04 August 2020

News Flash

च.. चारित्र्याचा!

टपालकी

(संग्रहित छायाचित्र)

सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यास,

सदू धांदरफळेचा नमस्कार.

अरे दादू, काय धम्माल पतंगबाजी केलीये तुझ्या पत्रात! तुझं ते सीनियर पतंगाचं मांजाला झालेलं ओझं काय, कर्जाच्या ओझ्याची कण्णी काय, कंची पतंग हाती घेऊ काय, आजीच्या बटव्यातलं संस्काराचं अ‍ॅप काय, विश्वाच्या आकाशामधी भारत देशाचा पतंग काय! अरे दाद्या, तू असाच जर सुविचारी लिहीत राहिलास तर लवकरच व्हॉट्सअ‍ॅपच्या दुनियेमध्ये तू वपु, पुलं, पाटेकर आणि नांगरे-पाटलांच्याही पुढे जाशील बघ. मी विनोद करत नाहीये. माझं पसंतीचं सर्टिफिकेट असं ज्ञानेश्वर युनिव्हर्सिटीच्या डिग्रीसारखं सहजासहजी मिळत नाही. लिहून ठेव माझी ही भविष्यवाणी.

बरं, ते जाऊ दे. कसा आहेस? मुलं आणि वहिनी कशा आहेत? रागावणार नसलास तर विचारतो, गावाकडे काही वेगळी सिस्टीम आहे, की तुम्हीही आमच्यासारखेच आपल्या बायकोच्या तालावर नाचता? अरे, इथं असं रात्रंदिवस बायकोच्या कोरिओग्राफीवर नाचून नाचून दमलो की आम्ही अधूनमधून श्रमपरिहार आणि विरंगुळा म्हणून डान्स बारमध्ये जायचो. तेवढीच दोन घटका करमणूक रे! पण तुला माहिती असेलच की,आपल्या मायबाप सरकारला त्या मंद उजेडातला आमचा आनंदानं उजळलेला चेहरा काही पाहवला नाही आणि त्यांनी आमच्या आयुष्यातल्या उरल्यासुरल्या हॅप्पी अवर्सवरच घाव घातला. एक वटहुकूम निघाला आणि डान्स बार बंद झाले. मी काय म्हणतो दादू, तुमच्या गावागावांत तमाशांचे फड जोरात सुरू असताना, समृद्धी महामार्गाचा पैसा जमीनमालकाला केवळ दर्शन देऊन तमासगीरांच्या खिशात जात असताना आणि इथं शहरात श्रीमंतांच्या खासगी मुजऱ्याच्या मैफिलीही रंगत असताना गरिबीतून अनुकंपा तत्त्वावर पदोन्नती मिळालेल्या आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांनाच या आनंदापासून का मुकावं लागावं? म्हणजे बघ, पुरुषांना दारू प्यायला परवानगी आहे, नाचायला परवानगी आहे, दारू पिऊन नाचायलाही परवानगी आहे; पण पुरुष दारू पीत असताना सुंदर बायांना नाचायला परवानगी नाही. अरे, हा कुठला न्याय? स्त्रियांवरील या अन्यायाविरुद्ध एखादी तृप्तीताई पेटून का उठत नाही? निदान स्त्रियांनी दारू पिताना पुरुषांना नाचायला मुभा द्यावी अशी अतरंगी मागणी कुणी का करत नाही? तुला सांगतो, आमचा दत्तू या शासनाला दु:शासन म्हणतो ते उगीच नाही!

विद्वान लोकांचं असं म्हणणं आहे (असं म्हटलं की, आपल्या मनातलं काहीही खपवता येतं!), की डान्स बारमध्ये वाईट काय आहे? संस्कृतीच्या नावाखाली चारित्र्याच्या कल्पना माजवून विवाहसंस्थेद्वारे सार्वजनिक जीवनात स्त्री-पुरुषांची एकमेकांपासून जी फारकत केली गेली, त्यातून त्यांना एकत्र येऊ  वाटणाऱ्या अनेक चोरवाटांनी नंतर जन्म घेतला. त्यापैकी तमाशा, मुजरा, डान्स बार या भारतीय चोरवाटा आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेत तमाशा फडात रमणाऱ्या पुरुषांचे आजचे वंशज नव्या जीवनशैलीनुसार ‘डान्स बार’मध्ये हजेरी लावीत आहेत, त्यात गैर काय? तात्पर्य काय, तर पुरुष हे डान्स बारमुळे बहकत नसून बहकलेले पुरुष डान्स बारकडे वळतात आणि त्याचे पोशिंदे होतात.

तर सांगायचा मुद्दा हा की, डान्स बारची ही बंदी न्यायालयात टिकणार नव्हतीच. कारण असं म्हणतात की, शेवटी सत्याचा विजय होतोच. (सत्याचा विजय सुरुवातीलाच का होत नाही; शेवटीच का होतो, याविषयी तुला काही माहिती आहे काय? कारण मी ‘सत्या’ सिनेमा पाहिला होता आणि त्यात शेवटी सत्याचा ‘गेम’ झाला होता. असो.) सर्वोच्च न्यायालयाला आम्हा पामरांची दया आली आणि राज्य सरकारच्या अनेक कठोर अटी रद्द करून सर्वोच्च न्यायालयानं डान्स बार पुन्हा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला, ही बातमी तू वाचली असशीलच.

राज्य सरकारनं आपल्या अर्जात डान्स बार सुरू करण्यासाठी ज्या अटी प्रस्तावित केल्या होत्या, त्यातील डान्स बारचालक चारित्र्यसंपन्न असावा अशी जी अट होती तिची मला गंमतच वाटली. मला सांग, ही अट न्यायालयानं मान्य केली असती तर चारित्र्याचं प्रमाणपत्र देणारे हजारो अण्णा सरकारनं कुठून आणले असते? आणि खरंच असं काही झालं असतं, तर बी.फार्म.वाल्या उमेदवाराचं सर्टिफिकेट भाडय़ानं घेऊन मेडिकल चालवणाऱ्यासारखं तुझं-माझं चारित्र्याचं सर्टिफिकेट भाडय़ानं घेऊन कुणा शेट्टीनं, सरदारजीनं किंवा भैयानं डान्स बार चालविलेच नसते याची काय गॅरंटी? कदाचित असंही असेल की, चारित्र्यसंपन्न माणसं व्यवहारात काही कामाची नसतात हे उघड गुपित असल्यामुळे अशा कुचकामी लोकांना सर्टिफिकेट भाडय़ानं देण्याचा रोजगार मिळावा, या उदात्त हेतूनं सरकारनं ही याचिका केली असावी. पण न्यायदेवता आंधळी असल्यामुळे तिला सरकारचं हे बेकारी निर्मूलनाचं उद्दिष्ट दिसू शकलं नसावं. (बाय द वे, न्यायदेवता जर ऑलरेडी आंधळी असतेच तर ती डोळ्यांवर आणखी पट्टी का बांधते? काळ्या काचांचा गॉगल घालून काळाबरोबर का चालत नाही?)

कधी कधी मला असं वाटतं, की आपल्या सरकारच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. सरकार आज म्हणतेय की, बार चालवणारे चारित्र्यसंपन्न असावेत. उद्या म्हणेल, शिक्षणसंस्था चालवणारे चारित्र्यसंपन्न असावेत, परवा धर्मादाय संस्था चालविणारे, नंतर मोठमोठय़ा कंपन्या चालविणारे, न्यायसंस्था चालविणारे.. असे करता करता देश चालविणारे चारित्र्यसंपन्न असावेत असेही म्हणेल. कळीचा मुद्दा असा आहे की, नावापुरता विकसनशील, पण प्रामाणिकपणात दरिद्री असलेल्या आपल्या देशाला चारित्र्यसंपन्न लोकांची एवढी उधळपट्टी परवडणार आहे का?

कसं आहे की, चारित्र्याची व्याख्या करता येत नसल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या वैयक्तिक व्याख्येप्रमाणे ऑलरेडी चारित्र्यसंपन्न आहेच. त्यामुळे जोवर कुणी ‘मी टू’ची टाचणी लावून फोडत नाही तोवर आपण आपापले चारित्र्याचे फुगे फुगवून आकाशी उडवायला हरकत नाही.

कधी कधी मला असंही वाटतं की, ‘मैं तुम्हें एक पुलिस अफसर की हैसियत से नहीं, बल्की एक बाप की हैसियत से मशवरा दे रहा हूं,’ असं म्हणणाऱ्या हिंदी सिनेमातल्या चरित्र अभिनेत्याला जशा दोन-दोन हैसियती असतात ना, तशी आपल्या प्रत्येकाला दोन-दोन चारित्र्यं असतात. आपण जाहीररीत्या कसे वागतो, बोलतो, विचार करतो ते आपलं जाहीर चारित्र्य आणि आपण खासगीत कसे वागतो, बोलतो, विचार करतो ते आपलं खासगी चारित्र्य. तुला सांगतो दादू, आमच्या इथं बॉलीवूडमध्ये अत्यंत संस्कारी म्हणून नावाजलेले आणि ‘मी टू’ प्रकरणात चारित्र्य डागाळलेले अभिनेतेही स्वत:ला ‘चरित्र अभिनेते’ म्हणवून घेतात! आहे की नाही गंमत!

खरं म्हणजे कोण चारित्र्यवान आहे आणि कोण नाही, हे ठरविण्यासाठी एक समिती नेमली पाहिजे आणि त्या समितीवर कोण कोण चारित्र्यवान सदस्य असावेत, हे ठरविण्यासाठी एक उच्च समिती नेमली पाहिजे. आणि त्या उच्च समितीवर कोण कोण चारित्र्यवान सदस्य असावेत, हे ठरविण्यासाठी.. हे म्हणजे सलूनमधल्या आरशातील प्रतिमांप्रमाणे न संपणारं प्रकरण आहे.

‘चारित्र्य’ ही प्रत्येक माणसाची ओळख असते आणि असलीच पाहिजे. आपण कसे वागतो, बोलतो, आपला कौटुंबिक-सामाजिक व्यवहार कसा आहे, आपले आर्थिक व्यवहार कसे आहेत, यावरून आपलं चारित्र्य कसं आहे हे ठरतं. पण चारित्र्य ही इतकी सापेक्ष संकल्पना झालीये, की ज्या उक्ती-कृतीसाठी आपण इतरांच्या चारित्र्याला नावे ठेवत असतो, त्याच उक्ती-कृतीचे शिंतोडे आपल्या कपडय़ावर उडाले तर आपण ‘दाग अच्छे है’ म्हणत मिरवत असतो. म्हणूनच २१ व्या शतकात होऊन राहिलेल्या नीरज श्रीधर या संतमहात्म्याने सलमान नावाच्या रेडय़ाच्या तोंडून सांगितलं आहे की-

‘इश्क के नाम पे करते सभी अब रास लीला है,

मैं करू तो साला कॅरेक्टर ढीला है’

तुझा चि. चा. मि. (चिरंजीव चारित्र्यकांक्षी मित्र),

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2019 12:32 am

Web Title: tapalki article by sabi perera 4
Next Stories
1 सेल्फी-बिंब
2 खुलासेवार प्रसंगवर्णनांतली रंजकता
3 मनस्वी कलावंताचे आत्मवृत्त
Just Now!
X