|| पराग कुलकर्णी

आपण कोण? कोठून आलो? का आलो? आपल्या या जगण्याला काही अर्थ आहे का? असलाच तर तो काय? असे प्रश्न आपल्याला कधीतरी पडतातच. याची उत्तरं आपण मग कधी देव, धर्म, अध्यात्मात शोधतो. कधी तत्त्वज्ञानात, तर कधी विज्ञानात! बऱ्याचदा विज्ञानाने शोधलेल्या गोष्टी या आपल्या आधीच्या समजुती, श्रद्धा आणि विचारांपेक्षा वेगळ्या असतात आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यास आणि ही नवीन माहिती आपलीशी करण्यात अनेक वर्षे जातात. आजची आपली संकल्पना म्हणजे असाच एक शोध आहे, ज्याने अनेक समजुतींना मुळापासून हादरा दिला. डार्वनिचा उत्क्रांतीवाद (Theory of Evolution)!

चार्ल्स डार्वनिने १८५९ साली आपल्या ‘On the Origin of Species’ या पुस्तकाद्वारे उत्क्रांतीचा सिद्धान्त मांडला. त्याला आधार होता डार्वनिने १८३० च्या दशकात केलेल्या समुद्रप्रवासाचा.. ज्यात त्याने दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील प्राण्यांचा, पक्ष्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास केला होता.  खरं तर डार्वनि आणि आल्फ्रेड वॉलेस या दोघांनीही हा सिद्धान्त स्वतंत्रपणे शोधला आणि दोघांनी मिळून तो १८५८ साली प्रकाशितही केला होता. पण डार्वनिच्या पुस्तकामुळेच या सिद्धान्ताला खरी प्रसिद्धी मिळाली.

उत्क्रांती (Evolution) म्हणजे हळूहळू बदलत जाणे, विकसित होत जाणे. उत्क्रांतीवादाचा सिद्धान्त सांगतो की, पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टी ही एकाच सजीवापासून (जो सुरुवातीच्या काळातील एकपेशीय जीव असू शकतो.) हळूहळू उत्क्रांत होत निर्माण झाली आहे. माकडापासून माणूस निर्माण झाला- असे याचे एक थोडे चुकीचे, पण समजण्यासाठी सोपे उदाहरण म्हणून सर्वत्र वापरले जाते. खरं तर ‘माकडापासून माणूस निर्माण झाला’ असे म्हणण्यापेक्षा ‘माकडाचे आणि माणसाचे पूर्वज एकच होते’ हे म्हणणे जास्त सयुक्तिक आहे. एवढंच कशाला- झाडे, प्राणी, पक्षी आणि माणूस या सर्वाचाच एक कोणीतरी पूर्वज होता असेही आपण म्हणू शकतो. पण हे सगळं झालं कसं, याचं उत्तर उत्क्रांतीवाद अजून एका संकल्पनेतून देतो- ‘नैसर्गिक निवड’ (Natural Selection)! ही निवड आहे सजीवांमध्ये होणाऱ्या बदलांची. कोणते बदल स्वीकारले जातात आणि कोणते नाकारले जातात, आणि कसे, हे नैसर्गिक निवडीद्वारे ठरते. उदा. समजा, एक झाडावर एकाच प्रजातीचे, पण दोन रंगांचे कीटक राहतात. एकाचा रंग हिरवा, तर दुसऱ्याचा लाल. एक पक्षी रोज येऊन हे कीटक खातो. आता ज्या कीटकांचा रंग हिरवा आहे ते हिरव्या पानांमध्ये लपले जातील, तर ज्यांचा लाल आहे ते उठून दिसतील. याचा परिणाम म्हणजे पक्षी लाल रंगांचेच कीटक जास्त प्रमाणात पकडू शकेल. त्यामुळे जास्त हिरवे कीटक जिवंत राहतील आणि अजून नवीन हिरवे कीटक जन्माला घालतील. काही काळातच त्या झाडावरचे लाल कीटक नामशेष होऊन फक्त हिरवे कीटकच उरतील. या उदाहरणात जगण्यासाठी निवड झाली ती हिरव्या कीटकांची. का? कारण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे गुणधर्म केवळ त्यांच्यातच होते. अशा प्रकाराने नियमन असण्यालाच नैसर्गिक निवड म्हटले आहे. नैसर्गिक निवड कशा प्रकारे काम करते हे दर्शविणारे प्रसिद्ध वाक्य म्हणजे- Survival of the fittest! अर्थात येथे फिट असणे म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि पुनरुत्पादन करून आपली प्रजाती जिवंत ठेवण्याची क्षमता असणे असा अर्थ होतो.

सजीवांमध्ये पिढय़ानुपिढय़ा छोटे छोटे बदल होत असतात. नैसर्गिक निवडीने त्यातील काही बदल टिकतात आणि पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवले जातात. त्यामुळे  प्रत्येक येणारी पिढी ही आधीपेक्षा थोडी वेगळी असते. हेच चक्र जर करोडो वर्षे असेच चालू राहिले तर मूळ सजीवांपेक्षा नंतर येणारे सजीव हे पूर्णपणे वेगळे असू शकतात आणि त्यातूनच आज आपल्याला दिसणारी विविधता निर्माण झाली आहे.

देवाने ही सृष्टी, प्राणी, पक्षी, झाडे, फुले बनवली आणि त्याचसोबत त्याचा सर्वात आवडता प्राणी माणूस बनवला.. अशा गोष्टी थोडय़ाफार फरकाने आपल्याला सगळ्याच धर्मात आणि संस्कृतीमध्ये आढळतात. खूप आधीपासून आपण कोण आणि कुठून आलो, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अशा गोष्टींचा वापर करण्यात येतो. अर्थातच अशा गोष्टींवर खूप विश्वास असणाऱ्या लोकांनी उत्क्रांतीच्या सिद्धान्ताला विरोध केला.. अजूनही करत आहेत. खरं तर डार्वनिच्या काळात उपलब्ध नसलेले अनेक पुरावे आता आपल्यापाशी आहेत. गुणसूत्रे (genes) आज आपल्याला सजीवांमध्ये बदल कसे होतात आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते कसे हस्तांतरित होत राहतात हे दाखवतात. अनेक जीवाश्म (प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष) सापडले आहेत- जे उत्क्रांतीच्या मधल्या संक्रमण (transitionary) अवस्था दाखवतात. इतरही अनेक विज्ञानशाखांतून उत्क्रांतीबद्दल आपल्याला अनेक पुरावे आणि अधिक माहिती मिळाली आहे.

जे आज आहे ते असेच निर्माण केले गेले आहे आणि ते पुढेही राहील, ही समजूत डार्वनिने खोडून काढली. एका सतत बदलणाऱ्या आणि जगण्यासाठी संघर्ष करावा लागणाऱ्या जगाचं चित्र डार्वनिने जगासमोर मांडलं. पण उत्क्रांतीवादाचा चुकीचा आणि एकांगी अर्थ काढून वंशवादाला वैज्ञानिक अधिष्ठान देण्याचाही प्रयत्न पाश्चिमात्य देशांतून मोठय़ा प्रमाणावर झाला. त्याचाच परिणाम म्हणून ज्यूंचा नरसंहार आणि आक्रमक धोरणांमुळे  झालेलं महायुद्ध जगाला बघावे लागले. पण त्याचबरोबर उत्क्रांतीवादाचा उपयोग मानसशास्त्रापासून ते समाजशास्त्रापर्यंत अनेक ज्ञानशाखांत आपले आकलन वाढवण्यासाठीही झाला. आपले डोळे उघडणारा, दृष्टी व्यापक करणारा आणि मानवकेंद्रित ‘आम्ही असू लाडके’पासून ‘वसुधव कुटुम्बकम्’ खऱ्या अर्थाने पटवून देणाऱ्या डार्वनिचे त्यासाठी मानावे तेवढे आभार कमीच आहेत.

parag2211@gmail.com