News Flash

अंतर्नाद : राम निरंजन न्यारा रे

चिंतनीय तत्त्वास कसला ना कसला आकार देत दृश्य पातळीवर आणतात!

|| डॉ. चैतन्य कुंटे

सुरेल तानपुऱ्यांचे नादवलय, हार्मोनिअमवर षड्ज-पंचमाची स्थिर गाज आणि तबल्याचा संयत ठेका… या साऱ्या मेळातून तीक्ष्ण स्वर उमटतो…

‘शून्य गढ शहर शहर घर बस्ती।’

पं. कुमार गंधर्व आणि ‘निर्गुणी भजन’ या समीकरणाला एक खास वलय लाभलंय. जेव्हा कुमारजी माळव्याच्या लोकधारेतील कबीराची आणि नाथपंथीय संतांची पदे मैफलीत गाऊ लागले तेव्हा काही श्रोत्यांची भुवई वाकडी झाली खरी, पण लवकरच ही ‘निर्गुणी भजने’ कुमारजींच्या चाहत्यांनी, उच्चभ्रू रसिकांनी उचलून धरली. आज निर्गुणी भजनांचा हा साचा इतका लोकप्रिय झाला आहे की या पदांचा दार्शनिक अर्थ व सांगीत आशय या दोन्हींपासून कोसो दूर असलेले अनेक गायक निर्गुणी भजने गाण्यात धन्यता मानताहेत! ‘पण नेमकं काय आहे निर्गुणी भजन हे प्रकरण?’ असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पं. कुमार गंधर्वांच्या सगुण व निर्गुण भक्तिपदांच्या गायनाचा बोलबाला बराच झाला. मात्र, सगुण भजनापेक्षा निर्गुणी भजन हे संगीत म्हणून काही वेगळे आहे का, ‘निर्गुणी’ असण्याची काही सांगीतिक लक्षणे आहेत का, याचा फारसा ऊहापोह कुणी केला नाही. कुमारजींचे चाहते अभ्यासकही त्यावर फारसे सांगीतिक भाष्य न करता ‘अहो रूपं अहो ध्वनिम्’ म्हणून थांबले आहेत. म्हणूनच आज सगुण आणि निर्गुण भक्तिसंगीताबद्दल आख्यान मांडलेय.

तसं पाहता सगुण साकार आणि निर्गुण निराकार उपासना ही सर्वच धर्मांत आढळते. साकार रूपाचे पूजन आणि निराकार तत्त्वाचे चिंतन हे सर्वच पंथांत आहे. मग ते मूर्तिपूजक, चिन्हपूजक असोत किंवा निसर्गपूजक असोत. मूर्तिपूजा न मानणारे हीनयान बौद्ध, ज्यू, पारशी, इस्लाम, शीख हे धर्म निर्गुणोपासक आहेत. मूर्तिपूजा वा पूजाचिन्हे मानणारे हिंदू, जैन, महायान व नवयान बौद्ध, ख्रिश्चान हे सगुणोपासक आहेत. मात्र, मूर्तिपूजक धर्मही अंतिमत: तात्त्विक पातळीवर निर्गुण निराकार विश्वचालक शक्तीला साकडे घालतात, तर मूर्तिपूजा न मानणारे धर्मही मानवी रूप वा गुण यांना भजत नसले तरी चिन्हरूपाने का होईना, चिंतनीय तत्त्वास कसला ना कसला आकार देत दृश्य पातळीवर आणतात!

ही सगुण आणि निर्गुण उपासना धर्मसंगीतात कशी प्रतिबिंबित होते? एक साधं निरीक्षण असं की, निर्गुण उपासनेवर भर असलेल्या पंथांत संगीतपरता तुलनेने कमी असते. त्यांचा भर मुख्यत: पाठ्यसंगीतावर असतो. म्हणजे असे की, संपन्न स्वरधुनांच्या गीतांतून व्यक्त होण्यापेक्षा ते अल्पस्वरी पाठ्यछंदांद्वारे अधिक व्यक्त होतात. तर सगुणोपासक पंथ हे अधिक संगीतपर असतात. म्हणजे काय? तर उपास्य दैवताची मानवी मूर्ती कल्पिली की त्यास मानवी संवेदना चिकटविली गेल्याने देवताविषयक भावनांचा आविष्कार गीतांमधून होण्याची शक्यता विपुल प्रमाणात तयार होते. म्हणूनच सगुणोपासनेत संगीत नाना रंग-रूपे घेऊन अवतरते! अर्थात इतके साधे-सरळ समीकरण मांडता येऊ नये अशीही सोय धर्मपंथ करतात बरं! पाहा ना, निर्गुणोपासक असलेला शीख धर्म आणि इस्लामचा सुफी संप्रदाय यांत निर्विवादपणे लक्षणीय अशी संगीतपरता आहे, त्यांनी स्वत:ची खास अशी सांगीत मुद्रा उमटवली आहे. उलट, जैन आणि हिंदूंतील काही पंथ हे सगुणोपासक असूनही काहीशी ‘सांगीत उदासीनता’ बाळगतात!

निर्गुणाकडे नेणारे अनेक आविष्कार भारतीय धर्मसंगीत परंपरेत आढळतात. तंत्रमार्गी पंथीयांचे बीजाक्षर मंत्रांचे पठण, तिबेटी बौद्धांचे मंत्रांचे गूढ उच्चार व अनेकविध वाद्यांच्या नादवलयांतून तयार केलेली कल्लोळाची अवस्था हे निर्गुण उपासनेकडे नेणारे सांगीत आविष्कार आहेत. सुफी परंपरेतील कव्वाली गायनातील समा बांधण्याच्या उत्कट अवस्थेचे द्योतक असलेला तराणा तर रागसंगीतातही विशेष महत्त्वाचा आहे. अमीर खुस्रोने तराण्याची निर्मिती केली असे काही मानतात. मात्र, तराण्याची पाळेमुळे भारताच्या प्राचीन परंपरेतही सापडतात. लौकिकदृष्ट्या भाषिक अर्थ नसलेले शब्द गाऊन निराकारास साकडे घालण्याचे जे तत्त्व तराण्यात आहे, तेच तत्त्व तराण्याच्या किमान हजार वर्षे आधीच्या वैदिक परंपरेतील शुष्कगीत, मार्गी संगीत परंपरेतील निर्गीत व बहिर्गीत यांत दिसते. उन्मनी अवस्था व्यक्त करणाऱ्या बाउलगानातही निर्गुण तत्त्वाकडेच निर्देश आहे. नाथपंथीय एकतारी भजन, कानफाटे जोगी आणि सिद्धांची पदे, तसेच पिंगळा, वासुदेव यांची काही कूटपदे, शिवाय भेदिक लावणी यांत निर्गुण उपासनेचे दर्शन होते.

या सर्वच संगीताविष्कारांत काही साम्यस्थळे आहेत. त्यांच्या अवलोकनातून संगीत निर्गुणत्वाकडे कसे नेते हे लक्षात येईल. इथे तालाची घट्ट आकृती निर्माण करण्यापेक्षा लयाघातांनी केवळ छंद निर्माण केला जातो. ध्वनिबरोबरच सूचक विराम आणि धुनेची पुनरावृत्ती आहे. गुंजन, पुकार आणि गरिमाभेदांचा सहेतुक वापर करून गानोच्चार केला जातो. ठोसपणापेक्षा संदिग्धता निर्माण व्हावी असे स्वरोच्चार अधिक असतात. धुनांत स्वरांची कोमल रूपे अधिक वापरण्याकडे कल आहे. ही सगळीच लक्षणे निर्गुण अवस्थेकडे नेणाऱ्या संगीतात दिसतील. कुमार गंधर्वांनी गायलेल्या निर्गुणी भजनांशी ही सगळी लक्षणे ताडून पाहा, म्हणजे तुम्हाला निर्गुणी भजनांतले संगीताचे नेमके स्वरूप सहजच ध्यानात येईल.

लोकधारा आणि नाथपंथीय निर्गुणी भजन या दोन्ही स्रोतांतील मूळ रचना ऐकल्या तर सहजच हे लक्षात येईल की, पं. कुमार गंधर्वांनी या स्रोतांतून प्रेरणा घेतली असली तरी त्यांनी रूढ केलेला निर्गुणी भजनांचा साचा हे त्यांचे स्वत:चे सर्जन आहे. त्यांनी स्वरबद्ध करून गायलेल्या निर्गुणी भजनांचे सांगीतिक विश्लेषण करता लक्षात येते की, त्यांत मुख्यत्वे भैरव मेला आणि मांड धून या दोन्हीचे प्राबल्य असून, काही थोड्या रचना भैरवी मेलात आहेत.

भैरव मेलातील रचना अशा : झीनी झीनी बीनी चदरिया, सुनता है गुरुग्यानी (पूर्वांगात विभासची डूब, उत्तरांगात दोन्ही धैवत), दूजे के संग नहीं जाऊँ (पूर्वांगात कोमल निषादाचा वापर), हिरना समझ बुझ बन चरना (उत्तरांगात मांडची डूब, कोमल निषादाचाही वापर. यास त्यांनी ‘निर्गुणीध्वनि’ असे म्हटले आहे.), आव कलंदर केसवा (उत्तरांगात मांडची डूब), गुरुजी जहां बैठू वहां छाया जी (उत्तरांगात शुद्ध ऋषभ, तसेच अंतऱ्यात पूर्वांगात कोमल निषाद व शुद्ध ऋषभ), मैं जागू म्हारा सतगुरु जागे, शून्य गढ शहर (शुद्ध धैवत व कोमल निषादाच्या विविक्षित दर्जांचा वापर).

मांड धुनेवर आधारित रचना : उड जाएगा हंस अकेला, राम निरंजन न्यारा रे, अवधूता युगन युगन हम योगी, रमैया की दुल्हन, निरभय निरगुण गुण रे गाऊंगा, कुदरत की न्यारी (अंतऱ्यात कोमल ऋषभ. यास त्यांनी ‘निर्गुणी मांड’ असे म्हटले आहे.), गुरा तो जिने, बिन सतगुरु नर (टप्प्याचे अंग), गुरुजी म्हाने म्हारे डर लागो (अंतऱ्यात कोमल धैवत व निषादाच्या वापरामुळे चारुकेशीची डूब), नैहरवा हमका न भावे (आसामांड), नैया मोरी नीके नीके चालन लागी (आसामांड).

भैरवी धुनेच्या रचना : धुन सुन के मनवा, भोला मन जाने, अवधूता गगनघटा गहरानी रे, सखिया वा घर सबसे न्यारा, सतगुरु मोरी चूक संभारो, मन बावरा भयो.

याखेरीज ‘कौन ठगवा नगरिया लूटल हो’ (मध्यम से कल्याण) आणि ‘माया महाठगनी हम जानी’ (बिलावल अंगाची व काफी अंगाची धनाश्री यांचे मिश्रण, अंतऱ्यात भैरव मेलाचे स्वर) या रचना स्वरमेलाच्या दृष्टीने वेगळ्या आहेत.

मूळ लोकधारेतील मोजक्याच स्वररचना त्यांनी गायल्या. त्या अशा : काची छे काया राम, लागी होय सो जाने हो, हम परदेसी पंछी बाबा, चालो गुरुजन, सिद्ध भजो ओंकार, गुरुजी ने दिया अमर नाम.

कुमारजींनी भैरव मेलाचे स्वर वापरूनही भैरव, कालिंगडा, जोगिया, अहिर भैरव असे कोणतेही एक स्थापित रागरूप ठोसपणे व्यक्त न करता संदिग्धतेतील सूचकता साधली. अशी संदिग्धतेतील सूचकता ते आणखी दोन मार्गांनी साधतात. दोन्ही ऋषभ वा दोन्ही धैवतांना खेळवत ठेवणे आणि कोमल स्वरांची अधिक चढीउतरी स्थाने दाखवणे हा एक मार्ग, तर भैरवाच्या मेलात अवचितपणे शुद्ध स्वर सामील करणे वा मांडच्या धुनेत अचानकपणे कोमल स्वर लावणे हा दुसरा मार्ग. शिवाय ‘षड्जाकर्षण’ तत्त्वाने- म्हणजे आधारस्वराभोवती सतत गुंजन ठेवणे, आधारस्वर पुनरावृत्त करत राहणे यातून ते एक प्रकारची अंतर्मुखता, तंद्रा निर्माण करतात.

त्यांच्या निर्गुणी भजनाच्या साच्याचे अजून एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यातील एकतारीच्या लयछंदाशी साधम्र्य राखणारा ठेका. तसे पाहता ‘धाग् तिंऽ तक् धिंऽ’ हा चार मात्रांचा ठेका, ‘धागेन धागे तिंऽ’ हा सात मात्रांचा सतवा ठेका हे दोनच मुख्य ठेके (आणि ‘गुरुजी म्हाने म्हारे डर लागो’सारख्या एखाद्या भजनात क्वचित खेमटा) त्यांनी वापरले आहेत. ‘लयीचा तानपुरा’ म्हणून गौरवलेल्या वसंतराव आचरेकरांचे या ठेक्यांचे संयत, घुमारदार वादन निर्गुणी भजनांना अंतर्मुखतेचे आगळे परिमाण देते. त्या वादनात तसे पाहता वैविध्य अजिबात नाही. उलट, पुनरावृत्तीच अधिक. शिवाय लग्गीचा वापरही केवळ अंतऱ्यांतील बदल अधोरेखित व्हावा एवढाच माफक व संयत. मात्र असे अनलंकृत असणे हेच तर त्यातील सौंदर्यविधान आहे!

एरवी सगुण भजनांच्या स्वररचनांत पं. कुमार गंधर्व प्रस्थापित रागरूपे वापरतात व त्यांचे गायन हे मुख्यत्वे ख्याल आणि ठुमरीच्या शैलीतील आहे. निर्गुणी भजनांत ते अर्धताल वापरतात, तर सगुण भजनांत त्रिताल, एकताल, कहरव्याचे खाली-भरी असलेले रूप, भजनी असे पूर्णताल वापरतात. कुमारजींच्या गायनात सगुण आणि निर्गुण भजनांच्या मांडणीतला फरक असा लक्षणीय आहे. पण विशेष म्हणजे कुमार गंधर्वांनी निर्गुणी भजनाच्या सांगीतिक साच्यात केवळ निर्गुणी आशयाची भजने पेश केली असे नाही, तर काव्याशयाच्या दृष्टीने निर्गुण नसलेल्या, व सगुणत्वाकडे निर्देश करणाऱ्या भजनांच्या रचनाही त्यांनी या सांगीत साच्यात पेश केल्या. त्यांच्या ‘तुकारामदर्शन’ कार्यक्रमातील ‘लक्ष्मीवल्लभा दीनानाथा पद्मानाभा’ आणि ‘कासियाने पूजा करू केशीराजा’ या रचना आशयाच्या दृष्टीने सगुण भजन आहेत, मात्र त्याला दिलेला संगीतसाज निर्गुणी भजनाचा आहे.

‘राम निरंजन न्यारा रे। अंजन सकल पसारा रे’ असं संत कबीरांनी म्हटलं आहे, तर पं. कुमार गंधर्वांची निर्गुणी भजनं ऐकताना ‘राग निरंजन न्यारा रे ।अंजन ताल पसारा रे’ अशी अनुभूती येते. नाना मार्गांनी आपण संगीताला सगुण करू पाहिले तरीही केवळ ध्वनिसंभूत व श्रवणगम्य असे संगीत अंतिमत: निर्गुणत्वाकडेच अंगुलीनिर्देश करत राहते, हेच खरे!

keshavchaitanya@gmail.com

(लेखक संगीतकार, संस्कृती-संगीतशास्त्राचे अभ्यासक व ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज्’ या प्रयोगकला अध्ययन केंद्राचे संस्थापक-संचालक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:02 am

Web Title: tibetan buddhists of the tantra sect in the indian religious music tradition akp 94
Next Stories
1 पडसाद : आता ‘निकम्मे’ कोण?
2 सत्यजित राय यांचे बालकलाकार
3 आमचे आम्ही!
Just Now!
X