14 July 2020

News Flash

पर्यटन – कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा

उन्हाळी सुट्टीचा हंगाम लवकरच सुरू होत आहे. गोव्यापेक्षा आर्थिकदृष्टय़ा परवडणारं आणि कौटुंबिक पर्यटनासाठी शांत व सुरक्षित परिसर म्हणून कोकणात हापूस आंब्यासह सागरी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची

| April 7, 2013 12:09 pm

उन्हाळी सुट्टीचा हंगाम लवकरच सुरू होत आहे. गोव्यापेक्षा आर्थिकदृष्टय़ा परवडणारं आणि कौटुंबिक पर्यटनासाठी शांत व सुरक्षित परिसर म्हणून कोकणात हापूस आंब्यासह सागरी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची पसंती वाढते आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनण्याची शक्यता असलेल्या तेथील पर्यटनाविषयी..

निसर्ग रमणीय कोकणाच्या आर्थिक-सामाजिक मागासलेपणाबद्दल अनेकदा चर्चा होते आणि या समस्येवरील उत्तर इथल्या निसर्गातच असल्याचंही आवर्जून सांगितलं जातं. जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि विविध प्रकारची जातिवंत मासळी ही कोकणातली ‘नगदी पिकं’ मानली जातात. त्याचप्रमाणे एका बाजूला सह्य़ाद्रीच्या पायथ्याशी वसलेली, जैवविविधतेने समृद्ध खेडी आणि दुसऱ्या बाजूला रूपेरी वाळू व माडाच्या बनातून सागरकिनाऱ्यांवरची सफर कोणाही पर्यटकाला भुरळ पाडणारी असते. त्यामुळेच आंबे किंवा माशांपेक्षासुद्धा पर्यटन हा कोकणच्या दृष्टीने शाश्वत विकासाचा पर्यावरणस्नेही पर्याय मानला जातो. गेल्या काही वर्षांत राज्य पर्यटन महामंडळाने कोकणच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्य़ांमधील पर्यटकप्रिय स्थळांवर लक्ष केंद्रित करून खास महोत्सवांचं आयोजन सुरू केलं आहे. त्याचबरोबर आजपर्यंत दुर्लक्षित पण पर्यटनाच्या दृष्टीने वाव असलेल्या ठिकाणी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या निवास व न्याहरीसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिलं आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात बोर्डी (जि.रायगड) इथे ‘चिक्कू महोत्सव’ आणि गेल्या महिन्यात मुरुड-हर्णे-वेळास इथे ‘डॉल्फिन-कासव महोत्सव’ स्थानिक संस्थांच्या सहकार्याने महामंडळाने आयोजित केले. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे महोत्सव प्रथमच झाले.  या महोत्सवांमुळे लगेच थेट आर्थिक लाभ होणं शक्य नसलं तरी भविष्यातील विकासाच्या दृष्टीने ही गुंतवणूक असल्याचं मुरुडच्या डॉल्फिन महोत्सवाचे स्थानिक आयोजक सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शैलेश मोरे यांनी नमूद केलं. ते म्हणाले की, अलीकडच्या काळात शनिवार-रविवारी या परिसरात पर्यटकांची भरपूर वर्दळ असते. गेल्या २६ जानेवारी रोजी आजपर्यंतच्या पर्यटकसंख्येचा विक्रम मोडला गेला. पुण्या-मुंबईपासून सुमारे चार-साडेचार तास प्रवासाच्या अंतरावरील दापोली हे यापूर्वीचं पर्यटकांचं अतिशय आवडतं ठिकाण झालं आहे. गेल्या वर्षी नाताळच्या काळात इथे सुमारे दहा कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. पण मुरुड-हर्णेसारख्या ठिकाणी मुंबई किंवा राज्याच्या अन्य भागांतून येणाऱ्या अमराठी पर्यटकांचं प्रमाण अतिशय कमी होतं. डॉल्फिन महोत्सवामुळे पर्यटकांच्या या नव्या वर्गापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. रत्नागिरी जिल्ह्य़ात दापोलीप्रमाणेच गुहागर आणि गणपतीपुळे या पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणीही हंगामात पथारी पसरायलासुद्धा जागा शिल्लक राहत नाही, असा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. शेजारच्या गोवा राज्यात नाताळच्या हंगामात सुमारे चार लाख पर्यटक येतात. गेल्या दोन वर्षांपासून कोकणही त्या काळात या संख्येपर्यंत पोचू लागलं आहे.

रायगड जिल्ह्य़ात एलेफंटा केव्हज्, कर्नाळा अभयारण्य, नागाव- किहीमचा समुद्रकिनारा, मापगाव येथील डोंगरावरील कनकेश्वर मंदिर, दिवे-आगार, मुरुड-जंजीरा, हरिहरेश्वर-श्रीवर्धन, महड-पाली येथील गणपतीची पेशवेकालीन मंदिरं, शिवाजीमहाराजांची राजधानी रायगडचा किल्ला अशी अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळं आहेत. त्याचप्रमाणे हा जिल्हा ठाणे-मुंबईला अतिशय जवळ असल्यामुळे कोकणातील तीन जिल्ह्य़ांपैकी या जिल्ह्य़ात पर्यटकांची संख्या सर्वात जास्त असते.

रत्नागिरी जिल्ह्य़ातील नऊ तालुक्यांमध्ये अनेक प्राचीन मंदिरं आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांबरोबरच शिवकालीन तब्बल पंचवीस किल्ले आहेत. त्यापैकी १३ डोंगरी (गिरीदुर्ग) आणि १२ सागरी (जलदुर्ग) किल्ले आहेत. दुर्दैवाने या किल्ल्यांची चांगल्या प्रकारे देखभाल झालेली नाही. तसंच त्याबाबत पर्यटकांना पुरेशी माहितीही नाही. यापैकी काही किल्ले पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे त्यांची देखभाल व दुरुस्ती या खात्यातर्फे केली जाते. त्यासाठी राज्य सरकारने पुरातत्त्व विभागाला निधी दिलेला असूनही हे काम होत नसल्याची खंत खुद्द राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी मुरुडच्या महोत्सवात व्यक्त केली होती.

रत्नागिरीप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातही बावीस शिवकालीन गड-दुर्ग आहेत. (हा एक वेगळा, साहसी ऐतिहासिक पर्यटनाचा विषय होऊ शकतो.) शिरोडा, सागरेश्वर, निवती, तारकर्ली इत्यादी अतिशय निसर्ग रमणीय समुद्रकिनारेही आहेत. आंबोली हे तर जिल्ह्य़ातील थंड हवेचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या जिल्ह्य़ात ‘सी वर्ल्ड’ हा सागरी पर्यटनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प होणार असून त्यासाठी जागतिक पातळीवरून निविदा मागवण्यात येणार आहेत.

या तिन्ही जिल्ह्य़ांना जोडणारा सागरी महामार्ग अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी कोकणच्या खाऱ्या समुद्राचं रमणीय दर्शन घडतं. तसंच काही उत्तम पर्यटनस्थळंही या मार्गालगत आहेत. पण तिथे जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी या मार्गावर खाद्य-पेयाचे स्टॉल, पेट्रोलपंप आणि इतर आनुषंगिक सुविधा निर्माण होण्याची गरज आहे.

कोकणाला पर्यटनाच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नकाशावर नेण्यासाठी संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखाली कोकण भूमी प्रतिष्ठान गेली काही र्वष विविध उपक्रम आयोजित करत आहे. या उपक्रमांना वाढता प्रतिसाद असल्याचं सांगून यादवराव म्हणाले की, कोकणात दरवर्षी सुमारे दोन ते अडीच कोटी पर्यटक येतात, असा अंदाज आहे. ही संख्या गेल्या काही वर्षांत, या क्षेत्रात मोठी झेप घेतलेल्या केरळपेक्षाही जास्त आहे. पण त्यापैकी बहुसंख्य फक्त आठवडाअखेरीस एक-दोन दिवसांसाठी येतात. त्यामुळे त्यांचा इथल्या अर्थव्यवस्थेवर विशेष प्रभाव पडत नाही. कोकणात पर्यटनाच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे दीड ते दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असावी, असा अंदाज आहे. पण त्यातून श्रीमंती येत नाही. ते होण्यासाठी कृषी किंवा ग्रामीण पर्यटनाला गाव पातळीवर चालना देण्याची गरज आहे. इथे पर्यटक जास्त दिवस राहावा यासाठी कोकणाचा राष्ट्रीय पातळीवर प्रचार करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर मुंबईत दरवर्षी सुमारे ४८ लाख परदेशी लोक येतात. त्यापैकी काही टक्के कोकणात पर्यटक म्हणून आले तरी इथल्या अर्थव्यवस्थेला चांगलं बळ मिळेल. पण त्यासाठी त्या दर्जाच्या सुविधा आणि निखळ व्यावसायिक दृष्टिकोनाची गरज आहे. यंदाच्या वर्षी शासनाने प्रथमच येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. कोकणात पर्यटन रुजण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल मानावं लागेल.

शासनाची विविध खाती राज्यात विकास योजना राबवण्यासाठी प्रयत्नशील असतात. पर्यटन खातं त्यापैकी एक असलं तरी या खात्याच्या कामाचं स्वरूप आणि कार्यक्षेत्र पाहता इथे जास्त कल्पक उपक्रमांची गरज आहे. त्या दृष्टीने कोकणात सध्या असलेल्या पर्यटनपूरक उपक्रमांमध्ये स्थानिक सहभाग आणि त्यातून रोजगार कशा प्रकारे वाढवता येईल, यासाठी पर्यटन महामंडळातर्फे काही योजनांची गंभीरपणे आखणी सुरू असल्याचं सरव्यवस्थापक किशोरी गद्रे यांनी नमूद केलं. डेक्कन ओडिसीसारख्या शाही पर्यटक गाडीचा कोकणात मुक्काम वाढवण्यासाठी परदेशी नागरिकांना आवश्यक तारांकित सुविधांची इथे गरज आहे. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी शासकीय कार्यपद्धतीच्या बाहेर जाऊन जिल्ह्य़ातील पर्यटन स्थळांची उत्कृष्ट रंगीत छायाचित्रांसह माहिती देणारं पुस्तक कलात्मक पद्धतीने प्रकाशित केलं आहे. राज्यातील सहल आयोजकांसाठी ते मोफत उपलब्ध आहे. या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतरही तयार असून ते परदेशी वकिलातींना पाठवण्याची मोघे यांची कल्पना आहे. अशा तऱ्हेच्या कल्पना-योजनांची कोकणच्या तिन्ही जिल्ह्य़ांमध्ये उत्तम समन्वयाव्दारे अंमलबजावणी होऊ शकली तर त्यातून येथील पर्यटनाला निश्चितपणे चांगला हातभार लागेल.

उन्हाळी सुट्टीचा हंगाम लवकरच सुरू होत आहे. कोकणात हापूस आंब्यासह सागरी पर्यटनासाठी या काळात पर्यटकांची चांगली गर्दी होते. त्याचबरेाबर गेल्या काही वर्षांत दिवाळी आणि नाताळच्या सुट्टीतही पर्यटक कोकणाला पसंती देताना दिसतात. गोव्यापेक्षा आर्थिकदृष्टय़ा परवडणारं आणि कौटुंबिक पर्यटनासाठी शांत व सुरक्षित परिसर म्हणूनही ही पसंती वाढली आहे. अशा सुट्टीच्या हंगामांबरोबरच पावसाळ्यातलं कोकण किंवा गणपती-शिमग्यासारख्या अस्सल स्थानिक उत्सवांच्या काळातलं कोकणही पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकतं. त्यासाठी नियोजनबद्ध प्रचार आणि प्रयत्नांची गरज आहे. बेभरवशी आंबा-माशांपेक्षा पर्यटनाचं क्षेत्र कोकणाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनू शकतं. फक्त त्यासाठी गरज आहे इथल्या नैसर्गिक साधनांचं संधीमध्ये रूपांतर करण्याची!

सतीश कामत

स्र्ीे२ं३्र२ँ.‘ें३@ॠें्र’.ूे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2013 12:09 pm

Web Title: travel and tourism a major factor of konkan region economic groth
टॅग Konkan,Tourism
Next Stories
1 संस्थांचे कोंडवाडे, वंचितांचे मसणवटे!
2 एकेक मूर्ती घडवताना…
3 नटराज कोविलम
Just Now!
X