News Flash

चवीचवीने… : धावीर बाबा की जय!

ढोलवादन सुरू झालं. देवपूजा, आरती, नैवेद्य झाला.

|| भूषण कोरगांवकर

‘‘चंद्रकांत, आईला सांगून सगळ्यांसाठी चटणी-चपाती घेऊन ये…’’ २०१६ साली आमचा दिल्लीचा दौरा निश्चित झाला आणि शकुबाईंनी ऑर्डर सोडली. ‘‘उगाच कशाला त्यांना त्रास? आपण राजधानीने चाललोय. गाडीत सगळं जेवण असतं.’’ मी म्हटलं. परंतु ‘‘तिथलं पांचट जेवण कोण जेवील? आपण आपलं नेलेलं बरं…’’ असं सर्वानुमते ठरलं. आणि खरोखरच ट्रेनमध्ये जेव्हा त्यांनी डबा उघडला तेव्हा त्या वासानेच आमची भूक  खवळली. सीमाबाई लाखे म्हणजे आमचे पेटीमास्तर चंद्रकांत लाखे यांच्या आईच्या हातच्या तीन वेगवेगळ्या चटण्या आणि चपात्या यांनी दिल्ली अक्षरश: गाजवली.

‘‘खरंच, त्या बाईच्या हाताला चव आहे!’’ प्रत्यक्ष लावणीसम्राज्ञीचा असा शिक्का मिळाल्यावर अजून काय पाहिजे? पुढे मग प्रत्येक दौऱ्यात असंख्य चटण्या आणि शिळ्या झाल्यावरही खमंग व मऊ लागणाऱ्या चपात्या यांचा रतीब सुरू झाला. चटण्यांचे केवढे ते प्रकार! शेंगदाणे घालून केलेली लसणाची साधी चटणी. पण त्यात हळद, हिरवी मिरची, लाल मिरची, कारळं, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं यातले काही जिन्नस (सगळे एकाच वेळेस नाहीत.) आणि ते घालण्याचं प्रमाण आणि वेळ (तेलात परतताना कुठल्या क्रमाने ते घातले आणि किती वेळ परतलं, त्यानुसार.) यानुसार वेगवेगळी चव, रूप आणि रंग. एकदा तर हिरव्या, लाल, काळ्या, करड्या रंगांच्या मोहक रेषा वेगळ्या वेगळ्या उठून दिसत होत्या. नेमकं तेव्हा फोटो काढायच्या आतच फस्त झाल्यामुळे ती रंगपंचमी केवळ आठवणीत उरली आहे.

 

चटणी (प्रकार १)

भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, हळद, खडे मीठ हे सारं ओबडधोबड वाटून घ्यायचं. तेलावर जिरे घालून, त्यावर हे वाटप मंद आचेवर दहा मिनिटं परतायचं.

अशा या सीमाबाईंच्या हातचं सलग दोन दिवस जेवायचा योग मात्र तीन वर्षांनंतर आला. निमित्त… डोंबारी कोल्हाटी समाजाची जत्रा. स्थळ- रायगड जिल्ह्यातलं रोहा शहर.

मी आणि कुणाल फेरीबोट, एसटी असा प्रवास करून तिकडे पोहोचलो.

‘‘आमच्या कुटुंबाची कुलदेवी रासाई… परंतु आम्ही बाकीबी अनेक देवांना पूजतो.’’ ज्येष्ठ पेटीमास्तर दशरथ लाखे सांगत होते, ‘‘आमच्या या धावीर देवाची जत्रा दर तीन वर्षांनी भरते. आमच्या भावकीतली- म्हंजे जेजुरीची लाखे आणि डावळकर अशी कुटुंबं माही पौर्णिमेला इकडं रोह्याला येतात.’’

गेल्या कित्येक पिढ्यांपासून शारीरिक कसरती, खेळ, नाचगाणी करत आलेल्या या समाजाचा ‘ज्ञानेश्वरी’तदेखील उल्लेख आहे. हा मूळचा भटका समाज गेल्या शंभरएक वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात स्थायिक झालाय. तळेगाव, जेजुरी, लोणंद, शिरवळ, वाई, सातारा, कराड, इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर, निपाणी, नातेपुते अशा अनेक भागांत त्यांच्या वस्त्या आहेत. यमुनाबाई वाईकर, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, अनुसूया लोणंदकर, शकुंतला लोणंदकर, रोशन सातारकर, लीला गांधी, सावित्री सातारकर अशा कित्येक महान कलाकार या समाजाने दिल्या आहेत. सध्याच्या पिढीतसुद्धा पुष्पा सातारकर, नंदा उमा इस्लामपूरकर, संध्या विद्या सातारकर, गीता लाखे, संगीता लाखे, अर्चना जावळेकर, जया लोणंदकर, पूजा वाईकर, आरती सांगलीकर, लताबाई वाईकर, सुमंत लाखे, तसंच साथीदारांमध्ये सुमीत कुडाळकर, सुनील जावळे, राजेंद्र-विनायक जावळे, विनोद वाईकर, कुंदन मास्तर, पवन गाडे, गोपाल लाखे असे अनेक गुणी कलाकार आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे तालासुराची उपजत समज. कलाकारांची अशी खाण असलेला हा समाज प्रचंड देवभोळा. आपल्या जुन्या परंपरा जीवापाड जपणारा.

‘‘नामदेव लाखे आमचे गुरव होते त्याच्या पूर्वीपास्नं आम्ही जेजुरीवरनं रोह्याला पायी यायचो.’’ दशरथ मास्तर जुन्या आठवणी सांगतात… ‘‘गाढवांवर ओझी टाकली की फण्या विकत, गोंदवन करत, त्यातनं भेटलेले पैशे जमा करत प्रवास सुरू. जाऊन-येऊन पाच-सहा महिने लागायचे. आता मात्र झटपट एसटी किंवा गाडीनं येतो.’’

मात्र, आजही एकदा रोह्याला पोचलं की इथे राहुट्या बांधूनच राहायचं. आपल्या जुन्या भटक्या आयुष्याची याद जागवत!

‘‘नगरपालिकेची, पोलिसांची आणि इथल्या सगळ्याच लोकांची लई मदत होती बघा.’’ मास्तर सांगतात. पहिले दोन दिवस तर साफसफाईतच जातात. वीज नाही. खाटा नाहीत. सार्वजनिक शौचालय. नदीवर अंघोळ. पण अडचण कुणालाच होत नाही. उलट, जत्रेची सगळेच जण वाट पाहत असतात. पोरंपोरी शाळा-कॉलेजातून सुट्ट्या काढतात. ‘‘आता ‘देव देव’ हाय म्हनून आमची मस्त सहल तरी होते. नाय तर आम्हाला कोण हॉलिडेला नेणार?’’ रूपालीवहिनी म्हणाल्या.

रोह्याच्या धावीर मंदिरात नैवेद्य दाखवला की दोन दिवसांनी सगळे रेवदंड्याला समुद्रात देवांना अंघोळ घालायला घेऊन जातात. असे शुचिर्भूत झालेले देव मग पुन्हा रोह्याला आणून कौल लावला जातो. कौल पडला की मगच राहुट्या उचलून माघारी जायचं. तोपर्यंत मुरुड-जंजिरा, अलिबाग, नागाव अशा एकदिवसीय सहली आयोजित केल्या जातात.

‘‘कधी पहिल्याच दिवशी कौल पडतु. कधी आठ-धा दिवस लागतात. देवाची इच्छा. आपलं काय? तेवढेच दिवस आपली भक्तीबी आन मस्तीबी…’’ मास्तरांनी सांगितलं.

पोरंबाळं, म्हातारीकोतारी सगळ्यांनी एकत्र राहायचं. पण खायचं काय? तर रोज ताजा माल विकत घेऊन तो रांधून खायचा. कधी बाहेर हॉटेलातलंही मागवतात. आम्ही जत्रेच्या मुख्य दिवशी पोहोचल्यामुळे सगळा साग्रसंगीत बेत होता. कोंबडे आणि बालिंगे (मेंढे) यांच्या भन्नाट भाज्या शिजत होत्या. कोंबडे शिजवायची त्यांची पद्धत एकदम वेगळीच वाटली. बळी दिलेले अख्खे कोंबडे उकळत्या पाण्यात घातले होते. ते गरम असतानाच त्यांची पिसं काढून ते चुलीवर भाजण्यात आले. आणि मग त्याचे तुकडे करून ते फोडणीला देऊन त्याची नेहमीप्रमाणे भाजी केली होती.

दिवेलागणी झाली. ढोलवादन सुरू झालं. देवपूजा, आरती, नैवेद्य झाला. आणि पंगती बसायला सुरुवात झाली. नैवेद्यात तेलच्या, मलिंदा आणि बोनं हे गोड प्रकार असतात. तेलच्या म्हणजे गूळ भरून तळलेल्या कणकेच्या जाड पुऱ्या. हा गूळ नंतर वितळतो. त्यामुळे तेलची खाताना आत लिक्विड चॉकलेट भरलेला एखादा परदेशी पदार्थ खातोय असा भास होत होता.

सामान्यत: भाकरी, चपाती, भात, चिकन या गोष्टी बायका बनवतात आणि बालिंगे पुरुष मंडळी. पण सीमाबाईंची खासियत अशी की, सगळा स्वयंपाक त्यांच्याच हाताखाली शिजत होता.

चिकन तयार होताना एवढ्या सोपस्कारांची काय गरज असं वाटलं होतं; पण त्याची खरपूस चव जी काही लागते त्याला तोडच नाही. मुळात गावठी कोंबडा. त्यातून या पद्धतीने चुलीवर शिजवलेला… आणि तोही सीमाबाईंच्या हातचा. म्हणजे तुम्ही कल्पना करून पाहा.

आणि बालिंगा तर त्याहून भारी.

 

बालिंग्याची भाजी (प्रकार १)

मटण : १ किलो मटण हळद व खडे मीठ लावून, पाणी, तेल काहीही न घालता वाफवून घ्यायचं. एका भांड्यात हे तुकडे घालून वरून पाण्याचं झाकण लावून मंद आचेवर तासाभरात ते शिजून येतं.

वाटप : ३ मोठे कांदे, २ लसणीचे कांदे, त्याहून कमी आलं, पाव जुडी कोथिंबीर, सुक्या खोबऱ्याची पाऊण वाटी, धणे, पांढरे तीळ, मगज बी व खसखस प्रत्येकी २ टीस्पून, अर्धा टीस्पून शहाजिरे, ३ लहान वेलची, २ तमालपत्रे. हा सगळा ऐवज तेलावर भाजून बारीक वाटून घ्यायचा.

कृती : थोड्या तेलावर बारीक चिरलेला एक मोठा कांदा परतायचा. त्यात दोन टोमॅटो बारीक चिरून सगळं एकजीव होईल असं परतून घ्यायचं. मग वरचं वाटप टाकून तेल सुटेस्तोवर परतायचं. नंतर त्यात २ टीस्पून कांदा-लसूण मसाला, २ टीस्पून धणे पावडर, दीड टीस्पून काळा मसाला, १ टीस्पून गोडा मसाला, १ टीस्पून मटण मसाला घालून आणखी थोडा वेळ परतायचं. (मटणात गोडा मसाला घातलेला मी प्रथमच ऐकलं.) आता त्यात शिजलेलं मटण (किंवा भाजून तुकडे केलेलं चिकन), रस्सा जितका हवा तितकं गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालायचं. थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून टाकायची. सगळं एकत्र १५-२० मिनिटं शिजलं की वाढायला तयार!

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही अंघोळी आटोपल्या. नदीला एक चक्कर मारली. टपरीवर चहा प्यायलो आणि राहुट्यांवर परत आलो. बघतो तो काय! सीमाबाई आणि त्यांच्या कुशल सूनबाई मंगलबाई आणि रूपाली यांनी आमच्यासाठी गरम गरम चपात्या, सुकं मटण आणि बिर्याणी असं जेवण तयार करून ठेवलं होतं. बिर्याणी राइस थेट कोइम्बतुरला खाल्लेल्या त्याच सुंदर चवीचा… वाडा कोलम तांदळाचा, काळपट दिसणारा. त्या सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला. चटणी-चपाती बांधून घेतली आणि सगळ्यांचा निरोप घ्यायला गेलो. आम्हाला त्यांच्या पद्धतीची समुद्राची ताजी मासळी खाऊ घालता न आल्यामुळे त्यांचा जीव चुटपुटत होता. आणि ही मौजेची, प्रेमाची सहल संपली म्हणून आमचा!

‘‘गेल्या हजार वर्षांत जत्रंत आमच्यासंगं राहिलेले आमच्या जातीबाहेरचे तुम्ही पहिलेच बरं का!’’ सगळे आम्हाला भारावून सांगायला लागले. ‘‘त्यात काय? त्यांच्यातबी भटक्याचे गुन हायेत…’’ आम्हाला बरोब्बर ओळखून असलेले चंद्रकांत मास्तर हसत म्हणाले. हे आम्हाला पुरतंच पटलं.

‘‘आता दसऱ्याला जेजुरीला यायचं…’’ सीमाबाई आवाज कमी करत पुढे म्हणाल्या, ‘‘आम्हाला माहितीये- तुम्हाला चालतं ते. मस्त बेत करू या…’’

‘‘काय भुकाळी ना? हो… हो. नक्कीच.’’ मी म्हणालो.

‘‘भुकाळी? ते काय असतं?’’ कुणालने विचारलं आणि सगळे शरमून हसायला लागले.

भुकाळी म्हणजे काय याचे अंदाज तुम्ही बांधलेच असतील. त्याच्या चविष्ट गोष्टी पुढच्या लेखात.

 

(छायाचित्रे : कुणाल विजयकर)

bhushank23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 12:05 am

Web Title: testy food test dishes spicy food chatni chapatti akp 94
Next Stories
1   मोकळे आकाश… : फिर जनम लेंगे हम…
2 थांग वर्तनाचा! : जशास तसं?!
3 अनिर्वचनीय आनंदाची कविता
Just Now!
X