परवा ‘व्हॉटस् अप’वर एका अनोळखी फोनमित्राचा मेसेज आला अन् मी अंतर्मुख झालो.  मेसेज होता ६०-७०-८० च्या दशकात मनाने वावरणाऱ्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीयासाठी. मोबाइलच्या त्या स्क्रीनने मला माझ्या बालपणात- यौवनात नेले. किती सुंदर वर्ष होती ती.. दर बुधवारी बिनाका गीतमाला लागायची.. ‘‘मेरे प्यारे भाईयों और बहनों’’.. अमीन सयानींचा आवाज कान तृप्त करायचा. रेडिओ सिलोनमुळे हा प्रदेश पाचूंच्या व्यतिरिक्त प्रायोजित कार्यक्रमासाठीच बनलेला असावा, असे वाटायचे. एकेक ‘बादान’पर चढनेवाले उन गीतोंने हमारा बचपन सँवारा और जवानी सँभाली थी।  ‘टॉप टेन’ची मिरासदारी सुरू व्हायची होती. टेलिव्हिजनचे आगमन मुंबई-पुण्यात झाल्यावर त्या काळ्या-पांढऱ्या पडद्याने आमच्या आयुष्यात रंग भरले. रात्री-अपरात्री बेल वाजवून शेजाऱ्यांच्या वेस्टर्न किंवा ई.सी. टी.व्ही.समोर बठक मारायला आम्हाला संकोच वाटायचा नाही. अँटेना तीन काडय़ांची असावी की नऊ यावर वाद व्हायचे. अँटेनावर बसणारा कावळा हाकलण्यासाठी खास काठीची प्रोव्हिजन असायची. जोराचा वारा आला अन् अँटेना हलली, की ती अ‍ॅडजस्ट करायला अस्मादिक गच्चीत पळायचे. शेजारच्या देशपांडय़ांना ऐकू जाईल याची खबरदारी घेत खाली आईला, ‘‘आता नीट दिसतेय का? मुंग्या गेल्या का?’’ अशी पृच्छा व्हायची.  टी.व्ही. पडदा काळा-पांढरा असल्याने तेव्हा आमचे फारसे बिघडायचे नाही, कारण क्रिकेटही पांढऱ्या कपडय़ाचे, रंगाचे अन् धर्माचे होते. फिक्सिंगचा संबंध तेव्हा फक्त लाख, िडक, गोंद, गम् अन् कॅमलिनशी होता. फेविकॉल का जोड जुळायचा होता. परगावहून आलेल्या पाहुण्यांसाठी ‘आमची माती, आमची माणसं’ही लावले जायचे. ‘ज्ञानदीप’ने ज्ञानाचे निरांजन तेवायचे, तर ‘छायागीत’ आणि ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ने कपॅसिटी क्राऊड जमायचा. तेव्हाचा आमचा दिवस सकाळच्या सदाशिव दीक्षितांच्या बातम्यांनी सुरू व्हायचा अन् संध्याकाळ अनंत भाव्यांच्या गूढगर्भ दाढीत मावळायची. माझा धाकटा मामेभाऊ ‘फुल खिले..’ लागले की, फ्लॉवरपॉट टी.व्ही.वर ठेवायचा. टी.व्ही. ही तेव्हा सार्वजनिक गणपतीसारखी एकत्र येऊन पाहायची गोष्ट होती. आज घराघरांतच नव्हे, तर घराच्या प्रत्येक बेडरूममध्ये टी.व्ही. आहे. डिश ही हातात घेऊन जेवण जेवायची गोष्ट न उरता बाल्कनीत लावायची बाब बनली आहे. ओलावा सरलाय, गोलावा फक्त उरलाय. अँटेनाच्या काडय़ा गेल्यात, माया आणि शेजारधर्म काडीमात्रही उरला नाही. काळा पांढरा का असेना, तेव्हाचा टी.व्ही. हा आमच्या आयुष्यात अभिजात संगीत, नृत्य, नाटय़ यांची पखरण करायचा. ‘हम लोग’ आले अन् वेळीअवेळी टी.व्ही. बंद करून जेवण मागण्याऱ्या नवऱ्यास  सीरिअल किलरची उपाधी प्राप्त झाली. सासवा-सुना घरातून टी.व्ही.च्या पडद्यात गेल्या अन् गोंधळात अधिकच भर पडली.
जी बाब टी.व्ही.ची तीच टेलिफोनची. शेजारच्या डॉ. कुलकर्णीचा फोन नंबर द्वारा म्हणून आमच्या नातेवाईकांना सांगण्यात आम्हाला कमीपणा नव्हता.  आमच्या पँटीचे बॉटम ४० इंच असायचे. गुरुशर्ट घातला की, आमची मान राजेश खन्नासारखी ऑटोमॅटिक वाकडी व्हायची. कॉलेजला जायला आमच्याकडे बहिणीची लेडिज सायकल होती. ती वापरण्यात आम्हाला कधी कमीपणा वाटला नाही.  बाइक्सचा आजच्यासारखा उदय झालेला नव्हता.  नाही म्हणायला राजदूत नावाची माहेरवाशीण जाऊबाई आणि एक जावा होती, पण खरे राज्य होते ते हमारा बजाजचे. चेतक आठ वर्षांनी, फिएट १२ वर्षांनी, टेलिफोन जनरल कॅटेगरीत १८ वर्षांनी मिळायचा. या साऱ्या गोष्टींनी आम्हाला वाट पाहायला शिकवले. प्रतीक्षेतला परमानंद दिला. नेसकॅफे अवतरली अन् आम्हाला जीवनातल्या ‘इन्स्टंट’पणाची चटक लागली. आता आम्हाला वाट पाहणे ‘सहेनारे’ झाले अन् गोष्टी उद्या-परवा नाही तर काल व्हाव्यात असे वाटू लागले. ७०-८० च्या दशकात कॅमेरा ही आमच्यासाठी अप्रूप गोष्ट होती. रिळातले ३६ च्या ३६ फोटो चांगले यायलाच पाहिजेत, नाही तर पसे फुकट गेल्यासारखे वाटायचे. प्रिन्टस् डेव्हलप करून यायला तीन-चार दिवस लागायचे, हे सांगितल्यावर आमची नातवंडे ‘आजोबा, किती बॅकवर्ड होतात,’ असे म्हणतात. पण त्या बॅकवर्डनेसमुळे आम्ही वाट पाहायला शिकलो हे खरे. ‘आबा’चे म्युझिक, नझिया हसनचे ‘आप जैसा कोई’ हे आमच्यासाठी आजच्या भाषेत ‘रॉकिंग’ होते. घरातली टी.व्ही., फ्रीज आणि मिक्सर.. ही आमची ‘गॅजेटस्’ होती, पण या साऱ्यात आम्ही सुखी होतो. आजच्या दृष्टीने आम्ही ‘टेक्नॉलॉजिकली चॅलेज्ण्ड’ होतो.
आज साधने आहेत, सुख हरवलंय. आयुष्यात रंग अवतीभोवती आहेत, आत नाहीयेत. कोलाहल आहे, सूर गमावलाय. मिठय़ा आहेत, स्पर्श हरवलाय.  हे सगळं मला अस्वस्थ करतंय. नव्या पिढीच्या एका प्रतिनिधीला हे सांगितल्यावर तो म्हणाला, ‘‘अंकल, पुढच्या १० वर्षांत मोबाइल फोन, स्क्रीन, टच-स्क्रीन हे सगळं नाहीसं होईल. माणसं एकमेकांशी मनगटावरच्या घडय़ाळातून बोलतील, ऑर्डर देतील, पशाचे व्यवहार करतील आणि अक्षरे स्क्रीनवर नाही तर तुमच्या डोळ्यांसमोर हवेत उमटतील, आपण त्याला ‘हेड-अप-डिस्प्ले’ म्हणू.
..मला गरगरायला लागले. डोळ्यांसमोर अक्षरे.. म्हणजे आता माणसे निदान फोनचे यंत्र कानाला लावून रस्त्याने चालतात, क्रॉस करतात, ड्राइव्ह करतात. तेव्हा तर ती फक्त हवेत बोटे फिरवतील.. अदृश्य अक्षरांना स्पर्श करतील.. हवेतल्या हवेत बोलतील.. प्रतिसाद म्हणून हसतील.. डाफरतील.. फक्त एकमेकांशी बोलणार नाहीत.
    ..मी पटकन डोळे मिटून घेतले.