01 October 2020

News Flash

विशी..तिशी..चाळिशी.. : ग्वाही!

मराठी घरांमध्ये आणि कंपूंमध्ये माझ्या सदरातल्या पात्रांची नावे सहज गप्पांमध्ये येताना मी ऐकतो, बघतो आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. आशुतोष जावडेकर

सदराचा शेवटचा लेख सुरू करण्याआधी तुम्हा सर्व वाचकांचे मनापासून आभार. मराठी घरांमध्ये आणि कंपूंमध्ये माझ्या सदरातल्या पात्रांची नावे सहज गप्पांमध्ये येताना मी ऐकतो, बघतो आहे. तुम्ही वाचक मित्र-मत्रिणी माझ्यासोबत होता म्हणूनच हे घडत गेलं आहे. आणि पुढेही हे सदर संपलं तरी तुम्ही माझ्यासोबत असाल! अरिन, माही आणि तेजससारखा आपलाही लेखक-वाचक मित्र असा एक ग्रुप आहेच.

आणि आता हा शेवटचा लेख!

माद्रिदमध्ये रस्त्याकडेला असलेल्या कॅफेच्या आतमध्ये उबदार हवेत माही येऊन बसली होती तरी थंडी तिचा पाठलाग करत जणू आत आली! काही काळ तिने हातमोजे तसेच ठेवले आणि मग अंगात हळूहळू कॉफी पिताना उब साठत गेली तशी तिने डोक्यावरची टोपी काढली. गळ्याभोवती गच्च बांधलेला मफलर सल केला आणि हातमोजे अखेर काढले. कॅफेमध्ये फार गर्दी नव्हती. छोटंसंच ठिकाण होतं, पण युरोपियन दृश्यजाणिवेनं पुरेपूर भरलेलं असं. छोटय़ा कुंडय़ा, खिडकीमधले व्हास आणि फुलं, काचेच्या तावदानावर चिकटलेले ख्रिसमसचे तारे, समोरच्या सुरेख काउंटरमागे कॉफी मशीन आणि अनेक मद्यांच्या सुबक बाटल्या.. उजळवेल, पण दिपवणार नाही असा गाळीव प्रकाश. धीरजला हनिमूनमध्येही दोन दिवस कंपनीचं काम करायला लागणार होतंच. माही आणि तो एकाच ऑफिसमध्ये असल्याने सहकारी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत असताना, ते दोघे स्पेनला हनिमूनला जाणार हे कळल्यावर त्यांच्या बॉसने मिठ्ठास पंजाबीयुक्त हिंदी बोलत तिथली एक क्लाएन्ट मीटिंग धीरजच्या गळ्यात मारली. बदल्यात त्याने दोघांसाठी एक दिवसाकरता भारी हॉटेलमधला हनिमून स्वीट कंपनीतर्फे बुक केला म्हणा! माही आणि धीरज एक क्षण वैतागले, पण सध्याचा स्पर्धेचा काळ त्यांना पूर्ण अवगत होता. मघाशीच धीरज त्या मीटिंगसाठी गेलेला आणि माही एक दिवसापुरती सोलो ट्रॅव्हलर झालेली. काही काळ ती भटकली मेट्रोने आणि पायीदेखील.. पण नंतर चार डिग्री तापमानात तिला अधिक फिरवेना. अमेरिकेत फिरायची की ती बिनधास्त थंडीत.. मग इथेच काय झालं आहे? शरीर लग्नानंतर वेगळं वागतं का? बोलतं का? शारीरिक जवळीक तिला आणि धीरजलाही नवखी नव्हती, पण लग्नानंतरचा प्रणय त्यांना फार अधिक आत्मीय वाटला होता यात शंकाच नाही.

माही कॅफेमध्ये बसून मोबाइलवरचे फोटो बघू लागली. हा लग्नाच्या आदल्या दिवशीचा- तिच्या घरचा. गीतामावशी रुखवत करत बसलेली. खरं तर लग्न ठरवून अगदी साधं, जवळच्या मोजक्या शंभर लोकांना बोलावून माहीच्या फार्महाऊसवरच होणार होतं. विधीही मोजकेच होते. कन्यादान वगैरे नव्हतंच. रुखवत खरं नसतं तरी चाललं असतं, पण गीतामावशीचा उत्साह आणि तयारी! आत्ता तो फोटो बघताना माहीला गीतामावशीची कडकडून आठवण आली. पुढच्या फोटोमध्ये अस्मितची बायको तिच्या गळ्यात हात टाकून होती. तिने तो फोटो छान फिल्टर केला आणि तिला पाठवून दिला. हे नातं तिला जाणीवपूर्वक सांभाळायचं होतं. रेळेकाकांचा अमेरिकेतून आलेला शुभेच्छा मेसेज मधेच तिने वाचला आणि पुन्हा ती फोटोंकडे वळली. दोन्ही हातांवर ती आनंदाने मेहंदी काढून घेत असताना अस्मित आणि अरिन मागून तिच्या डोक्याला शेंडय़ा लावत होते- असा पुढचा फोटो पाहून माहीला खदखदून हसायला आलं. अस्मितने खूप मदत केलेली लग्नात. काही न बोलता, फार काही न सांगता. माही जेव्हा लग्नानंतर गाडीत बसून निघत होती तेव्हा रडणारी आई, हललेले बाबा, भारावलेली गीतामावशी, पाणावल्या डोळ्यांचा अरिन आणि हरवलेला, पण आनंदलेला तेजस या सगळ्यांचा निरोप तिने त्यांना मिठीत सामावून घेतलाच, पण दूर मागे उभ्या असलेल्या अस्मितला तिने मुद्दाम बोलावून जवळ घेतलेलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. पण ती रडत नव्हती. मागे धीरज होता आणि त्याचा तिच्या हातातला हात फार घट्ट, आश्वासक होता!

तेवढय़ात तेजसचा फोन वाजत होता व्हॉट्सअ‍ॅपवर. ‘‘माही, कशी आहेस? पोचलात ना नीट? तू ओके आहेस ना? मी मिस करतोय तुला. पण मला तुझं लग्न झाल्याचा आनंदही खूप झालाय. परत आलात की तू आणि धीरज पहिले माझ्या घरी कॉफीला या.’’

तेजसला ती म्हणाली, ‘‘ऐक ना, कट कर हा फोन. मी व्हिडीओ कॉल करते.’’ मग तिने व्हिडीओ कॉल लावून म्हटलं, ‘‘हे बघ, इथे कॉफी पिते आहे आत्ता.’’ तेजस ते कॉफी हाऊस आणि तिचा चेहरा निरखत गेला. ती तेजसचा चेहरा निरखत गेली. माहीला एकदम वाटलं, ‘त्वमेव बंधू सखा त्वमेव’ हे नातं असं असेल काय? तेजस तिचा सखा आणि भाऊ दोन्हीदेखील- न सांगता, न बोलता, न गाजावाजा करता झाला होता काय? आणि अरिन? त्याला काय म्हणायचं? धाकटा भाऊ आणि सखा? नाही नाही. तो मित्रच! जवळचा, विशीचा उमदा, उत्साही, जिवलग मित्र! मग तिने पुढचा एक फोटो भर्रकन् काढून बघितला. अरिनने तिचा मेहंदी लावलेला हात त्याच्या हातात अलगद घेतलाय आणि तो मेहंदी न्याहाळतो आहे. मागे त्याची मत्रीण आहे इरा- तीही बसली आहे. माही आणि अरिनचं नातं कुतूहलाने बघत.. अरिन! इथे माद्रिदमध्ये तो तिला तसाही आठवलाच असता. एकदाच ती रिकीच्या आठवणीने फुटलेली अरिनसोबत गप्पा मारताना. पुढे दुसऱ्या कुणाला ते कधीच कळलं नाही. तेजसलाही नाही! रिकीच्या आठवणीने वेडंपिसं होऊन रडावं अशी ती रडली आणि वयाने लहान असलेल्या अरिनने तिला मिठीत घेऊन पाब्लो नेरुदा या त्याच्या लाडक्या स्पॅनिश कवीची ओळ ऐकवलेली. तिला ती ओळ आणि तो प्रसंग आत्ता एकदम आठवला. ‘‘Let us forget with generosity those who can not love us…’’ पाब्लो किती सुजाण बोलत होता. ती त्याला शरण गेलेली आणि मग रिकीला तिने अखेर क्षमाशील बनत मोकळं केलं. ते करताना तीही मोकळी झालेली. पुढे धीरज भेटला हा योगायोग. पण ती मोकळी झालेली नसती मनानं, तर धीरज तिचा झालाच नसता. तिने अरिनला मेसेज केला- ‘‘अऱ्या, इथे माद्रिदला तू आलास तर तुझं इन्स्टा भरून जाईल फोटोंनी. तुला आवडतं तसं सगळं इथे आहे. आणि स्पॅनिश पोरीही देखण्या आहेतच कमालीच्या!’’ मग एक स्माइली टाकत तिने मेसेज पाठवला. ब्लू टिक व्हायची वाट पाहिली, पण झाली नाही. अरिन कॉलेजमध्ये असणार.. त्याची स्वप्नं, भविष्य बघत. लग्न झाल्यावर माही गाडीतून गेली तेव्हा नंतर तो फुटला होता. तेजसने त्याला जवळ घेतलं तेव्हा तो त्याला अलगद म्हणाला, ‘‘तेजसदा, अरे, माहीच्या नुसतं जाण्याचं दु:ख नाहीये हे.. एक फेज संपली. आपला ग्रुपही राहील पुढे. पण जग पुढे गेलं यार. मलाही आता आधी जी. आर. ई. परीक्षेचा क्लास लावायला हवा!’’

तेजस त्याला घेऊन जवळच्या पानाच्या टपरीवर गेलेला आणि काही न बोलता सिगरेटचा झुरका घेत उभा राहिलेला. अरिन म्हणत होता त्यात तथ्य होतंच. एक अद्भुत असं मत्र त्या तिघांचं जुळलं होतं आणि ते खरंच आश्चर्यजनक होतं. त्या तिघांच्या वयात फरक होता. तिघांचं जग वेगळं होतं; पण त्यांना बांधून घेत गेलेलं जणू कोणीतरी पूर्वसंचितासारखं. आता ते मत्र संपणार नाही, पण पुढे जाणार. त्या मत्रीला टिकायचं असेल तर स्वत:मध्ये बदल करायला लागणार. आधीच्या पडछाया घेऊन ते मत्र जिवंत राहणार नाही! बघता बघता ‘विशी.. तिशी.. चाळिशी’ ग्रुप दहा वर्षांत ‘तिशी.. चाळिशी.. पन्नाशी’चा होईल. तो तसा व्हायला हवा असेल तर मत्रीचे सगळे ऋतू त्यांनी निष्ठेने भोगायला हवेत! आता हिवाळ्यात सगळं कसं बर्फाखाली झाकलं जाणार आहे.

माही तशीच बसून राहिलेली. धीरजचं सोबत असणं- तिला आत्ता तो समोर नसला तरीही जाणवत होतं. तिने त्याला एक चुंबन चिन्ह पाठवून दिलं. आणि मग थेट ‘विशी.. तिशी.. चाळिशी’ ग्रुपवर मेसेज टाकत तिने तेजस आणि अरिनला उद्देशून लिहिलं, ‘‘दोस्तांनो, लग्नाच्या आधी आणि खुद्द लग्नाच्या दिवशी तुम्ही दोघांनी इतकी साथ दिलीत. अगदी मोजक्या लोकांना बोलवायचा निर्णय धीरजच्या आणि माझ्याही वडिलांना फारसा मनापासून आवडला नव्हता. पण तुम्ही एकेकाने शंभर शंभर पाहुण्यांची साथ जणू लग्नात दिलीत. किती कामं केलीत! धीरज मला माळ घालणार तेवढय़ात तुम्ही दोघांनी मला केवढं वर उंचावलंत! जणू काही तुम्ही धीरजची परीक्षाच घेत होतात! आणि मग मी हार घातला तेव्हा मागे पाहिलं नाही, कारण मला पुढे जायचं होतं! पण तुमचे चेहरे तेव्हा कसे असतील ते मला पक्कं दिसलं, आत्ताही दिसत आहे. ‘थँक यू’ असं म्हणत नाही. पण सदा माझ्या आयुष्यात राहा. आणि मीही आहेच.’’

ब्लू टिक झाल्या! क्षणभर कुणी काहीच टाईप केलं नाही. असं सहसा कधी ग्रुपवर होत नसे. पटापट सगळे कुरघोडी करत टाईप करत असत. मग सवडीने तेजसचा हसरा चेहरा चिन्हातून उमटला. त्याने लिहिलं, ‘‘मत्रीचे ऋतू बदलत गेले तरी आपण असूच सोबत.’’ अरिन काहीतरी टाईप करत, खोडत होता. मग अखेर त्याचं वाक्य पडलं.. ‘‘माही, मज्जा कर तिथे. धीरजला थकव!’’आणि मग ग्रुपवर वाह्यत हसरी चिन्हं पडली. पण शेवटी अरिनने लिहिलं, ‘‘आणि माद्रिदमध्ये पाब्लो नेरुदा असू दे सोबत. You can cut all the flowers, but you can not keep spring from coming.’’

तिघंही शांत राहिले. सर्व फुलं निर्दयपणे तोडली तरी वसंताचं आगमन नियती रोखू शकणार नसतेच. मग तेजसने लिहिलं, ‘‘लव्ह यू ऑल!’’ शांतपणे हृदयचिन्हे स्क्रीनवर अलगद बर्फतुषार पडावेत तशी पडत राहिली. कॅफेमध्ये सजवलेलं माहीच्या टेबलासमोरचं ख्रिसमसचं झाड पुन्हा नवा, वेगळा, अधिक प्रगल्भ बहर येण्याची ग्वाही देत राहिलं!

ashudentist@gmail.com

(समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2019 4:18 am

Web Title: testimony vishi tishi chalishi dr ashutosh javadekar article abn 97
Next Stories
1 बहुआयामी संमेलनाध्यक्ष
2 परिवर्तनवादी चळवळींचा जैविक संबंधी!
3 सिंधू संस्कृती आणि आर्याचा समग्र माग
Just Now!
X