विद्युत भागवत – lokrang@expressindia.com

फुले यांच्या काळात कित्येक ब्राह्मण पुरुष स्वत:च्या बाईची केवळ ब्रिटिश बायकांशी तुलना करत पुरोगामित्वाचा टेंभा मिरवण्याचे साधन म्हणून स्त्रीशिक्षणाकडे पाहत होते. आणि आजकाल मराठा मूक क्रांती मोर्चातील पोस्टरवर झळकणारी स्त्रियांची नामधारी दृश्यता किंवा त्याला प्रतिक्रिया देणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चात दिसणारी ‘त्यांच्या’ स्त्रियांची नामधारी दृश्यता पाहिली की प्रश्न पडतो : पुरोगामी महाराष्ट्र हा नुसता मिरवण्याचा टेंभा तर नाही ना?

राष्ट्रीय महिला आयोगाच्या म्हणण्यानुसार, करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचारात वाढ झालेली आहे. घरीच बसलेल्या पुरुषांचे घटलेले उत्पन्न, दारू, सिगारेट आदींचा तुटवडा आणि त्यातून वाढलेली चिडचिड आणि शेवटी पुरुषी जगातील वाढणाऱ्या सगळ्या ताणतणावांचा परिणाम हा की स्त्रियांवरील कौटुंबिक हिंसाचारात वाढ! दैनंदिन घरकामे करता-करताच कुटुंबीयांच्या वाढत गेलेल्या फर्माईशींचा भार! शेवटी घरातच घडणाऱ्या या नित्याच्या बाबी; त्यामुळे त्यांची गुन्हा म्हणून नोंद तरी कशी होणार? मग अमेरिकेसारखा विकसित देश काय किंवा कॅनडा, इटली, भारत, पाकिस्तान काय; जवळजवळ जगभरात हेच चित्र आहे. महायुद्धासारख्या जगाची उलथापालथ करणाऱ्या घटनांमध्येही स्त्रीजगतावर विपरीत परिणाम झाल्याचा इतिहास आहेच. मोठय़ा प्रमाणात पुरुषजगत युद्धात गुंतले आणि कामी आले, तेव्हा युरोप-अमेरिकेत सार्वजनिक उत्पादनाच्या क्षेत्रात स्त्रियांना उतरवले गेले. परंतु युद्ध संपताच स्त्रिया पुन्हा घरांमध्ये ढकलल्या गेल्या.

महाराष्ट्राबाबत नेहमी ‘पुरोगामी’ असे बिरुद लावले जाते. छत्रपती शिवराय ते फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीबाई फुले, रानडे, आगरकर आदींची नावे घेऊन महाराष्ट्र पुरोगामी असल्याचा दावा केला जातो. परंतु वास्तवात महाराष्ट्र कसा दिसतो आहे याबद्दल मला काही म्हणायचे आहे. महात्मा फुले यांना अगदी वासाहतिक काळातच स्त्रीशिक्षण, स्त्रियांवरील हिंसाचार आणि स्त्री-भ्रूणहत्या या समस्यांना घेऊन काही प्रश्न पडले होते. त्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांनी निश्चित असे उत्तरही शोधले होते. स्त्रीशिक्षण कशासाठी? तर महात्मा फुले यांच्या दृष्टीने शिक्षणाचे प्रयोजन हे स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी होते. स्त्रियांचे व्यवस्थेच्या पातळीवरील दुय्यम स्थान कमी करायचे असेल तर त्यांना शिक्षण दिले पाहिजे. शिक्षणाने त्यांची अर्थार्जनाची क्षमता वाढेल, ज्ञानाची क्षमता वाढेल आणि त्यातून स्त्रियांना त्यांच्या पायावर उभे राहता येईल असे महात्मा फुले यांचे ठाम मत होते. महात्मा फुले यांचा काळ लोटून शंभरपेक्षा जास्त वर्षे उलटली असली तरी खरोखरीच हा प्रश्न आजही सुटला आहे का, असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रात आज कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह आदी प्रश्न सुटले आहेत का, कुटुंबाच्या आतच बाईची सगळी क्षमता गोठवणारी समाजरचना बदलली आहे का, असे प्रश्न पडतात. खरे तर या सगळ्या प्रश्नांचे ‘नाही’ असे एकच उत्तर द्यावे लागेल.

एकीकडे आपण म्हणतो की, महाराष्ट्र पुरोगामी आहे, इतर प्रदेशांना नेतृत्व देणारा आहे; परंतु स्त्रीप्रश्नाच्या बाबतीत फार काही समाधानकारक परिस्थिती ‘पुरोगामी’ महाराष्ट्रात आहे असे दिसत नाही. ताराबाई शिंदे त्यांच्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ या संहितेत असे म्हणतात की, एखाद्या बटिकेसारखं, ठेवलेल्या बाईसारखं स्त्रियांना वागवलं जातं. विजयालक्ष्मी यांनी जेव्हा त्यांचे स्वत:चे मूलच मारून टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या चारित्र्याची चर्चा सुरू झाली आणि त्यांना अगदी बिनदिक्कतपणे ताराबाई शिंदे यांनी खडा सवाल विचारला.

आज पुन्हा तसा खडा सवाल विचारण्याची वेळ आली आहे. कारण आजही स्त्रीभ्रूणहत्या होत आहेतच. स्त्रियांना शिक्षणात दुय्यमत्व दिले जात आहे. आजही कुटुंबाच्या जबाबदारीत स्त्रियांना जखडून टाकले जात आहे. करोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर जवळपास सगळे जग ‘न भूतो’ असे लॉकडाऊन अनुभवते आहे. सार्वजनिक उत्पादनाचे क्षेत्र ठप्प आहे आणि सरकारी यंत्रणांकडून किंवा जाहिरातींमधून आवाहन केले जात आहे की, ‘घरातच राहा, सुरक्षित राहा.’ या काळात जगभरात विकसित देश काय किंवा भारतासारखे देश काय; सर्वत्रच कुटुंबांतर्गत स्त्रियांवरील हिंसाचार वाढले असल्याची आकडेवारी समोर येत आहे आणि आपला ‘पुरोगामी’ महाराष्ट्रही याला अपवाद नाही.

शिवसेनेत आघाडीवर काम करणाऱ्या नीलम गोऱ्हे याही सांगताहेत की, लॉकडाऊनच्या काळात स्त्रियांवर घरकामाचे ओझे वाढून त्यांच्यावरील हिंसाचारात भर पडली आहे. अशातच ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’ हल्ली मोठय़ा प्रमाणात वाढली आहे आणि घरातल्या काका, मामा अशा प्रौढ पुरुषांनीच घरातील लहान मुलींवर अत्याचार केल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे सध्या जे सांगितले जात आहे की, ‘घरातच राहा, सुरक्षित राहा’- ते कुटुंब खरोखरीच बाईच्या दृष्टीने सुरक्षित आहे का? अशा परिस्थितीत दुय्यमत्व अनुभवणारी एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची शत्रू बनून दुय्यमत्वाची भरपाई करू पाहते. मग सासू-सुनेचं नातं हे ‘पहा, कशा बायकाच बायकांच्या खऱ्या शत्रू असतात!’ असं दिसू लागतं. ‘म्हणजे कुटुंब सुरक्षित नाही, आणि स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू झाल्यावर शेवटी बाई जाणार तरी कुठे?’ असा गहन प्रश्न उरतो.

माझ्या ओळखीची एक घरकाम करणारी स्त्री एकदा रडत होती. ‘का रडतेस?’ असे विचारले तर सांगू लागली, ‘माझा नवरा मला सोडून गेला. माझा कुंकवाचा आधार गेला..’ वगैरे. पुढे ‘का गेला?’ असे विचारले तर सांगू लागली, ‘दारूमुळे त्याची नोकरी गेली. मग माझ्याकडून पैसे घेऊन दारू, जुगारात उधळू लागला. तेव्हा मी पैसे देणार नाही असे म्हणाले तर मारहाण करून निघून गेला.’ मग मी तिला उलट विचारले, ‘अगं, मग यात तो तुझा आधार होता की तू त्याचा?’

म्हणजे काहीही वाईट झाले तर जबाबदार कोण? तर घरातील बायका! घर सांभाळायचे, बाहेरची कामे करून कमावून आणायचे, नवऱ्याचा मारही खायचा. म्हणजे कुंकवाच्या धन्याला तिचे काही घेणेदेणे नाही आणि तिने मात्र स्वत्व धन्याच्या पायाशी विलीन करून टाकायचे. आजही बाईने कुटुंबात स्वत:ला कोंडून घेण्यातच तिची सगळी प्रतिष्ठा आहे, चांगुलपण आहे.. हे काय आहे? आज आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो; पण खरंच असा महाराष्ट्र पुरोगामी असू शकतो का? त्यात आहे का कसले पुढचे पाऊल?

महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतरही सावित्रीबाईंनी समाजसेवेचा वारसा खडतरपणे सांभाळला होता. १९२० मध्ये आलेल्या प्लेगच्या महामारीत त्या लोकांची सेवा करत होत्या. प्लेगचे निदान करणारी ब्रिटिशांची शास्त्रीय पद्धत अनेकांना रुचत नव्हती आणि अशात ‘तपासण्याच्या निमित्ताने आमच्या स्त्रियांना हात लावता’ किंवा ‘आमच्या घरात कनिष्ठ जातीचे शिपाई घुसतात’ या सबबीखाली चाफेकर आदी मंडळी नाराज झाली होती. अफवा पसरवल्या जात होत्या की, दवाखान्यात दिल्या जाणाऱ्या प्लेगच्या औषधांनी नामर्दपणा येतो, किंवा स्त्रिया वांझ होतात, इत्यादी. ब्रिटिशांचा अतिरेक होताच; पण उच्च जाती अहंगंडातून केला जाणारा आडमुठेपणाही होता. आणि हे सगळे शेवटी बाईच्या अब्रूभोवती फिरत होते.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर नुकतेच जमावाकडून झालेले पालघरमधील निर्घृण झुंडबळीचे प्रकरण पुरोगामी महाराष्ट्राला थेट १९२० मध्ये नेऊन ठेवते. आधी अफवा पसरवल्या जातात, मग जमावाला चिथावून निष्पाप माणसांची हत्या केली जाते. आणि वर त्याला जमातवादी रंग दिला जातो. भारताच्या संदर्भात हा जमातवादी रंग नेहमी प्राधान्याने जातिभेद आणि स्त्रियांच्या दुय्यम वास्तवावर पांघरूण घालणारा राहिलेला आहे. वरील दोन्ही उदाहरणे ही हिंदू-राष्ट्रवादी चेहऱ्याआडच्या विकृतीची उदाहरणे आहेत. अफवांचा खेळ आणि मग त्यावर साकारणारा उच्चजातीय पुरुषी नेणिवांचा राजकीय साक्षात्कार.. अगदी १९२० ते २०२० पर्यंत! याला खरेच ‘पुरोगामी महाराष्ट्र’ म्हणता येईल?

महात्मा फुले यांच्या काळात स्त्रियांना शिकून काय करायचे आहे, किंवा द्यायचेच असेल स्त्रियांना शिक्षण- तर घरदार कसे नीट सांभाळायचे, मुलांचे संगोपन कसे व्यवस्थित करायचे, इतकेच द्यावे.. असे म्हणणारे काही कमी नव्हते. परंतु धक्कादायक हे आहे की, अजूनही त्या पुरुषी दृष्टिकोनात फारसा बदल झालेला नाही. कित्येक विद्यापीठांमध्ये सुरू असलेली स्त्री-अभ्यास केंद्रे मागील काही वर्षांत बंद केली गेली. आधीच स्त्री-अभ्यास केंद्रे म्हणजे फक्त ‘बायकांचे बायकांसाठी’ असा कोता आणि चुकीचा समज पसरवला गेलेला आहे. अगदी विद्यापीठांचे काही सन्माननीय कुलगुरूही स्त्री-अभ्यास क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे अभ्यास क्षेत्र म्हणून पाहतात. स्त्री-अभ्यास क्षेत्रांनी सायन्स, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र अशा विविध ज्ञानशाखांमध्ये दिलेल्या मूलभूत योगदानाची त्यांना साधी खबरही नाही. या पाश्र्वभूमीवर स्त्री- अभ्यास क्षेत्रात काम केलेल्या माझ्यासारखीला इतक्या दिवसांत महाराष्ट्रात काय बदलले आणि काय तसेच राहिले, असा प्रश्न पडतो. फुले यांच्या काळात कित्येक ब्राह्मण पुरुष स्वत:च्या बाईची केवळ ब्रिटिश बायकांशी तुलना करत पुरोगामित्वाचा टेंभा मिरवण्याचे साधन म्हणून स्त्रीशिक्षणाकडे पाहत होते. आणि आजकाल मराठा मूक क्रांती मोर्चातील पोस्टरवर झळकणारी स्त्रियांची नामधारी दृश्यता किंवा त्याला प्रतिक्रिया देणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चात दिसणारी ‘त्यांच्या’ स्त्रियांची नामधारी दृश्यता पाहिली की प्रश्न पडतो : पुरोगामी महाराष्ट्र हा नुसता मिरवण्याचा टेंभा तर नाही ना?

महात्मा फुले यांनी शिक्षणाकडे केवळ दागिन्याप्रमाणे सांभाळून ठेवायची शिकलेली बायको असे पाहिले नव्हते. शिक्षण हे त्यांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणाचे साधन म्हणून पाहिले होते. त्या शिक्षणाचा स्त्रियांना सार्वजनिक

क्षेत्रात वापर करता यावा आणि त्यातून त्यांचे दुय्यमत्व नष्ट व्हावे अशी अपेक्षा फुले यांनी बाळगली होती. परंतु दुर्दैवाने आजही पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात खासगी आणि सार्वजनिक अशा भेदाची रेषा बाईच्या अंगावरूनच गेलेली आहे.

विजयालक्ष्मी यांनी स्त्रीभ्रूणहत्येला विरोध करणारे लेखन केले आणि त्याला आपल्या निबंधात पाठिंबा दर्शवताना ताराबाई शिंदे विचारतात की, स्त्रिया भ्रूणहत्येच्या गुन्ह्य़ांपाशी का जातात? कुठेतरी असे वाटतेय, की ही घटना त्या काळची नसून आजही तेच होत आहे. मुलींची लग्ने त्यांच्या मनाविरुद्ध केली जातात. पाळी आली की लगेचच मुलीच्या लग्नाची घाई सुरू होते. मग लग्न झाले की गरोदरपण! म्हणजे सक्तीच्या मातृत्वाचे ओझे तिच्या अंगावर एकदा पडले की समर्थ माणूस म्हणून ती कधीच उभी राहू शकत नाही. त्यामुळे फुल्यांच्या काळात दोन पावले पुढे असलेला महाराष्ट्र आज चार पावले मागे आहे की काय, असा प्रश्न पडतो.