कौस्तुभ केळकर- नगरवाला

जिगरी मतर सदाभौ यास..

दादासाहेब गांवकरचा दंडवत.

बाप्पा मोरया सदाभौ..

बाप्पांचं आशीर्वाद तुम्च्या-आम्च्या आन् समद्या देसाच्या आसंच पाठीशी ऱ्हावू द्येत. ईडा पीडा टळो आन् समद्यास्नी चांगली बुद्धी मिळू द्येत.

सदाभौ, तुमी महागाईची आरती गावून ऱ्हायलायत की जनू. भाजीपाला महाग, धनधान्य महाग, प्याट्रोल-डिझल महाग. येवढंच कशाला, सगा दोस्त बी दोन शबुदान्ला महाग झालाया सदाभौ.

खाल मुंडी आन् मोबील धुंडी. सामने आल्येल्या दोस्ताची ईचारपूस कराया बी टाईम गावंना कुनाला. आवं, फेश्टीवल टाईमला घर पाव्हण्यारावळ्यान्नी कसं भरल्यालं पायजेल.आता कुनी बी कुनाकडं जात न्हाई की येत न्हाई. पाव्हणेरावळे ही शिश्टीमच बंद होऊन ऱ्हायलेय सदाभौ. आपला मानूस महाग जालाया. ही महागाई लई डेन्जर. आवं, किती बी जालं तरी बाप्पा पाहुणे आपले. बिझी श्येडूलमदनं टाईम काडून दरसाली भेटाया येतात समद्यास्नी हिथं धरतीवर. पार तिकडनं कैलासावरनं. त्यान्चं स्वोगत कसं ब्येश व्हायला पायजेल. येकदम धूमधडाक्यात. आमी करतु की! डीजे लावतु. ढोल बडवीतु. श्टार्टीगला येक बाप्पांचं गानं.. ‘चिकमोत्यांची माळ’वालं. बस्स. तेवढा भक्तीटाईम मस जाला. मंग हाईच व्होडका आन् पोपट. चालतंय की. मंजी बाप्पांना बी सवय जाली हाई त्येची. पर बाप्पांची बी काय तरी डिमांड आसंलच की न्हाई?

समद्या कार्यकर्त्यांस्नी निदान आरती संपूर्न पाठ पायजेल की न्हाई? अथर्वशीर्ष? मंत्रपुष्पांजली? बरं ऱ्हायलं. निदान कोरसबरूबर नुस्त्या टाळ्या पिटताना मनात भक्तीभाव दाटून यायला पायजेल की न्हाई? ते बी महाग झालंया जनू. कदी येकदा आरती संपून ऱ्हायलीय आन् प्रसाद गावतोय अशी हालत समद्यांची. मनी नाई भाव आन् द्योवा मला पाव! देव बाजारचा भाजीपाला न्हाई रे. द्येव  अशानं पावायचा न्हाई रे. सदाभौ, तुमी बोलून ऱ्हायलेयत ते हन्ड्रेड पर्शेट सच हाई. आपुन समदे भाजीपालाच जनू. कोथमीरवानी. वर नुस्ता फुलोरा. आतमंदी सडक्या काडय़ा.

कष्टाची आरती, बाप्पावर भक्ती आन् अथक परयत्न.. समदंच महाग झालंया. बाप्पांना भक्तलोगांची फिकीर असत्येच सदाभौ. परत्येकाला आपापल्या वकूबापरमानं मेहनतीचा प्रसाद गावतोच. ही मेहनतच समद्यात महाग झालीया सदाभौ. इन्श्टंट फकस्त काफी भ्येटते; बाप्पांचा प्रसाद न्हाई. मेहनतीची महागाई वाढत चालली की जोडीला मंदी येतीच सदाभौ. तवा मंदीच्या नावानं उगा खडं फोडीत बसन्यापरीस ऊटा आन् कामाला लागा. वर्सभर काम करा. श्मार्ट वर्क. गणेश फेश्टीवलला बाप्पा प्रसन्न हुनारच. पटतंय की न्हाई सदाभौ? बाप्पा मोरया.

तुमी तो बाप्पांच्या मूर्तीचा किस्सा सांगून ऱ्हायलाय ना सदाभौ.. आमाला बी आम्चं बप्पामूर्ती आठीवलं की वो. व्हय. समदं गाव बप्पामूर्ती म्हनायचं त्येस्नी. बप्पामूर्ती आमच्याच गावचं. कुंभारवाडय़ात ऱ्हायचं. कलाकाराचं हात तेन्चं. दहावी झालं आन् तिकडं ऱ्हायला ग्येलं. पेणला. तिकडंच गणपतीच्या कारखान्यात कामाला हुते बप्पामूर्ती. बाप्पाचं आशीर्वाद हमेशा त्येन्च्या पाठीशी. पेणला ग्येलं तरी बी शिक्षन थांबीवलं न्हाई. ते चालूच ऱ्हायलं. फुडं ते ममईला जाऊन ऱ्हायले. तिथून पदवी बी गावली. मंग ड्राईंग टीचर म्हनून पेणच्या एका साळंत रुजू जालं. दिनभर साळंत पोरांबरूबर रमायचे. रातच्याला गणपती कारखान्यात लई जीव रमायचा तेन्चा. साळंतली पोरं देवावानी वाटायची त्येन्ला. रातच्याला गणपती कारखान्यात बी समद्य्ो देवच. चौबीस घंटे देवान्ची शेवा घडती म्हून बप्पामूर्ती लई खूष.

पन आम्च्या काकी दमेकरी. पेणची हवा सोसंना. ‘गावाकडंची कोरडी हवा ब्येश राहील त्येन्ला..’ डागदर म्हनाले. म्हून तीस-चाळीस वर्सापूर्वी बप्पामूर्ती गावाकडं मागारी आले. तेन्चा पोरगा दिगंबर माजा शाळागडी. बप्पामूर्ती आमच्या शाळेमंदी ड्राईंग टीचर. जोडीला ईतिहास बी शिकवायचे.

पर गावाकडं गणपती कारखाना कुटं गावायला? जीवाची तगमग हुयाची तेन्ची. नुस्ती घालमेल. गणपती फेश्टीवल आला की बप्पामूर्तीन्च्या बाडीमंदी करंट वाहू लागायचा. तहानभूक लागायची न्हाई त्येन्ला. त्येन्चा चेहरा द्य्ोवावानी तेजाळलेला वाटायचा सदाभौ. एनर्जीचा बदाबदा धबधबा. समद्या गावचे गणपती त्येच घडवून ऱ्हायचे की वो त्ये.

परत्येकाचा गणपती अलग. येकदम डिजायनर गणपती. एका साली म्या म्हन्लं, ईठोबा गनपती हवा आपल्या घरला.. बप्पामूर्तीन्नी काय मूर्ती घडवली सदाभौ! बाप्पा नंबर १!! कमरंवर हात ठेवून खुदक हसनारा गणपती. काळासावळा. डिट्टो ईट्टलावानी. गणेश चतुर्थीच्या दिशी त्येन्च्या घरात समद्यांचे गणपती हारीनं मांडून ठय़ेवल्यालं. एकेक मूर्ती मंजी भक्ती आन् कलाकारीचा ईशवरी नमुना. नुस्तं डोळं भरून बगत ऱ्हावं. नजर हटायची न्हाई. लई लोक येवून शिकून ग्येलं बप्पामूर्तीकडं. तुमास्नी सांगतू सदाभौ, त्येन्नी कदी बी साचा वापरला न्हाई. समद्या मूर्ती सौताच्या हातानं घडवायचं ते. ते म्हनायचे, ‘‘मी काय बी करत न्हाई. तो येतू आन् पायजेल तसं रूप घेतू. माज्या हातान्नी मी फकस्त ते सजवीतो. कर्ता- करविता त्योच.’’ लई लोग शिकले त्येन्च्या हाताखाली.

त्येन्च्या मूर्ती साच्यात ओतून तिकडं नगर साईडला कारखानं काडलं एक-दोगान्नी. बप्पामूर्तीन्ला त्येचा कदीच अफसोस झाला न्हाई. गावकरी वाजतगाजत मूर्ती घरला नेत. मनाला वाटंल तेवडं पकं खिडकीत ठय़ेवून जात. भक्ती हाच भाव जनू. मूर्तीचा भाव क्येलेला त्येन्ला खपायचा न्हाई. मटेरीयलचा खर्च तरी सुटत आसंल की न्हाई देव जाणे. बप्पामूर्ती हमेशा आनंदात ऱ्हायले.

दिगंबरला ही फुकटची शेवा कदीच पटली न्हाई. तो कोपऱ्यामंदी हमेशा मुंडी खाली घालून अभ्यास करून ऱ्हायला. कदी बी हात वल्या मातीत घातले न्हाईत की मूर्ती घडवली न्हाई. मस शिकला. पुन्याला जाऊन ऱ्हायला. मोटा आर्किटेक्ट सायेब झालाय गडी. त्येच्या हातात बी जादू हाय. बप्पामूर्तीन्चा जीव गावाकडंच रमल्येला. दोन वर्सापूर्वी अचानक अ‍ॅटॅक आला तेस्नी. लगोलग दिग्या आला. पुन्याला बडय़ा हास्पीटलमंदी ठय़ेवलं. पन दोन दिसामंदी ख्येळ खल्लास. दिग्याला जाता जाता म्हन्ले, ‘‘अचानक जावं लागतंया. यंदा शेवा घडायची न्हाई. निदान या साली तरी गणपतीच्या टायमाला पंदरा दिस गावकडं ये. मूर्ती घडीव. बापाची आखरी विच्छा पूरी कर.’’

दिग्याचा बापावर भारी जीव. गडी समदं सोडून पंदरा दिस गावाकडं येवून ऱ्हायला. जिंदगीभर कंदी बी मातीत हात घातले न्हाई, पर येकेक मूर्ती अशी ब्येश घडवलीन. येकदम डिट्टो बप्पामूर्तीवानी. गावकरी मूर्ती घेवून ग्येलं. दिग्या रातच्याला माज्या घरी जेवायला हुता. खांदा वला करून मनमोकळा रडला माज्यापाशी.

‘‘बाप कळलाच न्हाई मला. द्योव हुता त्यो. मूर्ती घडवताना हातान्ला काय समादान गावतं ते आत्ता ऊमगलं. देवानंच मूर्ती घडवून घ्येतल्या माज्याकडनं. बापामुळं हा चानस गावला मला. मी पागल. तवा वेव्हार बगीतला बापाच्या अदाकारीत. लई चुकी झाली. बाप जित्ता असतानाच त्येच्यामंदी देव शोधाया पायजेल. खरा देवबप्पा त्योच.’’

सदाभौ, दरसाली पंदरा दिस येनार हाई दिग्या गावाकडं. गावाला नवा बप्पामूर्ती गावलाय जनू. समद्यान्नी आपापल्या कामात द्योव शोधाया पायजेल. बाप्पाची खरी आरती तीच हाई जनू.

बाकी तुम्च्या पुन्या-मुम्बला समदेच शेलीब्रेटी. मान्सं बी आन् द्य्ोव बी. धा-बारा तास लायनीत हुभं करत्यात. देवाच्या पावलावर घडीभर पटकत्यात आन् जावा म्होरं. द्योव डोळं भरून निवांत बगायला बी गावत न्हाई. द्योव द्योवच आसतू सदाभौ. चुकीची शिश्टीम मानसान्नी हुभी केलीया. कामन मॅन आसू दे, न्हाई तर शेलीब्रेटी.. देवापुडं समद्यो सारकेच. गावाकडं वढय़ाकाठी पावन गणेशाचं मंदिर हाई. येक डाव यावा दर्सनाला. छोटंसं मंदिर. समईची मंद ज्योत. आगरबत्तीचा झ्याक सुवास. मंदिराभवती झाडांनी सावली धरल्याली. पक्ष्यांचा किलबिलाट. वढय़ाचं झुळझुळू वाहनारं पानी. झाडी, पक्षी, वढय़ाचं पानी. समदा निसर्ग गणपतीची आरती गावून ऱ्हायलाय जनू. गाभाऱ्यात शिरलं की बाप्पा दिसतू. तुमास्नी बगितलं की बाप्पा प्रसन्न हासल्यावानी वाटतू. बाप्पाचा महिमा काय सांगू सदाभौ? तुमी सौतासाटी मागतच न्हाई काय बी. ‘समद्यास्नी सुखी ठय़ेव.’ बाप्पा खूष. तुमी बी.  खरा भक्तीभाव. तुमी धा घंटे लाईनीत हुभं राहून दर्शन घेयाचं आन् सेल्फीश होवून सौतासाटी कायबाय मागायचं.

‘आरारारा’! येक डाव दुसऱ्यासाटी मागून बगा. बाप्पा पावलाच पायजेल. सौतासाटी येकच मागायचं.. ‘‘अपयश पचवायची ताकद द्यो देवा. मी आखिर तक हिम्मत हारनार न्हाई. तू फकस्त पाठीशी ऱ्हा.’’ सदाभौ, देव पाठीशी हुभा ऱ्हाईल तुम्च्या.. हमेशा हमेशा के लिये.

या साली आम्च्या गावचा गणपती येकदम पेशल हाई बरं का. पंदरा-वीस र्वस झाली.. गावात येकच सार्वजनिक गणपती हाय. कुलकर्नी मास्तरान्ची किरपा हाय ही. तेन्नी आग्रह धरला आन् ‘येक गाव, येक गणपती’ झाला. कुलकर्नी मास्तर थकलं आता. भोईर मास्तर बगतात गणपतीचं आत्ताशा. या साली डेकोरेशन कटाप. जिवंत देखावे. पयली ते दहावी.. ईयत्तावार येक- येक दिस वाटून घेतलाय जनू. दर दिशी येगळा टापीक. पोरान्नी हुभा केलेला जिवंत देखावा, रचलेली गानी आन् श्येवटाला तज्ज्ञ मानसाचं व्याख्यान. कुनी गावातलेच, कुनी शिटीतून बोलावल्यालं. रोजचा दीड घंटय़ाचा कार्यक्रम. पूर्वीच्या काळच्या फेश्टीवलला मेळे आसत, डिट्टो तशेच. स्वच्छता गणेश, आरोग्य गणेश, कृषी गणेश, पर्यटन गणेश, अर्थ गणेश, शिक्षण गणेश, कला गणेश, संगीत गणेश, प्रजातंत्र गणेश आन् शेवटला विज्ञान गणेश. लई ब्येश आयडिया. येगयेगळ्या ईषयाची गावकऱ्यांना डिटेलमंदी माहिती गावली. पोरान्नी बी लई मेहनत क्येली. रोजगाराच्या नव्या आयडिया गावल्या. तज्ज्ञ लोकान्चा गाईडन्स मिळाला. भोईर मास्तर तुस्सी ग्रेट हो! गणपतीचं हे दशावतार लई आवडलं समद्यास्नी. वाचल्यालं पसं मुख्यमंत्री सहायता निधीला देवून टाकलं सरपंचान्नी. पूरग्रस्तांसाटी खारीचा वाटा. सदाभौ, या साली लई झ्याक वाटून ऱ्हायलंया. लई अभिमान वाटून ऱ्हायलाय गावचा. गणेशोत्सवाचं ओंगळ रूप न्हाई आमच्याकडं.  दशावतारच तारून नेतील समद्यास्नी सदाभौ. शेवटी धा दिस मुक्काम केल्यानंतर बाप्पा जानारच. आम्चं डोळं वलं हुनारंच. जाता जाता बाप्पाला येकच प्रॉमीश करायचं.. ‘‘माझ्यातलं मानूसपण हमेशा जित्तं ऱ्हावू द्यो. देवा हो देवा, गणपती देवा.. तुमसे बढकर कौन? तुझी किरपा आम्हावरी सदैव ऱ्हावू दे.’’

बाप्पा गालातल्या गालात हासनारच.

डोळ्यान्नी ‘हो’ म्हननार आनि गावाला निघून जानार.

बाप्पा वसे आम्च्या मनी.

डोन्ट वरी, बी हॅप्पी.

मोरया सदाभौ.

तुम्चा जीवाभावाचा दोस्त..

दादासाहेब गांवकर

kaukenagarwala@gmail.com