News Flash

थांग वर्तनाचा! : आपण विरुद्ध ते? आता बास!

दुसऱ्या महायुद्धानंतर केलेल्या सैनिकी मानसिकतेच्या अनेक अभ्यासांतले निष्कर्ष खूप महत्त्वाचे आहेत.

थांग वर्तनाचा! : आपण विरुद्ध ते? आता बास!

|| अंजली चिपलकट्टी

‘आपण-ते’ची चर्चा ह्यु थॉम्पसनच्या गोष्टीशिवाय अपुरीच राहील. ह्यु हा व्हिएतनाम युद्धातला अमेरिकी पायलट होता. व्हिएतनाम युद्ध म्हणजे व्हिएतनामी जनतेनं फ्रान्स-अमेरिकेविरुद्ध लढलेलं अटीतटीचं स्वातंत्र्ययुद्ध. अमेरिकेला त्यात स्वारस्य असण्याचं कारण म्हणजे त्यांना तिथं कम्युनिस्ट राजवट येऊ द्यायची नव्हती. अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय युद्धाचे सर्व नियम धाब्यावर बसवत, नागरी जनतेचाही भयंकर क्रूर संहार करत व्हिएतनामला चिरडण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन जनतेनं हे युद्ध थांबविण्यासाठी स्वत:च्याच सरकारविरुद्ध प्रचंड मोर्चे काढले. खुद्द अमेरिकन जनतेचा विरोध आणि व्हिएतनामी सैनिकांची चिवट झुंज यामुळे शेवटी अमेरिकेनं १९७५ मध्ये माघार घेतली. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाने व्हिएतनामसारख्या ‘चिरकुट’ देशासमोर माघार घ्यावी असं अमेरिकी लोकांना का बरं वाटलं असेल? या विरोधाला सुरुवात झाली १९६८ मध्ये घडलेल्या ‘माय-ले हत्याकांडा’पासून!

‘चार्ली कंपनी’ या अमेरिकी सैन्यतुकडीच्या कॅप्टनला असा संशय होता की, काही व्हिएतनामी सैनिक माय-ले गावात लपून बसले आहेत. या सैनिकांना मारण्यासाठी या गावात चार्ली कंपनी घुसली. पण गावात स्त्रिया, मुलं आणि वृद्ध यांच्याव्यतिरिक्त कोणी सैनिक वा शस्त्रास्त्रे सापडली नाहीत. काहीही प्रतिकार झालेला नसतानाही नागरिकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. काहींना विहिरीत ढकलून नंतर विहिरीत बॉम्ब टाकून मारण्यात आलं. प्रेतांची विल्हेवाट लावण्याची नंतर कटकट नको म्हणून अनेक स्त्रिया आणि मुलं यांना बंदुकीच्या धाकाने शेतातल्या खड्ड्यापर्यंत नेऊन तिथं त्यांच्यावर धडाधड मशीनगन चालविण्यात आल्या. मारण्याआधी अनेक स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले.

हेलिकॉप्टरमधून खालची टेहळणी करताना ह््युला अचानक स्त्रिया आणि मुलांचे अस्ताव्यस्त पसरलेले मृतदेह दिसले. त्याच्या लक्षात आलं की, आपलेच सैनिक निरपराध नागरिकांवर बेछूट गोळीबार करत आहेत. त्याचा विश्वासच बसेना. कॅप्टनला वारंवार विनंती करूनही खालचं मृत्यूचं तांडव थांबेना. पळून जायच्या प्रयत्नात असलेल्या काही स्त्रिया आणि मुलांचा पाठलाग अमेरिकी सैनिक करताहेत हे पाहून मात्र तात्काळ त्यानं आपलं हेलिकॉप्टर बरोबर त्या दोघांमध्ये उतरवलं. अत्यंत निर्भयपणे आणि ठामपणे तो आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी पाठलाग करणाऱ्या अमेरिकी सैनिकांना सुनावलं, ‘‘जर त्यांनी निरपराध नागरिकांवर गोळीबार केला तर आम्ही बंदुका चालवण्यास मागंपुढं पाहणार नाही.’’ त्यानंतर त्यानं उरलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे इतर ठिकाणी हलवलं. हेडक्वार्टरला परत गेल्यावर त्यानं त्याच्या ऑफिसरला घडला प्रकार सांगितला. त्यानंतर मात्र सूत्रं हलली आणि ‘सीझ-फायर’ची ऑर्डर आली. ‘माय-ले’नंतर अशाच इतर अनेक गावांवर होणारे नियोजित हल्ले रद्द झाले आणि अशी अनेक हत्याकांडे होण्याआधीच थांबली. असा अंदाज आहे की वीस हजार लोक केवळ ह्युमुळे वाचले असावेत.

हे हत्याकांड काही अमेरिकी सैन्याधिकारी आणि राजकीय नेत्यांनी वर्षभर दाबून ठेवलं. ह््युवरच कोर्ट मार्शल करण्याचा प्रयत्न झाला. पण सुदैवानं अनेक चांगले अधिकारी त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहिले आणि सत्य बाहेर आलं. तिथल्या माध्यमांनी सरकारला न घाबरता सत्य उचलून धरलं. अमेरिकी नागरिकांनीही सत्याची बाजू घेत जोरदार मोर्चे काढले.

गंमत अशी की, सत्य माहीत होऊनही काही ‘राष्ट्रवादी’ लोकांकडून त्याला धमकीवजा फोन येत… ह्यु देशद्रोही आहे, स्वत:च्याच सैनिकांविरुद्ध बंदूक उचलून त्यानं विश्वासघात केला आहे अशी या लोकांची धारणा होती.

एका मुलाखतीत त्याला प्रश्न विचारला गेला, ‘‘एवढ्या सैनिकांपैकी फक्त तुम्ही दोघे-तिघेच का बरं वेगळे वागलात? इतर सैनिक एवढे क्रूर का वागले?’’ त्यानं दिलेलं उत्तर असं होतं- ‘‘सैनिकी ट्रेनिंगमध्ये सैनिकांची मानसिकता मुद्दामहून अशी घडवली जाते की त्यांनी शत्रूचा द्वेष करावा; शत्रुदेशातील सर्व नागरिक जणू काही माणसं नसून आपल्यापेक्षा ते हीन आहेत, खालच्या दर्जाचे आहेत हे त्यांच्या मनावर बिंबवण्यात येतं, त्यांच्यात शत्रुत्वाची भावना निर्माण केली जाते. त्यामुळं सैनिक त्वेषाने लढतात. पण असा प्रभाव असूनही चार्ली कंपनीतील १९० पैकी फक्त १३-१८ सैनिकच या हत्याकांडात सहभागी होते. तेही ‘लीडर’च्या सूडबुद्धीच्या नकारात्मक दबावामुळे! बाकीचे सैनिक वरून आदेश असूनही यात सहभागी झाले नाहीत. युद्धात सैन्याधिकाऱ्याचे आदेश डावलण्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे माहीत असूनही त्यांनी नागरिकांवर गोळीबार केला नाही. देशासाठी लढायला खरं तर देशप्रेम पुरेसं आहे; त्यासाठी शत्रुदेशातल्या नागरिकांचा द्वेष करण्याची किंवा त्यांना ‘डीह््युमनाइज’ करण्याची गरज नाही. माझ्या आई-वडिलांच्या माणुसकीच्या शिकवणुकीमुळेच मी असं वागू शकलो.’’ ह््युसारख्या एका साध्या सैनिकामुळे सैनिकी कायद्यात नंतर सुधारणा होऊन अधिकाऱ्यांचे बेकायदेशीर आदेश न पाळण्याची मुभा सैनिकांना देण्यात आली, हा खूप मोठा बदल घडून आला.

दुसऱ्या महायुद्धानंतर केलेल्या सैनिकी मानसिकतेच्या अनेक अभ्यासांतले निष्कर्ष खूप महत्त्वाचे आहेत. दुसऱ्या माणसाचा जीव घेण्याविरोधी नैसर्गिक प्रेरणा कडक लष्करी प्रशिक्षणानंतरही सैनिकांत टिकून राहते म्हणूनच जिवावर बेतल्याशिवाय सैनिक शक्यतो गोळीबार करण्याचं टाळतात! याचमुळे युद्धानंतर अनेक सैनिकांना नैराश्य आणि ट्रॉमाचा (PTSD) त्रास सहन करावा लागतो.

एका टोकाला चार्ली कंपनीच्या मोजक्या सैनिकांची अमानुष वागणूक, मग बहुसंख्य सैनिकांचं हत्याकांडात सामील न होणं आणि दुसऱ्या टोकाला ह्यु थॉम्पसन आणि सहकारी यांचं ‘शत्रू’च्या नागरिकांना वाचवणं- असा हा मानवी वर्तनाचा वर्णपट नीट समजावून घ्यायला लवचीक विभाजन रेषांचं मेंदूविज्ञान मदतीचं ठरतं. ह्यु आणि इतर सैनिकांनी व्हिएतनामी नागरिकांना परक्या टोळीचे सदस्य न मानता त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहिलं. ज्या उत्क्रांतीनं आपल्याला टोळीभेदाची फॉल्ट-लाइन दिली, तिनंच हिंसेबाबत तिटकारा आणि विभाजन रेषा लवचीक असण्याची देणगीही बहाल केली आहे. मुद्दा आहे फक्त नेत्यांच्या प्रभावाखाली येऊन ‘आदेश’ न पाळण्याचा. पण ह्यु एक पाऊल पुढे जाऊन असं म्हणतो, ‘‘ ‘आदेश’ न पाळणं हे ठीकच आहे, पण त्याहीपुढे जाऊन सक्रियपणे त्यांना रोखणं अधिक महत्त्वाचं आहे.’’

आता अनेक प्रश्न उपस्थित होतात. आपण स्वत: कुठे प्रत्यक्ष हिंसा करतो? दंगलीत हिंसा करणारे कोण असतात? त्यात ‘आपले’ विरुद्ध ‘त्यांचे’ किती मारले गेले याचा हिशेब मनात होतो का? ‘बरं झालं, एकदा तरी त्यांना धडा शिकवला!’ असं आपण म्हणतो का? हिंसक झालेल्या ‘आपल्या’ लोकांचा निषेध न करता दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांना पाठिंबाच देणे नाही का? ‘आपण-ते’च्या रेषा पेटवून हिंसा करणाऱ्यांना आपण मत देतो का? की त्यांना रोखतो? ‘सभ्य’ हिंसेच्या एका वेगळ्या पातळीवर आपण वावरतोय का? शारीरिक हिंसा आपल्यापैकी बहुतेकांनी केलेली नसते, पण अशा सांकेतिक वागण्यातून आपण हिंसकतेला बढावा देतोच ना! ‘मला राजकारणात रस नाही,’ असं म्हणत अलिप्त राहणारे लोक प्रक्षोभक नेत्यांना रोखत नाहीत; ज्यातून हिंसेला खतपाणी मिळत राहते व आपल्याच पुढच्या पिढ्यांसाठी समाज अधिक असुरक्षित बनत जातो.

एली विझेल या नोबेलविजेत्या लेखकानं म्हटलेलं खरं ठरतं- ‘प्रेमाच्या विरुद्ध तिरस्कार असतो असं नाही. उदासीनता, अलिप्तपणा हा प्रेमाच्या जास्त विरोधी काम करतो.’ (लव्ह इज नॉट अपोझिट ऑफ हेट, इंडिफरन्स इज!) हिंसा होत असताना मौन बाळगणं हे हिंसा करणाऱ्याला बळच देतं; म्हणजे हे अप्रत्यक्षपणे अन्यायाची बाजू घेतल्यासारखेच आहे. एलीने स्वत: जर्मन घेट्टोत छळ सोसला आहे. तो म्हणतो, ‘‘हिटलर आणि त्याचे काही सहकारी वंशद्वेषी असतील; पण ज्यूंना मारण्यासाठी अनेक देशांत त्याने ज्या यंत्रणा (घेट्टो) तयार केल्या त्या असंख्य माणसांनी चालवल्या. ते सर्व वंशद्वेषी, आक्रमक, हिंसक नव्हते; पण ‘आदेश’ पाळून त्यांनी ६० लाख ज्यूंच्या संहारात सक्रिय सहभाग घेतला!’’

कोणत्याही विकसित प्रदेश किंवा देशाचं हे वैशिष्ट्य असतं की, तिथे विविध रंग-वंश-धर्म-देशांचे लोक एकत्र येऊन विकासाला हातभार लावत असतात. याला आपण ‘मेल्टिंग पॉट’ असं म्हणतो. जणू काही सर्व संस्कृती इथं वितळतात. हे सर्व लोक मिळून तिथली संस्कृती, पर्यावरण घडवत असतात. त्यामुळे विकसित देशातले संशोधक, नेते मेंदूच्या या ‘आपण-ते’चं द्वेषमूलक राजकारण आणि हिंसेला मागे टाकून सर्वांना सामावून घेणाऱ्या सामाजिक व्यवस्था घडवत आहेत.

भारतात मात्र जुन्या ‘आपण-ते’च्या रेषा अधिक ठळक करण्याचा कल दिसतो आहे. आपण ज्याला भारतीय समाज आणि परंपरा म्हणतो, ती विविध जमातींच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेतून घडली आहे. त्यामुळे ती विविधरंगी आहे. त्यापासून फारकत घेत सपाट, एकरंगी संस्कृतीचा आग्रह धरणं हे सामाजिकच नाही, तर आर्थिक विकासासाठीही घातक आहे, हे जितकं लवकर आपल्याला कळेल तितकं बरं; नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांना फार मोठी किंमत चुकवावी लागेल. त्यापेक्षा संघर्ष कमी करत, सामाजिक सलोख्याचे कार्यक्रम आखत, सर्व समूहांची वैशिष्ट्ये साजरी करत आपण एकत्र प्रगती करू  शकतो, हे दाखवण्याची क्षमता भारतीयांमध्ये नक्कीच आहे. प्रश्न आहे तो- आपण कोणता पर्याय निवडणार, हा!

anjalichip@gmail.com

(लेखिका वैज्ञानिक व विवेकवादी विचारपद्धती (दृष्टिकोन) या विषयाच्या अभ्यासक व प्रसारक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2021 12:03 am

Web Title: thang vartanacha hugh thompson vietnam war the american pilot war of independence akp 94
Next Stories
1 असामान्य कवयित्रीची संवेदनशील बखर
2 चवीचवीने… : ‘तिखटा’चं जागरण
3 चिरंतनाच्या चाहूलवाटा
Just Now!
X