सॅबी परेरा

आज माणसांचं पत्रलेखन थांबल्यातच जमा आहे. अशा काळात सभोवतालावर खुसखुशीत टीकाटिपण्णी करणारी सॅबी परेरा आणि कौस्तुभ केळकर यांची तिरकस पत्रापत्री..

प्रिय दादू यास,

हे खरं म्हणजे मला ‘दादूस’ असेही लिहिता आले असते; पण हल्ली असहिष्णुता इतकी वाढलीय, की तेवढय़ा एका शब्दावरून कुणाच्या भावना दुखावतील आणि मला भाऊ कदमसारखी ऑन कॅमेरा माफी मागावी लागेल, हे सांगता येत नाही!

अरे, तुला मी कधीपासून सांगतोय, एकदा मुंबईला ये, मुंबईला ये. छानपैकी भेटू, बसू आणि बोलू. पण तू काही केल्या येत नाहीस. मागे एकदा म्हणालास, ‘तुमच्या त्या घामट वातावरणात आणि गुंडापुंडांच्या शहरात मला यावंसं वाटत नाही.’ अरे, असेच जर असेल तर हा राईट सीजन आहे मुंबईला येण्याचा! मागच्या काही दिवसांपासून सकाळी गुलाबी थंडी पडू लागलीय, त्यामुळे घामही येत नाही. म्हणून यंदाचं हिवाळी अधिवेशनसुद्धा मुंबईत झालं आणि त्यामुळे बंदोबस्त वाढल्याने गुंडापुंडांचे प्रमाणही जरा कमी झालेय. कधी येतोस मग?

थंडीवरून आठवले, आज मॉर्निग वॉकला गेलो असताना (आपण काही तितकेसे पुरोगामी नसल्याने बिनधास्त मॉर्निग वॉकला जातो बरं का!) बाजूने चालणाऱ्याला सहज बोललो, ‘‘काय मस्त थंडी पडलीय..’’ तर तो खुशीत येऊन गप्पा मारू लागला. गप्पांच्या ओघात मी म्हणालो की, ‘‘सकाळी जरी प्रसन्न वाटत असलं तरी दुपारी काय भयानक उकडते हो!’’ यावर तो भडकला आणि ‘‘मागच्या सत्तर वर्षांत तुम्हाला उकडलं नव्हतं का? आताच बरं उकडायला लागलं..’’ असं बडबडत तरातरा निघून गेला.

सकाळी फेसबुकवाल्या झुक्याने आठवण करून दिली की, तुझ्या-माझ्या दोस्तीला आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने आपल्या फेसबुक मत्रीची सुरुवात आठवली. माझं फेसबुक प्रोफाइल पाहून तू फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. शक्यतो आम्ही मुंबईकर तुम्हा गावाकडच्या लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारत नसलो, तरी तुमचा अण्णा हजारे टाइप निरागस फोटो पाहून आम्ही तुम्हाला मित्र बनवून घेतलं. या वर्षभरात अधूनमधून तुम्ही आपला गावठी बाणा दाखवत फेसबुकच्या चव्हाटय़ावर अर्णब गोस्वामीसारखे भारंभार प्रश्न विचारत सुटलात. हे बघ दादू, आता हे ऑफलाइन सांगायला हरकत नाही की, तुम्हाला आमचं फेसबुक प्रोफाइल बनावट असल्याचा डाऊट आला होता तो काही अंशी खरा आहे. कारण आम्ही तेथे जे काही खरडतो ते खरे आणि मनापासून असले, तरी फेसबुकवरील आमचे नाव काही खरे नाही. त्याचे काय झाले की, आम्ही ज्या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो तेथील फिरंगी साहेबाला आमचे पतंजलीपेक्षाही शुद्ध देशी असे ‘सदू धांदरफळे’ हे नाव उच्चारता येत नसल्यामुळे त्याने आमच्या नावाला इंग्लिश टच दिला आणि आणि आता सवयीने आम्हालाही ते आवडू लागले आहे. असो.

सालाबादप्रमाणे या वर्षीही आम्ही दिवाळीला दिवाळी अंकांची आणि कालनिर्णयची खरेदी केली. एव्हाना दिवाळी अंक चाळून रद्दीतही गेले, कालनिर्णयवरील रेसिपी आणि संपूर्ण वर्षांचे राशीभविष्य वाचून ते भिंतीवर टांगूनही झाले. त्यामुळे भिंतीवरील कॅलेंडरचा कोपरा भरला गेला असला, तरी गेल्या कित्येक वर्षांपासून मनात जपलेला किंगफिशरच्या कॅलेंडरचा गुलाबी कोपरा अजून रिताच आहे. तारखा, तिथी, सणवार, भविष्य सांगण्यासाठी कुठलंही कॅलेंडर चालते रे, पण दिवस प्रसन्न जाईल याची तजवीज करणारे या भारतवर्षांत एकच कॅलेंडर होते; ते म्हणजे किंगफिशर! या विघ्नसंतोषी सरकारने, तब्बल साडेआठशे पॉर्न साइट्सवर बंदी घातल्यामुळे आणि किंगफिशर नामक सांस्कृतिक चळवळीच्या जनकाला देशोधडीला लावल्यामुळेच आपला देश जागतिक आनंद निर्देशांकात मागे पडत चालला आहे. हे बाकी कुणाला नाही, पण निदान संसदेमध्ये मोबाइलवर निळे सिनेमे पाहणाऱ्या खासदारांच्या तरी लक्षात यायला हवे होते की नाही? अरे, मी जर खासदार असतो ना, तर त्या विजय मल्याला निदान कॅलेंडर काढण्यासाठी तरी भारतात महिन्याभराचा सेफ कॉरिडॉर द्यावा अशी लक्षवेधीच मांडली असती. आपल्या राजकारण्यांना सौंदर्यदृष्टी असली, तरी ती दृष्टी विकसित करणारी किंगफिशर कॅलेंडरसारखी संसाधने तळागाळात झिरपावी म्हणून काही करायची त्यांची तयारी नाही हेच खरे!

दादू, मी काय म्हणतो, हल्ली छोटय़ा-मोठय़ा गावातून बऱ्याच स्टार्टअप कंपन्या सुरू होत असल्याचे आणि कोवळी कोवळी पोरं करोडो रुपये कमावत असल्याचे तुझ्या व्हॉट्सअ‍ॅपवर आले असेलच. तुझ्या माहितीत किंवा तुमच्या गावाकडे ‘असे’ कॅलेंडर बनविणारी एखादी स्टार्टअप कंपनी आहे का रे? किंवा संपूर्ण भारतभर अनटॅप्ड मार्केट असलेले हे प्रॉडक्ट बनवणारी एखादी स्टार्टअप कंपनी आपण दोघे मिळून सुरू करू या का?

मित्रा दादू, अख्खा महाराष्ट्र दुष्काळाच्या आगीत होरपळत असतानाही मुंबईकरांची चंगळ सुरूच असते, म्हणून तुम्हा खेडय़ातल्या लोकांनी दिलेले शाप या वर्षी आम्हा मुंबईकरांना भोवणार असे दिसते. नोव्हेंबरपासूनच मुंबई महापालिकेने पाणीकपात सुरू केलीय आणि मुंबईला वीजपुरवठा करण्यासाठी रिलायन्स नावाचा एक गुर्जर बंधू जाऊन त्याच्या जागी अदानी नावाचा दुसरा गुर्जर बंधू आलाय. या अदानीने येतायेताच आपली चुणूक दाखवल्याने सगळ्यांची बिले दीडपट वाढवून यायला सुरू झाली आहेत. आता तर परिस्थिती अशी आहे की, विजेचे बिल पाहताच डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली आहे आणि आमच्यासारख्या निम्न व उच्चच्या मधे लोंबकळणाऱ्या मध्यमवर्गीयांना काळोखापेक्षा प्रकाशाचीच भीती वाटू लागली आहे.

‘मुंबई-पुणे-मुंबई’ या सिनेमाचा तिसरा भाग येतोय हे तुला कळले असेलच. या सिनेमाचे आधीचे दोन्हीही भाग मला फारसे (खरं सांगायचं तर, अजिबात) आवडले नसले तरी मुक्ता बर्वेसाठी माझ्या हृदयात जो हळवा कोपरा आहे, त्यामुळे हा तिसरा भागही मी पाहणारच आहे. पुण्याचे आणि पुणेकरांचे मला फारसे कौतुक नसले तरी आपल्या तत्त्वासाठी झगडण्याचा त्यांचा गुण वाखाणण्याजोगाच आहे. कुठल्याही फालतू गोष्टीला तत्त्वाचा मुलामा देण्याची त्यांची कलाही दाद देण्याजोगीच. अरे, हेल्मेटसक्तीला विरोध करणारे एकमेव शहर असल्याचा चक्क अभिमान बाळगतात म्हणे पुणेकर! नाही तर आम्ही! आमच्या जीभेचा एक्सलरेटर तुटलेला असल्यामुळे आम्ही दुचाकीच काय, तर पायी चालतानाही हेल्मेट वापरतो. कधी कधी तर मला, मी सवयीप्रमाणे हेल्मेट घालून रस्त्याने चालत जात असताना मला ट्रॅफिक पोलिसाने पकडलंय आणि बिनागाडीचे हेल्मेट घातल्याबद्दल शे-पाचशे रुपयाची पावती फाडत असल्याची स्वप्नं पडत असतात. परत असो.

मित्रा दादू, येत्या महिन्यात येतो, पुढच्या महिन्यात येतो असे करत करत तू तुझ्या मुंबईवारीसाठी तारीख पे तारीख देत चालला आहेस. तू अच्छे दिन आल्यानंतरच येणार आहेस की काय? तसे असेल तर उलट टपाली कळव, म्हणजे आम्हालाही तुझ्या येण्याची वाट पाहणे थांबवता येईल. पत्राचे उत्तर मात्र पोस्टानेच पाठव, तितकेच एका पोस्टमनची नोकरी वाचवल्याचे पुण्य लाभेल.

कळावे, राग-लोभ काहीही नसावा!

तुझा आभासी मित्र,

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com