‘स्त्री एका टी-बॅगसारखी असते. गरम पाण्यात असल्याशिवाय ती किती कडक आहे ते तुम्हाला कधीच कळणार नाही.’ या एलेनॉर रुझव्हेल्ट यांच्या सुप्रसिद्ध वाक्याने ‘तिसरा नवरा नको गं बाई!’ या पुस्तकाची सुरुवात होते; आणि हे पुस्तक स्त्रियांच्या एका आगळ्यावेगळ्या स्वभावपैलूवर प्रकाश टाकणार याची कल्पना येते. लिसा स्कॉट्टोलाइन या अमेरिकन लेखिकेचे हे पुस्तक म्हणजे तिच्या वृत्तपत्रीय स्तंभाचं संकलन आहे. छोटय़ामोठय़ा निरीक्षणांपासून ते अगदी राष्ट्रीय घडामोडींवर प्रतिक्रिया देणारी लिसा नकळतपणे वाचकांना तिच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची संधी देते. समस्त महिलावर्गाशी हितगुज केल्यासारखी बिनधास्तपणे, काहीशा धाडसी विषयांना ती सहज हात घालते. पन्नाशीच्या जवळ असलेली, दोनदा घटस्फोट झालेली स्त्री तिच्या भन्नाट आयुष्यातले किस्से ऐकवत वाचकाला खिळवून ठेवते. त्यातूनच एका स्त्रीची आयुष्याकडे बघण्याची नर्मविनोदी शैली उलगडत जाते. तिच्या विभक्त पतीराजांना ती चक्क ‘वस्तू १’ आणि ‘वस्तू २’ या नावाने संबोधते. पाळीव प्राण्यांचा ताफाच तिच्याकडे आहे. त्यांच्यासह आकाराला आलेले तिचे कुटुंब हा तिचा जिव्हाळ्याचा विषय आहे. नुकतीच पदवीधर झालेली तिची तरुण मुलगी फ्रान्सिस्का, सत्तरीतली आई, गे असणारा भाऊ  फ्रँक आणि हयात नसणारे वडील हे तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांच्याविषयीच्या माहितीतून त्यांच्यातील नातं, भावनिक बंध उलगडत जातात. अमेरिकन लोकही कुटुंबाशी इतके जोडलेले असू शकतात, याचा प्रत्यय तिच्या लेखनातून आपल्याला येतो.
तिची मते अनेकदा खटय़ाळ वाटली तरी प्रामाणिक वाटतात. ‘राष्ट्राध्यक्षांचे व्हाइट हाऊस थोडं अधिक चांगल्या प्रकारे नाही का सजवता येणार,’ असं सुचवून सजावटीच्या काही सूचनाही करून ती मोकळी होते. अमेरिकेत न्यूक्लिअर कुटुंबाचं इतकं पेव फुटलेलं असताना कुत्र्यांवर प्रेम असलेली माणसे किमान २-३ जातीची कुत्री पाळतात, याला काय म्हणावे? असे तथ्य असणारे प्रश्न ती उपस्थित करते. ‘बाबांची आठवण येते’ या प्रकरणातून तिची वडिलांविषयीची कृतज्ञता, प्रेम, हळवी लिसा समोर येते. तर ‘स्वर्गातला घोटाळा’ मधून फ्रँक व आई यांच्यातील लुटुपुटुच्या लढाईचा तिने लावलेला सोक्षमोक्ष पाहून तिच्या लेखनाविषयी कौतुक वाटतं.
 ‘माझे लाडके प्राणी’ मधील लिटिल टोनी हा किंग कॅव्हॅलिअर जातीचा गोंडस कुत्रा हा माझा रोल मॉडेल असल्याची प्रस्तावना करीत आपल्याला लेखिका धक्का देते. पुढे रुबी ही कॉर्गी जातीची दमदाटी करणारी कुत्री टोनीचा कसा मायेने सांभाळ करते याचे वर्णन करत, लेखिका तिच्या रोल मॉडेल्सचे वेगळेपण विषद करते. पुस्तकातील काही प्रकरणे थोडी पाल्हाळ लावल्यासारखी वाटली तरी लिसाची लेखनशैली वाचकांना खिळवून ठेवते. एकूणच अनौपचारिक गप्पांमधून आपल्याला तिच्या आयुष्यातील घटना, प्रसंग यांविषयी माहिती देत लेखिका तिचे आयुष्याविषयीचे तत्त्वज्ञान आपल्याला समजावू पाहते. अनुभवातून आलेलं शहाणपण, मनाचा मोठेपणा व एकटीने धीराने राहणारी तिची छबी आपल्याला मोहून टाकते. चटकदार तरीही संवेदनशील लेखन असाच उल्लेख या पुस्तकाचा करावा लागेल.
या अनुभव कथनाला ‘तिसरा नवरा नको गं बाई!’ हे शीर्षक का, असा प्रश्न वाचकाला सुरुवातीला पडतो. परंतु पुस्तक वाचून झाल्यावर या प्रष्टद्धr(२२४)्नााचं उत्तर सापडतं. जीवनात आधार शोधताना लिसा लग्नाच्या बंधनात अडकते. परंतु संसार थाटण्याच्या दोन्ही प्रयत्नांमध्ये अपयश आल्यावर ती श्हाणी होते आणि एकटी राहण्याचा निर्णय घेते. यावेळी मात्र तिच्या सोबत असतात तिचे लाडके पाळीव प्राणी. त्यांच्याप्रती असलेला जिव्हाळा व त्यांच्यामुळे होणारा कमी त्रास या दोहोंमुळे तिला तिसऱ्या नवऱ्याची कमतरता अजिबात जाणवत नाही, म्हणूनच हा आगळावेगळा शीर्षकप्रपंच.
तिसरा नवरा नको गं बाई!
मूळ लेखिका- लिसा स्कॉट्टोलाइन, अनुवाद- शोभना शिकनीस,
मेहता पब्लिशिंग हाऊस,
मूल्य- २९० रु.