News Flash

परंपरा आणि समाजमन

गौतम बुद्धाला कोशल गावाहून एक अनुयायी भेटण्यास आला होता. त्याने बुद्धाला- योग्य मार्ग म्हणजे काय, असा प्रश्न विचारला.

| September 15, 2013 01:01 am

गौतम बुद्धाला कोशल गावाहून एक अनुयायी भेटण्यास आला होता. त्याने बुद्धाला- योग्य मार्ग म्हणजे काय, असा प्रश्न विचारला. बुद्धांनी त्याला सांगितलं, मी जे काही सांगितलं त्यावर केवळ मी काही सांगितलंय म्हणून विश्वास ठेवू नकोस. केवळ परंपरा सांगते म्हणून तू काही ऐकू नकोस. कोणी प्रसिद्ध व्यक्ती म्हणते म्हणून तू ऐकू नकोस. केवळ शक्य आहे म्हणून बरोबर आहे असं समजू नकोस. केवळ व्यवहारज्ञान आहे म्हणून स्वीकार करू नकोस. जे तुझ्या सदसद्विवेकबुद्धीला योग्य वाटतं, त्यावर तू विश्वास ठेव व त्याचं आचरण कर. डोळ्यांवरच्या अनेक पट्टय़ा काढून मनाची घडी बनव. हेच योग्य आहे.
व्यक्तिगत व सामाजिक जीवनात अशा कितीतरी रूढी, परंपरा आपण अशाच डोळ्यांवरच्या पट्टय़ा ठेवून पाळत असतो. कितीतरी परंपरा आज काळानुसार कालबाह्य़ ठरल्या असल्या तरी आपल्या पूर्वजांनी सुरू केल्या, सांगितल्या म्हणून आपण पाळत असतो. विटाळ ही अशीच एक रूढी अजूनही कमी-अधिक प्रमाणात पाळली जाते. ती एक नसíगक चक्रानुसार होणारी उत्सर्जन प्रक्रिया आहे. आज त्याची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी साधनं उपलब्ध आहेत. (पूर्वी ती नव्हती. त्यामुळे अस्वच्छता वगरे होऊ नये म्हणून बाहेर’ बसवण्याची पद्धत सुरू झाली असावी असा तर्क केला तरी शिवाशिव’ वगरे गोष्टी नक्कीच तर्कनिष्ठ नव्हत्या.) तरीही आज एकविसाव्या शतकात अगदी सुशिक्षित स्त्रियादेखील ही परंपरा’ अगदी मनोभावे पाळतात. त्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ वा फॅमिली डॉक्टरांकडून पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेणं हीदेखील एक परंपराच होऊन बसली आहे. श्रावण ते काíतक किंवा अगदी नंतर येणारा लग्नसराईचा काळ यात या गोळ्यांचा खप वाढतो. या चुकीच्या परंपरेचा सुशिक्षित स्त्रियांनी नक्कीच डोळ्यांवरची पट्टी काढून विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ, विवेकी पुनर्वचिार करणं अतिशय जरुरीचं आहे. निर्गुण, निराकार देव आपण आपल्यासाठी विविध रूपांत आणला आहे. तर त्या देवाला कसला आलाय नसíगक क्रियांचा विटाळ?
या उत्सर्जति वस्तू शेवटी निसर्गालाच जाऊन मिळतात ना? म्हणूनच श्रद्धा ठेवण्यात या नसíगक क्रियांचा अडथळा नक्कीच तर्कसंगत नाही. आणि विज्ञानविसंगत परंपरा पाळण्यासाठी विज्ञानानेच निर्माण केलेल्या गोळ्या घेणं, हा तर मग भोंदूपणाच नाही का? चमत्कार दाखवण्यासाठी काही वैज्ञानिक तंत्राचा वापर करणारे भोंदूबाबा व आपल्यात मग काय फरक राहिला? म्हणूनच ही अविवेकी विज्ञाननिष्ठा टाळलीच पाहिजे, हे नक्की. अर्थात एखाद्या ठिकाणी जाणं टाळण्यासाठी या परंपरेचा आधार स्त्रियांकडून घेतला जातो, हीसुद्धा एक निषेधार्ह बाब आहे. तीसुद्धा स्त्रियांनी विवेकाने टाळली पाहिजे.
आज स्त्रियांकडे बघण्याची पूर्वापार परंपराही प्रत्येक पुरुषाने बदलणं आवश्यक आहे. स्त्रीचं हेच ठराविक काम, स्त्रियांनी असंच वागलं पाहिजे, नतिकतेचं दायित्व स्त्रीचंच आहे, तसंच सणवार, घरातली कामं ही स्त्री घराबाहेर पडून अर्थार्जन करत असली तरी तिनेच करणं ही परंपरा आहे, हे विचार पुरुषांनीच नव्हे, तर स्त्रियांनीसुद्धा मनापासून बदलणं आवश्यक आहे. नसíगकदृष्टय़ा दोघांमध्ये फरक असला तरी स्त्रीची काही बलस्थानं व पुरुषाची बलस्थानं एकत्र आली तर सकारात्मक कौटुंबिक वातावरण निर्माण होऊ शकतं. म्हणूनच एकमेकांना समजून घेऊन दोघांनी समविचाराने संसार करण्याची गरज आहे. याकरता संपूर्ण समाजानेच या पुरुषप्रधान परंपरेचा पुनर्वचिार व्यक्तिगत स्वरूपात करणं गरजेचं आहे.
देवधर्म, देहधर्माच्या या जाचक परंपरा स्त्रियांसाठीच जास्त लागू होतात. त्या स्त्रियांचं मन:स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत असतात. माझ्या व्यावसायिक जीवनात स्त्रीरुग्णांच्या समस्या ऐकताना जाणवलेल्या या जाचक, अविवेकी परंपरा बदलण्याची आवश्यकता म्हणूनच प्रकर्षांने जाणवली. (Religious feeling must establish itself as a rational way of living. Religion must express itself in reasonable thought, fruitful action and right social institutions.) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी धर्म, परंपरा व विवेकाची घातलेली सांगड आपण मात्र पाळत नाही. नुसतं शिक्षकदिनी त्यांची अविवेकी’ पूजा करण्याची परंपरा पाळतो!
आज समाजातसुद्धा उत्सवांची परंपरा वाढत चाललेली दिसते. लोकमान्य टिळकांनी समाजात परकीय सत्तेविरुद्ध चेतना उत्पन्न करण्यासाठी, ती प्रसारित करण्यासाठी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. त्याचवेळेस द्रष्टे सुधारक न्या. महादेव गोिवद रानडे यांनी त्यांना सांगितलं होतं की, तुम्ही हे जे करताय त्याचा तुमचा हेतू उदात्त असला तरी त्यातून नको ते प्रश्न, वेगळ्या सामाजिक समस्या उभ्या राहतील. त्यामुळे पुनर्वचिार करा. परंतु उदात्त हेतूने सुरू केलेल्या या उत्सवाचं पारंपरिक रूप पुढे भयावह होत गेलं. त्यातून समाजप्रबोधन होण्याऐवजी बाजारीकरण मात्र अगदी छान झालं आहे. नवसाचे’ गणपती, राजे’ गणपती अशा प्रथांनी अंधश्रद्धेचं बाजारीकरण केलं आहे आणि त्याला तथाकथित राजकारणी (सर्वपक्षीय) व सेलिब्रिटीज् उपस्थित राहून पुरस्कृत करतात, ही किती अविवेकी बाब आहे. गणेशोत्सव सुरू होण्याआधी वर्गणीच्या (खंडणी!) नावाखाली अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी, व्यसनाधीनता याचाच आपण प्रसार करत आहोत. उत्सवाच्या वेळी ध्वनिप्रदूषणाबाबतही कोणी जागरूक राहत नाहीत. उलट, सरकारकडून सूट मिळवली’ जाते. खरं तर निधर्मी’ राज्यात कुठच्याही सार्वजनिक धार्मिक उत्सवांना बंदी करणं आवश्यक होतं. ते तर दूरच; पण सर्व निधर्मी’, धार्मिक’ राजकारणी या उत्सवांचे पुरस्कत्रे होतात, यासारखं दुर्दैव ते कोणतं? उलट, यात नवरात्र उत्सवाबरोबरच दहीहंडी उत्सवाचीही भर पडली आहे. परंपरा पाळण्यातला हा अविवेकीपणा आपल्याच विनाशास कारणीभूत होऊ शकतो. अशा तंत्रमंत्र, देवधर्म यांत आकंठ बुडाल्यानेच पेशवाई बुडाली. त्यामुळेच केवळ मराठी साम्राज्यच नाही, इतरही अनेक संस्थानं ताब्यात घेणं परकीयांना शक्य झालं असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी म्हटलं होतं.
आज तरी काय वेगळी परिस्थिती आहे? आणि म्हणूनच एक गाव- एक उत्सव’ किंवा एक शहर- दोन उत्सव’ एवढय़ावर तरी ही उत्सवी परंपरा सीमित करण्याचा विवेक दाखवणं ही काळाची गरज आहे. त्यात सर्वाचंच भलं आहे. कारण त्यामुळे गुन्हेगारी, व्यसनाधीनता रोखता येईल, प्रदूषण टाळता येईल, गर्दीमुळे विसर्जनाच्या वेळी येणारा ताणही मग टाळता येऊ शकतो. तेव्हा एकूणच समाजाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समस्त भारतीयांनी परंपरा पाळणं या विषयावर आत्मचिंतन केलं व विवेक दाखवला तर ते खूप फायद्याचं ठरेल, हे नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 1:01 am

Web Title: traditions and society thinking
टॅग : Society
Next Stories
1 विज्ञानाची‘विवेकी’ कास
2 प्रगतीचा प्रशस्त मार्ग
3 प्रेम भावे…
Just Now!
X