18 November 2019

News Flash

हाण त्येच्या आयला..

रामराम सदाभौ. तुमी लई जोरदार ब्याटिंग करून ऱ्हायलेत ना भौ.

|| कौस्तुभ केळकर- नगरवाला

 

जिगरी मतर सदाभौ यांसी,

दादासाहेब गावकरचा दंडवत.

रामराम सदाभौ. तुमी लई जोरदार ब्याटिंग करून ऱ्हायलेत ना भौ.

टीममंदी शर्मा हाईत, तरी बी तुमी आम्च्या वर्मावर घाव घालून ऱ्हायलाय की राव! काय बोलनार? धा देस खेळून ऱ्हायलेत फकस्त- तरीबी वर्ल्डकपच हाई. आवं, क्रिकेट समद्या खेळांचा राजा हाई. बिग बॉस हाई त्यो. इथल्ली येक-येक टीम धा-धा टीमांना भारी हाये. लाथ मारीन तिथं पानी काढीन.. कंचा त्यो ख्येळ तुम्चा? बराब्बर वळीखलं तुमी. तुम्च्या त्या फिफाच्या वर्ल्डकपामंदी १९५ देस हिस्सा घेत्यात. पन आसला फाफटपसारा क्रिकेटमंदी परवडत न्हाई. हिथं मंजी ‘छोटा परिवार, आन् सुखी परिवार’! चला, हवा येऊ द्या द्यावा. समद्या जगात सद्याच्याला फकस्त क्रिकेटची हवा चालती. तुमी आसलं सवाल इचारून ख्येळाची मजा किरकिरी करून ऱ्हायलाय राव. म्याच देखो ना सायेब. हिस्सा ल्येनेवाले टीम का नंबर मत गिनो.

तुमास्नी म्हून सांगतू- सौभाग्यवती अनुष्का इराट कोहली यास्नी तेंच्या सासूबाईन्नी येक टी- सेट घिवून दिल्ता गेल्या म्हैन्यात. मोजून बारा कपबशा हुत्या सेटमंदी. आपल्या ईराटसायेबांचं समदं काम आसतं डझनाच्या भावात. दोस्त आलं तर येकदम ग्यारा येत्यात. आवं, नवी नवरी ती! गांगरली जनू. गलतीशे मिश्टेक झाली बगा. अनुष्काताईंच्या हातून येक कप फुटला की राव. आता वाजले की बारा! त्येन्ला वाटलं, आता नशीबच फुटलं. ईराटसायेब आता रागं भरनार. सायेब लई जेंटलमन नवरा हाईत. ते फकस्त दाढीतल्या दाढीत खुदूक हसलं. म्हणले, ‘‘कारभारनी, कशापाई फिकीर करतीस? तुला लंडनहून मोटा कप आन्तू बग.’’ ईराटसायेबांनी वहिनीसायेबाला प्रामिस केलंय. ‘कुनी काय बी म्हना, वर्ल्डकप आमीच जिकनार.’

तुमी बी काय ईचारून ऱ्हायलाय सदाभौ? या सीझनमंदी आमी फकस्त क्रिकेटच बघतू. आवं, कश्मीर टू कन्याकुमारी समदीकडं क्रिकेटच्या तापाची लागन झालीया. आम्चा गाव बी आलाच त्येच्यामंदी. क्रिकेटमंदी जीव रंगला जनू. आवं, तालमी ओस पडल्या हैत. शड्ड ठोकनाऱ्या रानादापरीस आमास्नी शड्ड ठोकनारा गब्बर ज्यादा पसंद हाई सद्दय़ाच्याला. त्यो घरला मागारी आला लई वंगाळ झालं बगा. जिवाला सांबाळून ऱ्हावा शिक्करभौ.

आवं, शिटीपरीस गावाकडं क्रिकेटचं पागलपन जादा हाई. आमास्नी आटवतंय- ल्हान हुतो आमी तवा. आम्चं आईसायेब, काकी, मावशी आन् गावातल्या समद्या बाया धुनं बडवाया नदीवर जायच्या. त्येंच्याकडं ते लाकडी धुपाटनं आसायचं. तीच आम्ची ब्यॅट. त्येंचं धुनं बडवून झालं की नदीकाटी आम्चं क्रिकेट चालू. बॉल तयार करन्याची बी गावाकडं पेशल रेशिपी आसती. रद्दीतलं कागुद गोळा करायचं. पान्यात भिजत घालून त्येचा लगुदा करायचा. त्येला चंद्रावानी गोल शेप देयाचा. कुटनं तरी सायकलच्या टायरची जुनी टूब पदा करायाची. कातर घेऊन टूबच्या चकत्या कापायाच्या. लगुदाच्या गोळ्यावर त्या रबरी चकत्या करकचून फिट्ट बसवायच्या. जाला की आम्चा सीजन बॉल रेड्डी. किस्ना सुताराचं धाकलं पोरगं आम्चं दोस्त. बेनं बापाची लई शेवा करायचं त्या टायमाला. बाप खूश जाला की आम्च्या टीमला श्टम्पा गावायच्या. साळंच्या आदी, मदल्या सुट्टीमदी, साळा संपल्यावर.. तीन-तीन टायमाला आमी क्रिकेट खेळायचू. नुस्ती धूमशान. आमचं कंट्री क्रिकेट.

आम्च्या क्रिकेटमंदी कुस्ती, खो-खो, आटय़ापाटय़ा, हूतूतू समद्या देसी ख्येळाची तर्राट मिसळ आसती. कुनी लई मिल्कासींगवानी भागदौड करून रना काडाया लाग्लं की त्येचं पाय खेचायचं. गावाकडं येल बी डब्लू नस्तं सदाभौ. आम्चा पेशल बाल रप्पार लागतू. तंगडी आऊट हुती पार. त्येच्यापरीस ब्याटीनंच मारायचं बॉलला. हंपायरचा जल्म लई ब्येक्कार. कुनी हंपायर जाला की तो म्येलाच म्हून समजा. दोनी टीमकडनं त्यो मार खायाचा. रनआऊटच्या डिशीजनला पलं टेंगूळ हंपायरच्या डोस्क्यावर येतंया. क्रिकेटला कुस्तीचा तडका दिल्याबिगर ख्येळाया मजा येत न्हाई सदाभौ! चावडीम्होरंच्या मदानात मस इन्टरन्याशनल ल्येवलच्या म्याच हुत्यात. आमच्या गावापल्याड आडगाव हाई. तिथल्ली पोरं झ्याक क्रिकेट ख्येळत्यात. दरसाली ईस्वेस्वराच्या जत्रेच्या टायमाला आम्च्या गावच्या टीमसंगट तेन्ची म्याच आस्ती. आवं, आम्च्या गावचं रिकार्ड येकदम भारताच्या टीमवानी हाय. जत्रंच्या टायमाला आम्च्या गावची टीम कंदीबी हारत न्हाई.

परत्येक वर्ल्डकपला आपुन पाकिस्तानला चारीमुंडय़ा चीत करून ऱ्हायलोत ना सदाभौ. शेम टू शेम आमी बी आडगावच्या टीमला जिकू देत न्हाई. हाण त्येच्या आयला. बंबाट माहौल आस्तु गडय़ाहो. शिट्ट्या आन् रनांचा धो-धो पाऊस. समदा गाव गोळा होतु. आखिरला गावची टीम जिकली की सरपंच इजयी टीमला ट्राफी देत्यात. मानाचं फ्येटं बांधत्यात.

समदी ईस्वेस्वराची किरपा.

आम्ची क्रिकेटश्टोरी बी डिट्टो तुम्च्यावानीच हाये सदाभौ. आम्ची ल्येवल गल्लीपत्तुरच. दिल्ली बहुत दूर थी. साळंच्या टीममंदी बी आमास्नी कंदी चानस गावला न्हाई. परत्येक बॉलला सिक्सर मारून ऱ्हायलो ना भौ आमी. मंग काय? पयल्या बॉलला सिक्सर मारायचू आन् पुढच्या बॉलला दांडी गुल! तवा आम्च्या नशिबी श्येवटलीच ब्याटिंग. बोलिंग न्हाई जमत आपल्याला. येका ओवरमंदी धा-बारा वाईड बॉल पडत्यात. आमी फकस्त फिल्डिंगवालं. बाउंड्रीवर हुभं ऱ्हायचं. बॉल आम्च्या हातात पडला की बुंगाट. पीचपत्तुर पळत जायाचं. पर्सनली बॉल बोलरला द्येयाचा. आमच्यावानीच आम्चा थ्रो भरकटल्याला. उगा रीस्क नगं. आमी आम्चं सौताचं रिकार्ड पार इसरलोय बगा. याद ठेवन्यासारकं काय बी न्हाई आम्च्या रिकार्डमंदी.

आम्चा दत्तू लई झ्याक क्रिकेट खेळायचा. काय तेची बोलिंग. दोन-चार कोसावरनं राजधानीवानी धावत यायाचा. इकेट काडनार मंजी काडनारच. ब्याटिंग तर येक नंबर. चावडीवरच्या घडय़ाळाची काच दत्तोबानं धा टायमाला फोडली आसंल. दत्तू साळंत हुता तोवर साळंची टीम डिश्ट्रीक्ट ल्येवलला जिकून येनार मंजी येनारच. कुलकर्नी मास्तर नेहमी म्हनायचं, ‘‘दत्तोबा, तुमी रनजी ट्राफी खेळाया हवी. तुमी देसाच्या टीममंदी दिसलं पायजेल..’’

पन न्हाई जमलं सदाभौ. तालुक्याला ट्रेनिंगला गेल्ता येक डाव. तिथल्ला मास्तर क्रिकेट कीट आन म्हन्ला. कसं परवडनार? नो बॉल पडला की राव. दत्तू हमेशासाटी आऊट जाला. आम्च्या दत्तूचं क्रिकेट पुडं ग्येलंच न्हाई. माज्या खांद्यावर डोकं ठिवून लई रडला दत्तू तवा. समदं इसरून दत्तू साळा शिकला. कृषी पदवीधर जाला. रानात घाम गाळतु. आता मस बागाईतदार हाई. काय बी कमी न्हाई. ईस्वेस्वराचं टायमिंग कंदी कंदी चुकतंया गडय़ाहो. पका तवा गावला आस्ता तर..?

दत्तूच्या बॉडीमदनं आज बी क्रिकेटचं रगत वाहतंया. क्रिकेटचं देनं इसरलं न्हाई बेणं आजून. दरसाल पन्नास हजार साळंला देतु. भोईरमास्तर साळंच्या टीमला ट्रेन करत्यात. श्टंपा, ब्याटी, पॅड, हेल्मेटा, म्याट.. समदं हाई. दत्तू खुराकाची बी सोय करतु. काय बी कमी न्हाई. स्टेट ल्येवलपत्तुर पोरं खेळून येत्यात. दत्तू त्येच्या आज्याच्या नावानं क्रिकेट टूर्नामेंट भरवतुय दर साली. मस धा-बारा टीमा हिस्सा घेत्यात. नुस्ता क्रिकेटचा धुराळा उडतो आठ दिस.

तुमी बघशीला सदाभौ.. येक दिस आम्च्या गावचं पोरगं टीम इन्डियामंदी पोचनार. दत्तू मंजी आम्च्या गावचा क्रिकेटचा द्यावा हाई. सद्याच्याला रोज रातच्याला चावडीवर लोकं गोळा हुत्यात. दत्तू परत्येक टीमचा हिशेब सांगतु. कोन कसं खेळला? कोन चुकला? कुनी रेकार्ड मोडला? टीम इन्डियाची पुढची पालिशी काय असनार? सदाभौ, आम्चा दत्तू पुरी जिंदगी क्रिकेट जगला. म्याच कशी बगाया हवी, खुल्या दिलानं हार कशी कबूल कराया हवी, समदं आमास्नी दत्तोबानं शिकीवलं.

आमचा दत्तू काय म्हन्तो.. क्रिकेटच्या नशिबी ग्लॅमर हाई. त्येच्यामागं दुनिया पागल हाई. क्रिकेटमंदी पसा हाई. देशी खेळान्ला बी समदं मिळाया हवं. काय सांगून ऱ्हायलोय आमी? दत्तू प्रो-कबड्डीच्या लई पिरमात हाई. कंचा बी ख्येळ आसू दे- ख्येळामंदी पॉलीटीक्श नगं. पशावाचून कुनाचं अडाया नगं. गुनी खेळाडून्ला चांगलं ट्रेनिंग, चांगला खुराक गावला की आपल्या देसाचं नाव रोशन हुनार. सरकार आपल्यापरीस मस योजना आखून ऱ्हायलंय. खेळाडून्ला अनुदान देवून ऱ्हायलंय. पर जिथं सरकार पोचलं न्हाई, तिथं असं दत्तू पायजेल.

सदाभौ, आखिरला जिंदगी बी क्रिकेटची म्यॅच हाये. कंदी हार, कंदी जीत. आपुन दोनीसाटी रेड्डी आसाया हवं. हररोज कसरत कराया हवी. फीट ऱ्हाया पायजेल. कसून सराव कराया पायजेल. येक मॅच हारली तरी पुढची जिकता येती- हा कान्फिडन्स क्रिकेट देऊन ऱ्हायलंय. आसा खेळाडू जिंदगीची म्याच कंदी बी हारत न्हाई.

आवं, वर्ल्डकप हाई. चार सालातून येकडाव ही दंगल बगाया गावते. या टायमाला सायेबांच्या देसात हाई मंजी क्रिकेटच्या पंढरीत.

क्रिकेट आमास्नी जगाया शिकवीतं. हारलो तरीबी जिंकायची उमेद देतं. दोन घटका समदी गनगन ईसरून, समदे जातिभेद इसरून, समदा देस ग्यारा लोकान्मागं हुभा ठाकतो. ती ग्यारा लोक जिकली की देस इजयी हुतो. आमीबी याच क्रिकेटपंढरीचं वारकरी हाई सदाभौ.

तुमीबी या वारीला या आन् क्रिकेटच्या भक्तिरसात आंघूळ करा. कुनी बी जिकू देत, श्येवटला इजय क्रिकेटचाच. आता कुनी बी येक टप्पा आऊट हुनार न्हाई. ब्याट धरा हाती आन् हाण त्येच्या आयला. जिंदगीतली समदी दु:खं, अडचनी, गनगन आऊट हुनारच..

ब्येष्ट लक सदाभौ.

ब्येष्ट लक टीम इन्डिया..

तुम्चा जीवाभावाचा दोस्त..

दादासाहेब गावकर

First Published on June 30, 2019 12:12 am

Web Title: tapalki article by kaustubh kelkar nagarwala 6
Just Now!
X