आज बऱ्याच दिवसानं एस.टी.नं प्रवास करीत होतो. शिव्या शिकायचा क्लास लावल्यापासून मी जीप, ट्रक, टेम्पू, रिक्षा, काळी-पिवळीमधूनच प्रवास करतो. ड्रायव्हरच्या जवळ कॅबिनमधी बसलं की आपुन मल्या मंजी आपसुकच शिव्या शिकतं माणूस.. आहो आजकाल सरकारी आफीसात शिव्या देल्याबगर कामच होत नाही म्हणून हेव खटाटोप.. पण खरं सांगायचं म्हणलं तर काळी-पिवळी रिक्षासारखी मजा एस.टी.त बसल्यावर येईना. समोरून आलेलं वहान रोडच्या खाली घालायची कला एस.टी.वाल्याला येत नाही. तेच आपली गाडी हातभर खाली घालतेन. फक्त खुन्नस देण्याचा ड्रायव्हरी गुण इथं दिसतु- अन् गती त असी की कालच्या पोऱ्हायनं तीन-तीन, चार-चार सिट बसील्याली. मोटर सायकली पुढं काढावी का? मी त बोरं झालो म्हणून आतल्या बाजूनं तोंड फिरवून बसलो. बघतो त प्रवासी बावण उभे, तेरा  बाकीचे आडवे, पेऊन.
     मला वाटलं आपुन चुकून बाजार गाडीत बसलोत का काय? तसाच कालवा, गर्दी, गोंधळ. खेडय़ा-पाडय़ातून शाळा-कॉलेजात जाऊन येऊन करणाऱ्या पोऱ्हायची त्याच्यात भर.. पण वळखू येत नव्हते. कारण दप्तराच्या जागी हातात मोबाइल.. संभाषणाच्या जागी गाणं.. काही काही पोरं बिचारे आपले हेडफोन लावून आप्पलपोटय़ावानी एकटेच ऐकतेत, तर काही जण सगळ्यायला ऐकू जावा म्हणून. हाई-न्हाई तेवढा आवाज सोडून ऐकवीत होते. बाकीच्या प्रवाशाला हेव मिश्र संगीताचा कार्यक्रम पैसे देऊन ऐकावं लागत व्हता. खरं तर  कंडक्टर मंजी सगळ्यात चिडचिडी जात. पण त्यानं बी याह्य़च्या पुढं हात टेकले.
     पोरांच्या हातातले मोबाइल संपर्कापेक्षा पोरीला बेजार करायसाठीच वापरीतेत. पण आता पोऱ्हीयनं बी मोबाइल हातात घेऊन जशाला तसं उत्तर सुरू केल्यापसून बरं चाललंय. फेसबुकवर बसू बसू आता त्याह्य़ची बैठक सुधारली. शासनाचा शिक्षणावर होनारा १.७१ टक्के खर्च पोऱ्हायनं वापरलेल्या रिचारजरच्या सरकारी कमिशनवर फिटत असंन. खरं तर काळासंगं बदलून एक ऐच्छिक विषय म्हणून कॉलेजला एक स्वतंत्र पिरेडच पाहिजी, ज्याच्यात इतर तासात येनारे पोऱ्हायचे अन् गुरुजीचे सगळे कॉल वळील्याले असतेन. गुरुजीनं बी शिकवायचं सोडून आल्याला फोन घेन्यासाठी भाईर पडायची गरज पडणार नाही. बिनधास्त वर्गातच बोलता येईन. एस.एम.एस. सोडून पुस्तकं वाचत बसायचं काम नाही. एका बाकडय़ावर बसलोत म्हणून मित्र हे आता मोडून पडणं. आता आकरावीच्या पोऱ्हायला बारावीच्या वर्गात काय चाललंय हे फोनवर कळतं. त्याच्यासाठी वर्ष घालायची गरज नाही. आता वर्गात बसल्यावर वर्गातल्याच पोरायशी बोलावं असी सक्ती नाही. वरच्या वर्गातल्यायला बी बोलू शकतं. आत्ता एस.टी.त नाही का शिटवर बसल्याल्या शेजाऱ्याला गोपाळ वळखी काढून टाइमपास करण्यापेक्षा फोन लावून घराच्या, रानातल्या, दुकानातल्या, हापीसातल्या शेजाऱ्याला बोलता येतं. कंपनी टू कंपनी फ्री कॉलमुळं विचारच जुळावं असं काही नाही. सहज चलता-चलता बोलता येतं.
     काल आमच्या सुन्याचं असंच, चलता बोलता गेला टेम्पूखाली. मोटर सायकलवर, फोनवर बोलत-बोलत चलतानी टेम्पूला धडकला. टेम्पू रस्त्याच्या खाली अन् मालक खड्डय़ात, दोन-तीन लाखाला. अन्  सुन्याचा जीव जाता जाता राह्य़ला. ड्रायव्हिंग करतानी मोबाइलवर बोलतानी त्याचा जीव सगळा कानात असतू, तव्हा प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन बसतेत. मोबाइल, दारू अन् वहानं याच्या मधी नवी पिढी वाहून चालली. तिला आडवायची गरज वाटल्यामुळं गावानं येशीतच बांद घालायचं ठरिलंय. तस्या ह्य़ा तिन्ही गोष्टी सरकारची पिवर मोरंडी, मंजी पिकता मळा, टॅक्स देणारा; ज्याच्यातून आपल्याला विकासनिधी येतू.. दवाखाना, रोड करायला. ती पेल्यावर रोड पुरला पाहिजी ना चलायला. सरकारनं दारू इकनं बंद करायची का आपुन प्यायची बंद करायची हेव मोठा प्रश्न हे.
     कायद्याचं बंधन बांधून घ्यावं इतकं गाढवपण मानसात नाही. गाढवं एकदा दावणीजवळ उभा केलं अन् ज्या पायाला रोज चऱ्हाट असतं त्या पायाला नुसता हात जरी लावला तर ते स्वत:ला बांधून घेतं. म्हणून वेशीतच आम्ही कंट्रोल रूम बसवायच्या इचारात पाहिजीत. नाका चेक नाका. एकवीस वर्साच्या आतल्या पोऱ्हायला अन् त्याच्या बापाला कारणं दाखवा नोटीस.. तुम्हाला मोबाइल वापरायची परवानगी कामुन द्यायची? मोटार सायकलवरची चौथी चक्कर गावात मारायचं कारण काय? लेकरांच्या खिशात घुटक्याच्या पुडय़ा कामून अन् कुणाच्या पैशानं आल्या? येशीतच एक आवक-जावक रजिष्टर ठॉयचं. कोणत्या कामासाठी भाईर पडायचं? आज धाब्यावर खाऊनपेऊन यायचं कारण काय? तुमच्यासोबत कोण कोण हाई? त्यांचा धंदा काय? त्यात बापाच्या जिवावर जगणाराची संख्या किती व कधीपसून? अस्या रिकामटेकडय़ांकडं पाहुने म्हणून लोकांनी का यावं?  गावातल्या निरव्यसनी, कर्तृत्ववान पोऱ्हायची एक लिस्ट अन् नालायक, बिघडलेल्या पोऱ्हायची एक, येशीतच लावल्याली ठॉॅयची.  पोलीस स्टेशनसारखी. कारण आपल्याला माणूस नाही गिऱ्हाईक केलंय अन् बाजारात गिऱ्हाईक हे नफा कमवायसाठीच असतंय. आपुन कोन्हाच्या नफ्याचं साधनं होऊन आपला दुसऱ्याला फायदा जरूर व्हावा. पण त्याच्या फायद्यासाठी आपलं नुकसान कोन्ही करीत आसनं त ते शोधता आलं पाहिजी.
      टीव्ही मालीकान बाया-पोरीची अन् मोबाइल गाडीनं पोऱ्हायची मती गुंग झाली. हेव नवा नशा प्रकार हाई. तुमच्याकडून बंडखोरी क्रांती होऊ नी म्हणून हे शडयंत्र. जरा जपून. टीव्ही, मोबाइल हे विज्ञानाचं लेकरू हे, पण शिंदीचं कसं असतं दिवस निघायच्या आत काढली तर निरा नाहीतर दारू..
     रस्त्याला वळण असलं तर अ‍ॅक्सीडेंट होतेत अन् मानसाला वळण नसलं तर उधवस्त होतेत. मानसाचं वळण गावाला लागतं. अन् गावाला वळण असलं की आडवळणाची गावंबी फोकसमधी येतेत. येडय़ावाकडय़ा वळणाच्या रस्त्याला आपुन दगडं, पाटय़ा, रेडीयम लावून धोके कमी करतोत. पण वळणं नसलेल्या गावाला नीट करायला चांगले मानसं जागो-जागी उभा करावं लागतेत. आपल्या इथं सरळसोट वळणाची गावं अस्ताव्यस्त वाढली.. ती शिवार खात-खात. गाव खुराच्या मळ्याला गावठानात बदलून माळे उभा राहायलेत. अन् गाव आता गावठाणं सोडून फाटय़ावर येऊन बसलंय. गावाला शीव राहिली नाही ना मर्यादा, गाव कुठूनं सुरू होऊन कुठं संपत याची. पहिलं जणू भारत खेडय़ांचा देश व्हता, आता रस्त्यावरच्यांचा झालाय. कारण शहर असू का गाव सगळ्यायलाच रोडटच राहायचंय.. सगळेच आता हागल्या मुतल्याला रस्त्यावर यायलेत हमरीतुमरीला. अन् चांगले म्हणून घेनारे मंग मतदानाला बी भ्यायलेत. रस्त्यावर नगं म्हणून. तसं बंधन म्हणून कायदे हाईत, पण ते हातात असल्यामुळं सहज तोडता येतेत. मंगळसूत्रासारखे ते गळ्यात असते त मेल्याशिवाय तोडता नसते आले. खरं तर मंगळसूत्र हातात अन् कायदे गळ्यात असते त माणसं वळणात राहिले असते. ही नवी पिढी बंधनात आनायसाठी आपले आपुनच नियम गावाच्या गळ्यात बांधून घ्यायचेत. तोडता येऊ नी म्हणून.. आता येशीतच त्याची आमलबजावणी झाली पाहिजी. आता वेशीत टोल नाही, तोल सांभाळायचा.. उद्याच्या समाजाचा. नवी पिढी म्हणजी बियाणं. ते पेरायचं का कोंबडय़ायला चारायचं हे आपलं आपुनच ठरवायचं..