विजय तेंडुलकरांचे ‘दंबद्वीपचा मुकाबला’ हे एक प्रतीकनाटय़ आहे. काल्पनिक नाटय़स्थळ व व्यक्तिनामे घेऊन वास्तव राजकारणावर केलेले भाष्य म्हणजेच हे नाटक. यातल्या पात्रांच्या संवादांवरून पौराणिक नावांच्या बुरख्याखाली लपलेले मंत्र्यांचे चेहरे सहज ओळखू येतात. या नाटकातले संवाद म्हणजे उपरोध व उपहास यांचा उत्कृष्ट नमुना आहे.  आजही हे नाटक राजकारण्यांचे पारदर्शी दर्शन घडवून प्रेक्षकांना सजग करण्याइतके समर्थ आहे. आज ‘दंबद्वीप’सारख्या नाटकांची खरी गरज आहे.

नाटककार विजय तेंडुलकर खळबळ माजवणारा नाटककार म्हणून ‘श्रीमंत’पासूनच ख्यातकीर्त झाले होते. तेंडुलकरही आपल्या नव्या नाटकांतून हे बिरुद अधिकाधिक घट्ट करीत होते. अशा प्रकारच्या त्यांच्याभोवतीच्या हवामानामुळे त्यांची काही महत्त्वाची नाटकं दुर्लक्षित झाली. पूर्वायुष्यात ते पत्रकार होते आणि तरीदेखील त्यांनी एकच राजकीय नाटक लिहिलं, असं एका जाणकार नाटककारानं म्हटलं आहे. राजकारण असलेलं, राजकीय व्यक्ती प्रकट करणारं किंवा प्रचलित राजकारणावरचं रूपक नाटक ही सगळीच नाटकं ‘राजकीय’च म्हटली पाहिजेत. त्यादृष्टीनं ‘घाशीराम कोतवाल’, ‘दंबद्वीपचा मुकाबला’ आणि ‘भाऊ मुरारराव’ ही तेंडुलकरांची तीन नाटकं राजकीय नाटकंच म्हणायला हवीत.
‘दंबद्वीपचा मुकाबला’ व ‘भाऊ मुरारराव’ ही नाटकं त्यात खळबळजनकतेचा अभाव असल्यामुळे असेल कदाचित; दुर्लक्षित केली गेली. नेहमीचे तेंडुलकर या नाटकांतून दिसत नसले तरी ती महत्त्वाची नाटकं आहेत. १९६९ सालच्या राज्य नाटय़स्पर्धेनेही ‘दंबद्वीपचा मुकाबला’ला केवळ उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन साधी चापटीच मारली.
या नाटकाबाबत तेंडुलकरांनी एका मुलाखतीत म्हटलंय की, ‘मोरारजींना उठवून इंदिराबाईंनी उलथापालथ केली, ही परिस्थिती निमित्तमात्र असून राजकारणी माणसांविषयी माझं म्हणणं मी त्यात मांडलं आहे.’ सृजनशील कलावंत एक-दोन ओळीच्या बातमीतून उत्कृष्ट कलाकृती निर्माण करतो, त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजेच तेंडुलकरांचे ‘दंबद्वीपचा मुकाबला’ हे नाटक! या नाटकाविषयी अधिक काही जाणून घेण्यापूर्वी त्याचा परिचय करून घेऊ या.
दंबद्वीपचे राजे विचित्रवीर्य यांच्या राज्यरोहणाचा ६० वा वाढदिवस साजरा होत आहे. सालाबादप्रमाणे जनतेला उद्देशून त्यांचं भाषण चालू आहे. त्यात अनेक विषयांचा समावेश आहे. ‘घायपातीची लागवड’, ‘ग्रे-हाऊंड जातीच्या कुत्र्याची निपज’, ‘भारतीय अध्यात्माचे दंबद्वीपाच्या जीवनातील महत्त्व’ वगैरे वगैरे. पाच मंत्री राजेसाहेबांचे भाषण केव्हा संपते याची वाट बघत ताटकळत उभे आहेत. कर्कशीर्षांना तोंडपुजेपणा आवडत नाही, पण स्वार्थासाठी नातेवाईकांना पुढे ढकलण्यात ते पटाईत आहेत. पिष्टकेशी वारा येईल तशी पाठ फिरवणारे आहेत. राजकारणात मुरलेल्या भगदंताची कातडी गेंडय़ाची आहे. राजकारण आपला धंदाच आहे, असं व्रात्यसोम स्वत:च कबूल करतात. अरण्यकेतू खास महाराजांच्या मर्जीतले आहेत. आपले सगळे मंत्री कुचकामाचे आहेत, हे विचित्रवीर्याना चांगलंच ठाऊक आहे. सगळ्यांना आपापल्या कर्तव्याची जाणीव करून देऊन ते त्यांना जायला सांगतात. फक्त अरण्यकेतूला थांबायला सांगतात.
चित्रकार अश्वारूढ विचित्रवीर्याचं चित्र काढतोय. इतक्यात महाराजांची एकुलती एक मुलगी विजयाराजे येते. तिला ते तिथेच थांबवतात. ‘थांब, मी अश्वावर आहे.’ मुलगी म्हणते, ‘तुम्हीच अश्वासारखे दिसता. टुकार आणि म्हातारे.’ ती निघून जाते. चित्रकार अचानक घाबरतो. आपले सामान आवरतो. महाराज निश्चल झालेले असतात. अरण्यकेतूला काय ते समजतं. तो महाराजांचं निधन झाल्याचं जाहीर करतो. काळे कपडे घालून हातात उंच लेखण्या घेतलेले लेखणीवाले तालात ड्रमबीटमध्ये राज्यात भरदिवसा अंध:कार झाल्याचे जाहीर करतात.
‘महाराजांनंतर कोण?’ हा महत्त्वाचा निर्णय घ्यायच्या सभेत प्रत्येकजण ‘मला सत्तेची हाव नाही. मी एक कार्यकर्ता आहे,’ असे निक्षून सांगतो. कर्कशीर्षांनी एक खास तयार करून आणलेला तावीज खिशात ठेवलाय. अरण्यकेतू अपमान झाल्याकारणाने, ‘पाच मिनिटांत येतो,’ असं सांगून सभात्याग करतात. व्रात्यसोम मात्र आपल्याला महत्त्वाकांक्षा असल्याचं जाहीर करतात.
वेगवेगळ्या ठिकाणांहून जनतेचा उठाव होत असल्याच्या बातम्या येतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या मंत्र्याच्या विरोधात आवाज उठवले जातात. कदंब जमातीच्या नेत्याचं नाव मात्र कुठच्याच उठावात घेतलं जात नाही. पिष्टकेशी द्वीपाच्या विकासाचा अठरा कलमी योजनांचं एक बाडच घेऊन येतात. ‘योजनांच्या कलमांनी राष्ट्रे वाढत नसतात. त्यासाठी रक्त आणि घाम ओतावा लागतो,’ असे त्यांना ऐकवण्यात येते. सभेत काहीच ठरत नाही. सभा पुढे ढकलली जाते.
नवा नेता ठरत नाही. मंत्र्यांची गडबड चालूच आहे. त्या गडबडीत चुकून विजया घुसते. तिला बघून व्रात्यसोम ओरडतो, ‘पिष्टकेशी, सापडली. तडजोड सापडली.’ विजया गोंधळते. तिला काय झालं कळत नाही. विजयाराजेंकडे बोट दाखवत व्रात्यसोम पुन्हा ओरडतो, ‘हा पाहा नवा सत्ताधारी.. (विजया अंग चोरते.) महाराजांचा वारस! हा एक पुढे. आपण पाच मागे. ही सत्ता, आपण धारी! आपल्यात निर्णय लागेपर्यंत नवी योजना.’
सगळे सावकाश विजयाला घेरतात. ती मनस्वी घाबरलेली आहे. सगळे तिला न्याहाळीत आहेत. ती सशासारखी थरथरत उभी. पहिला अंक संपतो.
राज्यारोहणाच्या समारंभाने विजयाराजे थकली आहे. प्रन्नारायण तिचा एकमेव सेवक आहे. तो तृतीयपंथी आहे. राजवाडय़ात राणीकक्षात नोकरी मिळावी म्हणून लहानपणीच त्याचं खच्चीकरण केलं आहे. आईविना असलेल्या विजयाराजेंची देखभाल करण्याची जबाबदारी त्याच्यावरच आहे. विजयाराजे त्याला छप्पापाणी खेळायला बोलावते. तेव्हा तो तिची समजूत घालतो- ‘राणीपदावरच्या व्यक्तीला असं खेळणं शोभा देत नाही.’ पण ती हट्टच धरते. सिंहासनाचे पाय कापण्याचाही तिने हट्ट धरला आणि तो मान्य करावा लागला. अखेरीस प्रन्नारायणाला तिच्याबरोबर सागरगोटे खेळायला बसावं लागतं. भेटीला येणाऱ्या मंत्रिमंडळाला ती थांबवून धरते. बदललेल्या परिस्थितीत कसं वागायचं, ते प्रन्नारायण तिला शिकवतो. ‘सत्ताधारी माणूस हा अतिमानुष किंवा अमानुष असला पाहिजे. सगळे तुझ्यापेक्षा वडील आहेत. त्यांचे वातड अहंकार न दुखावतील अशा पद्धतीनेच त्यांचे अपमान केले पाहिजेत,’ अशी समजूत तो तिला देतो. शिकवल्याप्रमाणे मंत्रिमंडळावर जरब बसवण्यात ती यशस्वी होते. राजकारणाचा आता तिला कंटाळा आला आहे. तिला मातेसमान असलेल्या प्रन्नारायणाच्या मांडीवर ती निद्राधीन होते. बिनघोर विसावते.
लेखणीवाले ठेक्यात राणीची कारकीर्द विशद करतात. एका कार्यक्रमाला जात असताना राणीची गाडी कदंब जमातीचे लोक अडवतात. राणी त्यांच्या वस्तीला भेट देते. त्या उघडय़ानागडय़ा पोरांचे पापे घेते. त्यांच्याबरोबर न्याहारी करते. त्यांना आश्वासनं देते. राणी त्यांच्या पुनर्वसनाची, त्यांच्या भरभराटीची एक योजना तयार करते. पण मंत्रिमंडळातील कुणालाच ती पसंत पडत नाही. राणी कमालीची क्रुद्ध होते. ‘ही मंत्रिमंडळातील माणसं एवढी नीच कशी होतात?’ या तिच्या प्रश्नाला प्रन्नारायणचं उत्तर आहे- ‘माणसं महत्त्वाकांक्षी होतात तशीच.’ ती त्याच्याकडे हिंस्रपणे पाहते. म्हणते, ‘माझ्या आत काहीतरी बदलतं आहे. मला भय वाटतंय.’ प्रन्नारायण तिला सांगतो, ‘बाहेरून आत फार बघू नये. नेहमी आतून बाहेर बघावं. त्यानं महत्त्वाकांक्षा टिकतात.’ ती प्रन्नारायणाचे केस घट्ट पकडते. तिच्या मुद्रेवर स्मित येतं. त्याच्याही मुद्रेवर समजत असल्याचं स्मित येतं. दुसरा अंक संपतो.
राणीच्या योजनेकडे मंत्रिमंडळाने तुच्छतापूर्वक नकारात्मक पाहिले मात्र, लेखणीवाल्यांनी- म्हणजेच मीडियावाल्यांनी ताबडतोब गोंगाट करायला सुरुवात केली.
आपल्या ६२ व्या वाढदिवसानिमित्ताने व्रात्यसोमांनी सर्व मंत्र्यांना आपल्या घरी पार्टीला बोलावलं होतं. झाल्या घटनेबद्दल राणीने खेद व्यक्त केला. इतकंच नव्हे, तर आपल्याला भेटवस्तूही पाठवल्याचं प्रत्येक मंत्री सांगत होता. इतक्या वर्षांत सत्ताधीशाला आपण प्रथमच हलवू शकलो याबद्दल सर्वजण आनंदातिरेकाने नाचत होते. जल्लोष करीत होते. हा कार्यक्रम चालू असतानाच प्रन्नारायण राणीचा खलिता घेऊन येतो. त्यात लिहिलेलं असतं- ‘मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी न थांबता कदंबांच्या पुनर्वसनाची योजना मी माझ्या अधिकारात अमलात आणीत आहे.’ हे ऐकताच सगळे मंत्री खवळून उठतात. मंत्रिमंडळाची अशी जगजाहीर नाचक्की केल्याबद्दल, परंपरेचा खून केल्याबद्दल मंत्रिमंडळ राजीनाम्याची भाषा करीत नाही तर राणीशी मुकाबलाच करण्याचे ठरवते. सगळे मंत्री राणीला भेटायला निघतात तर प्रन्नारायण सांगतो, ‘राणी निद्राधीन झाल्या असून, सूर्योदयापर्यंत कुणी विक्षेप आणू नये अशी सक्त ताकीद त्यांनी दिली आहे.’ मंत्र्यांच्या क्रोधाग्नीत तेलच ओतलं जातं. सर्व मंत्री आपापल्या विभागात राणीच्या विरोधात जनतेला उठाव करण्यासाठी प्रवृत्त करतात. मंत्रिमंडळात राहून मनात राणीबद्दल पक्षपाती भावना बाळगणाऱ्यांनाही दटावले जाते.
लोकशाहीसाठी, तत्त्वांसाठी मंत्र्यांची राणीशी झुंज सुरू होते. राजवाडय़ाला जनतेचा घेराव घालण्याचा कार्यक्रम आखला जातो. अरण्यकेतू अखेरच्या तडजोडीसाठी प्रयत्न करतात. राणीला दिलगिरी व्यक्त करायला सांगतात. राणी त्यांच्यासकट दिलगिरीही फेटाळून लावते.
वाडय़ाभोवती होणारा जनता घेराव हाणून पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था केली जाते. घराघरांतून बंदूकधारी तैनात केले जातात. छुपे लष्करही पेरले गेलेले असते. या धुमश्चक्रीत राणी मृत्युमुखी पडली तर दु:ख होईल ते एकटय़ा प्रन्नारायणालाच!
अखेरीच्या संघर्षमय प्रसंगापूर्वीचा प्रन्नारायण व राणी यांचा तरल व हळवा प्रसंग मनाचा ठाव घेतो. प्रन्नारायण म्हणतो, ‘महत्त्वाकांक्षी माणसाचं हेच जगणं असतं. काहीतरी हाणून पाडणं.’ विजयाराणी म्हणते, ‘प्रन्नारायण, मला जगायचं आहे. इतकंच नव्हे तर राज्य करायचं आहे. एक हजार र्वष राज्य करायचं आहे. या मंत्रिमंडळाच्या नाकावर टिच्चून या दंबद्वीपाला मला हवं तसं रूप द्यायचं आहे. आता तर कुठे मी कामाला लागले आहे. कितीतरी समस्या आहेत. यक्षप्रश्न आहेत. दंबद्वीपला अजून खूप प्रगती करायची आहे. मी सिंहासनावर नसले तर द्वीपाचे हे नालायक म्हातारडे मंत्री काय करतील? मलाच सर्व करायला हवं.’ भिंतीवरच्या राक्षसाच्या चेहऱ्यावर हातातला बाण (डार्ट) मारून म्हणते, ‘येऊ देत ते मंत्री. त्यांचा जमाव. होऊनच जाऊ दे!’
राजवाडय़ाच्या बाहेर जमावाचा गोंगाट वाढतोय आणि आत दालनात सर्व मंत्री जमले आहेत. त्या गडबडीतही सत्तेवर पहिला हक्क कुणाचा राहील, याबद्दल वाद चालू आहे. दगड मारण्याची व वाहनं जाळण्याची व्यवस्था मंत्रिमहोदयांनी केली आहे. खिडकी उघडून कुठे धूर येतो का, ते पाहण्यात येतं. अजून दगड कसे येत नाहीत, या चिंतेत मंत्री असतानाच एक दगड तावदान फोडून आत येतो. कुठल्याही आंदोलनाला हुतात्म्यांची गरज असल्यामुळे किती मुडदे पडतील, याचा हिशेबही मांडला जातो. गोळीबार होतोय. विजयाराणी स्लॅक्समध्ये येतात. तिच्या हातात विणकामाचे सामान आहे. ती मंत्र्यांची अवस्था पाहतेय. सगळेच मंत्रिगण बाहेरच्या रानटी प्रकाराचा धिक्कार केल्याचं दाखवतात. ‘राणी सामोरी गेली तरच संतप्त जमाव शांत होईल.’ लोकशाहीसाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी सगळे मंत्री राणीचेच नाव घेतात. तेव्हा राणी मंत्र्यांनाच जनतेला सामोरे जाण्याची राजाज्ञा करते आणि मंत्र्यांची भंबेरी उडते. कदंब जमातीच्या मंत्र्याला अगोदरच बाहेर पाठवलेलं असतं. तो गोळीबारात संपल्याची बातमी येते. त्याला तिथेच श्रद्धांजली वाहण्यात येते. अखेरीस राणी स्वत:च जमावाला सामोरी जायला सिद्ध होते. ‘राणी अमर रहे! याला म्हणतात कर्तव्यनिष्ठा!’ असे दालनातून उद्गार निघतात. स्वत:च्या मृत्यूच्या घोषणा ऐकत राणी जमावासमोर उभी राहते आणि संतापाने ओरडून सर्वाना गप्प बसवते. किंचित पसरलेल्या शांततेचा फायदा घेऊन ती ताडताड बोलत राहते. तिचा आवेश पाहून सर्वच सर्द होतात. ती जमावाची निर्भर्त्सना करते. जमाव टाळ्या देतो. तिला जमावाची दया येते. ती प्रत्येकाच्या कल्याणासाठी झटण्याचे वचन देते. जनतेला करमाफी जाहीर करते. आजवर मंत्री झालेल्या सर्वाच्या खासगी इस्टेटीची जाहीर चौकशी करून अपराध सिद्ध झाल्यास कडक शासन केले जाईल, याचीही खात्री देते. ‘कदंब पुनर्वसन योजना व ती अमलात आणू न देणारे मंत्री यांना तुमच्या स्वाधीन करते,’ असे जमावाला सांगून स्वत:च्या जयजयकारात विजयी मुद्रेनं राणी आत जाते.
दालनातील मंत्र्यांना ती जमावासमोर जायला सांगते तेव्हा सर्वाचीच बोबडी वळते. कुणीही बाहेर जायला तयार होत नाही. अखेरीस राणी त्यांना बायकांचे पोशाख देऊन वेषांतर करायला सांगते. ताप आल्याचे कारण सांगून गैरहजर असलेले अरण्यकेतू बुरखा घालून येतात. पुनर्वसन योजनेचा जयजयकार करतात. जमावाच्या रोषाला बळी पडलेला भगदंत लंगडत फाटक्या कपडय़ात येतो. त्याला मुका मार लागलेला असतो.
राणी सगळ्या मंत्र्यांना रांगेत उभे करते. ‘घुम जाव’ अशी आज्ञा देते. सगळे पाठ करून उभे राहतात. विजयाराणी त्यांच्यासभोवती रिंगमास्टरसारखी फिरत न ऐकू येणारे प्रवचन देत राहते. तसे आविर्भाव.. तसे चेहरे. दोन्ही बाजूंनी दोन लेखणीवाले आपल्या उंच लेखण्यांद्वारे प्रेक्षकांना सामोरे जातात.
विजयाराणीचा जयजयकार
द्वंबद्वीपात महान चमत्कार
मंत्रिमंडळाचा संपूर्ण धुव्वा
विजयाराणींचा लवकरच भव्य सत्कार.
रिंगमास्टरी चालू आहे. लेखणीवाले स्वत:कडे श्रेय घेत आहेत. प्रन्नारायणाच्या निवेदनाने सुरू झालेला ‘मुकाबला’ त्याच्याच निवेदनाने विराम पावतो.
१९६९ साली या नाटकाचा पहिला प्रयोग राज्य नाटय़स्पर्धेत ‘रंगायन’ या नाटय़संस्थेने सादर केला. विजयाराजेच्या भूमिकेत भक्ती बर्वे होती, तर प्रन्नारायणाच्या भूमिकेत माधव वाटवे. अन्य भूमिकांत जयवंत नाडकर्णी, वृंदावन दंडवते, यशवंत भागवत, बाळ कर्वे, मधुकर नाईक, नाथ दिवाण, राजा बापट, अरुण काकडे, अरविंद आर्यमाने यांचा सहभाग होता. दिग्दर्शन अरविंद देशपांडे यांचे होते. नेपथ्य व प्रकाशयोजना राम शितूत यांनी सांभाळली होती.
हे नाटक रंगमंचावर येण्यापूर्वी तीनच वर्षे अगोदर इंदिरा गांधी पंतप्रधानपदी विराजमान झाल्या होत्या. सहा वर्षांनी- म्हणजे १९७५ साली आणीबाणी पुकारली गेली. नाटककाराचा द्रष्टेपणा लक्षात यावा म्हणून वरच्या नोंदी केल्या आहेत. विजयाराजेचा अल्लडपणापासून ते कणखर राज्यकर्तीपर्यंतचा नाटकात चित्रित केलेला प्रवास मोठा लक्षणीय आहे. राणीची आंतरिक तळमळ तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच उजाळा देते. प्रन्नारायण व विजयाराजेच्या नात्यातील नजाकत खास तेंडुलकरी चीज आहे.
हे एक प्रतीकनाटय़ आहे. काल्पनिक नाटय़स्थळ व व्यक्तिनामे घेऊन वास्तव राजकारणावर केलेले भाष्य म्हणजेच हे नाटक. पात्रांच्या संवादावरून पौराणिक नावांच्या बुरख्याखाली लपलेले मंत्र्यांचे चेहरे सहज ओळखू येतात. या नाटकातले संवाद म्हणजे उपरोध व उपहास याचा उत्कृष्ट नमुना आहे. एकमेकांना शह-काटशह देण्याच्या सूचनेसाठी बुद्धिबळाच्या खेळाचा वापर केला जातो. या नाटकात डार्ट बोर्ड आणि बाणाचा वापर करून बाईचा बदललेला टोकदार व हुकमी स्वभाव नेमका व्यक्त केलेला आहे. माध्यमांसाठी लेखणीवाल्या पात्रांचा वापर व त्यांच्यासाठी केलेला मुक्तछंदाचा वापर अचूक वातावरणनिर्मिती करतो. नाटकाऐवजी वगाच्या बाजात हे नाटक सादर केलं गेलं तर ते अधिक प्रभावी होईल. इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वावर नाटक लिहिण्यासाठी हे नाटक एक उत्तम आदर्श आहे. आजही हे नाटक राजकारण्यांचे पारदर्शी दर्शन घडवून प्रेक्षकांना सजग करण्याइतके समर्थ आहे. इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्त्वावर नाटक लिहिणाऱ्यांसाठी ‘दंबद्वीपचा मुकाबला’ ही उत्कृष्ट नांदी ठरावी. आज ‘दंबद्वीप’सारख्या नाटकांची खरी गरज आहे.