विजय पाडळकर यांच्या  लघुकथांचे ‘ठसा’ हे पॉकेट बुक ‘अभिजित प्रकाशना’ तर्फे प्रकाशित झाले. मराठी साहित्यातला हा एक वेगळा प्रयोग. यातील कथेच्या प्रवासाची गोष्ट सांगणारा लेख..

माझ्या कथाप्रवासाची सुरुवात झाली ती अगदी लहानशा प्रसंगाने. १९९६ सालची गोष्ट. त्यावेळी मी नोकरीनिमित्ताने उदगीरला, तर मधुकर धर्मापुरीकर गंगाखेडला राहत होतो. दोघांचेही घर नांदेडलाच होते. आपापल्या जवळच्या माणसांपासून दूर, एकटे राहिल्यामुळे समान आवडीचे, समान विचारांचे आम्ही आता समदु:खी बनलो होतो. तो काळ कथेने झपाटलेला होता. धर्मापुरीकरांचे कथालेखन बहराला येऊ लागले होते. मराठीतील नव्या दमाचे लक्षणीय कथाकार म्हणून त्यांना मान्यता मिळू लागली होती. मी ‘कथांच्या पायवाटा’ या नावाचे देशोदेशीच्या कथांची ओळख करून देणारे सदर लिहिले होते. त्याला बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली होती. त्या काळात आम्ही एकमेकांना पत्रे लिहायचो तीही कथा, तिच्यातील निवेदनाचे महत्त्व, संवाद याविषयीच्या चच्रेने भरलेली असायची.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
book review cctvnchya gard chayet by geetesh gajanan shinde
आत्मशोधाच्या पदपथावरील कविता
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..

एकदा असाच गंगाखेडला गेलो होतो. एका मोठय़ा बिल्डिंगमध्ये लहानशा खोलीत धर्मापुरीकर राहत. या ठिकाणी मी पूर्वी आलो होतो. त्यावेळची खोलीची अवस्था मला ठाऊक होती. त्या दिवशी सारे भलतेच टापटीप, जेथल्या तेथे दिसत होते. मी म्हणालो,‘‘काय मधुकरराव, स्वच्छता दिन साजरा केला की काय ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मी नाही, बाईने केला.’’ मधुकरराव बायकोला ‘बाई’ म्हणतात. मीही ‘बाई’च म्हणतो. (आमच्यातला हा आणखी एक समान धागा.) ‘‘गेल्या शनिवार-रविवारी बाई आली होती, पोरांना घेऊन. दोन दिवस मस्त मजा आली. जाताना सगळ्या घराला इस्त्री मारून गेली..’’ मधुकरराव म्हणाले.

बायको-मुलांसह दोन दिवस मजेत राहिल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर उमटला होता. ते बराच वेळ त्या आठवणींत गुंग होते. बोलता बोलता ते म्हणाले, ‘पाडळकर, त्या दिवशी मला एक विलक्षण अनुभव आला..’ त्या अनुभवाच्या त्यांच्या मनावरील ठशाबद्दल ते सांगत असताना माझ्या अंगावरही काटा आला. मग पाहता पाहता आम्हाला आमच्या अस्तित्वावर उमटलेले आमच्या प्रिय व्यक्तींचे अनेक ठसे आठवू लागले.

काही दिवसांनंतरची गोष्ट. ठशाची गोष्ट मनात सतत घोळत होती. अचानक एके क्षणी जाणवले की, हा तर एका चांगल्या कथेचा विषय आहे. गोष्टीचा सांगाडा तर अगदी रेडीमेड तयार होता. पण कथेच्या फॉर्ममध्ये अनुभवाला बसवण्यासाठी काही इतर तपशील भरावयास हवे होते. महत्त्वाचा प्रश्न हा होता, की भर कोणत्या गोष्टीवर द्यायचा? नायकाच्या हळवेपणावर की त्या कुटुंबाने एकत्रित घालवलेल्या, अनुभवलेल्या दोन दिवसांवर, की नायिकेच्या आठवणीवर? पॉइंट ऑफ व्ह्य़ू कोणता असायला हवा? प्रथम वाटले की धर्मापुरीकर मला कथा सांगतात, हाच फॉर्म ठेवावा. दोन मित्र. त्यापैकी एक जण दुसऱ्याला आपल्या आयुष्यातील एक उत्कट प्रसंग सांगतो. पण कथेच्या दृष्टीने दुसऱ्या मित्राचा रोल पक्का होत नव्हता. त्याला फक्त श्रोता ठेवायचे का? त्याच्या प्रतिक्रियेला कथेत स्थान द्यायचे का? त्यापेक्षा सरळ प्रथमपुरुषी निवेदनातूनच कथा पुढे नेली तर? तसे केले तर पत्नीच्या मनात कसे डोकावता येईल? ‘एकलेपण’ हा त्याचा एकटय़ाचा अनुभव नाही. तिचाही आहे. तो या फॉर्ममध्ये हरवेल. कथा साधारणपणे किती शब्दांची होईल? या अनुभवाला दीर्घकथेचा आकार पेलणार नाही. पण अगदी लहान, केवळ एका अनुभवापुरती कथा प्रभावी होणार नाही. अनेक शक्यता मनात भिरभिरत होत्या.

सुमारे १५ दिवसांनी धर्मापुरीकरांची भेट झाली, त्यावेळी त्यांना म्हणालो, ‘‘तुमच्या ठशावर एक सुरेख कथा लिहिता येऊ शकेल असे मला वाटते.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मला असे वाटते की हा एका लघुनिबंधाचा विषय आहे. एका भावनाप्रधान व्यक्तीला आलेला उत्कट अनुभव हा विषय लघुनिबंधाला अधिक जवळचा आहे. त्यात स्टोरी एलिमेंट कमी आहे.’’

‘‘व्यक्तिरेखा जसजशी सशक्त बनते, तसतशी ती काही कृती करू पाहते. या कृतीतून मग ती स्वत:ला आणखी प्रकट करते. या अंगाने ही कथाच होईल असे वाटते. मी तर कथा लिहावयास सुरुवातदेखील केली आहे.’’ मी समारोप केला.

लेखन सुरू केले खरे, पण लिहिताना जाणवू लागले की फक्त नवऱ्याचा अनुभव एवढय़ापुरती कथा मर्यादित ठेवली तर फारच लहान होईल. अपेक्षित परिणामही होणार नाही. मग मी बायकोच्या एकटेपणाचा विचार करू लागलो. अनेक ठिकाणी विभागली गेलेली एक गृहिणी मला दिसू लागली. मग माझी कथा त्या दिशेने सरकू लागली.

‘एक शिक्षिका. आई-वडिलांकडे माहेरी राहते. कारण या गावात लग्नापूर्वीपासून ती नोकरी करते आहे. मुलगा शिक्षणासाठी नांदेडला. नवऱ्याची नोकरी तिसऱ्या गावी. त्यामुळे तीन ठिकाणी विखुरलेले लक्ष. एका आठवडय़ात ती मुलाला घेऊन नवऱ्याकडे जाते. तिथले लहानसे भातुकलीच्या खेळासारखे विश्व. त्या विश्वात खुललेला, फुललेला एक संपूर्ण दिवस. आपल्या माणसाजवळ असल्याचे सुख.. त्याचबरोबर गृहिणीची भूमिका रक्तात भिनलेली. ती त्याची अस्ताव्यस्त खोली लावून देते. पुढल्या आठवडय़ाचे पीठही भरून ठेवते.. वगैरे.

इथपर्यंत येऊन मी थांबलो. अजून मनाजोगा आकार आला नाही असे वाटू लागले. पण तो सापडेना. काही दिवसांनी धर्मापुरीकरांची भेट झाली. ते म्हणाले, ‘मीही आता कथाच लिहितो आहे. एक प्रयोग करतो आहे- लघुनिबंधाच्या शैलीत कथा लिहायचा.’

आणि मग एके दिवशी कथेचा रचनाबंध सापडला. सगळी कथा फ्लॅशबॅकने सांगावी असा मी विचार केला. ‘रेणू नवऱ्याच्या गावाहून परत आली..’ इथून मी सुरुवात केली. दोन दिवसांच्या स्वप्नवत अनुभवानंतर पुन्हा रोजचेच व्यवहारी, रुक्ष जीवन. आयुष्य असेच असते. स्वप्नातून जागे झाल्यावर समोर पोपडे गेलेली भिंतच असते. रेणू शाळेत जाऊ लागते. तीन दिवसांनी रमेशचे पत्र येते. पत्र हातात घेताच तिला त्या मंतरलेल्या दिवसांची आठवण येते.. इथून मी सुरुवात केली. मग त्या दोन दिवसांचे तपशील. पुन्हा ती वर्तमानात येते. त्या अनुभवातून पुन्हा एकदा मनाने जाताना हळवी होते.

एकमेकांच्या अस्तित्वाचा एकमेकांच्या मनावर उमटलेला ठसा मला दाखवायचा होता. मला वाटले, जे सांगायचे होते ते व्यक्त झाले आहे. मी ‘ठसा’ हेच नाव कथेसाठी पक्के केले. कथा पूर्ण करून धर्मापुरीकरांना वाचायला दिली. त्यांनी त्यांची कथा माझ्या हातात ठेवली.

धर्मापुरीकरांनी त्यांची कथा प्रथमपुरुषी निवेदनातून लिहिली होती. म्हणजे पुन्हा हा लघुनिबंधाशी अत्यंत जवळीक सांगणारा साहित्यप्रकार. पण त्यांनी एका अनुभवावर भर न देता पती-पत्नीच्या नात्याची अत्यंत रमणीय व भावोत्कट रूपे रंगविली होती. त्यांनी त्या कथेला नाव दिले- ‘तुझ्यातली तू’!

मग आम्ही या दोन्ही कथा ‘अंतर्नाद’ मासिकाकडे पाठवून दिल्या. यथावकाश भानू काळे यांचे पत्र आले. त्यांना त्या आवडल्या होत्या. त्यांनी दोन्ही एकाच वेळी ‘अंतर्नाद’च्या १९९६ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध केल्या.

काही दिवसांनंतर माझ्या कथांचा एक संग्रह ‘पाखरांची वाट’ या नावाने प्रकाशित झाला. त्या संग्रहात ‘ठसा’ ही कथाही होती. संग्रहाच्या सुरुवातीला मी फार पूर्वी वाचलेली एक आफ्रिकन लोककथा उद्धृत केली होती..

‘‘एका खेडय़ातील एक कथेकरी आपल्या गोष्टीचा शेवट जवळ आला की जमिनीवर बसायचा. वाकून आपल्या हाताचे पंजे जमिनीवर ठेवायचा आणि म्हणायचा, ‘माझी गोष्ट मी इथे ठेवली आहे. एके दिवशी कुणी येईल व तिला उचलून पुढे चालू लागेल.’ ’

ही कथा उद्धृत करून पुढे मी लिहिले होते, ‘माझ्या कथाही मी या कागदावर ठेवल्या आहेत. कुणी येईल व त्यांना उचलून चालू लागेल.’ त्यावेळी मला कल्पनाही नव्हती की एके

दिवशी खरेच कुणी येईल व त्यांना उचलून घेईल.

सुमारे २० वर्षांनंतरची- २०१७ च्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची गोष्ट. भल्या पहाटे माझ्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज आला. बर्लिनमधून माझ्या एका मित्राने तो पाठवला होता. कुतूहलाने मी तो उघडून पाहिला. व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रथेप्रमाणे तो त्याचा मेसेज नव्हता, तर त्याला कुणीतरी तो पाठवला होता आणि त्यात माझा उल्लेख असल्यामुळे त्याने तो मला फॉरवर्ड केला होता. तो मेसेज असा होता- ‘नुकतंच मी ‘पाखराची वाट’ वाचलं- विजय पाडळकरांचं! छोटय़ा छोटय़ा कथा, लेख आहेत त्यात. एक फार सुंदर कथा आहे. नवरा आणि बायको मराठवाडय़ात वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतात. आठवडय़ाने दोघांची गाठभेट होत असते. नवऱ्याची बदली झाल्यावर काही दिवसांनी बायको मुलाला घेऊन दोन दिवस सुटीसाठी त्याच्याकडे येते. दुपारी ती एकुलती खोली स्वच्छ करते. तांब्या, पेले, भांडी चकाचक घासून ठेवते. दोरीवर पडलेले कपडे धुऊन घडय़ा घालून ठेवते. गहू साफ करून, दळण दळून आणून डब्यात ठेवते. नवरा सांगत राहतो की, बाई, थोडा आराम कर. पण ही सारी कामे उरकून मग ती गावी परत येते. सोमवारपासून तोच दिनक्रम चालू होतो आणि गुरुवारी नवऱ्याचे पत्र येते.’ पुढे मेसेजकर्त्यांने कथेचा शेवट सांगितला होता आणि शेवटी लिहिले होते, ‘याहून सुंदर ‘व्हॅलेंटाईन डे’ची कथा असू शकेल काय?’

अशा तऱ्हेने ही कथा पुन्हा अचानक माझ्यासमोर आली होती. त्यातही मजा अशी की, त्या दिवशी वेगवेगळ्या असंख्य ग्रुपवर ती कथा फिरत राहिली. मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, न्यूयॉर्क, सॅन होजे.. ती फिरत होती आणि पुन्हा कोठूनतरी अदृश्य धाग्याने ओढल्यासारखी माझ्याकडे येत होती. अनेक वाचकांचे यानिमित्ताने फोन आले. अनेक वाचकांनी त्यांना आवडलेली ही सर्वोत्तम कथा आहे असे कळविले. दोन दिवस हा ‘ठसा’ पुन्हा पुन्हा उमटत गेला. हे मेसेज वाचताना मला खलील जिब्रानचे एक वाक्य आठवले.. ‘What I say with one heart will be said tomorrow by thousand of hearts.’

त्या दिवशी अकस्मात अनेक हृदयांनी माझी कथा सांगितली. लेखकाच्या जीवनात याहून मोठा आनंद काय असू शकेल? काही दिवसांपूर्वी अभिजित प्रकाशनच्या वाळिंबेंनी ही कथा उचलली. तिला (आणि तिच्या उत्तरार्धाला) एका सुरेख पॉकेटबुकचे रूप दिले. आता उत्सुकता आहे ती या कथेच्या पुढल्या प्रवासाची!

vvpadalkar@gmail.com