20 September 2019

News Flash

‘धि गोवा हिंदु..’चे शतक           

‘धि गोवा हिंदु’च्या कार्याचा धांडोळा घेणारा लेख..

|| अरविंद पिळगावकर

गोमंतकीयांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय निकडींची पूर्तता करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘धि गोवा हिंदु असोसिएशन’ या संस्थेचा शतकपूर्ती सांगता सोहळा आज (२५ ऑगस्ट) रोजी मुंबईत होत आहे. त्यानिमित्ताने ‘धि गोवा हिंदु’च्या कार्याचा धांडोळा घेणारा लेख..

गेल्या शतकातला गोमंतक हा तसा शांत आणि सुशेगात प्रांत. (आजही बऱ्याच अंशी तो तसाच आहे.) पोर्तुगीजांचा अंमल असलेला. परंतु इथल्या चाकोरीबद्ध, सुशेगात जीवनाला कंटाळलेल्या आणि काहीतरी वेगळं करून दाखविण्याची जिद्द बाळगणाऱ्या अनेकांनी तेव्हा गोव्याबाहेरचा रस्ता धरलेला. शिक्षणासाठी वा रोजगार-धंद्यासाठी बऱ्याच लोकांनी मुंबई गाठली. अशांपैकी काही मंडळींनी एकत्र येऊन, आपापसात विचारविनिमय करून गोंयकार बांधवांसाठी २४ ऑगस्ट १९१९ या दिवशी एक संस्था स्थापन केली. नाव ठेवलं- ‘धि गोवा हिंदु असोसिएशन’! गोमंतकीय हिंदूंच्या सर्वसाधारण हितासाठी स्थापन झालेली ही संस्था काळाची निकड ठरली. गोमंतकीय लोकांच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन संस्थेने त्यादृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्य हे ‘गोवा हिंदु’चे प्राधान्याचे उपक्रम असून संस्थेच्या प्रारंभापासून आतापर्यंत या क्षेत्रांत संस्था जोमाने सक्रीय आहे.

सामाजिक-वैद्यकीय उपक्रमांतर्गत वैद्यकीय फंड, वसतिगृहे, महिला समिती आदी कार्ये तसेच रुग्णचिकित्सा केंद्र, बालक-पालक मार्गदर्शन केंद्रे संस्थेने सुरू केली. त्यात नामांकित डॉक्टरांच्या सेवेचा लाभ रुग्णांना घेता आला. आज संस्थेतर्फे गोमंतकीयांनाच नव्हे, तर इतरांसाठीही वैद्यकीय मदत दिली जाते. शिक्षणामुळे संस्कार आणि संस्कारांतून माणूस घडतो हे लक्षात घेत संस्थेतर्फे आर्थिकदृष्टय़ा कमजोर, पण हुशार आणि होतकरू गोमंतकीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवत्ता पारितोषिकेही दिली जातात.

एकीकडे हे सामाजिक कार्य सुरू असतानाच ‘गोवा हिंदु’च्या कार्यकर्त्यांना त्यांचं नाटय़वेड स्वस्थ बसू देत नव्हतं. १९२७ साली संस्थेचे अध्यक्ष आणि कोकणी चळवळीचे प्रणेते  वामनराव वर्दे यांनी फ्रेंच नाटककार मोलिएर याच्या एका प्रहसनावरून रूपांतरित  केलेल्या ‘मोगाचे लग्न’ या कोंकणी विनोदी नाटकाचा प्रयोग सादर केला आणि सर्वाना तो खूपच आवडला. त्यानंतर प्रत्येक संमेलनात कोंकणी आणि मराठी नाटकांचे प्रयोग होऊ लागले. तेव्हा हा उपक्रम ‘हौशी’ या सदरातच मोडणारा होता.

१९५५ साली महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाटय़स्पर्धाच्या घोषणेमुळे संस्थेच्या नाटय़प्रेमी सभासदांनी एकत्र येऊन पहिलं नाटक बसवलं ते शं. प. जोशी यांचं ‘खडाष्टक’! दिग्दर्शक होते जुने-जाणते नटश्रेष्ठ  मा. दत्ताराम. स्पर्धेच्या पदार्पणातच नाटकाने पहिलं पारितोषिक आणि चार वैयक्तिक पारितोषिकं पटकावली. यामुळे सर्वाचाच आत्मविश्वास वाढला आणि १९५६ साली संस्थेच्या कला विभागाची रीतसर स्थापना झाली. आणि पुढील चार-पाच वर्षांत संस्थेने ‘सं. संशयकल्लोळ’, ‘करीन ती पूर्व’, ‘सं. शारदा’, ‘सं. मृच्छकटिक’ ही नाटकं पेश करून अनेक पारितोषिके पटकावली. नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांचं दिग्दर्शन आणि पं. गोविंदराव अग्नि यांचं संगीत मार्गदर्शन यांचा लाभ झाल्यामुळे रामदास कामत, आशालता, मोहनदास सुखटणकर, विनायक पै, नंदकुमार रावते, रघुवीर नेवरेकर अशी कलाकारांची मांदियाळीच त्यांतून तयार झाली.

हौस म्हणून केलेल्या या नाटकांतून आर्थिक लाभाची अपेक्षा नव्हतीच; पण नाटकं बसवणं आणि ती चालवणं हे खर्चिक काम असतं. म्हणून मग साधकबाधक विचार करून कला विभागाने व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल टाकण्याचं ठरवलं आणि पदार्पणातच इतिहास घडवला. १९६२ साली प्रा. वसंत कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या ऐतिहासिक नाटकाने संस्थेच्या व्यावसायिक पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. दिग्दर्शक होते मा. दत्ताराम! या नाटकाने रंगभूमीला डॉ. काशीनाथ घाणेकर हा देखणा ‘संभाजी’ मिळाला.

या नाटकाच्या अपूर्व यशानंतर संस्थेने कानेटकरांचेच ‘सं. मत्स्यगंधा’ हे पौराणिक नाटक रंगभूमीवर आणले. पं. जितेंद्र अभिषेकी हा नवा संगीत दिग्दर्शक त्याद्वारे नाटय़सृष्टीला मिळाला. त्यांच्या संगीताच्या कस्तुरीगंधाने ‘मत्स्यगंधा’ योजनगंधा झाली.

इजा, बिजा आणि तिजा ही उक्ती सार्थ ठरविण्यासाठीच की काय, पुन्हा एकदा संस्थेने वसंतरावांचे ‘लेकुरे उदंड जाली’ हे मुक्तछंदात्मक नाटक रंगभूमीवर आणलं. बोलण्यात गाणं आणि गाण्यात बोलणं ही अत्यंत नावीन्यपूर्ण शैली या नाटकानंच प्रथम प्रयोगान्वित केली. गोमंतकातील  ‘तियात्र’ या कोंकणी नाटय़प्रकारातील संगीतावर आधारित या सादरीकरणाला संगीत देऊन पं. अभिषेकींनी आपल्या प्रतिभेच्या एका वेगळ्याच पैलूचं दर्शन घडवलं. या नाटकामुळे मो. ग. रांगणेकरांसारखे कलातपस्वी दिग्दर्शक संस्थेच्या आप्तांपैकी एक झाले. तसंच श्रीकांत मोघेंसारखा हरहुन्नरी नट प्रकाशात आला. वसंतराव कानेटकरांच्या या नाटय़त्रयीमुळे संस्थेचं पाऊल व्यावसायिक रंगभूमीवर पक्कं रोवलं गेलं आणि पुढील यशाची वाट सहज, सुकर झाली.

यानंतर ‘नटसम्राट’, ‘मीरा मधुरा’, ‘संध्याछाया’, ‘हयवदन’, ‘नागमंडल’, ‘तू तर चाफेकळी’, ‘स्थळ : स्नेहमंदिर’ अशा यशस्वी नाटकांसमवेत ४४ इतर नाटके संस्थेने मंचित केली. वसंत कानेटकर, तात्यासाहेब शिरवाडकर, जयवंत दळवी हे प्रथितयश नाटककार आणि डॉ. श्रीराम लागू, शांता जोग, विक्रम गोखले, विजया मेहता, भक्ती बर्वे, दामू केंकरे, सुधा करमरकर, ललिता केंकरे, विजय केंकरे, अरविंद देशपांडे अशा अनेक कलावंतांमुळे कला विभाग समृद्ध झाला.

या वाटचालीत संस्थेला अनेक आपत्तींनाही तोंड द्यावं लागलं, परंतु कार्यकर्त्यांनी खचून न जाता परिस्थितीवर मात करून आपलं कार्य सुरूच ठेवलं.

आज साहित्य तसेच नाटय़क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल संस्थेतर्फे कविवर्य बा. भ. बोरकर पुरस्कार, डॉ. सुभाष भेंडे पुरस्कृत प्रा. जी. ए. कुलकर्णी पुरस्कार, नाटय़समीक्षक शशिकांत नार्वेकर पुरस्कार, मा. दत्ताराम चतुरस्र कलावंत पुरस्कार, अ. ना. महांबरे पुरस्कार आदी पुरस्कार दिले जातात.

संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचं एक ठळक उदाहरण म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेला प्रकल्प- ‘स्नेहमंदिर’ (बांदिवडे, गोवा)! ‘स्नेहमंदिर’ची स्थापना १४ डिसेंबर १९८२ रोजी झाली. पु. ल. देशपांडे यांच्या प्रमुख पाहुणे उपस्थितीत आणि तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाचे उद्घाटन झाले ते डिसेंबर १९८१ मध्ये झालेल्या कला विभागाच्या रौप्यमहोत्सव प्रसंगी! एकाकी आणि निराधार वृद्धांसाठी हक्काचे आश्रयस्थान असावे, या दृष्टिकोनातून ही संस्था सुरू करण्यात आली. आजमितीला तिची व्याप्ती खूपच वाढली आहे. अतिज्येष्ठ, विकलांग ज्येष्ठांसाठी ‘सायंतारा’, ‘स्नेहालय’ हे विभाग सुरू करण्यात आले आहेत. संस्थेतर्फे बालविकास योजना, वैद्यकीय शिबिरे, फिरता दवाखाना, रुग्णवाहिनी सेवा, नर्सिग स्कूल, सृजन कला शिबीर असे विविध उपक्रम राबवले जातात.

‘गोवा हिंदु’च्या या प्रदीर्घ यशस्वी वाटचालीत अनेकांचे योगदान आहे. त्यातही रामकृष्ण नायक यांच्यासारख्या निरलस कार्यकर्त्यांचा आधारवड संस्थेला लाभला, हे संस्थेचं मोठंच भाग्य. त्यांनी कला विभाग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘स्नेहमंदिर’ प्रकल्पात सर्वस्व झोकून देत काम केलं. ज्येष्ठांसाठीच्या ‘स्नेहमंदिर’ प्रकल्पावर आधारित ‘स्थळ- स्नेहमंदिर’ या नाटकाची निर्मितीही संस्थेने केली.

त्यानंतर मात्र कला विभागाचं काम जवळजवळ थंडावल्यासारखं झालं. नंतर आलेल्या नवीन कार्यकारिणीने कला विभागाचे पुनरुज्जीवन करण्याचा घाट घातला. नवीन नाटकाचे प्रयोग करण्याइतका अनुभव गाठीशी नसल्याने छोटे छोटे कार्यक्रम करून मार्गक्रमणा सुरू झाली. प्रायोगिक नाटक, नाटय़संगीताचे कार्यक्रम असा प्रवास सुरू झाला. साहित्य संघाच्या दामू केंकरे नाटय़महोत्सवातही कला विभागाने २०१५ ते २०१९ या पाच वर्षांत आपला सहभाग नोंदवला. अशा रीतीने कला विभागाच्या ‘रायगडाला जाग आली’ आणि इतिहासाची पुनरावृत्ती म्हणून ‘मत्स्यगंधा’ या नाटकांचं पुनरुज्जीवन करण्याचं संस्थेनं ठरवलं. २४ सप्टेंबर २०१७ ला ‘मत्स्यगंधा’ नवीन कलाकारांच्या संचात पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरलं आणि डिसेंबर २०१७ ला नाटकाचा रौप्यमहोत्सवही साजरा झाला. अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या १४ जून २०१८ ला झालेल्या गो. ब. देवल स्मृती समारंभात सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाचा पुरस्कार संस्थेच्या ‘सं. मत्स्यगंधा’ या नाटकाला मिळाला. संस्थेच्या कला विभागासाठी ही अभिमानास्पद अशीच गोष्ट आहे.

धि गोवा हिंदु असोसिएशनने ४ ऑगस्ट २०१८ रोजी शतकमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्ताने २५ ऑगस्ट २०१८ या दिवशी मुंबईत यशवंत नाटय़मंदिर येथे एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर होते. या प्रसंगी  ‘शतक- नाटय़धारा’ हा संस्थेच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडणारा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना आणि सादरीकरण अरविंद पिळगावकर यांचं होतं. संस्थेच्या या शतकमहोत्सवी वाटचालीचा सांगता समारंभ रविवार, २५ ऑगस्ट २०१९ रोजी होत आहे.

‘महाराष्ट्र-गोमंतामधले भावबंधनचि ज्यांनी विणिले’ असे गोमंतकीयांचे वर्णन कविवर्य प्रा. वसंत बापट यांनी नांदीमध्ये केलेलं आहे. हे नातं यापुढेही असंच अतूट राहो, हीच प्रार्थना.

First Published on August 25, 2019 12:12 am

Web Title: the goa hindu association mpg 94