News Flash

थांग वर्तनाचा! : मेंदूतलं जुगाड

भावनिक शॉर्टकट? ते काय असतं बुवा? सत्याचा आभास तयार करणारं ते एक महान यंत्र आहे!

|| अंजली चिपलकट्टी

एका कोड्यापासून सुरुवात करू. एका बॅट आणि बॉलची मिळून किंमत ११० रुपये आहे. बॅटची किंमत बॉलपेक्षा १०० रुपयांनी जास्त आहे, तर त्यांच्या किमती काय? पटकन सांगा. काय आलं तुमचं उत्तर? १०० आणि १० ना? पण त्यांच्या किमतीतला फरक १०० नाही हे लक्षात आल्यावर सावकाश विचार केला तर याचं खरं उत्तर तुम्हाला मिळेलच. रोज भाजी घेताना करतो तेवढीही आकडेमोड यात नाहीए.

या चकव्याचं प्रात्यक्षिक केवळ हे कळण्यासाठीच, की आपल्याला सामोरे येणारे प्रश्न, अनुभव, माहिती हाताळण्यासाठी मेंदूकडे दोन पद्धती असतात. एक- वेगवान आणि दुसरी- हळूहळू. यालाच डॅनियल कान्हेमन या नोबेलविजेत्या मानसशास्त्रज्ञाने ‘सिस्टीम- १’ आणि ‘सिस्टीम- २’ अशी नावं दिली आहेत. सिस्टीम- १ असते झटपट, कार्यक्षम; पण कमी चिकित्सक. तर सिस्टीम- २ ही सावकाश, काहीशी आळशी; पण अधिक तार्किक, चिकित्सक व योग्य. माहितीची ‘फाइल’ आधी सिस्टीम- १ च्या टेबलावरच जाते. सिस्टीम- १ ला शक्यतो फारसा ताण न घेता माहिती रिचवायला आणि त्यानुसार निर्णय घ्यायला आवडते. पण एखादी माहिती क्लिष्ट, पटकन न समजणारी किंवा परस्परविरोधी असेल तर एक तर सिस्टीम- १… अ) ती चक्क बाजूला सारते, किंवा- ब) भावनिक शॉर्टकट घेते, किंवा- क) पर्यायच नसेल तर सिस्टीम- २ कडे पाठवते; जिथे मग जास्त ऊर्जा वापरून त्याची चिकित्सा होते. पण सिस्टीम- २ कडे माहिती पाठवायची की नाही, हे मात्र सिस्टीम- १ ठरवते! (आत्ताही हे वाचताना तुम्हाला काहीसं अवघड वाटलं आणि तुमच्या सिस्टीम- १ ने सिस्टीम- २ ला जागं केलं असेल तर पुढचं समजायला सोपं जाईल!)

भावनिक शॉर्टकट? ते काय असतं बुवा? सत्याचा आभास तयार करणारं ते एक महान यंत्र आहे! याला ‘कॉग्निटिव्ह बायस’ असं म्हणतात. आपल्या पूर्वजांना अख्ख्या आयुष्यात जेवढी माहिती हाताळावी लागत असे, त्याच्या कैक पटींनी अधिक माहिती आपल्यावर एका आठवड्यात आदळत असते. पण आपल्या मेंदूकडे एवढ्या माहितीला नीट हाताळण्याची क्षमता नाहीए! कोणती माहिती बरोबर, कोणती शंकास्पद/ चूक हे मग तो कसं ठरवतो? तो चक्क अनेक शॉर्टकट घेतो! माहिती तोकडी आहे म्हणून एखादा निर्णय फार काळ रेंगाळत ठेवला तर येणारी अस्वस्थता टाळण्यासाठी सिस्टीम- १ उपलब्ध माहितीचा जमेल तसा उपयोग करत निर्णय घेते. नवीन आलेल्या माहितीमुळे आपल्याला सुरक्षित/ असुरक्षित वाटतंय का, याचा अदमास मेंदू सतत घेत असतो. माहिती आपल्या मतांविरोधी असेल तर असुरक्षित वाटू शकतं. मग त्याकडे दुर्लक्ष करणं बरं. माहिती त्रोटक असेल तर माहितीच्या तुकड्यांमधल्या फटी चक्क आपल्या भावनिक स्मृती, पूर्वानुभव आणि अंदाज यांनी भरून सुसंगत वाटेल अशी गोष्ट रचून एक ‘जुगाड सत्य’ (heuristic) सिस्टीम- १ आपल्याला सादर करते! जणू जेवढी माहिती आहे ती परिपूर्ण असल्याचा आभास तयार करते. कारण? आपला गोंधळ उडून आत्मविश्वास कमी होऊ नये! याला ‘वायझियाटी इफेक्ट’ (WYSIATI – What You See Is All There Is) असं म्हणतात. (आत्मविश्वास हा काही वेळा शिकण्याच्या आड येतो, तो यामुळेही.) सोप्या निर्णयांसाठी WYSIATI चा उपयोग होतो. पण अवघड प्रश्नांसाठी हे असं जुगाड उपयोगी ठरत नाही. आधुनिक जगातली आव्हानं पेलायला या जोडण्या अपुऱ्याच नाही, तर घातकही ठरत आहेत. वैज्ञानिक अभ्यासातून माहीत झालेले हे शॉर्टकट्स मनोरंजकही आहेत.

शॉर्टकट- १) एखादी माहिती आधी ऐकली/ पाहिली असेल तर ती ओळखीची वाटू लागते, आणि ओळखीची गोष्ट शक्यतो ‘चांगली’ असते.  याबाबतचा एक प्रयोग केला गेला होता मिशिगन विद्यापीठात. प्रयोगकर्त्यांनी विद्यार्थी वार्तापत्रात पहिल्या पानावर सर्वांना दिसेल अशा जाहिरात चौकटीत काही तुर्किश शब्द मोठ्या अक्षरांत लिहिले. काही शब्द सलग दोन आठवडे, तर काही तीन-चार दिवस असे बदल करत त्याची नोंद ठेवली. शब्दांविषयी कोणतेही स्पष्टीकरण मिळणार नाही याची काळजी घेतली. नंतर काही दिवसांनी मुलांचा सर्व्हे घेतला. त्यात त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ चांगला असेल की वाईट, एवढंच विचारण्यात आलं. बहुतांश विद्यार्थ्यांनी जे शब्द तुलनेत जास्त वेळा पाहिले होते (वारंवारिता) त्यांचा अर्थ चांगला असणार असं उत्तर दिलं होतं! म्हणजे ज्याचं एक्सपोजर अधिक, तो अधिक ओळखीचा म्हणून अधिक चांगला- इतकं साधं लॉजिक?!

शॉर्टकट- २) याचंच दुसरं रूप म्हणजे एखादी माहिती, बातमी वारंवार पाहिली असेल तर ती खरी वाटू लागते. जाहिराती अनेक वेळा दाखवण्यामुळे वस्तूचा खप वाढतो, असं का होत असेल? जाहिरातींनी केलेले दावे खरे आहेत का, हे आपण तपासतही नाही. जाहिराती आणि नेत्यांची भाषणे यांत खूप साधम्र्य असतं. मोठे दावे, वचनं, भीती दाखवणं आणि जणू काही उत्तर फक्त आमच्याकडेच आहे असा छातीठोकपणे वारंवार सांगणं! हे दावे बऱ्याचदा खोटे किंवा अतिशयोक्तच असतात. पण तरीही आपण त्याला भुलतो. आपण कसं दिसायला हवं याबद्दलच्या आकांक्षा जाहिराती तयार करतात; ज्यातून फोफावलेला फॅशन, कॉस्मेटिक उद्योग (उद्योगीपणा!) इतका विश्वव्यापी बनलाय, की कोणी परग्रहावरचा सजीव इथे अवतरला तर त्यालाही न्यूनगंड येईल!

शॉर्टकट- ३) एखादी गोष्ट समजायला सोपी असेल तर ती मनात राहते आणि मग पटू लागते. स्पिनोझा या विचारवंताने खूप आधी माणसाच्या या सवयीचं सूतोवाच केलं होतं. गिल्बर्ट या मनोवैज्ञानिकाने त्याचं म्हणणं सोपं करून सांगितलं, ते असं : एखादा विचार, संकल्पना समजून घ्यायची असेल तर आधी तिचा अर्थ समजून घ्यावा लागेल आणि मग ती बरोबर/ चूक ठरवावी लागेल. पण पेच असा की, एकदा का विचार समजला की मग त्याचं नाकारणं तितकं सोपं राहत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पण तसे केले नाही तर चुकीची गोष्ट मनात ठाण मांडून बसते- केवळ ती समजली आहे म्हणून. याचंच उलट करून पाहा… समजायला सोपी गोष्ट पटकन पटते.

शॉर्टकट – ४) मेंदू कोणती माहिती स्मृतींच्या रूपात (स्मरणात) साठवतो, ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. जी माहिती भावनेशी निगडित असते ती साठवण्यासाठी मेंदू प्राधान्य देतो, त्या स्मृती जास्त काळ साठवल्या जातात.  इतकंच नव्हे तर मोक्याच्या वेळी त्याच पटकन पोतडीतून बाहेर येतात. आनंद, भीती, दु:ख या भावनांशी निगडित स्मृती आपोआप त्या जागेशी, माणसांशीही जोडल्या जाऊन एकत्र साठवल्या जातात. खूप पूर्वीचा कोणताही प्रसंग, शब्द आठवून पाहा. उदा. कोकण असं म्हटल्यावर कोकणाची रटाळ माहिती आठवत नाही; आपण तिथे घालवलेले मजेचे क्षण, बरोबरची माणसं आठवतात. खरं तर ‘रूटीन’ कामाशी संलग्न असलेली माणसं, जागा यामध्ये आपण अधिक वेळ व्यतीत करतो; पण त्या स्मृती साठवल्या जातातच असं नाही. ज्यांच्याशी भावनिक बंध जोडले जातात तेच लक्षात राहतं आणि त्याचा प्रभाव सतत मनावर राहतो. याला वैज्ञानिक भाषेत ‘इफेक्ट’ असं म्हणतात. याच भावनिक स्मृती त्रोटक माहितीच्या फटींमध्ये घुसून ऐसपैस पाय पसरत आभासी सत्य तयार करतात. आपल्या सर्व मतांवर, निर्णयांवर याची सतत छाया असते.

एका प्रयोगात परीक्षेआधी मुलींच्या दोन गटांना ठरवून वेगळी विधानं सांगण्यात आली. पहिल्या गटाला ‘मुलींना गणित या विषयात चांगली गती असते’ असं, तर दुसऱ्या गटाला ‘मुलींना शक्यतो गणित जमत नाही’ असं सांगण्यात आलं. पहिल्या गटातल्या मुलींचे मार्क दुसऱ्या गटापेक्षा बरेच जास्त होते! याला मानसशास्त्रज्ञ ‘प्रायमिंग’ असं म्हणतात. आपली मतं, धारणा कशा बनल्या, असं (धाडस करून) स्वत:ला विचारलंत तर लक्षात येईल की, बऱ्याच अंशी त्यात प्रायमिंग/ ‘इफेक्ट’चा हातभार असतो. आपल्या आवडत्या माणसांच्या (शिक्षक, बॉस, गुरू, नेता) मतांचा आपल्यावर नकळत बराच प्रभाव असतो. त्यांच्या मतांची चिकित्सा करण्याची गरज आपल्याला वाटत नाही. विचारधारा जुळणारी असेल तर तो पक्ष/ नेता भ्रष्टाचार करत नाही असं वाटणं, त्यांच्या धोरणांमध्ये चुका न सापडणं, हे सर्व ‘इफेक्ट’चे परिणाम आहेत. याला ‘हेलो’ (Halo) इफेक्ट असं म्हणतात. कोणी आपल्याला या धोरणांविषयी टोकलं तर ‘उपलब्ध’ (WYSIATI) माहितीच्या आधारे तार्किक जुळणी करून आपण प्राणपणाने वाद घालतो. आपण तर्कसंगत मांडणी करतो- पण ते आधीच ठरलेल्या मतापर्यंत येण्यासाठी! आपण शाळेत असताना जसं निष्कर्षाला जुळणारी निरीक्षणं तयार करायचो, तसं! म्हणजे तर्काला आपण भावनेच्या दावणीला बांधतो. यालाच जोनाथन हाईट हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो- ‘इमोशनल डॉग वॅग्स दि रॅशनल टेल!’ किंवा ‘इमोशनल टेल वॅग्स दि रॅशनल डॉग!’

एवढे शॉर्टकट्स…? बाप रे! आपले निर्णय एवढ्या प्रमाणात भावनांवर अवलंबून असतात? पण तसंच काहीसं दिसतं. वैयक्तिक निर्णयांबाबत ते ठीकही असतं. पण त्यापलीकडे समाजाचा एक घटक म्हणून वावरताना मात्र आपले अनेक निर्णय फसताहेत! कारण काही प्रश्न क्लिष्ट असतात आणि ते सोडवण्यासाठी लागणारी माहिती आपल्याकडे नसते. मग अपुऱ्या माहितीच्या आधारे मेंदूला जुगाड निर्णय घेण्याची, सत्याचा आभास निर्माण करण्याची सवय लागलेली असते. पण समजा, आपल्याला सत्यापर्यंत जायचंच असेल तर आपण काय करू? ते पुढील लेखात पाहू.

anjalichip@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 12:03 am

Web Title: thang vartanacha one puzzles the combined cost of a bat and a ball akp 94
Next Stories
1 दखल : मनोज्ञ विश्लेषण
2 चवीचवीने… : सुगरण आत्या
3 पडसाद : विचारांची संयत मांडणी
Just Now!
X