|| सॅबी परेरा

 

प्रिय मित्र दादू यास..

सदू धांदरफळेचा नमस्कार.

काय मित्रा, आठवडाभर तुमच्याकडे सॉलिड पाऊस पडतोय ही बातमी खरी आहे का? तसा आज आमच्या मुंबईलाही पडतोय म्हणा पाऊस- पण सॉलिड नाही.. लिक्विड!!! हॅऽऽहॅऽऽहॅ गंमत रे!

अरे दादू, जवळजवळ संपूर्ण जून महिना पावसाने वाट पाहायला लावली. अधूनमधून काळे ढग दिसायचे, पण पाऊस काही तोंड दाखवत नव्हता. धरणातला पाणीसाठा संपत आल्याच्या बातम्यांनी आमच्या शहरवासीयांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. गावात बळीराजा डोळ्यांत प्राण आणून पावसाची वाट पाहत होता. कवीलोक कागद-पेन घेऊन कविता पाडायला सरसावले होते. आणि पावसाने कुठल्या बँकेचे कर्ज बुडवले होते कुणास ठाऊक.. गायबच झाला होता.

अरे दादू, हे कॉर्पोरेट कल्चर माझ्या डोक्यात इतकं भिनलंय, की पाऊस या वर्षी पृथ्वीपर्यंत येणाराय कीढगातल्या ढगात वìकग फ्रॉम होम करतोय अशी मला शंका येऊन गेली. दादू, आपल्या विदर्भ-मराठवाडय़ातल्या पाणीटंचाईच्या बातम्यांचं ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असं झालेलं आहे. त्या बातम्यांना फारसं ग्लॅमर नसल्याने त्या मुंबईच्या मलबार हिलपर्यंतही पोहोचत नाहीत. पण चेन्नईला पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य झालं आणि त्याची बातमी पार इंटरनॅशनल झाली. जगभर पसरलेल्या तमिळ सॉफ्टवेअर इंजिनीअर्सनी सोशल मीडियावर पोष्टी टाकून आणि ट्वीट करून जग हलवून सोडलं. मला तर अशी ठाम खात्री आहे की, पिण्याचं पाणी जर ऑनलाइन मिळालं असतं तर सिनेमा रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत तो टोरेंटवर फुकटात उपलब्ध करून देणाऱ्या या तमिळ हॅकर्सनी अख्ख्या दुनियेचं पाणी चेन्नईला वळवलं असतं.

आज चेन्नईच्या नागरिकांना ज्या हालअपेष्टांतून जावं लागत आहे त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतं रे. वाटायलाच पाहिजे. मी तर म्हणतो, एखाद्याच्या दु:खाचंही दु:ख होत नसेल तर त्यापेक्षा मोठं दु:खच नाही. एक सांगू दादू, पाण्याच्या वापराबाबत आपण जर असेच गाफील आणि बेफिकीर राहिलो तर आज जी चेन्नईची परिस्थिती आहे ती उद्या मुंबई, पुणे, नाशिक- अगदी कुठल्याही शहराची आणि गावाची होऊ शकते. पाण्यासारख्या दुर्मीळ नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर अधिकाधिक जबाबदारीने करण्याची जाणीव विहिरीतून पाणी शेंदणाऱ्या ग्रामीण लोकांना आधीपासून होतीच; ती आता चोवीस तास नळाने, शॉवरने, फ्लशने आणि स्विमिंग पूलमध्ये पाणी उधळणाऱ्या शहरी लोकांनाही हळूहळू होऊ लागलीय, ही त्यातल्या त्यात आश्वासक बाब आहे. असो.

पूर्वी कसा जूनच्या पहिल्या आठवडय़ात न चुकता पाऊस यायचा. एक वेळ गोविंदाच्या सिनेमात शक्ती कपूर नसेल, अनुराग कश्यपच्या सिनेमात शिव्या नसतील, राधिका आपटेच्या चेहऱ्यावर मोबाइल हरवल्याचे भाव नसतील, पण सात जूनपर्यंत पाऊस आला नाही असं होत नसे. पाऊसही तेव्हा तुझ्या-माझ्यासारखा भाबडाच असावा. आपण दरवर्षी ‘ये रे ये रे पावसा.. तुला देतो पसा’ म्हटल्यावर पाऊस बिचारा यायचा. आपण ‘पसा झाला खोटा’ म्हणायचो. पावसाला माहीत असायचं, की ही पोरं गंमत करताहेत. पसा काही कधी खोटा होत नाही. पण आपल्याकडे ८ नोव्हेंबर २०१६ ला पसा खोटा झाल्याची बातमी त्याच्यापर्यंतही पाणोपपाणी पोहोचलीच असणार. त्यात हल्लीची इंग्लिश मीडियमची पोरं ‘रेन रेन गो अवे’ म्हणतात. मग पावसाला आपल्या इथे येण्यासाठी काय मोटिवेशन असणार सांग! अरे, तिथे ग्रामीण भागात शेतकरी बाप आभाळाकडे डोळे लावून वरुणराजाची वाट पाहतोय आणि त्याची तरुण पोरं मोबाइलमध्ये डोळे घालून ड्रीम इलेव्हनमध्ये क्रिकेटवर पैसे लावल्यामुळे इंग्लंडला पाऊस पडू नये म्हणून करुणा भाकताहेत. अशाने तो बिचारा पाऊस कन्फ्युज आणि नाउमेद होणार नाही तर काय होईल?

तुला सांगू, पाऊस तसा मनाने साधाभोळा आहे. एक आपलं भारतीय हवामान खातं सोडलं तर बाकी कुणाशी त्याची खुन्नस असल्याचं माझ्या ऐकिवात नाही. बीएमसीचे कर्मचारी हजेरीसाठी लावलेल्या कार्ड स्वॅपिंग किंवा थम्ब (अंगठा) स्वॅपिंग मशीनकडे ज्या नजरेनं पाहतात, त्याच नजरेनं पाऊस भारतीय हवामान खात्याकडे पाहत असावा. आपल्या येण्याजाण्याच्या वेळेचा कुणा ऐऱ्यागैऱ्याने हिशेब ठेवावा आणि भाकीत करावं, हे पावसाला रुचत नसावं. दादू, हवामान खात्याकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांच्या बाबतीत मी या निष्कर्षांपर्यंत पोहोचलो आहे की, तुम्ही त्यांच्या बातम्या ऐकल्या नाहीत तर तुमच्याकडे पाऊस-पाण्याबद्दल माहिती नसते; आणि ऐकल्या तर तुमच्याकडे चुकीची माहीत असते! बस्स!

गेली कित्येक दशके पावसाळा सुरू व्हायच्या आधी बीएमसीचे अधिकारी ९५% नालेसफाई झाल्याचा दावा करतात आणि पाऊस आला की न झालेल्या ५% नालेसफाईमुळे मुंबईची तुंबई होते. हा आपला गौरवशाली इतिहास, हा अभिमानास्पद वर्तमान आणि हेच आपलं उज्ज्वल भविष्य आहे. गटारांची, नाल्यांची स्वच्छता म्हणजे तरी काय असते? एका ठिकाणची घाण आणि कचरा उचलून दुसरीकडे टाकणे. विज्ञान असं सांगते की, ऊर्जा नष्ट करता येत नाही, ऊर्जेचं  फक्त वहन किंवा परिवर्तन करता येतं. शहरातील कचऱ्याचंही तसंच असावं. एक काहीतरी स्वच्छ करताना दुसरं काहीतरी घाण करावंच लागतं.

दादू, तुला माहीतच आहे की आपलं सरकार, आपली महापालिका ही सगळी प्रजाहितदक्ष मंडळी असल्यामुळे जनतेच्या खिशात चार पैसे खुळखुळावेत असे त्यांस वाटते. गुळगुळीत रस्त्यावर खिशातली चिल्लर खुळखुळणे शक्य नसल्यामुळे ते रस्त्यावर मुबलक खड्डे ठेवतात. मी मुळचाच हुशार असल्यामुळे (फॉर युवर इन्फम्रेशन.. कोचिंग क्लास, बेस्ट ऑफ फाइव्ह, शाळेकडून मिळणारे २० गुण असा काही प्रकार नसतानाही मला एस्सेसीला सत्तर तीन टक्के गुण मिळाले होते.) मला ही सरकारची भूमिका माहीत आणि मान्यही आहे. मात्र, पावसाळ्यात जेव्हा पाण्याखाली बुडालेला रस्ता दिसत नाही आणि आम्ही सर्वत्र खड्डेच आहेत असं समजून चालत किंवा गाडय़ा चालवीत असतो, तेव्हा आमची फसगत होऊ नये म्हणून जिथे कुठे चुकून चांगला रस्ता राहिला असेल तिथे महापालिकेने ‘‘सावधान! पुढे चांगला रस्ता आहे..’’ असे बोर्ड लावावेत, इतकीच माझी मागणी आहे.

आयला दादू, इतका चांगला पाऊस, इतका चांगला मौसम असताना पडणाऱ्या मस्त रिमझिम, रिपरिप, धो-धो पावसाकडे पाहत, हव्या त्या मूडची गाणी ऐकत,  हातात आवडीच्या पेयाचे चषक घेऊन एन्जॉय करण्याचे सोडून आपण या म्युन्शिपाल्टीच्या चिखलात काय लोळत बसलोय!

दादू, तुमच्याकडे आलाय का पाऊस? आला नसेल तर आज-उद्या नक्की येईल. आपल्या कलाने न घेणाऱ्याशी सूडबुद्धीने वागायला पाऊस काही कुठल्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष नाही की गृहमंत्री नाही. पाऊस आपला देवळाबाहेर बसणाऱ्या आंधळ्या भिकाऱ्यासारखा ‘देगा उसका भला, नहीं देगा उसका भी भला’ या न्यायाने अजूनही सगळ्यांवर सारखाच बरसतो. अगदी आपल्या लहानपणी बरसायचा तसाच. काही बदल झालाच असेल तर तो आपल्यात झालाय; पावसात नाही. तेव्हा आम्हाला पावसात हुंदडायला, चिखलात खेळायला, लोळायला आवडायचं. आता आम्हाला चिखलात किटाणू दिसू लागलेत. तेव्हा पावसात भिजताना आई रागावेल, बाप फटकावेल याची कधी पर्वा केली नाही. आज जीवापेक्षा  मोबाइल भिजेल याची काळजी वाटते. तेव्हा वाटायचं, की धो-धो यावा पाऊस आणि शाळाच वाहून जावी. आता बॉस आहे, मीटिंग्ज आहेत, टाग्रेट्स आहेत आणि एक सीएल जाईल याची चिंताही आहे. पाऊस तसाच येतो, अगदी पूर्वी यायचा तसाच! येताच मातीला अत्तराची कुपी भेट देतो. धरतीला प्रसन्न हिरवा शालू आणतो. आकाशात इंद्रधनुष्याचं तोरण टांगतो. नद्या-नाल्यांतून, रस्त्यांतून, गटारांतून तसाच वाहतो. भर पावसाळ्यात एसीत बसणारी, गॉगल घालून वावरणारी आपण कर्मदरिद्री माणसं या पडत्या पावसात भिजणं विसरून गेलोय. वाहत्या पाण्यात कागदाच्या होडय़ा सोडणं विसरून गेलोय, त्याला तो तरी काय करील?

पाऊस आकाशात नसतोच रे.. तो आपल्या आत खोलवर दडी मारून बसलेला असतो. दिवसभर, वर्षभर, आयुष्यभर. आपण आत डोकावून पाहायचा प्रयत्न केला तरी दिसत नाही, जाणवत नाही, भिजवत नाही. मात्र जेव्हा आभाळ भरून येते अन् ओलेती संततधार लागते तेव्हा आतला पाऊस उसळी मारून येतो बाहेर! मग नवे कोंब फुटतात. नवे धुमारे येतात. नवी पालवी येते. सगळा आसमंत कसा हिरवागार होऊन जातो. अन् रोमारोमातून आशाताईंचा मधाळ सूर भिनू लागतो..

‘नको नको किती म्हणू वाजणार दूर वेणू

बोलावतो सोसाटय़ाचा वारा मला रसपाना

ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना..’

 

चातकासारखी तुझ्या पत्राची वाट पाहणारा-

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com