|| अंजली चिपलकट्टी

‘गेम थिअरी’ हे एक गणितीय मॉडेल आहे हे आपण मागच्या भागात बघितलं. जे सजीव नेहमी अनिश्चित अशा भावना आणि ऊर्मी यांच्यावर हेलकावे खात असतात, त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी गेम थिअरी वापरणं हे आकलनापलीकडचं वाटू शकतं. परंतु निसर्गामध्ये निर्जीवांपासून सजीवांपर्यंत सर्वत्र सूत्रबद्ध असे गणितीय पॅटर्न सहज दिसून येतात.  फुलांच्या पाकळ्यांमध्ये दिसणारी फेबोनसी मालिका, शंखांपासून ते मानवी शरीरात दिसणारा गोल्डन रेश्यो, मुंग्यांपासून ते मेंदूतील न्युरॉन्समध्ये दिसणारे ‘फ्रॅक्टल्स’चे पॅटर्न अशा अगणित गणितांमधून सजीव सृष्टीची स्पंदने ऐकू येतात. जणू काही निसर्गाची भाषा गणितीय आहे. (वैज्ञानिक असं मानतातच.)

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…

तर प्राण्यांच्या प्रत्यक्ष जगण्यातल्या आंतरक्रियांमधील गुंतागुंत गेम थिअरीत खऱ्या अर्थानं आणता आली तर मानवी वर्तनाबाबतही काही तथ्यं हाताशी येतील असं अ‍ॅक्सलरॉडला लक्षात आलं. मग त्यानं गेम थिअरीच्या घटकांमध्ये बदल करून असंख्य खेळाडू एकमेकांशी खेळत आहेत अशी अनेक सिम्युलेशन्स केली. किती खेळाडू कोणती स्ट्रॅटेजी वापरतात, त्यांचं प्रमाण बदलत नेलं. खेळाच्या असंख्य फेऱ्या, कोणाशी खेळायचं याची निवड करण्याचं स्वातंत्र्य, एकाच वेळी अनेक खेळ अशी गुंतागुंत वाढवत नेली. ‘क्षमाशील- जशास तसं’, ‘जशास तसं’ किंवा ‘सतत फसवणूक/ सहकार्य’ अशा अनेक वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरून कोणती स्ट्रॅटेजी जास्त काळ टिकू शकते याचा अभ्यास केला. त्यातून असं लक्षात आलं की, गेम थिअरीचे अंदाज या निरीक्षणांशी बरेच जुळतात. यातून माणसाच्या वर्तनाविषयी काही भाकितं करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतो. उदाहरणार्थ, दोन कंपन्यांचं जेव्हा विलीनीकरण होतं तेव्हा निर्माण होणारे वाद सोडवण्यासाठी गेम थिअरीचा वापर होऊ लागला आहे. असो. तर आपण गेम थिअरीनं प्राण्यांबाबत केलेली कोणती भाकितं खरी ठरली त्याची उदाहरणं पाहू.

उंदीर, हरीण, काळवीट, वाघ-सिंहवर्गीय प्राण्यांपासून ते चिम्पांझी-बोनोबोसारखे प्राईमेट्स सजातीयांना ‘ग्रुमिंग’(ॠ१ङ्मङ्मे्रल्लॠ) करतात- म्हणजे एकमेकांना चाटतात, अंग घासतात, शरीरावरच्या केसांमधून परजीवी कीटक शोधून मारतात, एकमेकांना अन्न भरवतात, वाटून खातात. एकत्र शिकार करणं, संकटात एकमेकांना मदत करणं अशा नानाविध प्रकारे सहकार्य करताना त्यांना परतफेडीची अपेक्षा असते. मागच्या वेळी कोणी मदत केली, कोणी, कधी फसवलं, हे लक्षात ठेवून बहुतांश वेळा ‘जशास तसं’चे नियम पाळले जातात. याचे असंख्य पुरावे मिळाल्यानंतरही प्राणी-संशोधकांनी ठरवून विरोधी पुरावे शोधण्यासाठी काही प्राणीवस्त्यांची निरीक्षणं केली. (आठवतंय ना, विरोधी पुरावे कसे महत्त्वाचे असतात ते?) त्याची काही उदाहरणे फारच रंजक आहेत.

ब्लॅक हॅम्लेट माशाचं उदाहरण अद्भुत आहे. हे मासे आपलं लिंग मनाप्रमाणे बदलू शकतात. म्हणजे ते कधी मादी, तर कधी नर बनू शकतात. मादी बनणं म्हणजे अंडी घालणं, त्यांची काळजी घेणं, त्यासाठी शारीरिक तयारी, वगैरे आलंच. अर्थातच त्यासाठी मादीला जास्त ऊर्जा आणि वेळ खर्ची घालावा लागतो. त्यामुळे आपली जनुकं पुढच्या पिढीला सोपवणं हे उद्दिष्ट असेल तर त्यासाठी ‘मादी’ बनलेल्या माशाला शारीरिकदृष्ट्या खूप गुंतणूक करावी लागते. तर नर बनणं त्यामानाने खूपच स्वस्त पडतं. म्हणून मग हे मासे आळीपाळीने कधी मादी, तर कधी नर बनतात. परिणामी कोणा एकालाच मादीचा भार उचलावा लागणार नाही. (हे असं माणसात करता आलं असतं तर?) आता गंमत पाहा- जर एखादा मासा वारंवार नर बनून मादी व्हायचं टाळत असेल तर ती त्याच्या साथीदाराची फसवणूकच झाली. मग या ‘गेम’मध्ये पुढच्या फेरीत इतर मासे ‘त्याला’ सहकार्य करत नाहीत. म्हणजे त्याची ‘मादी’ व्हायला  कोणी तयारच होत नाही! जशास तसं! हे म्हटलं तर अचंबित करणारं आहे; पण तटस्थपणे पाहिलं तर लक्षात येईल की, असे सहकार्याचे नियम त्यांच्या अस्तित्वाबरोबरच उत्क्रांत झाले आहेत. म्हणजे सहकार्य हा परिणामही नाही आणि कारणही नाही.

‘नेकेड मोल रॅट’ ही उंदरांची एक जात. यांचं जगणं फारच विस्मयकारक आहे. हे इतर उंदरांच्या मानाने खूप मोठ्या- दोनेकशेच्या कळपात राहतात आणि त्यांच्या भूमिगत वस्त्या फुटबॉलच्या मैदानाइतक्या मोठ्या असतात. कामाच्या वाटपाबाबत हे इतके शिस्तशीर असतात की मुंग्या/ मधमाश्यांच्या जवळ जाणारा हा एकमेव सस्तन प्राणी असावा. बीळ खोदणं, नवीन जागा शोधणं, अन्न मिळवणं, देखरेख करणं, प्रजनन अशी अनेक कामं कोणी व कधी करायची याचं नीट वाटप केलेलं असतं. यांच्या आफ्रिकेतल्या एका वस्तीत संशोधकांना असं दिसलं की, त्यांच्यात दोन-चार तरी असे उंदीर असतात की जे कामच करत नाहीत. नुसता खादाडपणा करत इकडेतिकडे हुंदडतात. काम चुकवून फुकट खाणं म्हणजे फसवेगिरीच. आणि तरी त्यांना कळपात कोणी शिक्षा करत नव्हतं. जशास तसं वागत नव्हतं. संशोधकांना वाटलं, चला, आपल्याला विरोधी पुरावा मिळालाच शेवटी! पण अजून काही काळ निरीक्षण करत राहिल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की, ज्यांना ते कामचुकार समजत होते तेच गब्दुल उंदीर पावसाळ्यात आत पाणी शिरू नये म्हणून बिळांची तोंडं बंद करण्यासाठी पळापळ करत होते. समूहात त्यांना एक विशिष्ट भूमिका होती, जी ते चोखपणे निभावत होते!

तर मग माणसांबद्दल काय म्हणता येईल? माणसं आदिम टोळी-काळापासून ते मल्टिनॅशनल कंपन्यांपर्यंत नातलग नसलेल्यांशीच नव्हे, तर न पाहिलेल्या माणसांशीसुद्धा ज्या प्रकारे सहकार्य करतात, त्याला तोड नाही. माणसाच्या उत्क्रांतीमधला ९९% काळ हा सहकार्याच्या पायावर रचला गेला आहे. पृथ्वीवरील कोणतेच मानवी समूह सहकार्याशिवाय जगू शकत नाहीत. समूहात राहून वाटाघाटी करत सहकार्य करण्याची माणसाची प्रेरणा इतकी जैविक अशामुळे आहे, कारण त्याशिवाय माणूसच नव्हे, तर सर्व सस्तन प्राणी ज्यापासून बनले तो आदिप्राणीही अस्तित्वात आला नसता. इतकी जटिल आणि गुंतागुंतीची शारीरिक-सामाजिक रचना समूहात राहण्याच्या गुणांशिवाय उत्क्रांत होऊच शकली नसती. पण तरीही प्राणी आणि माणसं ज्या प्रकारे सहकार्य करतात, त्यात खूपच फरक आहे. प्राण्यांचं असं वागणं हे आपोआप/ अंगभूत (visceral) आहे. माणूस मात्र पर्यावरणातून शिकलेल्या वृत्तींनुसार अंगभूत गुणांना बाजूला सारण्याची क्षमता बाळगून आहे. त्यामुळे माणसांत अंगभूत गुण + पर्यावरणातून संस्कारित झालेल्या वृत्ती अशी मिसळण होऊन ‘स्ट्रॅटेजी’ ठरते.

अगदी नेहमीचे अनुभव पाहू. जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर हॉटेल (रेस्तराँ!)मध्ये गेल्यावर सलग तीन-चार वेळा तुम्हीच बिल दिलं असेल आणि तो/ ती निवांत असेल तर ‘हे वागणं बरं नव्हे!’ असं मनात येतंच. असं बिल न देणाऱ्यांना आपण ‘फुकटे’ मानतोच. कल्पना करा की, तुम्ही ऑफिसमध्ये सात-आठ जण पार्टी करणार आहात आणि सर्वजण मिळून बिल देणार आहात. खूप महागडे पदार्थ न मागवता उधळपट्टी केली नाही तर सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो. पण एक-दोघांनी जरी महागडे पदार्थ मागवायला सुरुवात केली तर इतर सर्व जण त्यात सामील होतात, आणि तुम्हीसुद्धा! अशा वेळी तुम्ही स्वस्त डिश मागवलीत तर तुम्हाला स्वत:वर अन्याय झाल्यासारखं वाटतं! (उगीच मनात खंतावू नका. बहुतांश माणसं अशीच वागतात.)

‘ती हॉस्पिटलमध्ये होती तर मी एवढी पळापळ केली, आता मला गरज आहे तर ती फिरकलीही नाही’, ‘मागच्या वर्षी मी त्याला भुईमुगाचं बियाणं दिलं होतं, या वर्षी मी मागितलं तर देईल की तो!’ अशा प्रकारचे आपल्या मनीचे गुज ऐकले तर आपणही ‘जशास तसं’ सहकार्य करतो हे लक्षात येईल. सहकार्याची कोणती स्ट्रॅटेजी माणूस वापरतो हे बऱ्याच अंशी आजूबाजूच्या पर्यावरणावर अवलंबून असतं. फसवणारे जास्त असतील तर सावधपणे ‘ठगास ठग’ हेच बरं. पण अशा फसवणाऱ्यांमध्ये थोडे ‘जशास तसं’वाले जरी सहकार्यानं वागू लागले तर फसवणाऱ्यांपेक्षा खूपच यशस्वी ठरतात. एकमेकांवर विश्वास ठेवू शकणारे लोक असतील तर ‘क्षमाशील + जशास तसं’ एकदम जोरात चालतं.

मात्र माणसाची सहकार्याची वृत्ती इतर प्राण्यांच्या तुलनेत फारच प्रगत आहे. समूहनृत्य व कवायतींत आपण ज्या प्रकारे सिंक्रोनायझेशन करू शकतो, त्याच्या जवळपासही इतर प्राणी पोहोचू शकत नाहीत. अदृश्य अशा सिस्टिम्सचे कायदेकानू आपण पाळतो. ते न पाळणाऱ्यांना- म्हणजे फसवणाऱ्या लोकांना शिक्षा व्हावी यासाठी पोलीस, न्यायव्यवस्था यासाठी जादाचा खर्च करण्याची आपली तयारी असते. (पोलीस सामान्य माणसांसाठी काम करतात आणि न्यायव्यवस्थेत न्याय मिळतो, हे गृहीत धरून.)

एक महत्त्वाचा मुद्दा ‘पण सर्व जीव स्पर्धा करताना दिसतात की!’ असं ‘स्पर्धा विरुद्ध सहकार्य’ असं द्वंद्व उभं करायचा प्रयत्न अनेकदा होतो. स्वहित (स्वप्रजनन) साधण्यासाठी सजातीयांवर कुरघोडी करायची प्रेरणा जीवांमध्ये जरूर दिसून येते; जी जैविक (हार्ड-वायर्ड) आहे त्याला आपण स्पर्धावृत्ती म्हणू शकतो. स्पर्धेत एकाचा फायदा, तो दुसऱ्याचा तोटा असतो. जणू एकूण बाकी शून्यच! पण जीवांमध्ये सगळेच ‘खेळ’ स्पर्धेचे नसतात! स्पर्धा, प्रेरणा त्यांच्या सर्व जगण्याला व्यापून उतू जात नाही. समूहात अनेक ‘खेळ’ सहकार्याचे असतात. त्यामुळे समूहात एकंदर जीवांचा फायदाच होतो. ‘हे स्पर्धेचं युग आहे!’ या वाक्यातली स्पर्धेची वृत्ती आणि प्राण्यांमधली जोडीदार मिळवण्यासाठीची स्पर्धा यांत खूप फरक आहे. माणसात या वृत्तीचे अनेक पदर- चुरस, असूया, मत्सर अशा भावनांच्या रूपात दिसतात; ज्यामुळे मेंदूत ताणाची निर्मिती होते. म्हणून तर स्पर्धेला अवाजवी महत्त्व देणाऱ्या समूहांमध्ये मुलं/ माणसं नैराश्यग्रस्त असतात.

तुकारामाच्या गाथेपासून कबिराच्या दोह्यांपर्यंत, राज्यघटनेसारख्या जम्बो नियमावलीपासून ते गाणी, नाटकं, सिनेमांपर्यंत, कॉर्पोरेटमधल्या ‘टीम स्पिरिट’पासून ईसापच्या गोष्टीपर्यंत सर्वत्र समूहात राहताना वाटाघाटीनं सहकार्य कसं करावं- ज्याला आपण ‘जगरहाटी’ म्हणू- ते शिकवण्याचे प्रयत्न होताना दिसतात.

सहकार्य करणं म्हणजे ‘दूरदृष्टी’नं पाहिलं तर स्वहितासाठीची ती गुंतवणूकच आहे. माणसाच्या ‘जाणिवे’त स्वहिताची व्याख्या प्रजननापुरती मर्यादित नाही. त्याला जगणं सुंदर करायला आवडतं. समूहात सहकार्य करताना उत्क्रांत झालेल्या  प्रेम, कृतज्ञता, क्षमाशीलता या भावनांचे सूक्ष्म पदर अनुभवायला त्याला आवडतात. त्यामुळे सहकार्याच्या अंगभूत प्रेरणेला विस्तारण्यासाठी माणूस विश्वासाचा पाया रुंद करण्याचा प्रयत्न ‘जाणीवपूर्वक’ करतो आहे.

anjalichip@gmail.com