News Flash

अफसाना लिख रही हूँ.. : ‘तेरे बिना जिया जाये ना’

एकमेकांना खुलवत, सुखावत, स्वत:चं घर नसूनही आनंदात दिवस जात असतात. अशा मोरपंखी दिवसांमधलं हे गाणं.

(संग्रहित छायाचित्र)

मृदुला दाढे- जोशी

mrudulasjoshi@gmail.com

एकमेकांना खुलवत, सुखावत, स्वत:चं घर नसूनही आनंदात दिवस जात असतात. अशा मोरपंखी दिवसांमधलं हे गाणं. ‘तेरे बिना जिया जाये ना..’ आरती आणि विकास सिनेमाला जायचं ठरवतात, पण तो हाउसफुल असतो. मग फुरंगटलेल्या आरतीला घेऊन चौपाटीवर भटकणं. उगीच वात्रटपणे तिथे बसलेल्या जोडप्यांना न्याहाळणं. अशात twelve string गिटारचा मस्त पीस अशा चनीत येतो की माहोल एकदम romantic बनतो. पंचमकडे प्रत्येक वाद्य वेगळं ऐकू येतं. म्हणजे, प्रत्येक वाद्य त्याच्या नेहमीच्या टोनपेक्षा वेगळ्या रंगात आणि स्वच्छ ऐकू येतं. या गिटारनंतर व्हायोलिनचा पीस, त्या समेवरच आरती-विकासचं दचकणं आणि मग येतो ‘तो’ जगप्रसिद्ध गिटार-मादल पीस. गिटारच्या chords प्रमाणे स्वरात जुळवलेले वेगवेगळ्या स्वरांचे मादल. (मादल : एक छोटं तालवाद्य). हे भन्नाट Combination पुन: पुन्हा ऐकावं, त्या प्रत्येक स्ट्रोकनिशी. विकासचे फोटो पत्त्यांसारखे ठेवत जाणारी आरती दिसते.. तिच्या हालचालींना एक लय आहे. गाण्याला मुळात अशा उंचीवरच सुरुवात झाली, की नंतरचा प्रवास त्या उंचीच्याही वर जाणार याची चाहूल लागतेच. पंचमच्या ऐन भरातल्या ज्या चाली स्तिमित करतात त्यापैकी ही एक. पंचमदांना गाणं कसं ‘दिसत’ असेल याचं मला नेहमी आश्चर्य वाटतं. एखाद्या गाण्याचा ग्राफ त्यांना आधी कसा जाणवत असेल? म्हणजे एक पट्टी, एक सप्तक याच्या पल्याड विचार करणारा, गाण्यातल्या कॉर्डसनासुद्धा एक भूमिका देणारा हा संगीतकार. शब्दांना दिलेली चाल कॉर्डच्या आधारावर कशी खुलणार आहे, त्याचा अंतिम टोन, रंग कसा असेल हे आधी ओळखण्याची नजर पंचमदांना होती. त्यामुळे त्यांच्या मनात गाणं सगळ्या सजावटीसहितच आधी वाजायला लागत असावं. असं का? याला उत्तर नाही. मनोव्यापारांना बंधन आहे का? मग स्वरतर्काला कसं असेल? पंचमच्या अनेक गाण्याला अगदी नावापुरता M1 म्हणजेच पहिल्या अंतऱ्याचा पीस असतो. इथेही तसाच आहे. पण चमत्कार पुढेच आहे. गाणं चक्क पट्टी बदलतं.. आधी ‘जी’ (G) स्वरात असलेलं गाणं अलगदपणे ‘ए’ (A) स्वरावर जातं. अंतऱ्याच्या पहिल्या तीन ओळी त्या पट्टीत गायल्यावर ‘रहा जाये ना’ ही ओळ मूळ पट्टीत (G स्वरावर) येते.. तिथे जाण्यासाठी कसलाही दृश्य आधार नाही. त्या अवकाशात मारलेली आंधळी उडी आहे ती.. (अर्थात ती आपल्याला ‘आंधळी’ वाटते. पंचमदांच्या डोक्यातला तिचा ग्राफ व्यवस्थित रचलेला आहे, ती ‘उडी’ सुखरूप खाली उतरते.) नवख्या गायिकेचा ‘सा’ हरवण्याची १०० टक्के शक्यता आहे, पण सुखरूपरीत्या मूळ स्वरावर येऊनही धाकधूक वाटत राहते की, ‘गल्ली चुकलो’ नाही ना आपण?

‘जब भी ख्यालों में तू आये,

मेरे बदन से खुशबू आये,

महके बदन में रहा ना जाये!’ काय असेल ही अवस्था? या विचारांनीच अंगांग दरवळून जावं. एक चंदनी झुळूक रक्त सुगंधित करून जावी आणि ती जाणीव आतून पुन: पुन्हा व्हावी. त्या स्वत:च्या प्रमाथी गंधानंही धुंदावून जावं. ते सुखही सहन होऊ नये. त्याच्या आठवणींची अत्तरकुपी फुटून रक्त बनून वाहतेय जणू! या अवस्थेतून बाहेरही यायचं नाहीये, पण त्यात राहताही येत नाही. काय स्थिती असेल ही? ‘खुशबू’ शब्दावरची जागा इवल्याशा मात्रेत कशी मावेल? असले प्रश्न सम्राज्ञीला पडत नसतात. ‘महके बदन में’ या ओळीला लताबाई आवाज किंचित बदलतात. आणि खालच्या ‘रहा जाये ना’ वर तर कहर लाडिक कबुली आहे. पडद्यावर रेखा, पार्श्वभूमीवर लताबाईंचा आवाज म्हणजे दोन लखलखती तेजस्वी नक्षत्र! अक्षरश: एखाद्याच्या अस्तित्वाचाच  प्रकाश पडतो, हे जर खरं असलं तर ते याच गाण्यात जाणवतं.. लतादीदींच्या आवाजाचा लख्ख उजेड पडतो.. असा झगझगीत आवाज लागलाय त्यांचा की रेखाच्या सौंदर्याची ती मादक आणि भेदक धार त्या आवाजाच्या लगावात संपूर्णपणे उतरते. काळीज काढून द्यावंसं वाटतं त्या क्षणी..

पंचमदा दुसऱ्या अंतऱ्याचे पीसेस (M2) मात्र अतिशय तब्येतीत ठेवत असत, तसा याही गाण्यात अतिशय  सुंदर, सतार आणि गिटार यांच्या मस्त combination चा विस्तृत पीस आहे..

‘रेशमी रातें रोज न होंगी

ये सौगातें रोज न होंगी

जिन्दगी तुझ बिन रास न आये..’

कदाचित विद्रूप भविष्यच बोललं का तिच्या तोंडून? या रेशमी रात्रींना ग्रहण लागणार आहे का? एकमेकांचे प्रियकर-प्रेयसी असलेले, एकमेकांत अखंड बुडालेले जीव.. त्यांच्यात आपण आता गुंतलोय! आरती जरा चंचल, अल्लड आहे हेही आपल्याला समजलंय. गाण्यात शेवटी किशोरकुमारच्या आवाजातल्या ‘तेरे बिना’ या ओळी फार गोड. एखाद्या लाडोबाला आंजारून गोंजारून जवळ घ्यावं, तसाच भाव आहे त्या आवाजात. आणि पडद्यावर विनोद मेहरा.. या वेडीला जवळ घेणारा.. डोक्यावरून हात फिरवणारा.. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आणि किशोरचा आवाज.. किती एकरूप होतात!

आणि.. या टप्प्यावर तो भयंकर प्रसंग घडतो. आरतीचा सिनेमाचा हट्ट, रात्री सिनेमा बघून परत येताना गुंडांनी अचानक आरतीचं अपहरण करून तिच्यावर केलेला बलात्कार. विकास असहाय्य.. जखमी, बेशुद्ध.. एका रात्रीत सगळं बदलतं. उद्ध्वस्त होतं. विकास सावरतो, आरतीला सावरू पाहतो. आरती घरी येते, पण मनावर असंख्य व्रण घेऊन.. धास्तावलेली, कोसळलेली.. अगदी दोघांच्यातल्या नाजूक क्षणीही ती पुन्हा तोच भयानक क्षण जगते. नको नको असताना! आरतीच्या मनात एकच आक्रोश आहे.. मनाचा गाभा तुझ्यासाठी. शरीराचा कण अन् कण तुझाच. खरं तर त्यावर खुद्द माझीच जिथे सत्ता नाही, तिथे दुसरा कुणी नजरेची तिरीप तरी टाकू धजेल का? इतकं हे नाजूक अस्तित्व केवळ तुझंच असताना त्याच्या चिंध्या होताना मी स्वत: बघितल्या! माझ्या त्या अस्पर्श क्षणांना ग्रहण लागलं. माझ्या कुपीतल्या मोत्याच्या ठिकऱ्या झाल्या! जे केवळ तुझ्यामाझ्यात फुललं, अनुभवलं, स्पर्शलं, ते लांडग्यांनी कुरतडलं.. मग काय राहिलं माझ्याजवळ? ‘ते’ क्षण, ‘तो’ स्पर्श, तुझ्या माझ्यातली ‘ती’ असोशी पुन्हा झळाळेल? पुन्हा हे माझं कोसळलेलं ‘घर’ उभं राहील?

पण विकास खूप वेगळा आहे. त्याला आरती हवीय, पूर्वीची रसरशीत, उत्साही! ‘त्या’ आरतीला जागवणारं, तिच्या मनातल्या विझलेल्या अनुरागाच्या ठिणग्यांवरची साठलेली राख फुंकरीने बाजूला सारणारं हे गाणं.

‘फिर वही रात है रात है ख्वाब की

रात भर ख्वाब में देखा करेंगे तुम्हें’- सुरुवातीच्या गुणगुणण्यातून हळूच गाणं उमलतं. ‘फिर वही रात है’ हे शब्द किती प्रकारे वेगवेगळ्या चालीत येतात! हळूच, ‘सब ठीक हो जायेगा’ असंही तो सांगून जातो. यातला ‘वही’ शब्द हजारो अर्थ छटा घेऊन येतो, वाटतो तेवढा तो साधा नाही.’’  ‘तीच’ अनाघ्रात रात्र आहे ही. मध्ये काहीच घडलं नाही. आरती, सगळं तस्संच आहे बघ.. तीच असोशी.. एकमेकांबद्दल तीच ओढ, डोळ्यातला प्रणय तोच.. तेच अथांग बुडून जाणं.. काहीही फरक पडलेला नाही आपल्या या नात्यात. आपल्या या फक्त दोघांच्या जगात..

आरतीला अक्षरश: थोपटून झोपवणारा, पांघरूण घालणारा विनोद मेहरा अंतर्बा देखणा वाटतो.. ही भूमिका त्याला नेमकी आकळलीय हे त्याच्या त्या डोळ्यांत बघताना जाणवतं. त्याच्या स्पर्शात ती काळजी आहे. शरीरापलीकडे जाणारं प्रेम आहे. त्याच्याही प्रेमाची कसोटी आहे ही!

‘मासूम सी नींद में, जब कोई सपना चले.

हम को बुला लेना तुम, पलकों के पर्दे तले’- जी स्वप्नं बघायची ती दोघांनी! आरतीचे टक्क जागे डोळे बघून तो म्हणतो, कांच के ख्वाब है आंखो में चुभ जायेंगे! पलको में लेना इन्हे आंखो में रुक जायेंगे.. नको त्या नाजूक डोळ्यात ही काचेची क्षणभंगुर स्वप्नं सांभाळूस. पापण्यांवरच थोपव त्यांना. आरतीच्या डोळ्यातल्या प्रत्येक शंकेला विकासकडे स्पर्शातून, नजरेतून उत्तर आहे. त्या संयमाला आणखी हळवं करणारा किशोरदांचा आवाज ‘फिर’ शब्दावर किती कमालीचा उत्कट होतो! काय विलक्षण प्रणय आहे हा.. फार फार परिपक्व! एकीकडे ती कुठल्या धक्क्यातून बाहेर आलीय हेही विसरून चालणार नाहीये. स्वत:ला झालेल्या यातनाही आतल्या आत जिरवायच्या आहेत आणि पुन्हा आधी होतं तसं जिवंत, निरागस आयुष्य तिच्याबरोबर जगायचंय. आरतीच्या जखमांना विकासच्या स्पर्शाशिवाय दुसरं कुठलंही औषध नाही. किशोरदांचा आवाज यात हेच करतो नेमकं. तो आवाजच विकासचा स्पर्श बनून येतो, तितका एकरूप होतो. किती प्रकारची romantic  गाणी असतात! प्रेयसीचा अनुनय करणारं गाणं असतं. प्रणय फुलवणारं गाणं असतं. विरहवेदना व्यक्त करणारं गाणं असतं, पण हे गाणं या सगळ्याहून वेगळं.. स्वत: होरपळून निघताना आपल्या सखीला झळा लागू नयेत म्हणून तिच्यावर स्वत:च्या प्राणांची सावली करणारं.

आरती त्या धक्क्यातून लवकर बाहेर येत नाही. विकास आपल्याला समजून घेण्याचं नाटक करतोय असंही तिला वाटत राहतं. पुन्हा ते दिवस कधी येणारच नाहीत, फुटकी काच कधी सांधणारच नाही असं वाटून ती घर सोडते. तिला शोधत विकास वेडय़ासारखा धावत जातो. हताश होतो, पण एका क्षणी ती त्याला ‘भेटते.’ जास्त आवेगाने! सगळी किल्मिषं निघून गेलेली असतात. ‘घर’ पुन्हा उभं राहतं. असल्या आघातांनी कोसळायला ते काय वाळूचं घर होतं? ते सजलं होतं सुंदर क्षणांनी. एकमेकांवर असलेलं तुफान प्रेम हाच त्याचा पाया होता. क्षणभर एक आघात आला आणि गेला. नातं कायम राहिलं. ‘ते’ क्षण पुन्हा उजळून निघाले..

‘हाथ छूटें भी तो रिश्ते नहीं छोडा करते

वक्त की शाख से लम्हें नहीं तोडा करते’

(उत्तरार्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 4:05 am

Web Title: tere bina jiya jaye na lokrang afsana likh rahi hoon article abn 97
Next Stories
1 शत्रूवरदेखील संकट येऊ  नये, पण..
2 साहिर..
3 अधुऱ्या स्वप्नांचा जादूगार