‘टू गो ऑर नाट टू गो?’

असा प्रश्न फक्त राज्यपालांनाच पडावा असा काही नियम नाही. इंधनदरवाढीनंतर तर तो आम्हांसही पदोपदी पडत असतो!

आत्ता या क्षणीही तोच ‘आजचा सवाल’ आमुचे दोन्ही मेंदू कुरतडतो आहे, की तुम्ही मला सांगा, जावे की न जावे? पण या प्रश्नाचे उत्तर आधीच फुटलेले आहे. जावे!

कोणी फुकट फौजदार म्हणाले तरी चालेल. पण जावेच!   

परंतु कुठे? दॅट इज द मूळ क्वेश्चन!

घुमानला की जोहान्सबर्गाला?

पंजाबला की दक्षिण आफ्रिकेला?

डोक्यात अगदी सावळा गोंधळ झाला आहे. पण त्याला आमचा नाइलाज आहे. स्थळनिवडीचा प्रश्न आला की आमचे हे असे नेहमीच होते! (तुम्हांस सांगतो, आजवर त्याची कटू फळे भोगतो आहोत.. असो!)     

मराठी साहित्य संमेलने तर दोन्ही शहरांत होणार आहेत, असे म्हणतात. एके ठिकाणी अ. भा. आणि दुसरीकडे विश्व, इतकाच काय तो फरक. पण त्याने काय फरक पडतो? साहित्य संमेलन कुठेही झाले, तरी त्याने मराठी साहित्य आणि संस्कृतीचे तेवढेच प्रचंड भले होते! गतवर्षी २६ जानुआरीच्या मुहुर्तावर आमुच्या सोसायटीतल्या सोसायटीत अ. भा. साहित्य संमेलन झाले. तर त्यातसुद्धा साहित्य आणि संस्कृतीचे कितीतरी भले झाले! (त्याचा नेमका आकडा सांगता येत नाही. पण हिशेब मिळताच तोही सादर करू!)

तेव्हा प्रश्न मराठीची देदीप्यमान पताका (आणि दर्शनीय स्थळांची यादी) घेऊन आपण कुठे जायचे, एवढाच आहे. (अगदी नेमकेच सांगायचे, तर प्रश्न विशेष आमंत्रितांच्या कोणत्या यादीत आपले नाव यावे यासाठी आतापासूनच खटपटीला लागायचे, एवढाच आहे!)

याबाबत आमचे परमशेजारी व साहित्यिक कार्यकर्ते

रा. रा. लेले यांचे मत असे पडले, गुपगुमान घुमानलाच जावे! कां, की, ७०० वर्षांपूर्वी मराठी शारदेच्या दरबारातील एक सारस्वत संतश्रेष्ठ नामदेव महाराज पंजाबला गेले. तेथे त्यांनी मराठी साहित्याची मुहूर्तमेढ रोवली. मधल्या काळात हा साहित्यसंबंध फारच रोडावला. आता मराठी शाळांतील संमेलनांत आपली मुले भांगडा नृत्य वगैरे करतात. मराठी विवाह समारंभात संगीत कार्यक्रम होतात, छोले-भटुरेचा बेत असतो. झालेच तर आपल्याकडील मंडळी पटियाळाशी पेगद्वारे संबंध ठेवून असतात. पण हे तितकेच. तेव्हा आता आपणच ते संबंध दृढ करण्याची ऐतिहासिक जबाबदारी उचलली पाहिजे! पुन्हा एकदा पंजाबच्या भूमीत मराठी साहित्याचा वेलु असा गगनावेरी गेला पाहिजे! नामदेवांनंतर पंजाबात मराठी नेणारे साहित्यशार्दूल म्हणून आपले नाव उद्याच्या मराठी साहित्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेलेच पाहिजे.

रा. रा. लेले यांचे हे राष्ट्रीय एकात्मतेने भारलेले भाषण ऐकले आणि तुम्हांस सांगतो, आमच्या चर्मचक्षूंसमोर तो मराठी साहित्य-संस्कृतीचा लंगरच उभा राहिला.

अहाहा!

किती सुरम्य होते ते घुमान साहित्य संमेलनोत्तर सुखचित्र!

पंजाबातील सरसोंच्या खेतांविच कोणी कास्तकार महानोरांच्या संध्याकाळच्या कविता आळवतो आहे. गुरुद्वाराच्या द्वारी क्षणभरी बैसलेले जाणते वृद्ध साठोत्तरी मराठी कवितेतील सोहनी सोहनी सौंदर्यस्थळे यांवर चर्चा करीत आहेत. कोणी अमरिंदर कौर माजघरात पुलंचे विनोद वाचून खुदूखुदू हसत आहे. तिकडे सायंसमयी कोण्या गब्रू जवानास समोरच्या प्लेटीतील पापड पाहून पाडगावकरांच्या पावसाळी कविता आठवून भरून आले आहे. रात्री कामावरून परतलेला डॅडीसिंग आपल्या जिगर दा तुकडय़ांना थकलेल्या बाबाची कहाणी सांगत आहे.. रस्त्यांवरून सुसाट धावणाऱ्या ट्रकांवर ‘हॉर्न ओके प्लीज’ बरोबरच ‘आई तुझा आशीर्वाद’ वगैरे मराठी सुवचने गुरुमुखीत लिहिलेली आहेत. गावागावांत मराठी साहित्य परिषदेच्या शाखा उघडल्या आहेत आणि तेथील मराठी वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्या चाळण्यासाठी झुंबड उडत आहे..

आम्हांस तर भरूनच आले हे चित्र पाहून!

वाटले, काय वाट्टेल ते झाले तरी मराठी साहित्य- संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी जगभरात सर्वत्र साहित्य संमेलने भरविलीच पाहिजेत. (आणि तेथे आपण विशेष आमंत्रितांच्या यादीतून गेलेच पाहिजे!)

या सुविचाराने तर आमच्या डोळ्यांतले आनंदाश्रू गालावरच उतरले.

ते पाहून आमची पाचवीतील सुकन्या ओरडली, ‘मम्मी मम्मी, कम पटकन. बघ ना, डॅडी कसे क्राईंग ते!’

इत्यलम्!!