धर्म, साधू-महंत म्हटले की भलत्याच तांत्रिकतेचा खेळ मनात डोकावू लागतो. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या कुंभमेळ्याने २१ व्या शतकात प्रवेश केला असला तरी हा खेळ पिच्छा सोडत नाही. यंदाच्या कुंभमेळ्यातही अशा गोष्टी अनुभवास येतीलच. परंतु त्यापेक्षा वेगळ्या ‘तंत्रा’नेही हा कुंभमेळा भारलेला असेल. विविध स्तरांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा इतक्या मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात येत आहे, की त्यास ‘तंत्रज्ञानाचा कुंभ’ असे स्वरूप प्राप्त झाले आहे. सिंहस्थासाठी येणाऱ्या गर्दीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून ते अगदी सफाई कामगारांच्या ‘टॅब’द्वारे छायाचित्र हजेरी घेण्यापर्यंतच्या कामांत हे तंत्रज्ञान वापरले जात आहे. फिरते भ्रमणध्वनी मनोरे, एसटी बसमध्ये ‘कम्युनिटी रेडिओ’, भाविकांच्या मार्गदर्शनार्थ नानाविध ‘मोबाइल अ‍ॅप’, सार्वजनिक ध्वनिवर्धक यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक पडद्यांद्वारे मार्गदर्शनाबरोबरच गुन्हेगारांचा शोध घेण्याची यंत्रणा, पोलीस व आरोग्य विभागाच्या वाहन व्यवस्थापनाकरिता ‘जीपीएस’ यंत्रणा, आपत्काळात संपर्कासाठी उपग्रहाधारित दूरध्वनी.. असे अनेक आधुनिक ‘तंत्र’प्रयोग प्रथमच या कुंभमेळ्यात करण्यात येत आहेत.
वर्षभर चालणाऱ्या या सिंहस्थात सुमारे चार ते पाच कोटी भाविक, पर्यटक व साधू-महंत सहभागी होण्याचा अंदाज आहे. प्रत्येक शाही पर्वणीच्या वेळी नाशिक मध्ये ८० लाख, तर त्र्यंबकेश्वरला ३० लाख भाविक येतील अशी अपेक्षा आहे. गेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचे गालबोट लागले होते. त्यात ३३ जणांचा मृत्यू झाला. अतिशय दाटीवाटीची वस्ती व अरुंद रस्ते असलेल्या भागात गर्दीचे व्यवस्थापन हे मोठेच आव्हान असते. या गर्दीचा समाजविघातक प्रवृत्ती लाभ घेण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनही सावध आहे. संशयास्पद बाबींवर नजर ठेवण्यासाठी गोदाकाठ, कुशावर्त तीर्थ आणि इतर ठिकाणी सुमारे ७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. गर्दी नियंत्रणासाठीही याची मदत होईल. त्याकरिता नाशिक पोलीस आयुक्तालय व त्र्यंबक येथे खास नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाले आहेत. या सुविधेद्वारे स्नानासाठी आलेल्या गर्दीचा अंदाज करता येईल. गरज भासल्यास व्यवस्थेत त्यानुसार तात्काळ काही बदलही करता येतील.
देशविदेशातून येणारे भाविक व पर्यटक नाशिक-त्र्यंबकेश्वरसंबंधी अनभिज्ञ असतील. परंतु गावच्या वेशीवर येण्याआधीच व वेस ओलांडल्यावरही तंत्राविष्कारयुक्त कुंभक्षेत्र त्यांना परिचित होण्यास अवधी लागणार नाही. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक युवकांनी स्वयंस्फूर्तीने सिंहस्थाशी निगडित ‘मोबाइल अ‍ॅप्स’चा जणू मेळाच भरवला आहे.

सोयीसुविधा, निवासव्यवस्था, पुरोहितांची माहिती, जिभेचे चोचले पुरविणारी ठिकाणे, घाटावर स्नानास कसे जाता येईल, साधुग्राममधील दैनंदिन कार्यक्रम, महत्त्वपूर्ण फोन क्रमांक, रेल्वे-बस वेळापत्रक, आरोग्यसेवा आदींचा अंतर्भाव असलेल्या ‘अन्नदान, रेन्ट माय होम, ऑल शॉप ऑनलाइन, नाशिक सिटी कनेक्ट, नाशिक हब’ आदी अ‍ॅप्सचा सुकाळ आहे. हे विनामूल्य अ‍ॅप्स म्हणजे सिंहस्थातील आधुनिक वाटाडेच. प्रशासन व महापालिकेचे कुंभ अ‍ॅप शहरासह ३०० एकर क्षेत्रांत वसलेल्या साधुग्राममध्ये भ्रमंती करण्यास उपयुक्त ठरतील. सिंहस्थासाठीचे खास संकेतस्थळ व समाजमाध्यमांवर सिंहस्थाच्या माहितीचा महापूर आहे.
पर्वणीकाळात भाविकांना शहरात वाहने आणण्यास प्रतिबंध आहे. शहराच्या हद्दीलगत उभारलेल्या वाहनतळाहून शहरात भाविकांची ने-आण करण्यासाठी तीन हजार बसेसचा ताफा सज्ज आहे. साधारणत: सहा ते सात कि. मी.च्या या बसप्रवासात कम्युनिटी रेडिओद्वारे भाविकांशी संवाद साधला जाईल. बसमध्ये नाशिकची माहिती, प्राचीन मंदिरे, स्नानासाठीची व्यवस्था, कुठे काही अनुचित घटना घडल्यास त्यासंदर्भातील पूर्वसूचना आदींची माहिती देण्याचे नियोजन केले गेले आहे. बसमधून उतरल्यावरही मार्गदर्शन व सूचनांची जबाबदारी सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणेला दिली गेली आहे. त्यासाठी तब्बल पावणेतीन हजार ध्वनिप्रक्षेपकांचे जाळे तयार करण्यात आले आहे.
नाशिकचे रामकुंड व त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ या ठिकाणी स्नानासाठीची गर्दी रोखण्यासाठी यंदा दहा नवे घाट बांधण्यात आले आहेत. वेगवेगळ्या महामार्गावरून आलेल्या भाविकांना कोणत्या घाटावर न्यायचे, याचे नियोजन केले गेले आहे. भाविक मार्ग व घाट परिसरात ३५ ते ४० एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारे रामकुंडात होणाऱ्या साधू-महंतांच्या शाही स्नानाचे थेट प्रक्षेपण कुठूनही पाहता येईल. या सुविधेद्वारे आवश्यक ती माहितीही दिली जाईल. सिंहस्थातील गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्या गुन्हेगारांची छायाचित्रेही त्यावरून प्रदर्शित केली जातील.
सिंहस्थात सार्वजनिक स्वच्छतेसाठी साडेपाच हजार सफाई कामगारांचा ताफा सज्ज असणार आहे. त्यांच्या कामावर महापालिकेची खास संगणकीय प्रणाली लक्ष ठेवेल. या कामगारांची ‘टॅब’द्वारे हजेरी घेतली जाईल. या प्रणालीत प्रत्येकाचे छायाचित्र, नाव, पत्ता, काम करण्याचे ठिकाण समाविष्ट असेल. त्यामुळे कोणताही कामगार नेमलेल्या ठिकाणी आहे किंवा नाही, त्याने कुणाला बदली तर पाठवले नाही ना, हे यातून उघड होईल. या काळात संपर्क व्यवस्थेवर येणारा प्रचंड ताण हे आणखी एक मोठे आव्हान. एकाच वेळी लाखो लोकांकडून भ्रमणध्वनीचा वापर झाल्यास ही व्यवस्था कोलमडू शकेल, याचाही गांभीर्याने विचार झाला आहे. मनोरे नसल्याने भ्रमणध्वनीच्या वापरास जिथे मर्यादा येतील अशी ३१ ठिकाणे शोधून तेथे तात्पुरत्या स्वरूपाचे फिरते भ्रमणध्वनी मनोरे उभारण्यात आले आहेत. एका वाहनावर चार-पाच कंपन्यांच्या संयुक्त मनोऱ्यांद्वारे ही व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस व लष्कराकडून वापरली जाणारी बिनतारी संदेशवहन यंत्रणा सर्वाधिक विश्वासार्ह मानली जाते. भ्रमणध्वनी यंत्रणा कोलमडल्यास या पर्यायावर भिस्त राहील. तिच्या वेगवेगळ्या १९ स्तरांवरील वापरासाठी पोलिसांनी सखोल नियोजन केले आहे. पर्वणीकाळात ७५० हून अधिक वॉकीटॉकी सेट्सचा वापर होईल. यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यासाठी यापैकी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या पथकाने उपग्रहाधारित दूरध्वनी दिमतीस ठेवले आहेत.
गोदाकाठाच्या सभोवताली तीन कि. मी. परिघात प्रत्येक पर्वणीला अलोट गर्दी होणार असल्याने पोलीस, अग्निशमन व आरोग्य विभागाची कसोटी लागणार आहे. या तिन्ही यंत्रणांची हजारो वाहने गोदाकाठ परिसरात सक्रीय राहतील. ती कोणत्या भागात आहेत, याचे अवलोकन करण्यासाठी त्यावर जीपीएस ट्रॅकर यंत्रणा बसवण्यात आली आहे. आपत्काळी निकटच्या वाहनांना जलदगतीने घटनास्थळी रवाना करणे त्यामुळे शक्य होईल. लष्करी पथकही साधुग्राममध्ये तैनात करण्यात आले आहे. गरज भासल्यास आपद्ग्रस्तांना लष्करी हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी नेले जाईल. प्रसंगी हवाई रुग्णवाहिकेचाही वापर करण्यात येईल.
ज्या गोदावरी नदीत लाखो भाविक पवित्र स्नानाचा योग साधणार आहेत, ती गोदावरी पर्वणीकाळात पुराच्या वेढय़ात सापडू नये म्हणूनही अभ्यास करण्यात आला आहे. गोदावरी खोऱ्यातील पूर-पूर्वानुमानासाठी पाटबंधारे विभागाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. धरणातील जलसाठय़ाबरोबरच गोदावरीसह अन्य नद्यांमधून वाहणाऱ्या पाण्याची पातळी दर १५ ते ३० मिनिटांनी उपलब्ध होईल. गोदावरी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात आधीच स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा कार्यान्वित असल्याने गोदावरीतील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होईल. सिंहस्थाच्या एकूणच नियोजनात अत्याधुनिक तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. त्यामुळे पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा संगम या सिंहस्थात पाहावयास मिळेल.
अनिकेत साठे -aniket.sathe@expressindia.com