13 August 2020

News Flash

दिवस परीक्षेचे आहेत..

टपालकी

(संग्रहित छायाचित्र)

सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यास,

सदू धांदरफळेचा नमस्कार!

गावाकडं पाण्याचं दुर्भिक्ष्य झाल्याचं तुमच्या पत्रात वाचलं आणि खरंच खूप वाईट वाटलं. इथं मुंबईला बिल्डर लोक रोज नवनवीन प्रोजेक्ट्सच्या जाहिरातींमध्ये २४ तास पाणी आणि स्विमिंग पुलाच्या बाता मारत असताना (फ्लॅटचा प्रत्यक्ष ताबा द्यायची वेळ येते तेव्हा मुंबईच्या उपनगरांतले बिल्डर २४ तास नळ आणि बिनपाण्याचा स्विमिंग पूल देतात, ती गोष्ट वेगळी!) खेडेगावातील आमच्या आयाबहिणींना पाण्यासाठी वणवण करावी लागणं, ही खरंच खेदाची बाब आहे. पण दादू, या वर्षी पाऊस मुबलक असेल आणि दुष्काळाची शक्यता नाही, अशी सरकारी बातमी मध्यंतरी कानावर आली होती, ती खोटीय का? सरकारी बातमी खोडून काढणारं मत मांडलंस तर तुझ्यावर देशद्रोहाचा शिक्का बसू शकतो याची कल्पना आहे ना तुला? राग मानून घेऊ  नकोस दादू, पण ‘पुलवामोत्तर’ काळात मला सगळ्याच गोष्टींकडे संशयानं पाहायची सवय झालीय म्हणून विचारतो- तुमच्याकडे खरोखरच पाण्याचा दुष्काळ आहे की येत्या उन्हाळी सुट्टीत आपल्याकडे कुणी पाहुणे येऊ  नयेत म्हणून तुम्ही हा पुणेरी डाव टाकलाय?

ते जाऊ  दे. अरे, मार्च महिना म्हणजे शाळा-कॉलेजच्या परीक्षांचा काळ. शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा असाव्यात की नसाव्यात, हा कळीचा प्रश्न असला आणि आमच्या महाराष्ट्राचे शिक्षण खाते गेली कित्येक वर्षे या प्रश्नाचे खेळणे ‘ऑन-ऑफ, ऑन-ऑफ’ करण्याचा खेळ खेळत असले, तरी शिक्षणाच्या बाबतीत निदान आपले महाराष्ट्र सरकार नेहमीच गंभीर होते याबद्दल मला तरी शंका नाही. आजवर महाराष्ट्रात जे जे म्हणून शिक्षण मंत्री झाले, त्या प्रत्येकाला आपणच मेकॉलेचा बाप असल्याचा भास होऊन त्या प्रत्येकाने शिक्षणव्यवस्थेला एक नवे वळण देण्याचा प्रयत्न केला. या ९० अंशातल्या वळणांमुळेच गेली कित्येक वर्षे आपली शिक्षणव्यवस्था पुढे जाण्याऐवजी तोंडानं शेपूट पकडू पाहणाऱ्या कुत्र्याप्रमाणे आहे त्याच जागी गोल गोल फिरत राहिली आहे.

माझ्या मुलीच्या शाळेनं एक चांगला निर्णय घेतलाय. इतिहास या विषयाची वार्षिक, सहामाही किंवा तिमाही परीक्षा न घेता प्रत्येक पाठ शिकवून झाल्याबरोबर ताबडतोब परीक्षा घेतली जाणार आहे. त्यांचंही बरोबरच आहे म्हणा! इथं रोजच्या रोज इतिहास बदलला जात असताना वर्षभराची रिस्क कोण घेईल हो!

दादू, परीक्षा म्हटली की मला माझे शाळेतील दिवस आठवतात. परीक्षा जवळ आल्यावर आमचे शिक्षक आमची उजळणी घ्यायचे. तेव्हा ते अधूनमधून एखाद्या प्रश्नाला ‘इम्पॉर्टन्ट’, दुसऱ्या एखाद्या प्रश्नाला ‘मोस्ट इम्पॉर्टन्ट’ अशा खुणा करायला लावायचे. मित्रा, मला अजूनही एक गोष्ट कळत नाही, की या शिक्षकांना अभ्यासक्रमातले महत्त्वाचे काय आणि बिनमहत्त्वाचे काय, हे जर सुरुवातीपासूनच माहीत होतं, तर वर्षभर आम्हाला बाकीच्या फालतू गोष्टी शिकवून त्यांच्या आणि आमच्या डोक्याचं ते भुस्काट का करीत असतील?

आपला आपल्या स्वत:वर, शाळेवर आणि शिक्षकांवर जितका विश्वास असतो, त्यापेक्षा जास्त विश्वास नशिबावर आणि देवावर असल्याने परीक्षांच्या काळात अभ्यासिका आणि लायब्ररीपेक्षा देवळात विद्यार्थ्यांची मोठी रांग लागायची. माझा तसा नशिबावर तेव्हाही विश्वास नव्हता आणि आताही फारसा नाही. पण शाळेत जेव्हा आपल्याला न आवडणारी मुलं आपल्यापेक्षा उत्तम गुणांनी पास होतात आणि आपण ज्यांचा दु:स्वास करतो अशी माणसं आयुष्यात जेव्हा खूप पुढे जातात, तेव्हा त्यांची हुशारी, त्यांची धडाडी, त्यांचं कर्तृत्व मान्य करण्यापेक्षा त्यांना नशिबानं साथ दिली असं म्हटलं की आपलं अपयश झाकायला बरं पडतं!

तर.. प्रत्येक परीक्षेच्या आधी आम्हा मित्रांची एक गुप्त बैठक व्हायची. त्या बैठकीत परीक्षा हॉलमध्ये एकमेकांना उत्तरं विचारण्या-सांगण्यासाठी सांकेतिक भाषा ठरवली जायची. आपली कोड लँग्वेज वर्गातील सुपरवायझरला काही केल्या कळणारच नाही, असा एक अजित डोवल टाईप कॉन्फिडन्स आम्हाला असायचा. तरीही बऱ्याचदा आमचा एखादा भिडू कॉपी करताना पकडला जायचा. मला तर पक्का डाऊट आहे की आमच्या शिक्षकांना डी. एड्.- बी. एड्.ला शिकवणारा इसम ‘सी. आय. ए.’ किंवा ‘मोसाद’चा एजंट असला पाहिजे. मलाही एकदा कॉपी करताना पकडून ताकीद देऊन सोडलं तेव्हापासून मी यापुढे कॉपी न करण्याची प्रतिज्ञाच केली होती. पण ज्याप्रमाणे बेवडय़ानं सुधारायचं ठरवलं तरी लोक त्याला घरपोच बाटली आणून देतात, त्याचप्रमाणे आमचे भिडू लोक कॉपीच्या दोन-दोन प्रती काढायचे.. एक त्यांच्यासाठी आणि एक माझ्यासाठी. काय ते प्रेम, काय ते प्रेम!

प्रत्येक विषयाला दोन दिवस या हिशेबानं सहा विषयांसाठी परीक्षेच्या १२ दिवस आधी अभ्यासाला सुरुवात केली तर आपण आरामात पास होऊ  असा आत्मविश्वास मला नेहमीच वाटायचा. माझ्या या आत्मविश्वासाची बरोबरी फक्त आणि फक्त ‘पुढचा मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकरच!’ असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाबरोबर होऊ  शकते. १२ दिवस म्हणता म्हणता परीक्षेला चार दिवस राहिल्यावर कसाबसा पुस्तक उघडायचा मुहूर्त निघायचा. सिलॅबसवर नजर टाकल्यावर इतकंच कळायचं, की ‘कुछ तो हुवा है, कुछ हो गया है.’ पण जे वर्षभरात जमलं नाही, ते त्या चार दिवसांत डोक्यात घुसणं शक्यच नसायचं. आणि मग अपेक्षेप्रमाणे परीक्षेच्या वेळी ‘सब कुछ अलग है, सब कुछ नया है’ अशी अवस्था व्हायची.

तुला सांगतो दादू, परीक्षेच्या नावानंच आमच्या पोटात कळ यायची. आमच्या बालपणी शाळेत आणि शाळेबाहेरही ‘व्होल वावर इज अवर’ हीच शौचाला जाण्याची जनमान्य रीत असल्यामुळे माझा परीक्षेचा अर्धा वेळ मी वावरातच वावरायचो. आता गावागावांत सरकारने आणि शहरात जागोजागी ‘सुलभ’वाल्यांनी संडास बांधलेत. ‘जो चोच देतो तो चाराही देईल’ या न्यायाने ज्यांनी संडासची सोय केलीय, ते कधीतरी रोजगाराचीही सोय करतील, या आशेवर अख्खा देश उकिडवा बसलाय. मागच्याच आठवडय़ात एक बातमी आलीय, की मुंबईमध्ये ‘बेस्ट’वाले त्यांच्या जुन्या बसगाडय़ांचा वापर मोबाइल टॉयलेट म्हणून करणार आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय चांगलाच आहे रे.. त्याविषयी प्रश्नच नाही. पण होते काय, अशामुळे लोकांच्या अपेक्षा विनाकारण वाढतात. आजवर रस्त्यावरील मुंबईकरांना आणीबाणीच्या वेळेला शौचाला निदान ‘सुलभ’ व्हावं, इतकीच अपेक्षा असायची; आता ते ‘बेस्ट’ व्हावं असंही वाटू लागेल.

अरे दादू, आपण हे असे भर परीक्षेतून उठून संडासमध्ये कसे घुसलो? चला, ट्रॅकवर येऊ या. तर, काय म्हणत होतो, की परीक्षा..

वाईट या गोष्टीचं वाटतं, की हवे तसे पालक मिळविण्यात आम्ही कमी पडलो. कॉलेजच्या परीक्षेत पेपरमध्ये एकाही प्रश्नाचं उत्तर न देता मी जो काही क्लीन परफॉर्मन्स द्यायचो, त्याचं आमच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय बापाला कधीच कौतुक वाटलं नाही. अरे दादू, लक्षात घे, तीन-तीन तास टॉर्चर करून आपल्या पोराला प्रश्न विचारले जातात आणि पोरगं काही केल्या एकाही प्रश्नाच्या उत्तरासाठी तोंड उघडत नाही, या गोष्टीचा अभिमान वाटण्यासाठी तुमचा बाप नामचिन गँगस्टरच असायला हवा; मध्यमवर्गीय पपलू लोकांची ती कामं नाहीत!

कॉलेजला गेल्यानंतर (आणि एक-दोनदा प्रेमभंग झाल्यानंतर) मला साक्षात्कार झाला, की आपल्या परीक्षासुद्धा गर्लफ्रेंडसारख्याच असतात. एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती करतात. त्यांना आपल्याकडून नक्की काय अपेक्षा आहेत, ते कळायला मार्ग नसतो. सारखी संदर्भासहित स्पष्टीकरणं देत राहावी लागतात. आणि इतकं सारं करूनही रिझल्ट काय लागतो? तर- निक्काल!

दादू, गमतीगमतीत आपण भले म्हणू, की ९० टक्के, ९५ टक्के हे सारे श्रीमंतांचे चोचले आहेत. एवढय़ा मार्क्‍समध्ये आपल्यासारखी दोन-तीन गरीब मुलं सहज पास झाली असती. पण सगळंच गमतीत घेऊन चालणार नाही. दिवस परीक्षेचे आहेत. बऱ्याचदा तर आपली परीक्षा घेतली जातेय हेच आपल्याला कळत नाही. रोज आपल्याला संभ्रमित करणाऱ्या प्रश्नपत्रिका समोर येत आहेत. तेव्हा अपेक्षित प्रश्नसंचातली साचेबद्ध उत्तरं घोकून चालणार नाही. अभ्यास वाढवावा लागेल. परीक्षेला सामोरं जाण्याचा पवित्रा बदलावा लागेल. तुम्ही कसे जिंकता यापेक्षा तुम्ही किती मार्कानी जिंकता, याला महत्त्व आलेलं आहे. अपयशानं खचून आत्महत्येचा मार्ग अवलंबणं विद्यार्थ्यांला, शेतकऱ्याला, नोकरदाराला, व्यावसायिकाला, मतदाराला.. कुणालाच भूषणावह नाहीये. तेव्हा दादू, आपल्याला परीक्षा द्यायचीय, जिंकायचंय. युवर टाइम स्टार्टस् नाऊ!

तुझ्या उत्तराच्या प्रतीक्षेत..

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2019 12:28 am

Web Title: tapalki article by sabi perera 5
Next Stories
1 अखंडित 
2 ‘लोकांकिका’ नाटकाची प्रयोगशाळा
3 ‘जवान त्र्यंबक’
Just Now!
X