लेखक महावीर जोंधळे यांनी अमेरिकेतील वास्तव्यात निरंतर भटकंती केली. या भटकंतीत त्यांना जाणीव झाली की, इथल्या जादुई दुनियेत न अडकता, अमेरिकेला केवळ एक बडे भांडवलशाही, चंगळवाद व भोगवादास प्रेरणा देणारे राष्ट्र म्हणून हिणवण्यापेक्षा भारताच्या प्रगतीसाठी आपण त्यांच्याकडून नेमके काय घेऊ शकतो याचा विचार करणे अधिक उचित ठरेल. ‘आम्ही लटिके ना बोलू…’ हे पुस्तक म्हणजे या विचारांचा प्रत्यय होय. या प्रवासात लेखकाच्या अजेंड्यावर प्रामुख्याने होती ती शेती. तिथली शेततळी, शेतातली घरं, मनसोक्त चरणाऱ्या गाई, भरपूर दूधदुभतं, दारोदारी डेअरी धंदा, शेती अवजारांची दुकानं, नियोजनपूर्ण खेडी असे चित्र या भटकंतीत त्यांना दिसले. लेखकाने अमेरिकेतील दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिमेच्या काही राज्यांची निवड करून तिथली शेती, तंत्रज्ञान, शिक्षण, निसर्ग, पर्यावरण ते मानवनिर्मित अवर्णनीय वास्तू यांचा अभ्यास केला. कॅलिफोर्नियात शेतीचा अभ्यास करताना त्यांना जाणीव झाली की, तिथल्या शेतकऱ्याला कोणाकडे काही मागावे लागत नाही. भारतात नेमकी याउलट परिस्थिती आहे. अ‍ॅरिझोनातील वैविध्यपूर्ण निसर्ग-कलाकृतीु त्यांच्या संवर्धनाचे रसाळ वर्णन पुस्तकात येते. स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांचे स्वातंत्र्य, तरुणाईच्या दृष्टीने सकारात्मक बदल इ. बाबीही लेखकाने या भ्रमंतीत टिपल्या आहेत. अमेरिका केवळ भौतिकदृष्ट्याच प्रगत नाही, तर तिथली सामाजिक, राजकीय प्रगल्भताही महत्त्वाची आहे. अमेरिकेच्या विकासाकडे वेगळ्या नजरेने पाहताना तिथल्या विकासाचा ‘हट के ’ पद्धतीने विचार करण्याचा लेखकाचा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल.

‘आम्ही लटिके ना बोलू…’- महावीर जोंधळे, लोकवाङ्मय गृह, पृष्ठे- १४५, मूल्य- २०० रु.

पडद्यामागील बातम्यांचा वेध

आपल्याकडे खासगी वृत्तवाहिन्यांना तीन दशकांचा इतिहास आहे. पूर्वी खासगी मराठी वाहिन्यांवर बातम्या तसेच मनोरंजनपर कार्यक्रम असे स्वरूप होते. आता स्वतंत्र वृत्त व मनोरंजन वाहिन्या निर्माण झाल्या आहेत. वृत्तवाहिन्यांच्या एकूणच वाटचालीचा आढावा ‘ब्रेकिंग न्यूज’ या पुस्तकात संतोष गोरे यांनी घेतला आहे. त्यांना अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. वृत्तवाहिन्यांचे काम कसे चालते, त्याची रचना, बातम्यांचा स्रोत, वृत्तनिवेदकांची जबाबदारी, स्टुडिओची रचना, त्यात काम कसे चालते याबद्दलचं कुतूहल या पुस्तकाने शमवलं आहे. एखादी मोठी बातमी आल्यावर प्रत्यक्ष जो बातमीपत्र काढतो (बुलेटिन प्रोड्युसर) त्याच्यावर किती दबाव असतो आणि या दबावात कसे काम करावे लागते याची कल्पना वाचकांना येईल. ‘टीआरपी’ वाहिन्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याआधारे जाहिरातदार वाहिन्यांना जाहिराती देतात. टीआरपी कसा मोजला जातो, हे एका प्रकरणात सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. कालानुुरूप वृत्तवाहिन्यांमध्ये होणारे बदल… उदा. प्रमुख महानगरांमधील बातम्यांना प्राधान्याने जागा का मिळते, याचे विश्लेषण या माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांशी बोलून त्यांनी मांडले आहे. एखादी बातमी आल्यापासून ती पडद्यावर येईपर्यंतचा तिचा प्रवास कसा असतो, हे पुस्तक वाचल्यावर समजून येते.

‘ब्रेकिंग न्यूज, जग मराठी न्यूज चॅनेल्सचे’ – संतोष गोरे, सदामंगल पब्लिकेशन,

पृष्ठे : ८०, किंमत : १५० रुपये.