20 November 2019

News Flash

बाकी सब फस्क्लास है!

काल एक मित्र भेटला. म्हणाला, ‘‘अरे, तुला त्या दादूला पेपरमध्ये जाहीर पत्रं लिहायची काय गरज आहे?

सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यास..

सदू धांदरफळेचा नमस्कार.

काल एक मित्र भेटला. म्हणाला, ‘‘अरे, तुला त्या दादूला पेपरमध्ये जाहीर पत्रं लिहायची काय गरज आहे? सरळ फोन करता आला असता की! आता तर ‘अनंत हस्ते कोकिलासुताने, डेटा किती घेशील दो कराने’ अशी परिस्थिती असताना आणि व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेल, व्हिडीओ कॉल अशी खूप सारी संवादाची माध्यमे असताना हा पत्र लिहिण्याचा उपद्व्याप करण्याची काय गरज होती? हे तुमच्या दोघांतलं संभाषण दुनियेला ऐकवण्यात (खरं म्हणजे ‘वाचवण्यात’!) काय हशील आहे?’’

मी म्हटलं, ‘‘लोकांना एखाद्याच्या खासगी बाबींत इंटरेस्ट असला तर दोन प्रेमी जीवांनी अगदी जोशात केलेल्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट काढले जातात. इथे राष्ट्राध्यक्षांचाही फोन टॅप होतो आणि संरक्षण मंत्रालयाची वेबसाइटदेखील हॅक होते. याउलट, लोकांना तुमच्यात इंटरेस्ट नसला तर तुम्ही अपघातग्रस्त होऊन रस्त्याच्या कडेला ‘वाचवा, बचाव, हेल्प,’ असं बहुभाषेत किंचाळत पडून असाल तरी कुणी ढुंकूनही तुमच्याकडे पाहत नाही. थोडक्यात काय, तर फोन, ई-मेल किंवा पत्र काहीही माध्यम वापरलं तरी लोक चोरून ऐकणार, पाहणार किंवा वाचणारच. लोकांना सवयच झालीय.. झाकून ठेवलेलं वाकून पाहण्याची आणि भर चौकात उघडय़ावर ठेवलेल्या बॉम्बकडे दुर्लक्ष करण्याची! यास्तव माझ्या मित्राव्यतिरिक्त दुसऱ्या कुणीच वाचू नये म्हणून मी पेपरमध्ये जाहीर पत्र लिहितो.’’

मला कायम असं वाटत आलंय की, फोनवर फक्त वरवरची ख्यालीखुशाली विचारली/ सांगितली जाते. या हृदयीचं त्या हृदयी असं काही होत नाही. त्यात व्यक्तीच्या भावभावनांचं, कुटुंबाचं, समाजाचं, जगाचं प्रतिबिंब पडत नाही. त्यासाठी पत्रच बेष्ट. असं म्हणतात की, पत्र हा त्या- त्या काळाचा आरसा असतो, इतिहास असतो. उद्या चुकूनमाकून तू किंवा मी प्रसिद्ध व्यक्ती झालो (जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रांत पस्तीस टक्क्यांचं उद्दिष्ट ठेवल्यामुळे- आणि तेही रडतखडत गाठल्यामुळे ती शक्यता कमीच आहे.) तर नेहरूंनी इंदिरा गांधींना लिहिलेल्या पत्रांइतकंच महत्त्व आपल्या या पत्रांना येऊ शकतं.. आहेस कुठं! अरे, आज अब्राहम लिंकनचं पत्र जसं प्रत्येक शाळेत लावलं जातं तसं उद्या आपलं एखादं पत्र सलूनमध्ये, बियर बारमध्ये किंवा देशी दारूच्या दुकानातल्या भिंतीवर लागू शकतं.

तू म्हणतोस की- मी तुला काही कळवत नाही. अरे, ज्या बातम्या पेपरात आणि टीव्हीवर कानीकपाळी ओरडून सांगितल्या जातात त्याच परत माझ्याकडून (ग्राफिक्स आणि बॅकग्राउंड म्युझिक वजा करून) ऐकण्यात तुला काय मजा येते कळत नाही. पण तुझा आग्रहच असतो म्हणून मी आज तुला माझ्या मनात, घरात आणि आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी कळवायचं ठरवलं आहे.

माझ्याविषयी तुला कळविण्यासारखे काहीही नाही. सगळ्या निम्न-मध्यम, मध्यम, सेमी-मध्यम आणि उच्च-मध्यमवर्गीयांची भारतभर जी (केविलवाणी) स्थिती आहे तीच माझीही आहे. पोरं दिवसभर हातातल्या मोबाइलमध्ये बिझी असल्याने आपल्याकडे काही मागत नाहीत, आपल्याला काही सांगत नाहीत आणि आपण काही सांगायला गेलो तर लक्षही देत नाहीत. आपण सुधारायच्या पलीकडे गेल्याची मनोमन खुणगाठ बांधून बायकोही हल्ली आपल्यावर पूर्वीसारखी खेकसत नाही. आपण मॅनेजिंग कमिटीमध्ये नसल्याचे कळल्यापासून सोसायटीच्या वॉचमननेदेखील आपल्याला सॅल्युट मारणे सोडून दिलंय. ऑफिसमध्ये आपल्यावर जळणं हे सहकाऱ्यांचं आणि आपल्यावर ओरडणं हे बॉसचं कामच आहे. त्यांचं काम ते इमानदारीत करीत असतात. तुझ्यापासून काय लपवायचं रे! अरे, आमच्या कंपनीचा नफा कमी झालाय म्हणून या वर्षी आम्हाला इन्क्रिमेंट मिळालं नाही आणि बेल-कव्‍‌र्हमध्ये बसत नसल्याने या वर्षी माझं प्रमोशनही हुकलं. च्यामारी! आम्हाला जितके टक्के इन्क्रिमेंट मिळतं त्यापेक्षा जास्त रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले तरी इथे कुणाला काही जाणवत नाही. त्यामुळे  इन्क्रिमेंट मिळाली काय अन् न मिळाली काय, काय फरक पडतो?  तेवढं सोडलं तर माझं बाकी सगळं फस्क्लास आहे.

यार दादू, जगभर दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी खाली जात असून, त्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’सारख्या मोहिमा राबविणे गरजेचे आहे असे वैज्ञानिक आणि त्यांचे ऐकून जनता म्हणत असते. आता तू पेपरमध्ये वाचलंच असशील, की मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांत अतिवृष्टी झाली. पाणी साचल्यामुळे लोक घराबाहेर पडू शकले नाहीत. जर महापालिकेने पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केली असती तर सगळं पाणी लगेच समुद्रात गेलं असतं आणि शहरात जमिनीतील पाण्याची पातळी अधिकच खाली गेली असती, हे ध्यानात न घेता लोक महापालिकेच्या कारभाराला नावे ठेवतात. तुम्ही काहीही करा अगर नका करू, बोलणारे बोलणारच. तेवढं सोडलं तर आम्ही राहतो त्या मुंबईच्या उपनगरात बाकी सगळं झकास आहे.

मित्रा, आपण- म्हणजे जनता जशी असते त्याच लायकीचे त्यांना राज्यकत्रे मिळतात असं एक इंग्रजी वचन आहे. त्यामुळे आपले राज्यकत्रे थर्डक्लास आहेत असं म्हणायला माजी जीभ धजावत नाही. म्हणून मी म्हणतो की, आम्ही नशीबवान आहोत, आम्हाला राज्यकत्रे उत्तम मिळालेले आहेत. आम्ही मुंबईत तुंबलेल्या पाण्याच्या गोष्टी करतो तेव्हा ते रशियात आलेल्या पुराविषयी आम्हाला माहिती देऊन आमचं जनरल नॉलेज वाढवतात. आम्ही रस्त्यावरील खड्डय़ांच्या आणि ट्रॅफिक जामच्या तक्रारी करतो तेव्हा त्यांना भरधाव जाणारी बुलेट ट्रेन दिसत असते. आम्ही मॅनहोलमध्ये पडून जीव गमावणाऱ्या मुलांची बाजू घेतो तेव्हा ते पालकांच्या जबाबदारीविषयी आम्हाला प्रवचन देतात. पावसामुळे आणि तुंबलेल्या गटारांमुळे घरात मच्छर आणि माश्यांनी उच्छाद मांडल्याची आम्ही कुरबुर करतो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं की, आमच्या राज्यात सगळ्यांना काम मिळाल्यामुळे माश्या मारणारी रिकामटेकडी मंडळी राहिली नाहीत. आणि या डिजिटल इंडियामध्ये जे कुणी रिकामटेकडे आहेत, त्यांचा सगळा वेळ गुड मॉìनगचे मेसेज डिलीट करण्यात जातो!’’ बाकी आमच्या शहरात सगळं उत्तम चाललंय.

हल्लीच आपल्या सरकारने खूप गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजना राबविली. त्याच्या कितीतरी वर्षे आधीपासून आमच्याकडे जलयुक्त खड्डे आणि खड्डेयुक्त रस्त्यांची योजना कोणताही गाजावाजा न करता सुरू आहे. रस्त्यावरील या खड्डय़ांमुळे काही किरकोळ अपघात होतात. अधूनमधून एखाद्याचा जीवही जातो, पण ते काही फारसं महत्त्वाचं नाहीये. अरे, चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी माणसाची किंमत किती होती? आज काय आहे? आज माणसाला कवडीची किंमत नाही. तरीही आम्ही म्हणतो- महागाई वाढलीय. तर सांगायचा मुद्दा हा की, सरकार रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करते अशातला भाग नाहीये. दरवर्षी हजारो कोटी रुपये रस्त्यांच्या नावाने खर्च केले जातात. आता हे ओपन सीक्रेट आहे की, रस्तेबांधणीच्या कामात ९० टक्केपसा कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांच्या खिशात जातो आणि उरलेल्या दहा टक्के रकमेत स्पीड ब्रेकर बनविले जातात!  मी तर म्हणतो, ज्या मटेरीअलने हे (रस्ते फुटले तरीही न फुटणारे) स्पीड ब्रेकर बनविले जातात त्याच मटेरीअलने आमदार-खासदार बनविले जावेत. पण माझं म्हणणं काळा कुत्रासुद्धा ऐकत नाही. तेवढं सोडलं तर राज्यात बाकी सगळं फस्क्लास आहे.

भारतात उद्योगधंद्यांची परिस्थिती काय आहे ते तू वाचत असशीलच. किंगफिशर, जेटसारख्या विमान कंपन्या बुडाल्या. एअर इंडिया अजून उसन्या पशाच्या ऑक्सिजनवर तग धरून आहे. टेलिकॉम कंपन्या तोटय़ात आहेत. सरकारी मालकीच्या बीएसएनएलकडे तर कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पसा नाहीयेत. मोठमोठे उद्योगपती र्कज बुडवून परदेशी पळताहेत. दरवर्षी बेरोजगारांचा आणि हुतात्म्यांचा आकडा वाढतच आहे. पण व्यावसायिक स्पर्धा आणि जागतिकीकरण म्हटलं की हे सगळं अपरिहार्यच आहे रे! मन्नतवासी शाहरुख खान आणि जन्नतवासी आर. आर. पाटलांनी सांगितलेलंच आहे की, बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं. दोन महिन्यांपूर्वी जेटच्या तिकिटापायी बुडालेले वीस-पंचवीस हजार सोडले तर मला अजून तरी या सर्वाची झळ बसली नाहीये. तेवढं सोडलं तर देशात बाकी सगळं फस्क्लास आहे.

दादू, सारखं सारखं नकारात्मक बोललं, वाचलं, ऐकलं तर आपली कर्कश्श ममतादीदी व्हायला वेळ लागणार नाही. जगात सकारात्मक गोष्टीही खूप आहेत. मात्र, आपल्याला त्या पाहता आल्या पाहिजेत. तुला तर माहीतच आहे- मी कॅल्क्युलेटेड रिस्क घेणारा माणूस आहे. त्यामुळे मोìनग वॉकला जाताना ‘माय नेम इज सदू अँड आय एम् नॉट फुरोगामी’ असं प्रिंट केलेला टी-शर्ट घालून जातो. तर असाच काल मोìनग वॉकला गेलो असताना नाना-नानी पार्कमध्ये एक वयस्क गृहस्थ बसलेले दिसले. त्यांनी हातात छान रंगीत प्रिंटआऊट धरला होता. त्यावर लिहिलं होतं- ‘‘एक सोन्याचा दात सापडला आहे. जिचा कुणाचा असेल तिने समक्ष येऊन, मला स्माइल देऊन ओळख पटवावी आणि दात घेऊन जावे.’’ तुला सांगतो दादू, असे जिंदादिल म्हातारे आणि एकूणच अशी रसिक मंडळी जगातून कमी होत चाललीयेत. बाकी सब फस्क्लास है.

तुझा फस्क्लास मित्र..

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com

First Published on July 21, 2019 12:20 am

Web Title: tapalki article by sabi perera mpg 94
Just Now!
X