ती नागपूरची. तिच्या मुलाला- अर्णवला घेऊन ती आली, तीच मुळी ‘याच्या अजीर्णानं मी हैराण झाले आहे’ असे सांगत. अर्णव वय वर्षे तीन. स्वातीची मुख्य तक्रार होती की अर्णव एका जागी बसून जेवत नाही. ‘घरभर फिरत असतो हो हा. मग याच्या मागे याला भरवत फिरावं लागतं. घरातलं कुणीही भरवतं त्याला. कधी कधी तर एका वेळचं जेवणही दोन जण भरवतात. कळतच नाही यानं किती खाल्लं ते. मारून बघितलं, उपाशी ठेवलं तरी याची सवय जात नाही.’

‘त्यापेक्षा एक सोपा उपाय कर ना! तुम्ही सगळे जेवायला बसता ना, तेव्हा तुमच्याबरोबर त्यालाही बसवा जेवायला. एका जागी बसून स्वत:च्या हातानं जेवायला लागेल.’ मी म्हणाले. (वैद्यांना असे वैद्यकेतर सल्लेही द्यावे लागतात.)
‘पण आम्ही सगळे एकत्र जेवायला नाही बसत. घरातल्या प्रत्येकाची वेळ वेगळी आहे.’

‘म्हणजे?’, मी आश्चर्याने विचारलं.

‘म्हणजे सासू-सासरे त्यांच्या खोलीत टी.व्ही. बघत जेवतात, त्यांच्या बेडवर बसून. दीर आणि नवरा कधी डायनिंग टेबलवर, तर कधी टी.व्ही. बघत हॉलमध्ये जेवतात. माझी जाऊ तर खूप वेळा उभ्या उभ्याच जेवते. दिराची दोन आणि माझा मोठा मुलगा त्यांच्या शाळांच्या वेळेप्रमाणे जेवतात. त्यांना जेवताना कार्टून नाही तर मोबाइल गेम लागतो. तेही एका जागी बसत नाहीत. पण आता त्यांना भरवावं तरी लागत नाही..’

 

‘काय सांगतेस? अगं, मग मुलगा कुणाचं बघून एका जागी बसेल? तो सगळ्यांचं थोडं थोडं अनुकरण करत असणार! त्याला मारून काय उपयोग?’

‘कशासाठी, पोटासाठी’- असं म्हणत दिवसाचे दहा-बारा तास वणवण करणारे आपण, पोटाची वेळ आली की मात्र हलके घाईत, बेफिकीर का होतो? जमिनीवर मांडी घालून बसून, केवळ दहा मिनिटंही आपण जेवणासाठी देऊ शकत नाही? कसं पचणार अन्न?  आज शहरात ‘मांडी घालून जेवण’ हा प्रकारच लोक विसरलेत. मध्यंतरी आमच्या एका ज्येष्ठ वैद्यांच्या घरी बऱ्याच वैद्यांना जेवायला बोलावलं होतं. त्यांच्या अन्य स्नेह्य़ांनापण आमंत्रण होतं. ऐनवेळी खूप जण आलेच नाहीत. त्या वैद्यांचे एक स्नेही म्हणाले, ‘अहो, यांच्याकडचं जेवण खूप छान असतं. त्यामुळे आधी सगळी मंडळी यायला तयार झाली. नंतर कुणीतरी मुद्दा काढला की इथे पाटावर बसून मांडी घालून जेवावं लागतं. उठताना फजिती होते. मग खूप जण गळाले!’

डायनिंग टेबलवर पाय लोंबकळत ठेवून, टी.व्ही.पुढे उभं राहून, समारंभात फिरत- फिरत, (याला आमचे एक मित्र बुफे न म्हणता ‘बफेलो जेवण’ म्हणतात.) स्टॉलवर उभं राहून किती नवीन नवीन ‘आसनं’ आलीत भोजनासाठी?

आठ-दहा वर्षांपूर्वी टी.व्ही.वर स्थानिक केबलचं साम्राज्य होतं. त्यांचं स्वत:चं एक चॅनेल पण असायचं. कल्याणच्या एका चॅनेलचा मालक एकदा माझ्याकडे आला. मला म्हणे, ‘मला आहार या विषयावर, माझ्या चॅनेलवर एक मालिका तयार करायची आहे.’

‘व्याख्यानांची का?’ मी काही न सुचून विचारलं.

‘छे, छे! व्याख्यान बोअरिंग असतं. असं नीट चित्रीकरण करायचं आणि दाखवायचं.’ खुर्चीत जवळजवळ झोपल्यासारखा बसत आणि तरी अखंड वळवळत तो बोलत होता. ‘म्हणजे तुमचे आयुर्वेदातले काहीतरी नियम असतील ना? एखादा सांगा बरं.’ मला काही झेपेना. पण बोलणं क्रमप्राप्त होतं. ‘जमिनीवर मांडी घालून जेवायला बसावं.’.. मी  पहिला नियम सांगितला. माझं वाक्य ऐकताक्षणी तो ताडकन सरळ झाला आणि म्हणाला, ‘असा नियम आहे? आणि तसं नाही केलं तर?’ अचानक त्याला काय झालं मला कळेना. ‘अहो, मांडी घालून बसलं की बराचसा रक्तप्रवाह पोटाकडे वळवला जातो. पाचक स्राव स्रवायला, आतडय़ांची हालचाल व्हायला त्यामुळे मदत होते. साहजिकच पचन उत्तम होतं. शिवाय मांडी घालून जेवण्याचा आणखी एक फायदा म्हणजे माणूस तड लागेपर्यंत पोटभर जेवू शकत नाही. पोट भरल्याची जाणीव थोडी आधीच होते.’ हे सगळं केबलवर कसं दाखवता येणार हा प्रश्न मला भेडसावत होता.

‘पण मी तर कधीच मांडी घालून जेवत नाही’ तो अभिमानानं म्हणाला.

‘मग?’ मी आश्चर्यानं विचारलं.

‘माझं कसं आहे, सगळी कामं झाल्यावर, वेळ मिळाला की मी निवांत जेवतो. माझा बेड टी.व्ही. समोर आहे. उशाला दोन मोठे तक्के घेऊन मी तिथे आडवा होतो. पोटावर ताट ठेवतो आणि आरामात, टी.व्ही. बघत जेवतो.’ मी अवाक्   झाले. (थोडय़ा वेळानं हा सांगायचा- मी शीर्षांसनातही जेवू शकतो!)

एखाद्या मोठय़ा मशिनचा अगदी छोटय़ातला छोटा स्क्रूही महत्त्वाचा असतो की नाही? तसंच भोजनाच्या संदर्भातले हे छोटे छोटे नियमही खूप महत्त्वाचे असतात, पचनाला मदत करणारे असतात. ‘त्यात काय एवढं,’ असं म्हणून बेफिकिरी केली, तर आपलंच नुकसान!

रोज कार्यालयात सगळ्यांबरोबर होणारं जेवण, रात्री ठरवून सगळ्यांनी एकत्र घेतलेलं जेवण, लग्न-मुंजी आदी समारंभातलं जेवण, पार्टीतलं ‘बफेलो’ जेवण, सुट्टीत पाहुण्यांबरोबर केलेलं आमरसाचं जेवण- ही जेवणं अगदी ऐसपैस गप्पा मारत, हसत-खेळत होतात. पण शास्त्र सांगतं- ‘अजल्पन् (न बोलता) आणि अहसन् (न हसता) जेवावं.थोडक्यात जेवताना मौन पाळणंच जास्त इष्ट. आजही काही जण ‘व्रत’ म्हणून जेवताना मौन पाळतात. (आणि अशा बुद्धिमान व्यक्तीला आजचे शिक्षित लोक हसतात.)

टी. व्ही. बघत जेवणाऱ्यांचं तर काही विचारूच नका! मुलं असोत की मोठी माणसं, जेवणापेक्षा पडद्याकडेच जास्त लक्ष! घास तोंडात जातोय की नाकात हेही भान नसतं त्यांना! पडद्यावरच्या दृश्यांबरोबर मन आंदोलनं घेत असतं. दु:ख, राग, द्वेष, सूड, भांडणं.. काय काय बघत जेवतात! जेवताना असं वातावरण नसावंच. प्रसन्न मनानं आणि भोजनात तन्मय होऊन जेवावं. त्यामुळे पचनाला अनुकूल वातावरण तयार होतं. रांगोळी, उदबत्त्या, मंद बासरी हा जेवतानाचा थाट वातावरणातील प्रसन्नता वाढवणारा आणि पर्यायानं पचनाला उपयुक्त असतो. माझी एक मैत्रीण खूप हौशी आहे. ती अगदी रोजच्या जेवणालाही वेगवेगळ्या काचेच्या डिशेस घेते, रांगोळी काढते, एखादं मंद वाद्यसंगीत लावते, अन्नपदार्थाच्या भांडय़ांमध्ये एका द्रोणात चाफा, मोगरा, बकुळ, जुई किंवा कुंदाची सुगंधी फुलं ठेवते. अशा वातावरणात मोगँबोसारखा खलनायकही ‘खूश’ होऊ शकतो.. भोजनाचा इतका आदर केला, की ते इच्छित फळ देणारच!

जेवायला लागणारा वेळ हा पचनावर परिणाम करणारा आणखी एक घटक! ‘माझं जेवण दोन मिनिटांत होतं,’ असं काही जण अभिमानानं सांगतात. शहरातल्या नोकरी करणाऱ्या बऱ्याच भगिनी, पोळपाटावर पोळीची घडी घालून, ओटा आवरता आवरता ती भरभर पोटात कोंबून घेतात. याउलट टी. व्ही. समोर बसणारी मुलं तास तासभर जेवत असतात. कॉर्पोरेट सेक्टरची तर तऱ्हाच वेगळी. तिथे बिझनेस मीटस् आणि जेवण असं एकत्र असेल तर विचारायलाच नको. त्यांची फाइव्ह कोर्स किंवा सेव्हन कोर्स जेवणं अडीच-तीन तास चालतात. पहिलं अ‍ॅपेटायझर पोटात गेल्यानंतर, तीन तासांनी डेझर्ट पोटात जातं. जणू पोटातले पाचक स्राव तोपर्यंत थांबून दबा धरून असतात. आयुर्वेद शास्त्र सांगतं- नातिद्रुतम् (खूप भरभर जेवू नये) नातिविलम्बितम् (खूप सावकाशही जेवू नये.) भरभर जेवताना अन्नाचं चर्वण नीट होत नाही. सावकाश जेवलं की, प्रमाणापेक्षा जास्त जेवलं जाण्याचा धोका असतो. या सगळ्याचा परिणाम पुन्हा पचनावरच होतो. जेवताना अन्य कुठलंही व्यवधान न ठेवता, एकाग्र मनानं जेवलं, तर जेवण भरभर किंवा वेळ लावून घेत नाही, आपोआपच योग्य वेळेत होऊ शकतं.

‘आत्मानं अभिसमीक्ष्य’ म्हणजे स्वत:चा विचार करून जेवावं. आपल्याला काय आवडतं, काय चालतं, काय पचतं हा विचार अत्यावश्यक आहे. सगळेजण खातात म्हणून, कुणी आग्रह केला म्हणून, नवीन काहीतरी ‘ट्राय’ करायचं म्हणून, पचायची सवय व्हायला हवी म्हणून, अपथ्य असलं तरी आवडतं म्हणून- वेगवेगळे पदार्थ खाल्ले तर त्याचं पर्यवसान ‘अनारोग्यातच’ होतं. लहान मुलांवर याबाबतीत फार अन्याय होतो. त्यांना भूक नसली तरी बळजबरीनं भरवलं जातं. कच्चं अंडं खाऊन उलटी झाली, तरी ‘तब्येत सुधारावी’ म्हणून ते रोज पाजलं जातं. (पण मग रोज उलटी झाली तर तब्येत कशी सुधारणार?) हे थांबवून फक्त स्वत:च्या/ खाणाऱ्याच्या आरोग्याचा विचार व्हायला हवा.

हे सगळे नियम पाळूनही, जेवताना जर आपलं मन चिंता, भय, क्रोध, शोक, दु:ख यांनी युक्त असेल किंवा रोज रात्री जागरण होत असेल तर अन्नाचं पचन योग्य प्रकारे होत नाही, असं चरकाचार्य सांगतात. आजच्या ‘जवळ’ आलेल्या जगात- अशी चिंताद्रिविरहित व्यक्ती मिळणं दुर्मीळच आहे. जागरणावरचा उपाय झोप हाच आहे. मात्र इतर मानसिक व्यथांचा उपाय आहे प्रार्थना. जेवायला बसलं की सुरुवातीला हात जोडून, डोळे मिटून मनापासून प्रार्थना करणं ही खरं तर आपली परंपरा आहे. पृथ्वीच्या पाठीवर ज्या देशांना प्राचीन सांस्कृतिक परंपरा आहे, त्या सगळ्याच देशांमध्ये जेवणापूर्वी प्रार्थना करण्याची पद्धत आहे. आजही या परंपरेचा पाईक असलेला वर्ग मोठा आहे. ‘ईश्वरानं दिलेलं, ईश्वरस्वरूप अन्न, माझ्यामधल्या ईश तत्त्वाचं पोषण आणि तर्पण करणार आहे’- ही आपल्या संस्कृतीची विचारधारा, मनाला दोषमुक्त करायला उपयोगी पडते. अन्न आणि आपण यात एक नातं तयार होतं. ‘सकारात्मक विचार’ म्हणजे दुसरं काय? सायासविरहित सकारात्मक विचार म्हणजेच ‘प्रार्थना.’ हा अनिर्वचनीय अनुभव ज्याचा त्यानं घ्यावा.

या सगळ्याला शास्त्रात ‘आहारविधि’ किंवा ‘भोजनविधि’ असं म्हटलं जातं. हा विधि पाळून जेवायचं म्हटलं तर आपल्याला एका जेवणाला जास्तीत जास्त २० ते २५ मिनिटं लागू शकतात. आपलं ‘विधिनिषेधरहित’ जेवण हे आपल्यापैकी कित्येक जणांच्या आजारांचं कारण असतं किंवा असलेल्या आजारांमध्ये भर घालत असतं. आरोग्य हवं असेल, तर आपल्याला ही २० मिनिटं काढावीच लागतील. हा शास्त्रीय भोजनविधि, आपल्या जीवनात आपल्या संस्कृतीनं अलगद आणून ठेवलाय. आधुनिक शिक्षणाच्या अध्र्या हळकुंडानं पिवळे होऊन, आपण या सगळ्या नियमांविरुद्ध बंड पुकारतो. पूर्वजांच्या बुद्धीवरच प्रश्नचिन्ह लावून ‘का? मी नाही करणार’, असं म्हणतो. पण तो आत्मघात आहे. आपण जर बुद्धिमान असू, तर आपले पूर्वजही तसे असणारच अशा विश्वासानं, या नियमांकडे बघू. मग आपल्या मनातला प्रश्न बदलेल. ‘का बरं सांगितलं असेल असं?’ असा विचार आपण करू. करू या? मग ‘फैला दो। नया है यह।’