|| सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यास,

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
nagpur, wrong landing point, construction, bridge, kasturchand park, confusion in drivers, traffic congestion,
वाहतूक कोंडीमुळे नागपूरकर हैराण! कस्तूरचंद पार्कजवळील पुलाचे लँडिंग चुकले…
navi mumbai municipal corporation to open wetlands for residential complexes zws
पाणथळ जमिनींवर निवासी संकुले! नवी मुंबईत पामबीचलगत फ्लेमिंगो अधिवास धोक्यात

उटी-रिटर्न सदू धांदरफळेचा वणक्कम्!

..तर मागील पत्रात तुला सांगितलेला आमचा वार्षिक पर्यटनाचा उपचार सुखरूप पार पडलेला आहे. परदेशातच फिरायला जायचं असा हट्ट बायको शेवटपर्यंत धरून बसली होती. त्यासाठी तिनं तिच्या कित्येक नातेवाईकांचे आणि मत्रिणींचे दाखले दिले. (त्या प्रत्येक दाखल्याच्या शेवटी पूर्णविरामाच्या जागी ‘माझंच मेलीचं नशीब फुटकं!’ असं अदृश्य पालुपद होतं.) पण मी काही बधलो नाही. शेवटी ती म्हणाली, ‘‘नाक्यावरच्या वाण्याचा कॉलेजवयीन मुलगादेखील अमेरिकेला गेला आणि तुम्ही मात्र आम्हाला देशातच फिरवायला निघाला आहात.’’ पण मी तिची समजूत काढली. ‘‘‘म्हारो छोकरो स्टेट्स मा गियो..’ असं म्हणणाऱ्या त्या गुजराती माणसाचा मुलगा अमेरिकेला गेलेला असेलच असं काही नाही. कदाचित तो स्टॅटिस्टिक्समध्ये नापास झालेला असू शकतो!’’

बाकी तुला सांगितल्याप्रमाणं कुठंही फिरायला गेलं तरी तोच समुद्र, तेच डोंगर, तसेच पडके वाडे आणि ‘टुरिस्ट स्पॉट’ नावाच्या भोज्ज्याला शिवून हातातल्या आयटिनरीवर टिक मारत ‘टूर मॅनेजर’ नावाच्या इसमापाठी धावणारी माणसं या कशाकशात मला काडीचा म्हणून इंटरेस्ट नाही. केवळ वर्षभर घरात शांती नांदावी या एकमेव हेतूनं मी फॅमिली व्हेकेशनला जातो. आपलं नशीब असं थोर आहे, की प्रवासातही आपल्या वाटय़ाला काही एक्साइटमेंट येत नाही. बऱ्याचदा विमानात आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला वेगवेगळ्या ठिकाणी सीट मिळते. समोरून एखादी अल्पवस्त्रांकित ललना येताना दिसते. ती आपल्याच बाजूच्या रिकाम्या सीटवर बसणार, या खात्रीनं आपण आपल्या उर्वरित केसांवरून आणि कपडय़ांवरून हलकासा हात फिरवून सावरून बसतो. पण ती ललना आपल्याला ओलांडून जाते आणि तिच्या पाठोपाठ येणारी.. जखमेला बँडेज बांधावं तसे अंगाला कपडे लपेटलेली की लपेटलेला हे न कळायच्या अवस्थेतली कुणी व्यक्ती आपल्या शेजारच्या सीटवर बसते. मग आपल्याला नशिबाला दोष देत ‘आपत्कालीन स्थिती में लाइफ जॅकेट फुलाने कि विधी’ पाहण्याशिवाय गत्यंतर नसतं!

दादू, मी गेलो होतो म्हणून सांगतो असं नाही; पण उत्तरेकडील राज्यांत सुट्टीवर जाण्यापेक्षा मला दक्षिणी राज्यांत जाणं बरं वाटतं. बाकी इकडची प्रेक्षणीय स्थळं किंवा माणसं बरी आणि तिकडची वाईट असं सरसकटीकरण मी तरी करणार नाही. पर्यटनस्थळी चालणारे सगळे भलेबुरे उद्योग सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात चालतातच. बहुतेक सगळ्या हिलस्टेशनच्या ठिकाणी गोरे लोक दिसले की स्थानिक ड्रग-पेडलर्स त्यांचा पिच्छा सोडत नाहीत. अगदी ‘काय हवं, काय नको’पासून सर्वात उत्तम प्रतीचा माल (चरस, गांजा) मीच तुम्हाला कसा स्वस्तात देईन, हे सांगून गळी पडतात. आपण काशी किंवा तत्सम तीर्थक्षेत्री गेल्यावर तिथले पंडे जसे आपल्या मागे लागतात, अगदी तोच प्रकार इथंही चालतो. थोडक्यात काय, तर कुठं धर्माची नशा असते, तर कुठं नशेचा धर्म असतो. बाकी सगळं सारखंच!

त्यातल्या त्यात मला दक्षिणेकडील राज्यांत जायला एवढय़ाचसाठी बरं वाटतं, कारण तिथं निदान नाश्त्याला चांगले ऑप्शन्स असतात! उत्तरेकडे गेलं की सकाळ-संध्याकाळ कसला न् कसला पराठाच येतो नाश्त्यासाठी. मागे एकदा हिमाचलैला गेलो असताना तिथं स्थायिक झालेल्या आमच्या जवळच्या मत्रिणीनं जेव्हा मला नाश्त्यासाठी प्लेटमध्ये मुळी पराठा वाढला तेव्हा मी म्हटलं, ‘‘तुला कितीदा सांगितलं, मला मुळी पराठा मुळीच आवडत नाही म्हणून!’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘हा केवळ नावापुरताच मुळी पराठा आहे रे. त्यात मुळी मुळीच नाही!’’

लोक म्हणतात- प्रत्येक भटकंतीच्या वेळी एक तरी युनिक अनुभव घ्यायला मिळाला पाहिजे, तरच ती व्हेकेशन यादगार होते. दादू, खरं सांगायचं तर माझ्या या भटकंतीमध्ये मला असा काहीच वेगळा अनुभव मिळाला नाही. हां, नाही म्हणायला एक गोष्ट मला आजवर आयुष्यात अनुभवता आली नव्हती ती या व्हेकेशनमध्ये करता आली. त्याबद्दल मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो. उटीच्या आमच्या हॉटेलशेजारी एक लग्नाचा हॉल होता. तिथं दिवसभर वाजंत्री वाजत असत. त्यामुळे तीन दिवसांच्या आमच्या तिथल्या मुक्कामादरम्यान अगदी प्रातर्विधीला जातानाही आम्हाला वाजतगाजत जाता आले!

डोंगराळ प्रदेशात चालणारे अ‍ॅडव्हेंचर गेम्स खेळण्याइतकं साहस माझ्या छातीत नसल्यानं मी ते खेळ केवळ पाहून घेतले. मात्र, पॅराग्लायडिंग चालणाऱ्या एका ठिकाणी ‘जगात आजवर एकही पॅराग्लायडर उंचावरून पडल्यानं मेलेला नाही’ अशी खोटी जाहिरात पाहून- ‘‘तुम्ही अशी धडधडीत खोटी जाहिरात कशी काय करू शकता?’’ असं म्हणत मी तिथल्या ऑपरेटरला भिडलो. तो अमित शाहांसारख्या थंड नजरेनं उत्तरला, ‘‘आमची जाहिरात शंभर टक्के खरी आहे. उंचावरून पडल्यामुळे माणूस मेल्याचं एकही उदाहरण मला माहीत नाही. माणूस मरतो तो जमिनीवर आपटल्यामुळे!’’

दादू, आजकाल लोक काही पाहण्या-अनुभवण्यापेक्षा फोटो आणि सेल्फी काढता यावेत आणि ते सोशल मीडियावर डकवता यावेत म्हणून घराबाहेर पडतात. त्याला आमचं कुटुंबही अपवाद नाही. तुला पटणार नाही दादू, पण दहा दिवसांच्या टूरमध्ये आम्ही जवळजवळ पाच हजार फोटो काढले. आता तूच हिशेब कर. फोटोसाठी योग्य स्पॉट शोधणं, स्टायलिश पोज देणं, कॅमेऱ्याचा अँगल साधणं.. या सगळ्या गोष्टींसाठी लागलेला वेळ वजा केला तर आमचा दौरा तीन-चार दिवसांतच आटोपला असता की नाही! खरं म्हणजे पाच हजार फोटो काढणे (त्यातले ९९.९९ टक्के बायकोचे!) हे काही खायचं काम नाही. माझ्या जागी दुसरा कुणी (आपल्या स्वत:च्या बायकोचे फोटो काढणारा) असता तर वैतागलाच असता. पण मी नेहमी सकारात्मक विचार करणारा माणूस असल्यानं न वैतागता असा विचार करतो की, जी बायको एरवी २४ तास कशा ना कशासाठी फुरगंटून बसलेली असते; तिनं दहा दिवसांत फोटोसाठी का होईना, जवळजवळ पाच हजार वेळा स्माइल दिलं, हे काही कमी आहे का!

मला हे असं कडाक्याच्या उन्हात किंवा हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत झुंडीनं भटकायला, दुपारी भूकच लागू नये इतपत (हॉटेलच्या पशात अंतर्भूत असलेला) ब्रेकफास्ट करायला, धावाधाव करून अधिकाधिक टुरिस्ट स्पॉट उरकायला, निसर्ग अनुभवायचा सोडून फोटो काढायला आणि सोशल मीडियावर आपल्या फोटोंचं प्रदर्शन भरवायला अजिबात आवडत नाही. एकदा का पावसाळा सुरू झाला, सगळीकडे हिरवंगार झालं, वातावरणात एक छान थंडगार प्रसन्नता आली की मला एकटय़ानं कुठंतरी जंगलात, नदीकिनारी, माळरानावर फिरायला जाण्याचे वेध लागतात. एकटय़ानं आपल्याच तंद्रीत भटकायला आवडतं. कुणी जोडीला नसावं, कसलं वेळेचं बंधन नसावं, कुणी डिस्टर्ब करणारं नसावं, वाटेल त्या विचारांवर वाटेल तितका वेळ विचार करता यावा. कधी कधी तर कसलाच विचारही न करता नुसतंच निरुद्देश कुणाशीही काहीही न बोलता चालत राहावं, किंवा एखाद्या झाडाखाली नदीच्या पाण्यात पाय सोडून निवांत बसून राहावं यासारखं दुसरं सुख नाही.

दादू, तुला हे असं माझ्यासारखं स्वत:च्याच सान्निध्यात रमायला, स्वान्त सुखाय जगायला आवडतं काय? असेल तर येत्या पावसाळ्यात ये आमच्याकडे. आपण जाऊ फिरायला एकत्र. रमतगमत, गप्पाटप्पा मारत. तेवढीच कंपनी! काय?

बरं का दादू, बोलण्याच्या ओघात खूपच लांबलं पत्र. तेव्हा व्हेकेशनहून परत येताना माझ्या धाकटय़ा मुलीबरोबर झालेला आमचा संवाद सांगतो आणि हे पत्र आवरतं घेतो..

‘‘मम्मा, आम्हाला ना पोलिटिकल सायन्सच्या टीचरनं एक मराठी वर्ड सांगितला होता, पण आता मला तो आठवतच नाहीये.’’

‘‘मी कामात आहे, मला त्रास देऊ नकोस. डॅडीला विचार. असलं फाल्तू जनरल नॉलेज त्याच्याकडे खूप आहे!’’

‘‘डॅडी, आम्हाला ना पोलिटिकल सायन्सच्या टीचरनं एक मराठी वर्ड सांगितला होता, पण आता मला तो आठवतच नाहीये.’’

‘‘अच्छा! काय होता तो शब्द?’’

‘‘आठवतच नाहीये सांगितलं ना!’’

‘‘अरे, पण काही संदर्भ, कशाबद्दल होता.. काही सांगशील?’’

‘‘म्हणजे अशी एक पोलिटिकल सिच्युएशन असते, जेव्हा सरकार जी काही ऑर्डर काढेल त्याप्रमाणे तुम्हाला वागावंच लागतं, तुमच्या म्हणण्याला काहीच किंमत नसते. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे हिंडू-फिरू शकत नाही, मित्रांचा जमाव जमवू शकत नाही, तुम्हाला येणारी आणि तुम्ही पाठवत असलेली पत्रं, मेसेजेस यावर सरकार नजर ठेवून असतं. तुमच्या फोन कॉल्सवर सरकार कान ठेवून असतं. एक प्रकारे तुम्ही २४ तास नजरकैदेतच असता. आणि वर तुम्हाला न आवडणारी शारीरिक मेहनतीची कामंही करावी लागतात.’’

‘‘अच्छा.. अच्छा.. आलं लक्षात!’’

‘‘काय?’’

‘‘मराठी भाषेत या परिस्थितीला ‘आणीबाणी’ म्हणतात. इंग्रजी भाषेत त्याला ‘इमर्जन्सी’ म्हणतात. विनोबांच्या भाषेत त्याला ‘अनुशासन पर्व’ म्हणतात. आणि आम्हा नवरोबांच्या भाषेत त्याला ‘व्हेकेशन’ म्हणतात!’’

तुझा व्हेकेशन-रिटर्न मित्र..

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com