News Flash

थांग वर्तनाचा! : ‘आपण-ते’ सत्य की आभास

समूहभावनेमुळे सुरक्षित वाटत असलं तरी समूहातील नको असलेले रीतिरिवाजांचे जोखड मानगुटीवर बसते.

(संग्रहित छायाचित्र)

अंजली चिपलकट्टी

भय शिकण्यातून येणारी आक्रमकता आणि ‘आपण-ते’ असा टोळीभेदाच्या धारणा कशा घडतात हे आपण मागील लेखात पाहिलं. मात्र त्याच वेळी निसर्गानंच आपल्याला दोन किल्लय़ा दिल्या आहेत- १. टोळीभेदाच्या विभाजन रेषा कमालीच्या लवचीक असणं. आणि २. कोणत्याही व्यक्तीकडे टोळीचा सदस्य म्हणून न बघता एक व्यक्ती म्हणून बघणं.

समूहभावनेमुळे सुरक्षित वाटत असलं तरी समूहातील नको असलेले रीतिरिवाजांचे जोखड मानगुटीवर बसते. ‘आपल्या’ टोळीतले लोक अन्यायकारक वागत असतील आणि ते वैयक्तिक नैतिकतेविरुद्ध असेल तरी आपण मौन बाळगतो आणि नंतर त्याचं रॅशनलायझेशन करतो. त्याचा अतिशय घातक परिणाम माणसाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीवर होतोय. उदाहरणं भरपूर आहेत- स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थान असलं पाहिजे, असं काही समूह मानतात किंवा गोरे पुरुष इतर पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात, असं काही समूह मानतात. जात-पंचायतीचे अन्यायकारक निर्णय बहिष्कृत होण्याच्या भीतीपोटी लोक स्वीकारतात. पूर्वी समुद्र पार करून उद्योग/शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्यांना धर्मद्रोही समजलं जायचं. हा म्हणजे प्रखर टोळीभावनेच्या आहारी जाऊन पायात पाय अडकवून पडण्याचाच प्रकार! परक्या जाती-धर्मातल्या स्त्रियांवर झालेले अत्याचार आपण फार मनाला लावून घेत नाही; ते कसे? मी ज्या टोळीचा सदस्य आहे ती टोळीच म्हणजे- देश, धर्म, संस्कृती, जात, लिंग इतरांपेक्षा महान आहे असं मानण्याला टोळीभावनाच कारणीभूत ठरते.अशी उच्च-नीचता आपण मान्य करतो ती टोळीच्या प्रभावाखाली असल्यामुळेच! प्रखर वंशवाद, टोकाचा राष्ट्रवाद वा धर्मवाद ही याचीच उदाहरणं आहेत.

अशा प्रखर टोळीभावनेचा आणि मेंदूतील ऑक्सिटोसिन या संप्रेरकाचा अगदी निकटचा संबंध आहे. ऑक्सिटोसिन ओळखलं जातं प्रेमाचं रसायन म्हणून! स्त्रीला अपत्याबद्दल प्रेम निर्माण होणं, स्त्री-पुरुषांमधले लैंगिक बंध टिकवून ठेवणं हे या रसायनाचं मुख्य काम. तीच भावना पुढे उत्क्रांत होत टोळीतील सर्वाबद्दल प्रेम आणि विश्वासाचं नातं तयार होण्यापर्यंत विस्तारत गेली. समाजशील वर्तणुकीसाठी हे रसायन फारच उपयोगाला येतं. म्हणजे समजा, या रसायनाचा स्प्रे आपण हुंगत राहिलो तर आपण विश्वासू, प्रेमळ, कुटुंबवत्सल, सहवेदना दाखवणारे गुण नेहमीपेक्षा जरा जास्तच उधळू.

प्रेमाचं रसायन? क्या बात है!! पण खरी पंचाईत पुढे आहे. ऑक्सिटोसिनमुळे प्रेम, विश्वास वगैरे वाढतो- पण कोणासाठी? तर फक्त ‘आपल्या’ गटातल्या माणसांसाठी! ‘आपल्या’सारखे नसणाऱ्या लोकांसाठी मात्र आपण जास्तच अलिप्त, द्वेषमूलक, असहकार्याने वागू. याचा अर्थ ऑक्सिटोसिन समूहाशी एकनिष्ठता वाढवतं, पण परक्यांबद्दल दुरावा निर्माण करतं आणि ‘आपण-ते’ यांच्यातली दरी वाढवतं आणि एकदा हा मध्य सरकला की आपला आणि समाजाचा तोल ढळतो.

पण समूहभावनेसाठी ऑक्सिटोसिन स्रवणं आवश्यकच आहे. मग आता आपण परत चक्रव्यूहात अडकलो का? त्याची काही गरज नाही. माणसातली टोळीभावना इतर प्राण्यांसारखी जैविकतेत रुतलेली नाही तर  संस्कारीत विभाजन-रेषांवर आधारलेली आहे. या विभाजन-रेषा म्हणजे काही काळ्या दगडावरची रेघ नव्हे; या सहजपणे बदलता येतात.

पहिल्या महायुद्धातलं उदाहरण खूपच बोलकं आहे. १९१४ सालच्या डिसेंबरमध्ये जर्मन आणि फ्रेंच सैनिकांनी अनधिकृतपणे काही दिवसांचा युद्धविराम पाळला. कशासाठी? तर दोन खंदकांमधल्या ‘नो मॅन्स लँड’मध्ये पडलेल्या मृत सैनिकांच्या शवांना दफन करण्यासाठी. काही तासांपूर्वी एकमेकांना शत्रू समजून लढणारे जर्मन आणि फ्रेंच सैनिक अगदी सहजपणे एकमेकांना मदत करू लागले. खड्डे खणणं, मृतदेह उचलून त्यात ठेवणं.. हे करताना आपण शत्रू आहोत हे तर ते विसरूनच गेले, इतके की त्यानंतर त्यांनी एकत्र ख्रिसमस साजरा केला, प्रार्थना म्हटल्या, सॉकर खेळले आणि युद्धानंतर भेटण्यासाठी एकमेकांचे पत्तेही घेतले! हे एका ठिकाणी नाही तर अनेक आघाडय़ांवर घडलं. हे त्यांच्या सैन्यातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांचं धाबं दणाणलं. शेवटी आपल्याच सैनिकांवर बंदूक रोखून, त्यांना धमकावून एकमेकांबरोबर युद्ध करायला अक्षरश: भाग पाडलं गेलं! याचा अर्थ, एका कृत्रिम टोळीचा सदस्य बनवून एकमेकांविषयी शत्रुभाव निर्माण केला तरी मूळ माणूसपणाची भावना तितकीच बळकट राहते, याचा हा पुरावा आहे.

हिटलरने जर्मन लोकांच्या वंशश्रेष्ठत्वाच्या टोळीभावना पेटवून सत्ता हस्तगत केली. राजकीय नेते सत्ताकांक्षेतून ‘आपल्याच’ जनतेच्या टोळीभावना कशा वेठीस धरतात याचाही हा उत्तम पुरावा आहे. अशी बरीच उदाहरणे आपल्या आजूबाजूला वर्तमानातही घडताहेत.

वैज्ञानिकांनी केलेल्या अनेक सर्वेक्षणांतून असं लक्षात आलं की, ‘परक्या’ समूहातले लोक जणू मोनोलिथिक म्हणजे एकजिनसी गुण/ वृत्तीचे असतात, असा सरसकट समज करून दिला जातो.  ‘..ते सगळे तसलेच असतात..’ हे वाक्य ओळखीचं वाटतंय ना? १५व्या शतकात गुलामांचा व्यापार व्हायचा तेव्हा आफ्रिकन लोकांविषयी सरसकटपणे ‘ते कसे कमी बुद्धीचे, क्रूर, असंवेदनशील, किळसवाणे आहेत..’ असा प्रचार व्यापारांनी केला होता. त्यामुळे त्यांना ‘माणसासारखे’ सर्व अधिकार द्यायची गरज नाही, अशी कृतकबुद्धी जाणीवपूर्वक जोपासली गेली. त्यांच्या कामाविषयी कृतज्ञतेची भावना तर दूरच, उलट त्यांच्याविषयी सर्वसामान्यांत घृणाच तयार केली गेली. भारतात अजूनही तथाकथित ‘शूद्र’ जातीच्या लोकांविषयी असा समज पाळला जातो! (कोणत्याही शहरात सफाई कामगार कोणत्या जातीचे आहेत हे जरा तपासून पाहा.)

‘आपण-ते’च्या भेदातूनच सामाजिक उतरंडी (hierarchy) तयार होतात. अशी उतरंड, विषमता मान्य नाही असं वरकरणी म्हणणारे लोक प्रत्यक्षात मात्र खूप बाळबोधपणे(?) त्याचं औचित्य सांगत असतात. ‘गरिबीत खरंच किती सुख असतं नाही? गरीब लोक प्रामाणिक असतात. शेतकऱ्यांची जीवनशैली किती छान!’ असं म्हणत एक प्रकारे ‘सिस्टीम’विरुद्ध न बोलता त्याचं गौरवीकरण करतात; पण शेतकऱ्यांची कष्टकारक जीवनशैली आत्मसात करत नाहीत! गरीब/शेतकऱ्यांच्या कष्टाविषयी खरंच आस्था असेल तर त्यांना कष्टाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून ‘खाऊन-पिऊन’ सुखी असणारे समूह शेतकऱ्यांच्या बाजूने लढताना दिसायला हवेत. तसे दिसतात का?

एकंदर जगात दोन प्रकारचे लोक/ समूह दिसतात- १. ‘आपण-ते’मधला टोळीभेद सतत जागवत उतरंड (उच्च-नीचता) तयार करणारे. २. टोळीभेद मिटवत सामाजिक सलोख्यासाठी धडपड करणारे. नवीन जीवजाती तयार होत असताना जसे दोन्ही प्रकारचे जीव एकाच वेळी अस्तित्वात असतात तसंच काहीसं. प्रखर समूहभावनेच्या आहारी जाऊन वंशभेदाचा कळस गाठलेल्या हिटलरच्या जर्मनीचा मागमूसही आत्ताच्या अँजेला मर्केल यांचं नेतृत्व लाभलेल्या जर्मनीत दिसत नाही. उलट सर्व युरोपीयन देशांना एकत्र ठेवण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. हे वृत्तीतले बदल अनुकूल सामाजिक पर्यावरण तयार करून तिथल्या नेतृत्वाने घडवले आहेत. अनुकूल सामाजिक पर्यावरण घडवणं म्हणजे फक्त विशिष्ट समूहाच्या टोळीभावना उद्दीपित होतील असे कार्यक्रम देण्याऐवजी, सर्व समूहांना कवेत घेऊन सहकार्य भावना वाढीस नेणारे कार्यक्रम देत आर्थिक प्रगती साधणं, हे प्रगतिशील नेतृत्वाचं लक्षण मानता येईल.

नैसर्गिक समूहभावनेच्या गाभ्याशी सहकार्याची भावना जन्म घेते. त्याचा विधायक उपयोग करत पोषक सामाजिक व्यवस्था कशा कराव्यात हे स्कँडेनेव्हियन समूहांकडून शिकण्यासारखे आहे. स्वीडनसारख्या पूर्वी युद्धखोर असलेल्या देशांनी गेल्या दोनशे वर्षांत एकही युद्ध न करता ‘सामाजिक विश्वास’ तयार करण्यावर भर देऊन प्रगती साधली आहे. (तिथेही इतर धर्मीय अल्पसंख्य आहेत!)

समाजात सर्वत्र विविध धर्माच्या, वंशांच्या लोकांचा वावर असेल आणि त्यांच्याबरोबर आपली रोजची ऊठबस असेल तर समूहभावनेच्या कक्षा रुंदावत जाऊन ‘त्यांना’ही आपण सामावून घेतो, असं अनेक अभ्यासांतून लक्षात येतं. अर्थात त्यासाठी समूहांची एकोप्याची इच्छाशक्ती हवी. स्कॉट पेज हा समाजशास्त्रज्ञ म्हणतो, ‘‘एकत्र काम करणारा कोणताही समूह (संस्था, कंपनी) एकजिनसी असण्यापेक्षा विविधता (diversity) असणारा असेल तर समस्यांवर जास्त चांगलं उत्तर शोधतो, कारण दृष्टिकोनातल्या विविधतेमुळं अधिक जोमदार काम होतं.’’ मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी घरापासून अगदी शाळेपर्यंत समाजातील विविध समूहांच्या मुलांबरोबर त्यांची देवघेव असेल तर त्यांची मने भयमुक्त होऊन ती अधिक मुक्त व विविधांगी विचार करू शकतात असं आता मेंदूविज्ञान सांगतं.

आपल्या प्रत्येकाला सुरक्षित वाटेल असा ‘आपला’ एक गट हवा असं वाटणं स्वाभाविक आहे. मग गट बनवायचाच असेल तर ‘आपण-ते’ असा भेद न मानणाऱ्यांचा बनवू या आणि वाढवू या!

anjalichip@gmail.com

(लेखिका वैज्ञानिक व विवेकवादी विचारपद्धती (दृष्टिकोन) या विषयाच्या अभ्यासक व प्रसारक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 12:31 am

Web Title: thang vartanacha article on illusion of self truth abn 97
Next Stories
1 चवीचवीने.. : बाबांच्या हातचं!
2 ‘राजद्रोहा’चा अतिरेक!
3 हवामानबदल : विकासातील धोंड
Just Now!
X