतत जानारा कामन मॅन दिसंल. तुमी म्हनून ऱ्हायलाय तसाच मुका, बहिरा, भूकाप्यासा, बेरोजगारी, हेल्पलेश..

काय सदाभौ, बसला का चटका झटका? येवढं शेन्टी होऊ नका राव.

आसं काय बी हुनार न्हाई. नव्या सरकारला पब्लीकनं दिलेला हा लाश्ट चान्स आसंल. काम करा, न्हाईतर घरी जावा. यंदाचं सोडा, पाच वर्सानंतरची विलेक्शन लई डेंजर आसंल.

सदाभौ, आवं आमचा ब्लड ग्रूप ‘बी पॉझिटिव्ह’ हाये. आमी जिंदगीकडं बी तसंच बगतु. बी पॉझिटिव्ह सदाभौ.

नवं सरकार कंचं बी येवू दे, ते लोकान्साटी काम करील. देसाची परगती हुईल. न्हाई तर..

न्हाई तर काय हुईल?

सोडून द्या तो ईषय. आपुन फकस्त २३ तारकेची वाट बगायची. आन् येनाऱ्या सरकारला ब्येष्ट ईशेस देयाच्या.

तोवर..

हाताची घडी आन् तोंडावर बोट..

 

तुम्चा जिवाभावाचा दोस्त..

दादासाहेब गावकर

kaukenagarwala@gmail.com