|| प्रवीण दशरथ बांदेकर

आटपाट नगर होतं. खाऊन-पिऊन सुखी होतं. आनंदात जगत होतं. आटपाट नगराच्या वेशीबाहेर राहत होत्या सात बहिणी. सात बहिणींची सात घरं. सात घरांत फक्त सातजणी. पण गंमत अशी की, या सात बहिणी सगळ्यांनाच दिसू शकत नव्हत्या. पुरुषांना तर नाहीच नाही. बायकांतही फक्त कुमारिकांना. हे असं का? आम्हाला का नाही दिसत सात बहिणी? आणि यांचीच घरं अशी वेशीबाहेर का? कुणी काढलं यांना नगराबाहेर? या प्रश्नांना उत्तरं नव्हती कुणापाशी. कुणाला काही माहीत नव्हतं.

हा तसा सार्वत्रिक अनुभव. कुणालाच काही माहीत नसतं. आटपाट नगराच्या आत आपण  आनंदात जगत असतो. आपल्याला कसली ददात नसते. कसली फिकीर नसते. त्यामुळे वेशीबाहेर काय आहे, कोण राहतंय, का राहतंय, आपल्याला काही माहीत नसतं. सहज माहीत झालं तर ठीक; मुद्दामहून माहीत करून घेण्याचे कष्ट आपण सहसा घेत नाही. आपण बरं की आपला संसार बरा… जगाच्या उठाठेवी हव्यात कशाला, असे आपले संस्कार. अगदी असंच काहीसं माझ्या बाबतीतही झालं. जन्मापासून मी जिथं वावरतोय, माझ्या पंधरा-वीस पिढ्या ज्या गावात नांदत आल्या आहेत, त्या गावाच्या वेशीबाहेरचं आपल्याला काही माहीत नाहीये, हे मला एका गोरज वेळेला कळून आलं.

जेमतेम वर्षभरापूर्वीची गोष्ट. होळीसाठी गावी गेलो होतो. अचानक एका रात्री ‘जहां भी हो वहीं रहिये’ची घोषणा झाली. आम्ही सगळे निस्सीम देशभक्त असल्यामुळे आणि महामारीला हरवण्याच्या इष्र्येने पेटून उठल्यामुळे मिळालेला आदेश शिरसावंद्य मानला. सगळ्या गैरसोयी सहन करीत घरीच ठाण मांडून राहिलो. महाराष्ट्र आणि गोमंतकाच्या सीमेवरच्या गावातलं हे आमच्या वाडवडिलांचं मूळ घर. इथं शहरातल्या माणसांचा वेळ जावा अशी साधनं फारशी नाहीत. ना टीव्ही, ना वर्तमानपत्रं. फोनला रेंज कुठे मिळेल याच्या शोधात फिरावं लागतं. साहजिकच रिकामटेकडे घरात बसून सगळे कंटाळले होते. तरी एक बरं होतं : दारातून वाहणारी नदी होती आणि घराच्या पाठीमागे झाडापेडांनी गच्च भरलेला डोंगर होता. त्यामुळे करवंदं, जांभळं, रातांबे, तोरणं, काजूबोंडू असा रानमेवा शोधत डोंगरात भटकणं आणि नदीत डुंबणं हा तरी वेळ घालवायचा एक मार्ग होता.

तशातच एकदा कंटाळलेल्या मुलांना घेऊन मी नदीकाठानं फिरत निघालो. भटकत भटकत आम्ही वस्तीपासून बरेच दूर आलो होतो. पुढे पुढे सगळाच निर्जन भाग. रानझुडपांची दाटीही बरीच. वाट काढत थोडं जपूनच पुढे जावं लागत होतं. इतक्यातच काहीशा उंच टेकाडासारख्या ठिकाणी एकावर एक रचलेले दगड असावेत तसं काहीतरी दिसलं. काय असावं बरं, म्हणून अचंबा करीत जवळ जाऊन पाहिलं तर पुरुषभर उंचीची तुळशी वृंदावनं दिसली. एक-दोन नव्हेत, तर चक्कसात. खूप जुनी, दगडी. आसपास लाजरी, रानमोडीसारखं रानगवत आणि हसोळी-करवंदीच्या वगैरे झाळकटी वाढल्या होत्या. त्यात दडल्याने ओबडधोबड दिसत असली तरी मुळात ते सुबक बांधकाम असावं. त्यांच्या शेजारी काही कमी-जास्त उंचीचे पाषाणही पुरलेले. नदीपात्रापासून जेमतेम चार-पाचशे मीटर अंतरावर ते टेकाड; तरीही तिथं माणसांचा वावर कमीच असावा. गुरं राखणारे या दिशेला येणं बहुतेक टाळत असावेत. अन्यथा हे ठिकाण असं निर्वावर जाणवलं नसतं. काहीशी भीतीदायक अशीच ही जागा वाटत होती. जाणत्यांच्या तोंडून ऐकून मला या जागेविषयी थोडीफार माहिती होती. पण मी याआधी कधी या बाजूला आलो नव्हतो. मुलांना तर नदीकाठी अशी एखादी जागा असेल याची जराही कल्पना नव्हती. त्यामुळेच ही निर्जन जागा नि ती पुराणी वृंदावनं बघून मुलं काही क्षण बावरल्यासारखी झाली.

गावापासून दूर, इतक्या दाट रानात, नदीकाठी ही तुळशी वृंदावनं कुणी आणि कशासाठी बांधली असतील? मुलांच्या मनातलं कुतूहल जागं झालं होतं. ‘बाबा, पूर्वी इथं आपल्या गावाची स्मशानभूमी वगैरे होती की काय?’ संवादने विचारलं. अनेक ठिकाणी नदीकाठी स्मशानभूमी असते हे त्याला माहीत होतं.

‘गाववाले सांगतात- या सात बहिणी आहेत. गावावर शत्रूचा हल्ला झाला तेव्हा शीलरक्षणासाठी त्यांनी नदीच्या कुंडात जीव दिला. काहीजणांना वाटतं, ज्यानं गाव वसवला त्याच्या त्या सात राण्या. त्याच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या. त्यांच्या आठवणीसाठी बांधलेली ही वृंदावनं…’ लहानपणापासून ऐकून माहीत असलेल्या कहाण्या मी मुलांना सांगितल्या.

गार्गी काहीतरी विचार करत गंभीरपणे म्हणाली, ‘तुळशी वृंदावनं म्हणजे बायकांशीच संबंधित काहीतरी असणार, हे नक्की. आणि एवढ्या मोठ्या आकाराच्या… म्हणजे तसंच काहीतरी महत्त्वाचं असणार. नाही तर कोण कशाला एवढा खर्च करेल?’

मी म्हटलं, ‘पण जे काही महत्त्वाचं घडलं होतं, ते काय असू शकतं? लोकांच्या स्मृतींचा इतिहासही फार चुकीचा असेल असं वाटत नाही. बाईचं शील ही गोष्ट आपल्या समाजाला कायमच खूप महत्त्वाची वाटत आली आहे. चुकीचं की बरोबर- ते नंतरचं; पण आपल्या भारतीय लोकांनी ‘बाईनं काय वाट्टेल ते झालं तरी आपली अब्रू जपली पाहिजे,’ असंच कायमच सांगितलेलं आहे. अब्रूसाठी बाईला जीव गमवावा लागला तरी त्यात काही गैर नाही वाटत कुणाला. त्यामुळे एखाद्या आक्रमणाच्या वेळी एखाद्या घरातल्या किंवा गावातल्या काही स्त्रियांनी शत्रूच्या हाती लागून अब्रू गमवावी लागण्यापेक्षा धीरानं नदीचा हा डोह जवळ केला असेल, तर तशीही शक्यता मान्य करायला हरकत नाही.’

गार्गी म्हणाली, ‘आणि अशा गोष्टीचं ग्लोरिफिकेशन करणं समाजाला नेहमी आवश्यक वाटत असतं. त्यामुळे बाकीच्या बायकांना आणि नंतरच्याही पिढ्यांना आपसूकच समजतं, बाईचं शील किती महत्त्वाचं मानलं जातं ते! त्यासाठी प्रसंगी प्राणही गमवावा लागला तरी आपला समाज त्या बायकांना कसं विसरत नाही, त्यांच्या आठवणी जतन करून ठेवतो, त्यांना देवीसमान आदर देतो, हेही मनावर ठसवलं जातं इनडायरेक्टली.’

गार्गीचा तर्क पटण्यासारखा होता. पण सती गेलेल्या बायकांच्या स्मृतीवाली ती दुसरी मिथ्यकथा मात्र मान्य होईलच अशी नव्हती. एक तर सती जाण्याची प्रथा काही विशिष्ट सामाजिक स्तरांतील स्त्रियांपुरती मर्यादित होती. आमच्या गावात नि आजूबाजूच्या परिसरातही तशी काही घरं नव्हती. उलट, कोकणातल्या नि गोव्याच्या या भागात अनेक बहुजन जातींमध्ये पाट लावणे, पुनर्विवाह करणे हेही समाजमान्य होतं. त्यामुळे तशा कुण्या सरदाराच्या बायका एकसमयावच्छेदेकरून सती गेल्या असतील, ही शक्यता जवळपास नव्हतीच. पण असे प्रत्यक्षात सती गेल्याचे काही पुरावे नसले तरी सती आणि सतीच्या नावाने बांधलेल्या तुळसी, घुमट्या, देवळं वगैरे अनेक ठिकाणी आढळतात. कदाचित एखाद्या सवाष्ण गेलेल्या बाईलाही ‘सती’ संबोधून तिच्या स्मृती जपल्या गेल्या असाव्यात. काहीही असो, सती ही काहीतरी भयंकर पवित्र समजली जाणारी संकल्पना लोकांच्या मानसिकतेत यानिमित्ताने रुजवली गेली आहे, हे मात्र नक्की. आपल्या गावात अशी एखादी ‘सती’ होती हेसुद्धा काही लोक अनेकदा अभिमानाने सांगत असतात, हेही याच मानसिकतेचं द्योतक आहे.

गार्गीने मग एक नवाच मुद्दा काढला. ती म्हणाली, ‘आपण हा असा तरी विचार कशाला करायचा? मला काय वाटतं, पोर्तुगीज राजवटीच्या काळात गोव्यातून तिथल्या धर्मछळाला कंटाळून आपले लोक देवबिव घेऊन पळून आलेत ना इकडे? मग कदाचित त्याच आपल्या पूर्वजांच्या या स्मृती नसतील कशावरून?’

अचानक मला आठवलं… काही दिवसांमागे नद्यांकाठच्या सांस्कृतिक जीवनाविषयीचं एक पुस्तक वाचनात आलं होतं. त्यातून विश्वास बसू नये अशा अनेक गोष्टी नव्यानेच कळल्या होत्या. वेगवेगळे मानवी समुदाय नद्यांच्या काठी वसले; वेगवेगळ्या मानवी संस्कृतीही नद्यांच्या काठी विकसित झाल्या, हे आपल्याला माहीत असतं. पण नदीकाठच्या या मानवी वसाहतींच्या नदीशी जोडलेल्या चित्रविचित्र श्रद्धा, चालीरीती, परंपरा यांविषयी आपल्याला फारसं माहीत नसतं. काही गोष्टी काळाच्या ओघात लुप्त झालेल्या असू शकतात. काही गोष्टी आपल्याला परिचित असलेल्या संस्कृतीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. त्यामुळे साहजिकच आपण चकित होऊन जातो. आपल्या पूर्वजांच्या कल्पकतेचं कौतुक करावं की भयगंडातून त्यांनी स्वीकारलेल्या रूढींची चिरफाड करावी, आपल्याला कळेनासं होतं. मला चांगलं आठवत होतं, त्या पुस्तकातला एक संदर्भ वाचताना मी चमकलो होतो. काही समूहांत नदीकाठी वस्ती करताना नदीला कुमारिका अर्पण करण्याच्या प्रथेविषयी त्यात नोंदवलं होतं. सती जाणाऱ्या स्त्रीप्रमाणेच एक वा अनेक कुमारिकांना सजवलं जात असे आणि वाद्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डोळे, तोंड, हात-पाय बांधून त्यांना नदीच्या वाहत्या पात्रात सोडलं जात असे. ज्या नदीकाठी वास्तव्य करायचं आहे तिनं काही विघ्न आणू नये म्हणून तिला संतुष्ट करण्याचा हा विधी. पण मग गार्गी म्हणतेय तसे आपलेही पूर्वज असेच सात डोंगर ओलांडून इथे आले, या नदीकाठी वसले. त्यांनीही असं काहीतरी अघोरी कृत्य केलं नसेल ना? आणि मागाहून त्याची स्मृती अशा वृंदावनांमधून जपली असेल. असेल वा नसेल; पण मुलीला हे सांगण्याचं धाडस त्या क्षणी तरी मला झालं नाही. आपल्या स्वार्थासाठी पिढ्यान् पिढ्या स्त्रीला ‘नकुशी’ ठरवून अन्याय-अत्याचार करणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीचा मी वर्तमानातला प्रतिनिधी. कधीही, कशानंही भरपाई न होणाऱ्या त्या पापाचं ओझं वाहणाऱ्या माझ्या मनात दाटून आलेला अपराधभाव मला मुलीकडे नजर वर करून पाहण्याचीही हिंमत देत नव्हता. कदाचित वेशीबाहेरच्या त्या कुमारिकांकडे पाहायचे स्वच्छ, निर्मळ डोळे माझ्याकडे नव्हते, हे जास्त खरं होतं.

गावोगावी आढळणाऱ्या अशा स्मारकांमागे असाही काही काळाकुट्ट इतिहास असू शकतो. इतिहासाच्या पुस्तकात कुठल्याच पानावर एखादीही ओळ पुराव्यादाखल सापडत नाही. त्यामुळे लोकस्मृतींवर अवलंबून राहावं लागतं. तर्ककुतर्क करून कुठे काही धागेदोरे जुळतात का पाहावं लागतं. नेहमीच यात यश येतं असं नाही. बऱ्याचदा इतिहास उरीपोटी जपणाऱ्या या खाणाखुणा तशाच संदर्भहीन पडून राहतात. काळासोबत सांगोवांगीच्या कहाण्यांची पुटं त्यांच्यावर चढत राहतात… गडद होत जातात. आपण केलेल्या पापाचं उदात्तीकरण पिढ्यान् पिढ्या होत राहतं. आपल्या पूर्वजांच्या बऱ्या-वाईट जगण्याचा पुरावा असलेलं हे खास आपलंच असं काहीतरी शोधायला कुणापाशी वेळही नसतो. मला ठाऊक आहे, सात बहिणींच्या या पाषाणी स्मारकांचंही असंच होऊन जाणार आहे. वेशीबाहेरच्या इतिहास आणि संस्कृतीशी जोडणारा एक दुवा आपल्याच नतद्रष्टपणामुळे नष्ट होऊन गेला आहे. वेशीबाहेरच्या सात बहिणींची गोष्ट अधुरी राहिली आहे, हेच तेवढं मग मनात छळत राहील!

samwadpravin@gmail.com