पूर्वोत्तर राज्यांपकी त्रिपुरा हे एक तुलनेने शांत आणि बंगाली भाषेत बोलायचे तर ‘रूपाशी’ (रूपवान) असं राज्य आहे. ते असं शांत असण्याचं एक कारण तेथील प्रशासन हेही असू शकेल. देशातील इतर राज्यांचे मुख्यमंत्री कोटय़वधी रुपयांची ‘माया’ जमवत असताना त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी सलग तीनदा विराजमान होणारे निष्कलंक माणिक सरकार यांची संपत्ती  चौदा हजार रुपयेसुद्धा नाही. त्रिपुराची  राजधानी- अगरतळा. अगरतळय़ाहून ५३ कि.मी.वर पाण्यात दिमाखात उभा असलेल्या नीरमहालाविषयी खूप ऐकले होते. त्याचे सुंदर फोटोही पाहिले होते. तो महाल बघण्याचा विचार मनात खूप दिवस घर करून होता. जोडीला आगरतळा शहराच्या मध्यभागी असलेला, रुबाबदार उज्जयंता पॅलेसही खुणावत होताच. यापूर्वी सहज जाण्याजोगी अमृतसरनजीकची वाघा बॉर्डर व तेथील ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाहिला होता. तशीच अगरतळाला खेटून असलेली बांगलादेशची सरहद्द पाहायची उत्सुकता मला त्रिपुराच्या राजधानीत खेचत होती. स्वतंत्रपणे फिरणाऱ्या पर्यटकांना कोणत्या राज्यात काय पाहायचे, सहलीत कोणत्या स्थळांना प्राधान्य द्यायचे, इच्छित सर्व ठिकाणे पाहायची तर प्रवासास किती वेळ लागेल याची चिंता सतावत असते. पर्यटनात आघाडीवर असलेली  हिमाचल प्रदेश व केरळ ही राज्ये शांत आहेत. त्याउलट, ईशान्येतील राज्यांतून येणाऱ्या अतिरेक्यांच्या किंचित अतिरंजित बातम्या पर्यटकांचा हिरमोड करतात. बरं, नीट माहिती मिळवायची, तर ती मिळण्याचे स्रोतही तसे तुटपुंजेच आहेत. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक या राज्यांच्या पर्यटन खात्याच्या कचेऱ्या तरी मुंबईत आहेत. तशा ईशान्येकडील राज्यांच्या पर्यटन कचेऱ्याही अस्तित्वात नाहीत. कोलकात्याला गेलेले बरेचसे पर्यटक तिथवर गेलोच आहोत तर तसेच थोडे पुढे खूपसे शांत असलेल्या शिलाँगला विमानाने जाऊन येण्यावर समाधान मानतात. मेघालयएवढाच  शांत असलेला आणि सुंदर व कलात्मक इमारती तसंच हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या त्रिपुरातला मुक्काम नक्कीच आनंददायी ठरेल याची कित्येकांना कल्पना नसते.
त्रिपुरा हे राज्य चारही बाजूंनी भूवेष्टित आहे. या राज्याच्या दक्षिण, पश्चिम व उत्तरेच्या सरहद्दीला खेटून आहे- बांगलादेश. तर पूर्वेला आहे- आसाम आणि मिझोराम ही भारतातलीच राज्ये. भाषा, कपडे, खाद्यपदार्थ, रस्त्यावरच्या पाटय़ा याबाबतीत हे दुसरे कोलकाता आहे. पण जरा खोलात गेलात तर इथली वारसा जपणारी स्मारकं, इको-उद्यानं आणि देवळं आपल्याला चकित करतात. त्रिपुरात बघण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. मुख्य स्थळांत उदयपूर जिल्हय़ातील माताबाडी किंवा त्रिपूरसुंदरीचे मंदिर पाहण्यासारखे आहे. ते उदयपूर या जिल्हय़ाच्या शहरापासून दोन ते तीन कि.मी.वर, किंचित उंचशा टेकाडावर आहे. हे प्राचीन मंदिर त्रिपुरावासीयांना अत्यंत पूजनीय आहे. माताबाडी म्हणजे आई देवीचे मंदिर. बंगाली भाषेत बाडी म्हणजे घर. (जसे कोलकात्यातील गुरुदेव टागोरांच्या घराला ‘ठाकूरबाडी’ म्हणतात.) हे मंदिर ५१ शक्तिपीठांपकी एक मानले जाते. राज्याचे मुख्य दैवत असलेल्या या देवीला पार्वतीचा अवतार मानले जाते. इथे मातेचा उजवा पाय पडल्याचे मानले जाते. पश्चिम बंगालमधून बऱ्याच बंगाली लोकांनी त्रिपुरात स्थलांतर केलेले आहे. त्यामुळे बंगालमधील अनेक रीतीरिवाज इथेही आपल्याला आचरणात दिसतात. त्यापकी एक म्हणजे देवीला आवाहन करायची त्यांची रीत.  इथे दर्शनाला आलेल्या महिला भक्त देवीच्या आवाहनासाठी ठरावीक पद्धतीने जिभेची जोरात हालचाल करून ‘ओलूध्वनि’ म्हटला जाणारा आवाज करतात. या देवळासमोर अजूनही नवसपूर्तीसाठी बकऱ्याचा बळी देण्याची पद्धत आहे. त्यासाठी गाभाऱ्यासमोर खास मंडपही उभारलेला आहे. ‘कल्याणसागर’ या देवळानजीकच्या सरोवरामुळे हा परिसर अतिशय प्रसन्न वाटतो.
माताबाडी मंदिराकडे जाताना वाटेत आपल्याला ४०० विविध जातींचे वृक्ष असलेल्या ‘सेपाहिजाला’ या अभयारण्यातून जावे लागते. खरं तर हे एक पूर्ण दिवस मजेत घालवता येईल असं मनोरंजक ठिकाण आहे. इथल्या तळ्यात बोटिंगची सुविधा आहे, तर छोटय़ांसाठी टॉय ट्रेनही आहे. भटक्यांनी थोडी तंगडतोड केल्यास जंगलात त्यांना यापूर्वी कधीही न पाहिलेल्या वानरांच्या विविध जाती पाहण्याचा योग येऊ शकतो. तिथले बोटॅनिकल गार्डन पाहण्यासारखे आहे.     
त्रिपुराची राजधानी आहे अगरतळा. अगर जातीच्या वृक्षांचे प्रमाण इथे विपुल होते, म्हणून या शहराला हे नाव पडल्याचे सांगतात. विविध संस्कृतींचे सुंदर मिश्रण असलेली, पूर्वीच्या टिपेरा संस्थानची ही राजधानी अतिशय शांत आहे. अगरतळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणता येईल अशी एक वास्तू म्हणजे ‘नीरमहल’ हा सरोवरात बांधलेला महाल! अगरतळ्याहून माताबाडी येथील देवीचे दर्शन घेतल्यावर परतीच्या वाटेवर तो लागतो.
सहसा पाण्यातील राजवाडा म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर राजस्थानमधील उदयपूरचा ‘लेक पॅलेस’ तेवढा येतो. कारण तशा पद्धतीचा दुसरा महाल भारतात आहे याची कित्येकांना माहिती नसते. राजस्थानमधील त्या अनेकमजली राजवाडय़ाचे आता महागडय़ा आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे ‘अशा प्रकारचा महाल असतो तरी कसा?’ अशी एखाद्याला उत्सुकता वाटली तरी तो त्याच्या जवळ जायला कचरतो. त्रिपुराचा बठा नीरमहल हा भारताचा एक सांस्कृतिक ठेवा म्हणून मानाने मिरवत आहे. या महालाचे हे नाव थोर कवी रवींद्रनाथ टागोरांनी ठेवले आहे. एक विलक्षण योगायोग म्हणजे हे दोन्ही जलमहाल उदयपूर या सामायिक नाव असलेल्या जिल्हय़ांत आहेत. रुद्रासागर या सरोवरात असा महाल बांधण्याचे स्वप्न त्रिपुराचा शेवटचा राजा वीर विक्रम किशोर माणिक्य बहादूर यांचे होते. हा महाल बांधण्याचे काम नऊ वष्रे मार्टन्सि आणि बर्न्‍स ही कंपनी करीत होती. यापूर्वी या कंपनीने अगरतळा शहराच्या मध्यभागी असलेला उज्जयंता पॅलेस बांधला होता. १९३० साली पूर्ण झालेल्या या नीरमहालाची लांबी १३०० फूट आहे. या वाडय़ात २४ खोल्या आहेत. सात-आठ फूट उंच चौथरा असल्याने एकमजली असलेला हा महाल दुरून दुमजली भासतो. पाण्यात उभा असल्याने चौथऱ्याची एवढी उंची योग्यच आहे म्हणा! सरोवराच्या काठावरून या महालाचे शांत पाण्यातील प्रतििबब बघत राहणे, हा एक अवर्णनीय आनंद आहे. महालाला रोषणाई केल्यावर तो दृष्ट काढावी इतका सुंदर भासतो. वाजवीपेक्षा जास्त लांबीमुळे महालाची उंची कमी भासते. आणि या नाजूक उंचीमुळे तो जमिनीवरून अत्यंत मोहक दिसतो. त्याच्या या सुंदरपणाला आणखी एक कारण म्हणजे महालात साधलेली प्रमाणबद्धता! मुघलकालीन स्मारकं आपणास चांगली दिसतात त्याचे कारणही हेच आहे. सात-आठ पर्यटक जमले की सागरमहलनजीकच्या जेटीवरून मोटरबोटीने तिथे नेण्याची व्यवस्था होते. किंवा थोडे अधिक पसे भरून आपण स्वतंत्रपणेही बोट भाडय़ाने घेऊ शकतो.  
त्रिपुराच्या दक्षिण भागात सुमारे दहाव्या शतकातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे अगरतळ्याहून शंभर कि.मी.वरील पिलक आणि आडवाटेवरचे रुद्रसागरहून सातपट मोठे असलेले दुंबूर सरोवर ही काही ठिकाणेही पाहण्याजोगी आहेत.
त्रिपुराच्या उत्तर भागात उनाकोटी हे न चुकता बघावे असे एक ठिकाण आहे. पुराणवस्तूंच्या अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे स्थळ अगरतळ्याहून सुमारे १७८ कि.मी. वर आहे. उनाकोटीचा शब्दश: अर्थ आहे- एक कोटीहून थोडे कमी! ‘बास-रिलीफ’ प्रकारातील डोंगराच्या कडेला केलेले भारतातील सर्वात मोठे असे हे  खोदकाम (रॉक-कट) भोवतालच्या हिरव्या वनश्रीमुळे शोभून दिसते. यातील शिववदन आणि गणेश या मूर्तीचे खोदकामही छान वठले आहे. इथे उनाकोटी टुरिस्ट लॉज आणि जुडी लॉज या ठिकाणी राहण्याची सोय होऊ शकते.          
महामार्ग क्र. ४४ च्या किंचित पश्चिमेला अगरतळ्याहून २७ कि.मी.वर कमलासागर हा रम्य तलाव आहे. त्याच्या कडेने भारत-बांगलादेशच्या सरहद्दीचे उंच तारेचे कुंपण आहे. जवळच उंचवटय़ावर १६ व्या शतकातील कालीमंदिर आहे. भोवतालच्या शांत व प्रदूषणविरहित वातावरणामुळे हे एक आदर्श सहलीचे स्थान म्हणून प्रसिद्ध झाले आहे.
खुद्द अगरतळा शहरात असलेल्या काही स्थळांत सरकारी म्युझियम, उज्जयंता पॅलेस व बांगलादेशाची सरहद्द ही रिक्षाने पाहता येईल अशी काही ठिकाणे आहेत.  शहराच्या मध्यभागी असलेला उज्जयंता राजवाडा (बंगालीत : उज्जयोंतो प्राशाद) हे निर्वविादपणे अगरतळातील एक देखणे स्थळ आहे. महाराज राधाकिशोर माणिक्य यांनी १९०१ मध्ये हा राजवाडा बांधला. हा राजवाडा म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत  त्रिपुराची विधानसभा होती असं सांगण्यात आलं. त्रिपुरातील लांबची स्थळं बघण्याच्या गडबडीत ऐन शहरातील ही सुंदर इमारत पहिल्या दिवशी माझ्याकडून पाहायची राहिली होती. शेवटी मुंबईला निघायच्या दिवशी सकाळीच घाईघाईने नाश्ता घशाखाली ढकलून गळ्यात कॅमेरा अडकवून मी सकाळी साडेसात वाजता राजवाडय़ाच्या मागील बाजूने त्याच्या प्रांगणात शिरलो. प्रासादाचे डागडुजीचे व रंगरंगोटीचे काम जोरात चालले होते. सुंदर नक्षीकाम केलेले दरवाजे, भव्य घुमट व स्तंभ, कारंजी, प्रमाणबद्ध पुतळे हे सर्व काम कौतुकास्पद आहे. राजवाडय़ासमोरील पटांगणातील पाणी खळाळते ठेवण्यासाठी त्याच्या ट्रफमधील लाद्या एकावर एक अशा ओव्हरलॅप करून बसवलेल्या आहेत. राजवाडा नीट पाहून व मनासारखे फोटो काढून झाल्यावर मी प्रासादापुढील तळ्यांचे फोटो घेऊन माझ्या हॉटेलमध्ये परतणार, एवढय़ात ‘मी फोटोसाठी आधी परवानगी घ्यावी, राजवाडा पाहायची अधिकृत वेळ वस्तुत: संध्याकाळची आहे,’ असे तेथे अवचितपणे आलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. रात्री दिव्यांच्या रोषणाईत राजवाडा अधिक सुंदर दिसतो असे मला नंतर कळले.
अमृतसरला गेल्यावर पर्यटकांचा तिथे वाघा बॉर्डरला भेट देण्याचा कार्यक्रम असतो. पण तिथे होणाऱ्या अतोनात गर्दीमुळे ध्वज उतरवण्याचा तो कार्यक्रम मोठय़ा मुश्किलीनेच पाहायला मिळतो. अगरतळा शहरापासून जवळच बांगलादेशची सरहद्द आहे. एकूणातच भारताच्या या ईशान्य भागात तसे पर्यटक कमीच येतात, त्यामुळे इथला हा सोहळा निवांतपणे अवलोकन करता येतो. आमची रिक्षाने तिथे संध्याकाळी पाचच्या आधी पोचण्याची लगबग चालली होती. त्या रस्त्यावर सरहद्दीच्या अलीकडे आवश्यक वस्तू हद्दीपलीकडे नेणारे ट्रक वाटेत आडवेतिडवे उभे होते. त्यामुळे आम्ही रिक्षा बऱ्याच आधी अंतरावर सोडली. सकाळी पाऊस पडून गेल्यामुळे मातीच्या रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला होता. ध्वज उतरवण्याची वेळ गाठण्यासाठी सरहद्दीजवळ पोहोचण्यासाठी आम्ही धांदल करीत होतो. आपल्या सरहद्दीच्या पुढील ‘नो मॅन्स लॅण्ड’नंतर लगेचच बांगलादेशची सीमा सुरू होताना पाहिली. राष्ट्रध्वजाला जवानांनी सलामी दिल्यावर ब्युगलच्या धीरगंभीर आवाजात तिरंगा हळूहळू खाली उतरवण्यात आला. वरिष्ठांच्या आज्ञेनंतर ध्वजाची छान घडी घालून तो योग्य जागी ठेवण्यात आला. तेथील अधिकाऱ्यांनी आमची विचारपूस करून आमच्या चहापानाची सोय केली. कडक इस्त्रीच्या लष्करी गणवेशामागे दडलेल्या माणुसकीचे आम्हाला त्यातून दर्शन घडले.

Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार